साम्राज्यवामनटीका - श्लोक ८१ ते १००
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते
हें पवित्र यशा तुझें ते श्री माया असेच कीं ।
जग मायामयी यांत असे सत्य स्वरूपची ॥८१॥
एवं ऐश्वर्य वैराग्य ज्ञान धर्म यश श्री ही ।
षडिवध गुण जे त्यांतें भग नामचि बोलती ॥८२॥
भग तेंचि जग असे आत्मा तोच म्हणूनिया ॥
भग नाम जगीं वंत आत्माच भगवंत तो ॥८३॥
तो आत्मा वंत सुवर्ण भगनाम जगीं नगीं ।
म्हणूनि तो वासुदेव भगवंत हि तो असे ॥८४॥
भगवंत वासुदेव देहीं ब्रम्हांड अंतिंही ।
जाणती कल्पिती त्यातें नमितीच पुन: पुन: ॥८५॥
दिसे निर्गुण बुद्धीतें इंद्रियां जग षडगुण ।
पाहे प्रत्यक्ष निर्गूण भगवान् हरि तो स्वयें ॥८६॥
जगीं षडगुण पाहे जों मनीं आवेश होय तो ।
निजीं निर्गुण षडगुणीं पाहे विश्व हरीच तो ॥८७॥
रीती अनुभवाची हे सर्वभूतींच षडगूण ।
आत्मभक्त अनुभवी त्या सर्वीं भगवंत तो ॥८८॥
त्रिगुणातीत निर्गूण षडगूण सगुणचि जो ।
सेव्यसेवकभावें ही ज्या घ्यानीं वासुदेवची ॥८९॥
वसे सुवर्णचि नगीं भगवंत तसा भगीं ।
भगशब्दें जगचि त्या म्हणूनी वासुदेव तो ॥९०॥
इंद्रियां जो जगद्भास पाहाती जगदीश्वर ।
गुरुक्ती करुनी ज्ञान होतां जें आठवूनि तें ॥९१॥
वासुदेवाय भगवते नमो प्रणवयुक्तची ।
जपती ते ब्रम्हाभूत पदवी पावती स्वयें ॥९२॥
सर्वभूर्ती ब्रम्हादृष्टी भगवंतचि पाहती ।
प्रसन्न वर्तति सदा शोककांक्षादिवर्जित ॥९३॥
सर्वभूतीं न त्यां द्वेष सृष्टी ज्यां भगवद्रुप ।
दिसें जें तें लहरि ती पाहे अमृतसिंधुची ॥९४॥
मुमुक्षा तारि मित्रत्वं दया भूतीं असीच कीं ।
प्रतिबिंबरुपें भोक्ता सर्वत्र वासुदेव ज्या ॥९५॥
न त्या अहंकृति परि स्फुरे प्रारब्ध भोगितां ।
कर्मशक्ती जाणुनी ते पाहे दु:खसुखीं सम ॥९६॥
भगवद्भाव सर्वत्र क्षेत्रज्ञ जगदीश्वर ।
पाहे करी सुखी नेदी दु:खें भलतया हि तो ॥९७॥
सर्वभूतीं स्वात्मखूण क्षमापरापरधि त्या ।
न दाखवी वक्रभाव कायावाचामनेंहि जो ॥९८॥
द्वादशाक्ष्ररमंत्राच्या जपादीही जपांतिची ।
अर्चिती त्या यथाउक्त उपचारकल्पनात्मकें ॥९९॥
स्वधर्मादिक कर्मे जीं कृष्णपादींच अर्पिती ।
सर्वात्मभावें नमिती अनंतत्व स्मरोनियां ॥१००॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP