आतां अप्पयदीक्षितांनीं म्हटलें आहे कीं,
“अशा रीतीने, जर :----
‘तुझ्या मुखाला कांतीमुळें कित्येक चंद्र समजतात तर, दुसरे कुई सुंगधामुळें कमळ समजतात, पण आम्ही म्हणतों. कीं तुझें मुख हें, तप आचरल्यामुळें दोन्ही मिळून एक झालेलें, चंद्र व कमळच आहे.’
ह्या अपहनुति अलंकाराच्या विशिष्ट प्रकारच्या उदाहरणांत, उल्लेखाच्या लक्षणाची अतिव्याप्ति होईल अशी शंका वाटत असेल तर, त्या उल्लेखाच्या लक्षणांत, एका वस्तूच्या अनेक प्रकारच्या उल्लेखाला, निषेधाचा ज्याला स्पर्श झाला नाहीं, असें विशेषण द्यावें, म्हणजे झालें. आणि तसें केल्यानंतर, (‘कान्त्या चंद्रं’) इत्यादि वरच्या उदाहरणांत आलेल्या पहिल्या दोन उल्लेखांत, दुसर्यांच्या मताचा निर्दिश केल्यानें, त्या रूपानें निषेधाचें सूचन होत असल्यामुळें, येथे उल्लेख अंलकार होत नाहीं. आणि म्हणूनच उल्लेखाच्या लक्षणाची येथील अपहनुति अलंकारांत, अतिव्याप्ति होत नाहीं.”
हें अप्पय्यदीक्षितांचें म्हणणे योग्य नाहीं. त्यांनीं आपल्या ग्रंथांत, ‘हा उल्लेखालंकार दोन प्रकारचा आहे; एक शुद्ध व दुसरा कोणत्या तरी अलंकाराशीं मिश्रित, असें म्हणून पुढें स्वत:च म्हटलें आहे कीं :---
‘श्रीकंठ या देशाच्या वर्णनांत, ‘यस्तपोवनमिति मुनिभ्रगृह्यात’ (ह्या श्रीकंठ देशाकडे पाहून मुनींना वाटलें कीं हें तपोवनच आहे.) ह्या वाक्यांत शुद्ध उल्लेखालंकार आहे तर, ‘यमनगरमिति शत्रुभि:, वज्रपञ्जरमिति शरणागतै:’ (श्रीकंठ देशाकडे पाहून शत्रूंना वाटले कीं, हें यमनगर आहे व शरण आलेल्या लोकांना वाटले कीं, हा वज्राचा पिंजरा आहे.) ह्या वाक्यांत, उल्लेखालंकार हा, भ्रांति, रूपक वगैरे अलंकाराशीं मिश्रित आहे.’ तेव्हां ह्या ठिकाणीं सुद्धां (म्हणजे कान्त्या चंद्र इत्यादि श्लोकांत सुद्धां,) उल्लेख अलंकार अपहनुति अलंकाराशीं मिश्रित आहे असें म्हणणें अगदीं सोपें आहे. आणि शिवाय, यासारख्या अपहनुति अलंकाराचें निवारण करण्याकरिता तुम्ही उल्लेखाच्या लक्षणांत ‘निषेधाचा ज्याला स्पर्श नाहीं तो,’ असें विशेषण दिलेत खरें, पण,
“ कवटींत पडलेल्या चंद्राच्या किरणांना, दूध मानून, मांजर चाटीत आहे; झाडांच्या पानांच्या झरोक्यांतून खालीं आलेल्या चंद्रकिरणांना, कमलतंतु समजून, हत्ती सोंडेनें खेचीत आहेत; अंथरुणावर पडलेल्या चंद्रकिरणांना,हें (माझें) पांढरें पातळ आहे असें समजून, एक स्त्री रतिक्रीडेनंतर हातानें ओढीत आहे; अशा रीतीनें, आपल्या प्रभेनें धुंद झालेला चंद्र सार्या जगाला वेडे करून टाकीत आहे, हें केवढें आश्चर्य ?”
ह्या, तुम्ही भ्रांति अलंकाराचें उदाहरण म्हणून दिलेल्या, श्लोकांत, उल्लेखाची अतिव्याप्ति होऊं लागेल. तिचें निवारण तुम्ही कसें कराल ? कारण वरील भ्रांतिमानअलंकाराच्या उदाहरणांत, मांजर, हत्ती वगैरे अनेक ग्रहीते असल्यामुळें, तेथेंही उल्लेखालंकार आहेच; आणि शिवाय, तो उल्लेख होण्याला आपापल्याला प्रिय असलेला आहार अथवा वस्तु घेण्याची इच्छाया रूपानें, उल्लेख अलंकाराला कारण होणारीं अनेक निमित्तेंही वरिल श्लोकांत आहेत. म्हणून, इतर अलंकारांशीं उल्लेखाचें मिश्रण होऊ न देण्याचा तुमचा (हा) प्रयत्न व्यर्थ आहे.