उदाहरणार्थ:-
“ ह्याच ठिकाणीं, गोदावरीच्या तीरावर, मी शिकार करून परत आलों होतो; ( गोदीवरीच्या ) लटांवरून येणार्या वार्यांनीं माझा थकवा दूर झाला होता; आणि एकांतांत तुझ्या मांडीवर डोकें ठेवून मी वेताच्या लतामंडपांत निजलों होतों; असें मला आठवत आहे. ”
कुणी असें म्हणतील कीं, “ एका भावाला दुसरा भाव जेथें अंग म्हणून येतो तेथें प्रेयस् अलंकार होतो, असें लक्षण करूं नका. तर एका भावाला ( दुसरा भाव नसलेला पण ) नुसता संचारी ( म्ह० व्यंग नसलेला व्यभिचारी भाव ) अंग झाला असतां, प्रेयोलंकार होतो, ” असें त्याचें लक्षण करा. आणि तसें केलें म्हणजे, प्रस्तुत श्लोकांत, स्मरण जरी स्वशब्दानें वाच्य झालें असलें आणि त्यामुळें तें ( व्यभिचारी ) भाव झालें नसलें तरी तें स्मरण केवळ व्यभिचारी असायला कांहींच हरकत नाहीं. आणि म्हणूनच त्याल प्रेयस् अलंकार म्हणणें ह्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं, ह्यावर आमचें उत्तर असें कीं, तुमचें म्हणणें मान्य केलें तर, कुठल्याहि इतर पदार्थाला अंगभूत कोणताही स्थायी झाला, ( म्ह० तो व्यंग्य भाव नसला ) तरीसुद्धां, तेथे रसालंकार म्ह० रसवत् अलंकार होतो; व तो होण्याकरतां, स्थायी व्यंग्य असायची जरूर नाहीं, असेंही म्हणणें सोपें आहे.
अशाच रीतीनें-
“ चर वा अचर ह्या उभय स्वरूप असलेल्या जगाच्या उत्पत्तीकरतां, ज्यानें शरीर धारण केलें आहे, अशा, प्रलयाच्या वेळेच्या महाकालाप्रमाणें क्तुद्ध झालेल्या व सर्वांचा नाश करणार्या रुद्राला आम्ही नमस्कार करतों ”
ह्या श्लोकांत, क्रोध हा स्वशब्दानें वाच्य असला तरी तो, देवता-विषयक कवीच्या रतिभावाचें अंग होऊन रहाणारा स्थायी आहे असें म्हणण्यांत कांहींच अडचण नाहीं; व म्हणून ह्या श्लोकांत रसवत् अलंकार
आहे असेंहि म्हणण्याची पाळी येईल. ‘ मग बिघडलें कोठें ? होऊं द्या रसवत् अलंकार , ’ असें म्हणाल तर, तसें तुमचें म्हणणें सिद्धांताला सोडून होईल, ( म्हणून तुम्हांला तसें म्हणतां येणार नाहीं. ) तेव्हां स्थायी व्यंग्य असून, तो दुसर्याला अंग झाला असेल तर, तेथें रसवत् अलंकार होतो, व संचारी व्यंग्य असून दुसर्या कोणत्याहि भावाचा अंग होत असेल तर, तेथें प्रेयस् अलंकार होतो; असेंच म्हटलें पाहिजे. आणि म्हणूनच वरील,‘ अत्युच्चा: परित: ’ इत्यादि श्लोकांत, स्मृति हा भाव मानून येथें प्रेयस् अलंकार झाला आहे असें न म्हणतां, श्लोकाच्या पूर्वार्धांत व्यंग्य असलेली पृथ्वीविषयीची कवीची रति ही, उत्तरार्धामध्यें, व्यंग्य असलेल्या राजविषयक कवीच्या मनांतील रतिभावाची अंग झाली असल्यामुळें ह्या ठिकाणीं प्रेयस् अलंकार आहे, असें म्हणणेंच योग्य आहे.
आणि ममटभट्टांनींहि म्हटलें आहे कीं, ‘ ह्या श्लोकांत, पृथ्वी-विषयींचा कवीचा रतिभाव हा, त्याच्या, राजविषयक रतिभावाला, अंग झाला असल्यानें, ह्या ठिकाणीं प्रेयोलंखार आहे. ’
आणि शिवाय, हें मोठेंच आश्चर्य आहे ( हीं हो, ) कीं, आपण ( अप्पय्यदीक्षित )स्वत:च निर्माण केलेला कुवल्यानंद नांवाचा ग्रंथ ( अजिबात ) विसरला. त्या ग्रंथांत, आपणच म्हटलें आहे कीं, ‘ विभाव व अनुभाव यांनीं सूचित झालेले निर्वेद इत्यादि व्यभिचारीभाव, ज्या ठिकाणीं, दुसर्या कोणत्यातरी भावाचें अंग होतात, त्या ठिकाणीं ( च ) प्रेयोलंकार समजावा. ’