स्मरणालंकार होण्याकरतां, साक्षात् सदृश वस्तूंचेंच स्मरण झालें पाहिजे; म्हणजे, त्याच्याशीं ( म्ह० सदृश वस्तूंशीं ) संबंध असणार्या इतर वस्तूंचें स्मरण होतां कामा नये, असें येथें सांगण्याचा अभिप्राय नाहीं; अशा रीतीनें, ह्या श्लोकांत शब्दानें सांगितलेल्या शेषशय्या व योग-निद्रा ह्या दोहोंच्या स्मरणाचा व ह्या दोहोंच्या स्मरणाचें आक्षिप्त कारण म्हणून ( मागाहून ) सांगितलेल्या समुद्राच्या स्मरणाचा, ( अशा दोन स्मरणांचा, ) स्मरणालंकारांत सारखाच समावेश करतां यावा म्हणून, ह्या अलंकाराच्या लक्षणांत, सदृश वस्तूच्या प्रत्यक्ष दर्शनानें झालेलें स्मरण असें न म्हणतां, प्रत्यक्ष पाहिलेल्या सदृश वस्तूंशीं संबद्ध असलेल्या दुसर्या कोणत्याहि वस्तूंचे ( अप्रत्यक्षपणें ) स्मरण झालें असतांहि स्मरणालंकार होऊम शकतो, असें म्हटलें आहे.
कांहीं लोकांचें असें म्हणणें आहे कीं, सदृश वस्तु पाहून जाग्रत झालेल्या संस्कारांनीं साक्षात् उत्पन्न झालेलें जें तत्सदृश वस्तूंचें स्मरण त्यालाच स्मरणालंकार म्हणावें. ( या लोकांच्या मतें, वरील श्लोकांत शेषशय्या व योगनिद्रा ह्या दोहोंच्या स्मृतीला स्मरणालंकार म्हणतां येणार नाहीं.
“ येथून आपल्या घरीं गेलेल्या, आणि त्या ठिकाणीं वडील मंडळींच्या कोंडाळ्यांत सापडलेल्या त्या सुंदरीच्या, मान फिरवली आहे, भु वया वाकलेल्या आहेत, अशा, हसर्या मुखकमलाचें मला अजून स्मरण होत आहे. ”
ह्या श्लोकांतील स्मरण, सारखा विचार केल्यानें जाग्रत झालेल्या संस्कारांनें उत्पन्न झालेलें असल्यामुळें, त्याला अलंकार म्हणतां येत नाही.-आणि ह्या श्लोकांत, स्मरण व्यंग्य नसल्यामुळें त्याला भावहि म्हणतां येत नाहीं. याचप्रमाणें-
“ मान किंचित् वाकवली आहे; सुंदर कमळासारखे डोळे किंचित् मिटलेले आहेत; व जोरानें श्वास सुरू झाल्यानें अंग गळून गेलें आहे; अशा अवस्थेंतील त्या सुंदरीच्या झालेल्या समागमाचें मला सारखें ( चिरकाल ) स्मरण होत आहे. ”
ह्या श्लोकांत, स्मृति हा भावहि नाहीं व अलंकारहि नाहीं. व्यभिचारी व्यंग्य असेल तरच त्याला भाव म्हणता येतें. उदाहरणार्थ, “ सा वै कलंकविधुरा मधुराननश्री: ” इत्यादि. ( या श्लोकांत, स्मरण हा व्यभिचारी भाव आहे. ) आलंकारिकांचा असा एक संप्रदाय आहे कीं, स्मरण सादृश्यमूलक असेल तरच त्याला अलंकार म्हणावेंल. ज्याप्रमाणें सादृश्यमूलक असतील तरच त्यांना निदर्शना वगैरे अलंकार म्हणतात त्याचप्रमाणें, हें स्मरण पण सादृश्यमूलक नसेल व व्यंग्य असेल तर त्याला भाव म्हणावें, आणि स्मरण सादृश्यमूलकहि नसेल व व्यंगहि नसेल तर तो केवळ एक पदार्थच आहे, ( असे समजावें ).
आता, ह्या स्मरणालंकाराचें बाबतींत अप्पय्य दीक्षित खालील-प्रमाणें लिहितात:-
“ जी स्मृति सादृश्यमूलक असून दुसर्या वस्तूच्या आश्रयानें राहणारी असेल, तिला स्मरणालंकार म्हणावें. मात्र ही स्मृति व्यंग्य असतां कामा नये. ”
उदाहरणार्थ-
“ आपल्या घोडयाजवळून उडून जाणार्या, सुंदर पिसार्याच्या मोंरावर त्यानें आपल्या बाणाचा नेम धरला नाहीं; कारण कीं, चित्रविचित्र फुलांनीं भरलेल्या व रतिप्रसंगीं सैल झालेल्या अशा आपल्या प्रियेचे सुंदर केस त्याच्या मनापुढें एकाएकीं उभे राहिले ” ( रघु० ९।६७ )
“ देवांच्या मनांत पण जिनें विस्मय उत्पन्न केला आहे, व जिचे हात कमळाप्रमाणें सुंदर आहेत, अशा, लक्ष्मीप्रमाणें पाण्यांतून वर येणार्या एका स्त्रीला पाहून, श्रीकृष्णाला समुद्रमंथनाचें स्मरण झालें ” ( माघ० ८।६४ )
वरील दोन श्लोकांपैकीं, पहिल्या श्लोकांत, सदृश वस्तूच्या दर्शनानें, तत् सदृश वस्तूचें स्मरण झालें आहे. व दुसर्या श्लोकांत सदृश वस्तूच्या ( म्ह० एका सुंदरीच्या ) दर्शनानें , तत् सदृश जी लक्ष्मी, तिच्याशीं सबंध असलेल्या समुद्रमंथनाचें स्मरण झालें आहे. तरीपण, ह्या दोन्हीहि ठिकाणीं सादृश्यमूलक दुसर्या वस्तूंचे स्मरण होणें ही गोष्ट सारखीच आहे. अशा-रीतीनें, सदृश आणि ( त्याच्याशीं संबंध ठेवणार्या दुसर्या ) असदृश वस्तु ह्या दोहोंनाहि साधारण, असा अर्थ असलेल्या, ‘ दुसर्या वस्तूच्या आश्रयानें होणारें स्मरण ’ या शब्दांचा, लक्षणांत निर्देश, सार्थच आहे.
