आतां, सदृश पदार्थाच्या अनुभवामुळें दुसर्या कोणत्या तरी वस्तूचें स्मरण झालें असतां, स्मरणालंकार होतो; असें अलंकारसर्वस्वकार व अलंकाररत्नाकरकार ह्या दोघांनींहि स्मरणालंकाराचें जें ( सारखेंच ) लक्षण सांगितलें आहे, तें पण योग्य नाहीं. कारण कीं, सदृश वस्तूच्या स्मरणानें जाग्रत झालेल्या सस्कांरामुळें उत्पन्न झालेल्या ( दुसर्या ) स्मरणाचा ह्या लक्षणांत समावेश होत नसल्यानें, हें लक्षन अव्याप्त आहे. उदाहरणार्थ:-
“ ह्या जगांत अत्यंत रम्य दिसणारे असे पुष्कळ पक्षी आहेतच, पण त्यांच्यापैकीं चातक पक्ष्यांच्या विषयीं ( च ) माझी फार मोठी आवड आहे. कारण कीं, ते चातक पक्षी, प्रत्यक्ष पाहतांच, आपल्या मित्राप्रमाणें असणार्या मेघाची आठवण करून देतात; आणि मग त्यामुळें, कृष्ण या नांवाचें ( अवर्णनीय ) परब्रह्म आठवतें. ”
ह्या श्लोकांत, चातक पक्ष्याच्या दर्शनानें, श्रीकृष्णाप्रमाणें श्यामवर्ण असलेल्या मेघाचें स्मरण झालें. ‘ कोणत्याहि एका पदार्थाचें ज्ञान झालें असतां, त्या पदार्थाशीं संबंध असणार्या दुसर्या पदार्थाची आपोआपच आठवण होते, ( ज्ञान होतें, ) ह्या नियमाप्रमाणें , येथें चातकाला पाहूनं ,
त्याच्याशीं संबद्ध असलेल्या मेघाचें स्मरण, व त्या स्मरणानें तत्सदृश भगवान श्रीकृष्णाचेंहि स्मरण झालें. आणि हें स्मरण, श्रीकृष्णाविषयीं कवीच्या मनांत असलेल्या भक्तिभावाचें अंग झालें आहे. ( आणि म्हणूनच ह्या ) ठिकाणीं स्मरणालंकार झाला आहे. ) म्हणून वरील दोघा आलंकारिकांनीं केलेल्या लक्षणांतील सदृशानुभवावरून हा शब्द काढून टाकून, त्याच्या ऐवजीं, सदृशज्ञानावरून असा शब्द घातला तर, वरील श्लोकांत, होणार्या विशिष्ट स्मरणाचाहि, स्मरणालंकाराच्या लक्षणांत, समावेश होऊ शकेल ? आतांपर्यंत ह्या अलंकाराचें थोडक्यांत दिग्दर्शन केलें.