मिथिला नगरांतील लोकांच्या ह्या उक्तींत त्यांना वाटणरी चिंता व्यक्त करणारा, (सूचित करणारा) संदेहच केवळ आहे. (ससंदेह अलंकार नाहीं.) अशा ह्या संदेहाच्या ठिकाणीं, संदेहालंकाराची होणारी अतिव्याप्ति टाळ्याकरतां वरील लक्षणांत साद्दश्यमूलक हे शब्द घातले आहेत; व त्याचा अर्थ, साद्दश्याचें होणारें जें ज्ञान त्या ज्ञानरूप दोषानें उत्पन्न होणारी संदेहबुद्धि, असा आहे. (वरील लक्षणांत, साद्दश्यज्ञानरूप दोषानें उत्पन्न होणारी बुद्धि असें म्हटलें आहे) त्यामुळें, “सिंहाप्रमाणें दूर देशीं निघून जा, किंवा कुत्र्याप्रमाणें घरींच रहा.” या सिंहाप्रमाणें दूर देशीम निघून जा, किंवा कुत्र्याप्रमाणें घरींच रहा.” या परस्परांना विकल्प म्हणून येणार्या दोन उपमांच्या वाक्यांतील वा (किंवा) या शब्दानें प्रतीत होणारा विरोध ज्याच्यांत आहे अशा, रानांत जाणें व घरीं राहणें, ह्या अनेक धर्मांना स्पर्श करणारी व साद्दश्याला विषय करणारी जी संदेहबुद्धि, तिच्या ठिकाणीं संदेहालंकाराची अतिव्याप्ति होणाचा प्रसंग येणार नाहीं. कारण कीं. ह्या उपमाविकल्पालंकाराच्या उदाहरणांत असलेलें जें ज्ञान, तें साद्दश्यज्ञानरूप असतें. साद्दश्यज्ञानरूप दोषामुळें उत्पन्न झालेलें नसतें. ह्या संदेहालंकाराची मालारूपकाशीं अतिव्याप्ति टाळण्याकरतां, लक्षणांत ‘भासमानविरोधका’ (धी:) हें विशेष दिलें गेलें आहे, आणि उत्प्रेक्षेची व्यावृत्ति करण्याकरतां ‘समबला’ हें विशेषण दिलें आहे; व त्या विशेषणाचा अर्थ, ‘दोन पदार्थांना समान मानायला लावणारी सामग्री जिच्यांत आहे अशी बुद्धि’ असा आहे. वरील दोन विशेषणांनीं (सहज) कळणारें जें अनेकत्व तेंच जास्त स्पष्ट करण्याकरतां, ‘नानाकोटयवगाहिनी’ हें विशेषण दिलें गेलें आहे. “स्थार्णुवा पुरुषो वा” (हा खांब आहे का पुरुष आहे ?) ह्या व्यवहारांत वाटणार्या (रूक्ष) संशयाच्या निवृत्तीकरतां वरील लक्षणांत रमणीय हें विशेषण घातलें आहे; व चमत्कार उत्पन्न करणारी बुद्धि असा त्याचा अर्थ आहे. रमणीय हें विशेषण, अलंकाराच्या सामान्य लक्षणांतून हातीं येतेंच. याचप्रमाणें उपस्कारक हें विशेषण सुद्धां, सर्व अलंकारांच्या (सामान्य) लक्षणांतून मिळतें असें समजावें, वरील दोन विशेषणें, व ‘साद्दश्यमूलक’ हें तिसरें विशेषण यांचा, लक्षणांत अभाव असेल तर, (त्या ठिकाणीं संदेहालंकार होणार नाहीं.) तो केवळ संशयच होईल अथवा :---
“साद्दश्य हें जिचें कारण आहे, आणि निश्चय व संभावना ह्या दोहोंहूनही भिन्न अशी जी रमणीय बुद्धि (ज्ञान) तिला संशयालंकार म्हणावें,” असेंही ससंदेहाचें लक्षण करतां येईल. हा ससंदेहालंकार शुद्ध, निश्चयगर्भ (ज्याच्या पोटांत म्ह० मध्यभागीं निश्चय आहे असा) आणि निश्चयान्त (ज्या संदेहाचा निश्चयांत शेवट होतो असा,) असा तीन प्रकारचा आहे.