परिकर अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
विशेषणें (गूढ) अभिप्रायानें युक्त असणें म्हणजे परिकर अलंकार. साभिप्राय विशेषणें असणें म्हणजे, प्रस्तुत अर्थाला उचित ठरविणार्या व चमत्कार उत्पन्न करणार्या, व्यंग्यानें युक्त असणें, असें असल्यामुळेंच (म्ह० साभिप्रायत्वाची ही व्याख्या असल्यामुळें), हेतु अलंकार या अलंकाराचा निराळेपणा आहे. हेतु अलंकारांत व्यंग्य आवश्यक नसतें. उपपादक असणें याचा अर्थ, समर्थक होणें, अथवा योग्य अर्थ उत्पन्न करणें, यापैकीं कोणताही अर्थ. या अलंकारांत व्यंग्य गौण असल्यामुळें येथें ध्वनीचा व्यवहार केला जात नाहीं.
(परिकर अलंकाराचें) उदाहरण :--- सर्व मंत्रांनीं निराशेनें हात टेकले, औषधांनीं (आपले) डोळे मिटले, देवांचे समूह घाबरून गेले; दाट अमृताचे रस गळून पडले; व मरकतमणी फुटून गेले; आपल्या लाटांनीं कालिया सर्पाच्या शत्रूचे (म्ह० श्रीकृष्णाचे) चरण जिनें धुतले आहेत, अशा हे स्वर्गंगे ! (भागीरथी), आतां तूं (तरी) संसारभयरूपी सापानें विळखा घाटलेल्या माझा ताप दूर कर.
ह्या ठिकाणीं भागीरथीनें प्रपंचरूपी सापाच्या दंशानें उत्पन्न झालेला स्वत:चा (म्ह० वक्त्याचा अथवा कवीचा) ताप दूर. करावा अशी आशा करणें हा वाक्यार्थ आहे. ह्या ठिकाणीं भगवती भागीरथीनें संसाराचा ताप दूर करणें ही गोष्ट सुप्रसिद्ध असल्यामुळें परिणाम अलंकाराच्या मदतीनें म्ह०) सर्प ह्या विषयीनें (उपमानानें) प्रपंचभयरूपी विषयाशीं (म्ह० उपमेयाशीं आपलें तादात्म्य करून, त्या द्वारा सर्पाकडून होणारा संताप भागीरथीकरवीं दूर करणें, ही गोष्ट सहजच सिद्ध करतां आली (असें तादात्म्य झालें नसते तर ही गोष्ट शक्य नव्हती.)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP