पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक १६ ते २१
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
स्वयंज्योतिर्भवत्येष पुरोऽस्माद्भासतेऽखिलात् ॥
तमेव भांतमन्वेति तद्भासा भास्यते जगत् ॥१६॥
सि० - “अत्रायं पुरुष: स्वयं जोतिर्भवति" ॥ “तस्य भासा सर्वमिदं विभाति” ॥
इत्यादि अनेक आहेत श्रुति ॥ प्रमाण इया ॥८८॥
जो स्वत: स्वयं प्रकाश ॥ तयाचेचि प्रकाशें सकलभास ॥
तया प्रकाशनीं कोण्याही वस्तुस ॥ सामर्थ्य नसे ॥८९॥
येनेदं जानते सर्वं तत्केनान्येन जानताम् ॥
विज्ञातारं केन विंद्याच्छक्तं वेद्ये तु साधनं ॥१७॥
यजाचेनि योगानें ॥ सकल वस्तु जात जाणणें ॥
तयासी आतां कोण्याप्रमाणें ॥ सिद्ध करशी ॥९०॥
“विज्ञातारं केन विजानीयात् ॥ ऐसे अनेक श्रुतिसिद्धांत ॥
तेंचि प्रमाण घेउन बोलत ॥ आम्हीं सदांसर्वदां ॥९१॥
वादी - मन सकलही वस्तु जाणें ॥ जयाठाईं असें ज्ञानाचें ठाणें ॥
तयाशीं आत्मज्ञान न होणें ॥ हें कायी आतां ॥९२॥
सि० - “यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह” ॥ इति ॥
बोलियली प्रमाण श्रुति ॥ अनुभव ही त्याच रिती ॥
परि अज्ञात आंतर्यामि जाण ॥ तया कैसा कळे ॥९४॥
मनाचें जें मूळरूप ॥ तें तया कैसें ये समीप ॥
आपणचि आपुला बाप ॥ व्हावें कैसें ॥९५॥
पाहतांचि कैसा होईल पाहणें ॥ ज्ञाताचि कैसा होईल जाणणें ॥
आपणचि आपुले स्कंदीं बैसणें ॥ हें घडे कैसें ? ॥९६॥
कर्ताचि कर्म होता ॥ शास्त्रा येई विरोधता ॥
म्हणोनि मन ही आत्मा जाणता ॥ होऊं न शकें ॥९७॥
स वेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता ॥
विदिता बिदिताभ्यां तत्पृथग्बोधस्वरूपकम् ॥१८॥
‘स वेत्ति वेद्यं नच तस्यास्ति वेत्ता’ ॥ ‘अन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि’ इति ॥
प्रमाणें बोलियली श्रुति ॥ तेंचि आमुची वाचा वदती ॥ जाहली श्लोकें ॥९८॥
अरे सकला जो वेत्ता ॥ तया कोण होय वेद्यकर्ता ॥
ज्ञानाज्ञान विरहिता ॥ कैसा जाणसी ॥९९॥
बोधस्वरूप आत्मा जाण ॥ नाहीं जयाशीं अज्ञान आवरण ॥
तयाशीं कोणतें प्रमाण धरून ॥ विषय करशी ? ॥१००॥
वादी - ज्ञानाचा न होय विषय ॥ अज्ञानाची मुळींच नाहीं सोय ॥
तयांचा अनुभव तरी कैसा होय ॥ आम्हां सांगा ? ॥१०१॥
बोधेप्यनुभवोयस्य न कथंचन जायते ॥
तं कथं बोधयेच्छास्त्रं लोष्ठं नरसमाकृतिम् ॥१९॥
सि० - श्रुति युक्ति प्रमाणद्वारें ॥ जया आंगीं बोध न शिरे ॥
तया मूर्खाशीं कोण्या प्रकारें ॥ शास्त्रें बोधावें ? ॥१०२॥
ते नराकृती असती पाषाण ॥ जयासी न शिवे बोध जाण ॥
शास्त्रें तयाशीं डावलून ॥ सदां जाती ॥१०३॥
द्विपद पशूंच्या जाती ॥ मनुप्यामध्यें कांहीं असती ॥
ऐसें आचार्यही बोलती ॥ भाष्यांमधें ॥१०४॥
घटादि प्रत्यक्ष पहातां ॥ अनुभवी अनुभव नाहीं म्हणता ॥
तया दगडाशीं बुद्धि माता ॥ सोडुनी गेली ॥१०५॥
जया जवळी नाहीं बुद्धि ॥ तया अनुभवाची कैची सिद्धी ॥
नपुंसकाशीं रंभा विद्धी ॥ हें कैं घडे ? ॥१०६॥
जन्मांध असतां डोळा ॥ काय करील सूर्याचा गोळा ॥
बधिरापुढें गायन लीला ॥ काय करती ? ॥१०७॥
तैसेची जड मंद मती ॥ तया नरा शास्त्रें काय करती ॥
ऋद्धि सिद्धी आल्या कृपणाहातीं ॥ तरि कां दाता होई ? ॥१०८॥
जिव्हा मेऽस्तिन व्येत्युक्तिर्लज्जाजै केवलं यथा ॥
न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति ताद्दशी ॥२०॥
जिव्हा आहे कीं नाहीं पुसणें ॥ हे बोलचि जैसे लाजिखाणें ॥
तैसेचि खात्मबोध नाहीं म्हणणें ॥ हें घडे कैसें ? ॥१०९॥
आपणचि नाहीं म्हणशी ॥ तरी व्याघात होती बोलण्याशीं ॥
जिव्हेविण कैसा पुसशी ॥ नाहीं आहे ऐसें ? ॥११०॥
तात्पर्य तुझाचि तुजला ॥ बोध न होता झाला ॥
हें काय आणिकाला ॥ पुसावें लागे ? ॥१११॥
वादी - असो ऐसा बोध झाला ॥ तेणें काय फळ लाधला ॥
प्रस्तुत ब्रम्हाज्ञानाच्या उपेगाला ॥ काया आलें ? ॥११२॥
यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ॥
यद्बोधमात्रं तदब्रम्होत्येवंधीर्ब्रम्हानिश्चय: ॥२१॥
सि० - लोकीं जो जो विषय हो ज्ञानाला ॥ तो तो उपेक्षुनी हो टाकिला ॥
शेवटीं तया ही ज्ञानाला ॥ उपेक्षावें ॥११३॥
विषय ज्ञानासीं उपेक्षोनी ॥ जें राही तें न टाकवें कोणाचेनी ॥
तयाशीं च सकळ ज्ञानी ॥ ब्रम्हा बोलती ॥११४॥
हाचि बुद्धिचा निश्चय बाणणें ॥ तयाशींच ब्रम्हाज्ञान म्हणणें ॥
हें स्वबोधाचेंनि योगें मिळणें ॥ होय सदां ॥११५॥
वादी - विषय ज्ञान उपेक्षितां ॥ ब्रम्हाज्ञान लाभें हातां ॥
मग पंचकोश विवरितां ॥ कां जाहलां ? ॥११६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2014
TOP