उल्लेखाचें उदाहरण :---
“मनुष्यांनीं, उत्तम गति प्राप्त करून देणारी म्हणून, देवांनीं, ही आमची नदी म्हणून, सर्व सिद्धांच्या समूहांनीं, ही फार मोठी सिद्धि देणारी आहे म्हणून, आणि आसक्तिरहित अशा मुनींनीं, ही श्रीहरीची तनु म्हणून, जिचा आश्रय केला जातो, अशी ही शंतनूची अंगना (म्ह० भागीरथी) माझ्या शरीराचें कल्याण करो.”
ह्या ठिकाणीं, गंगेचा लाभ व्हावा हें एक निमित्त व तिची आवड हें दुसरें निमित्त, या दोन निमित्तांनीं अनेक ग्रहीत्यांना उत्तम गति प्राप्त करून देणारी वगैरे अनेक प्रकारचीं ज्ञानें झाल्यानें उल्लेखालंकार झाला आहे; व तो गंगोविषयींच्या (कवीच्या) भक्तिभावाला उपस्कारक झाला आहे. वरील श्लोकांतील उल्लेखालंकार शुद्ध आहे. (असें समजावें.) कारण त्याच्याशीं रूपक वगैरे अलंकारांचें मिश्रण झालेलें नाहीं.
पण हा उल्लेखालंकार इतर अलंकारांशीं मिश्रित असाही आढळतो. उदाहरणार्थ :---
“हे सुंदरी, मंदहास्यानें युक्त अशा तुझ्या मुखाकडे पाहून भुंगे, ‘हें कमळ आहे’ अशा भ्रांतीनें अत्यंत आनंदित होतात; आणि हें सखि, पूर्णिमेच्या चंद्राची भ्रांति झाल्यामुळें, चकोर पक्षी, खूप वेळ, आपल्या चोंचा हालवितात.”
ह्या ठिकाणीं एकेकट्या होणार्या भ्रांतिज्ञानाशीं (म्ह० भ्रांतिमान् अलंकाराशीं ) अनेक ज्ञने अनेकांना झाल्यामुळें होणारा (समुदायात्मक उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.
“हिला सर्व लोक स्त्री म्हणून खुशाल म्हणोत; पण मला तर वाटतें कीं, ही तरुणांची मूर्तिमंत तपश्चर्याच फळाला आली आहे.”
ह्या ठिकाणीं, वनिता ह्या विषयाचा वनितात्व हा धर्म, दुसर्याला जरी संमत असला तरी, मला मात्र मात्र संमत नाहीं या स्वरूपानें, निषेध्य म्हणून सांगितला असल्यामुळें, अपहुनुति अलंकार झाला आहे व त्याच्याशीं उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.