ज्याप्रमाणें समोर घोडा असतां, हा खांब आहे कां पुरुष आहे ? आस संशय उत्पन्न होतो; व ही जमीन, खांब उभा असलेली आहे कां पुरुष उभा असलेली आहे ? असा दुसरा एक संशय त्या पहिल्या संशयाला अनुकूल असा होतो, त्याप्रमाणें येथेंही समजावें; म्ह० सूर्य़किरण ज्याच्यामध्यें विषय आहे असा जो नंतरचा (दुसरा) संशय, तो पृथ्वीमंडळ ज्याचा विषय आहे अशा पहिल्या संशयाला गुणीभूत होऊन रहातो; व तो व्यंजनाव्यापारानें सूचित होत असल्यानें, त्याला, विषयावर विषयीचा आरोप करण्याला अनुकूल असणारीं जी समानविभक्ति तिची जरूर वाटत नाहीं. जरूर वाटते ती, साक्शात् शब्दांनीं ज्या ठिकाणीं आरोप केला जातो, अशा संदेहालंकारालाच. अर्थात् ह्या श्लोकांतील दुसरा संशय व्यंजनामूलक असल्यानें तो अध्यवसानमूलक आहे असें कसें म्हणतां येईल ? वरील विवेचनावरून संशयालंकार अध्यवसानमूलक असतो; असें प्रतिपादन करणार्या विमर्शिनीकारांचें म्हणणें खंडित झालें (असें समजावे).
आतां अप्पय्य दीक्षितांचें जें म्हणणे :--- “हिला निर्माण करण्याच्या बाबतींत (निर्माण) कर्ता, कांति देणारा चंद्र झाला असावा का केवळ शृंगाररसरूप असा स्वत: मदन (कर्ता) असावा ? का वसंतमास कर्ता असावा ? वेदाचा अभ्यास करून जडबुद्धि झालेल्या आणि विषयसुखापासून परावृत्त झालेल्या अशा त्या म्हातार्या मुनीला, हें मनोहर रूप निर्माण करण्याचें सामर्थ कोठून असणार ?
ह्या श्लोकांत संदेहाचे विषय असलेले चंद्र वगैरे पदार्थ अनेक आहेत.
परतुं संदेहाचा प्रकार (म्हणजे विधेय विशेषय) जिचें वर्णन प्रस्तुत आहे अशा स्त्रीला निर्माण करणारा, हा एकच आहे; म्हणून, ह्या ठिकाणीं संदेहाच्या अनेक कोटींचा (म्हणजे प्रकारांचा) अभाव आहे. त्यांमुळें, परस्परांशीं विरोध असल्यानें, परस्परांचा प्रतिक्षेप करणारे म्हणून, श्लोकांत आलेले जे अनेक प्रकार, त्यांचें वर्णन करणारा जो संशयालंकार त्याच्या लक्षणाची, वरील श्लोकांत, अव्याप्ति आहे. (म्हणजे वरील श्लोक संशयाच्या लक्षणांत येत नसल्यामुलें, त्यांत संदेहालंकार नाहीं.)”
तें बरोबर नाहीं. कारण कीं, ह्या श्लोकांत ‘हिला निर्माण करण्याच्या बाबतींत जो (निर्माण) कर्ता झाला, तो चंद्र होता का मदन होता का वसंत होता ?’ असा जो संशय, त्या संशयांत, निर्माणकर्ता (प्रजापती) हा विषय आहे; व चंद्र, मदन इत्यादि अनेक पदार्थ त्या संशयांत प्रकार म्हणून आले आहेत. असें असल्यामुळें, ह्या श्लोकांत संशयालंकाराच्या लक्षणाची अव्याप्ति कशी असेल ? शिवाय, या श्लोकांत चंद्रादिविषयक संशय आहे असें म्हणणें योग्य नव्हे, यांतील संशयाचे चंद्र वगैरे विषय असते व प्रजापति हा विषयी असता तर, या प्रजापतीचा श्लोकांत प्रथम निर्देश झाला नसता.
आतां. चित्रमीमांसा या ग्रंथांत,“साम्यामुळें अप्रकृतार्थाची जी अनिश्चित बुद्धि तिला संदेहलंकार म्हणावें.” हें जें प्राचीनांनीं केलेलें संदेहाचें लक्षण त्याचें, विस्तृत लेख लिहून, अप्पय्य दीक्षितांनींच खंडन केलें आहे; पण तें खंडन बरोबर नाहीं. कारण, त्या लक्षणाचा, ‘साम्याच्या निमित्तानें, निश्चय अथवा संभावना ह्या दोहोंहूनही भिन्न जी बुद्धि, तिला संदेहालंकार म्हणावें.’ असा अथ केल्यास त्यांत कांहींच दोष राहणार नाहीं’; मात्र, असा अर्थ करतांना, त्यांतील निश्चय या पदाचा ‘संदेदरहित निश्चय’ असा स्पष्ट अर्थ केला म्हणजे झालें. आतांपर्य़ंत आलेल्या उदाहरणांत, हा संदेहालंकार, संदेह या स्पष्ट शब्दानें वाच्या झाला असल्यामुळें. वाच्य आहे, असें समजावें.