वरील कारिका सांगितल्यानंतर आनंद - वर्धनाचार्य पुढें लिहितत :---
“संकेताची वेळ जाणण्याची इच्छा ह्या माझ्या प्रच्छन्न कामुकाला आहे. असें जाणून त्या चतुर स्त्रीनें, हसत हसत व मिष्किलपणानें डोळें मिचकावीत, आपल्या हातांत गमतीखातर घेतलेलें कमळ, आपल्या दोन्ही हातांनीं, झाकून टाकालें.”
ह्या ठिकाणीं ‘हा (माझा प्रच्छन्न प्रियकर) संकेतकाल जाणू इच्छित आहे असें कळ्यावर, तिनें हातांतलें खेळायचें कमळ झाकून टाकलें,’ असें म्हणणार्या कवीनें, ‘कमळ झाकून टाकल्यामुळें रात्रीचा प्रारंभ सूचित होतो व हाच संकत समय’ असा अर्थ स्वत:च्या तोंडानेच सांगितला आहे. आणि म्हणूनच ह्या श्लोकांत ध्वनिमार्गाहून निराळा असा गुणीभूत व्यंग्याचा मार्ग आहे. (असें मानलेंच पाहिजे) अथवा :---
“या ठिकाणीं आमच्या वृद्ध आई (सासूबाई) निजतात, आणि ह्या ठिकाणीं सगळ्यांत जख्ख म्हातारे असे आमचे मामंजी निजतात; आणि आमची मोलकरीण घरांतील सगळें काम करून झालेल्या श्रमानें, गळूण गेलेली अशी ह्या ठिकाणीं पडते; आणि पापी अशी मी. बरंच दिवसाकरितां माझे पति दूरदेशीं गेल्यामुळें, ह्या ठिकाणीं एकटीच पडते; अशा रीतीनें, प्रवाशाला एका तरुणीनें, (सर्वांच्या निजावयाच्या) जागा दाखविण्याच्या मिषानें, म्हटलें”
ह्या ठिकाणी तूं माझ्याशीं रममाण होण्याकरतां नि:शंकपणें ये, हा अर्थ पहिल्या तीन ओळींतील वाक्यार्थानें सूचित झालेलाच होता; तरी पण ‘(सर्वांच्या) जागा दाखविण्याच्या मिषानें,’ असें सांगणार्या कवीनें तो व्यंग्यार्थ स्वत: स्पष्टपणें सांगितला; म्हणून ह्या श्लोकांतही ध्वनीचा मार्ग आहे असें म्हणतां येणार नाहीं.”
यानंतर ध्वन्यालोकाच्या तृतीय उद्योतांत गुणीभूत्त व्यंग्याचें निरूपण करीत असतां, आनंदवर्धनाचार्यांनीं जें लिहिलें त्याचें विवेचन करण्याच्या प्रसंगानें, अभिनवगुप्तपादाचार्य खालीलप्रमाणें लिहितात :---
व्यंग्यार्थाचें थोडयाशा बोलण्यानें सुद्धां जरी स्पष्टीकरण झालें तरी, त्या व्यंग्यार्थाचा गुणीभाव होतो: व त्यानेंच जास्त शोभा येते; म्हणून ज्या ठिकाणीं शब्दांनीं सांगितल्यावांचून, (केवळ) वाक्याच्या तात्पर्यावरूनच, व्यंग्यार्थ प्रतीत होतो, त्या ठिकाणीं, व्यंग्यार्थाचें प्राधान्य असल्यानें, ध्वनि आहे असें समजावें.
अशा रीतीने या प्रकारच्या सर्व विषयांत व्यंजक अथवा व्यंग्यार्थ यांना थोडासा जरी वाच्यार्थाचा स्पर्श झाला तरी, त्यांचें ध्वनित्व नाहींसे होतें, असें म्हणणारे आनंदवर्धनाचार्य व त्यांचे टीकाकार अभिनवगुप्तपादाचार्य ‘कांचित् काञ्चनगौरांगीम्० इत्यादि श्लोकांतले व्यंग्य शब्दांनीं सांगितलें असल्यानें त्याचें ध्वनित्व कसें बरें स्वीकारतील ?
वरील विवेचनावरुन, “दर्पणे च परिभोगदर्शिनी” या पूर्वी सांगितलेल्या श्लोकांत “लज्जा या व्यभिचारिभावाचा ध्वनि आहे” असें जें अप्पय दीक्षितांनीं म्हटलें आहे त्याचेंही खंडन झाले. थोडक्यात हा विषय सांगून झाला.
ह्या संशयामध्यें (म्हणजे ससंदेहालंकारामध्यें) असलेल्या संशयाच्या अनेक प्रकारांत, कुठें कुठें एकच समानधर्म असतो, तर कुठें तो निरनिराळा असतो; आणि तो समानधर्म सुद्धां कुठे अनुगामी असतो, तर कुठें बिंबप्रतिबिंबभावानें युक्त असा असतो; कुठें तो शब्दानें सांगितलेला नसतो तर कुठें तो शब्दानें सांगितलेला असतो. ह्या द्दष्टीनें पाहतां, ‘मरकतमणिमेदिनीधरो वा’ इत्यादि ससंदेहालंकाराचें उदाहरण म्हणून पूर्वीं दिलेल्या श्लोकांत, श्यामत्वविशिष्ट अभिरामत्व हा एकच अनुगामी धर्म, संशयाचा विषय जो राम व संशयाचे प्रकार जे तमालवृक्ष व पाचूंचे डोंगर, या सर्वांना समान आहे, परंतु तो धर्म सूचित असल्यानें त्याचा शब्दानें निर्देश केला नाहीं. आतां शब्दानें सांगितलेल्या अनुगामी धर्माचें उदाहरण असें :---
“नेत्राला रमणीय वाटणारें सुंदर स्त्रीचें मुख पाहून, त्याच क्षणी लोकांच्या मनांत हें कमळ आहे का चंद्रबिंब आहे, असा संशय उत्पन्न झाला.”
ह्या ठिकाणीं नेत्राला रमणीय वाटणें हा धर्म तिन्ही ठिकाणीं एकच अनुगामी धर्म म्हणून निर्दिष्ट केला आहे. निराळा अनुगामी धर्म निर्दिष्ट केल्याचें उदाहरण पूर्वी आलेल्या ‘आज्ञा सुमेषो:’ इत्यादि श्लोकांत मिळेल.
अथवा ह्याचेंच दुसरें उदाहरण, “त्या अतिशय कृशांगी, व आपल्या शोभेनें जिनें सर्व जगाला प्रकाशित केलें आहे अशा तिला, पाहणार्या लोकांच्या ह्रदयांत, ही वीज आहे का पूर्णिमेची रात्र आहे असा संशय उत्पन्न झाला.”