“वर वर तलवारीच्या धोरच्या आकाराचे आणि भयंकर भुजंगापेक्षांही क्रूर, पण आंतून द्राक्षाला गोडपणाची दीक्षी देण्यांत मूर्तिमंत गुरुच असे अलौकिक लोक उत्कर्ष पावतात.”
ह्या आर्येंतील पहिल्या चरणांत उपमा आहे व दुसर्या चरणांत व्यतिरेक अलंकार आहे. ह्या दोन अलंकारांशीं म्ह० त्या दोहोंच्या समुच्चयाशीं, व आर्येंच्या उत्तरार्धांत असणार्या (लुप्त) उत्पेक्षेशीं हा उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.
“ हे राजा, तूं शत्रुराजांना मूर्तिमंत यम, त्या शत्रुराजांच्या प्रदेशाला साक्षात अग्नि, सज्जनांना खरोखरी धर्मराज, धन इच्छिणारांना कुबेर, शरण येऊं पाहणारांना वज्राच्या टोकांनीं निर्माण केलेलें घर - अशा रीतीनें ह्या पृथ्वीवर तूं एक असूनही ब्रम्हदेवानें तुला अनेकरूप केलें आहे.”
ह्या श्लोकांत, कवीनें राजाला यम वगैरे रूपांनीं साकार केल्यानें, रूपकालंकार झाला आहे आणि राजा समोर आला असतां शत्रुराजांना तो यम वगैरे आहे अशी भ्रांति होणेंही संभवते, म्हणून भ्रांतिमान् अलंकारही आहे; (असे दोन अलंकार होतात); व शत्रूराजे वगैरे अनेक ग्रहीत्यांनीं यमत्व वगैरे अनेक धर्माच्या द्दष्टीनें राजाचा उल्लेख केल्यामुळें, पूर्वीं सांगितल्याप्रमाणें येथें उल्लेखालंकाराचा एक प्रकारही झाला आहे; व शेवटी या तिन्ही अलंकारांशीं मिश्रित झालेला व श्लोकांतील, संबंध दाखविणार्या पष्ठीबहुवचनाच्या अनेक प्रयोगांमुळें, वर्णनाला विषय असणारा राजा अनेकविध होऊन त्यामुळें एक उल्लेखालंकार झाला आहे.
ह्या ठिकाणीं ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे :---
आम्ही प्रथम सांगितलेल्या उल्लेखाच्या “ज्याला महाविष्णु असें वैष्णव म्हणतात, शिव असें शैव समजतात, यज्ञ पुरुष असें यजमान समजतात, निसर्ग असे नास्तिक समजतात, व ब्रम्हा असें उपनिषदांचे ऋषि मानतात तो हा आदिपुरुष श्रीहरी आहे.”
ह्या प्रकारांत अनेक प्रकाराच्या ग्रहीत्यांना होणारीं जीं अनेक प्रकारचीं ज्ञाने, त्यामुळें चमत्कार उत्पन्न जाला आहे, ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे; व त्यामुळेंच येथें उल्लेखालंकार झाला आहे. परंतु उल्लेखाच्या दुसर्या प्रकारांत,
“शिष्ट पुरुषांच्या ठिकाणीं दयाळु, दुष्टांच्या ठिकाणीं क्रूर” इत्यादि वाक्यांत, विषयांच्या भेदामुळें झालेल्या अनेक प्रकारांमुळेंच केवळ उल्लेखालंकार झाला आहे. या दुसर्या प्रकारांत ग्रहीत्याला होणार्या ज्ञानाचा अंश हजर असूनसुद्धां त्यामुळें उल्लेखालंकार झालेला नाही; कारण त्यांत चमत्काराचा अनुभव नाहीं. उपमा वगैरे अलंकार होण्याला चमत्कारच कारण असतो, ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच अशी आम्ही विषय वगैरेपैकीं कोणत्यातरी एकाच्या अनेकत्वामुळें एका वस्तूचे अनेक प्रकार होणें म्हणजे उल्लेख, असें या दुसर्या उल्लेखाचें लक्षण केलें आहे. वर उल्लेखालंकाराचीं जीं दोन लक्षणें केलीं आहेत त्यांपैकीं, कोणतेंही एक लक्षण असणें, हेंच उल्लेखालंकाराचें सर्वसामान्यलक्षण आहे. असें कुणी म्हणतात.