“ हे लक्ष्मणा, मी म्हणतों, ‘ आपण ह्या झाडाखालीं बसूं या; कारण सूर्याचा ताप वाढत चालला आहे. ’ ‘ पण रामा, रात्रीच्या वेळीं, सूर्याची, कसली गोष्ट काढतां ? हा तर चंद्र उगवतो आहे. ’ ‘ अरे पण, वत्सा लक्ष्मणा, हा चंद्र उगवतो आहे हें तुला कसें कळलें ? ’ ‘ ( कसें म्हणजे ? ) याच्यावर हरिण आहे म्हणून ! ’ ‘ हाय हाय ! हे हरिणनयने, चंद्रमुखी प्रिये जानकी, तूं कुठें आहेस बरें ! ’ ” ( प्रसन्नराघव- ६।१ )
हा श्लोकांत हरिण हा शब्द ऐकल्याबरोबर त्याच्याशीं संबंध असलेल्या त्याच्या डोळ्याचें स्मरण झालें; व मग त्या हरणाच्या डोळ्यांसारखे असलेल्या सीतेच्या डोळ्यांचें स्मरण झालें; व ( त्या मागून, ) त्या डोळयाशीं संबंध असलेल्या सीतचें स्मरण झालें. तरीपण, येथें स्मरणालंकार
नाहीं; कारण ह्यांतील स्मृती व्यंग्य असल्यानें प्रधान आहे; म्हणून अशा तर्हेच्या व्यंग्य स्मृतील स्मरणालंकारांतून काढून टाकण्याकरतां या अलंकाराच्या लक्षणांत, व्यंग्य नसलेली ( स्मृति ) असें, स्मृतीला विशेषण दिलेलें आहे.
“ अति उंच असे पर्वत चोहोंकडे शोभत आहेत; त्याचप्रमाणें विस्तीर्ण समुद्रहि आहेत; पण त्या सर्वांना धारण करतांना थोडीसुद्धां तूं थकली नाहींस याबद्दल, तुला प्रणाम असो. अशा रीतीनें, आश्चर्यानें मी वारंवार पृथ्वीची स्तुति सुरू करीत आहे तोंच, त्या पृथ्वीला धारण करणारा तुझा बाहु मला आठवला; आणि माझें तोंड बंद झालें. ”
या ठिकाणीं, जिची स्तुति सुरू केली आहे, त्या पृथ्वीशीं संबद्ध असलेल्या राजाची स्मृति ही सादृश्यमूलक नसल्यामुळें, येथें स्मरणालंकार नाहीं. पण येथील स्मृति हा व्यभिचारीभाव राजाविषयीच्या कवीला वाट-णार्या रतिभावाचें अंग झाला असल्यामुळें, येथें प्रेयस अलंकार झाला आहे. स्मरणालंकाराच्या लक्षणांतून प्रेयोलंकाराची व्यावृत्ति व्हावी म्हणून, लक्ष-णांत, सादृश्यमूलक हें विशेषण घातले आहे. ”
दीक्षितांचें हें सर्व म्हणणें गचाळ आहे. उदाहरणार्थ- त्यांनीं म्हटलें आहे कीं, सदृश व असदृश असे (अनुक्तमें ) सुंदर केस व समुद्र-मंथन ह्या दोन पदार्थांचा लक्षणांत समावेश व्हावा म्हणून, आम्ही लक्षणांत
‘ कसल्याहि दुसर्या वस्तूंचें ज्ञान ’ असें साभिप्राद पद घातलें आहे. पण यावर आमचें म्हणणें असें कीं, ‘ सादृश्यमूलक स्मरणालंकार म्हणावें, ’ एवढें त्यांनीं ( मोघम ) म्हटलें असतें तरीसुद्धां, त्यामुळें सुंदर केसाच्या स्मरणाप्रमाणें, समुद्रमंथनाच्या स्मरणाचा सुद्धां संग्रह झाला असता; आणि म्हणूनच ‘ दुसर्या कसल्याहि वस्तूविषयीचें’ , हें स्मरणाला तुम्ही दिलेलें विशेषण निरर्थक आहे; कारण कीं, वरील दोन स्मरणांपैकीं, सुंदर केसांचें स्मरण हें, तत्सदृश वस्तूच्या दर्शनानें जाग्रत झालेल्या संस्कारामुळें उत्पन्न झालेलें आहे; तर दुसरें, ( म्ह० समुद्रमंथनाचें स्मरण हें, ) सदृश वस्तूच्या दर्शनानें जाग्रत झालेला जो संस्कार , त्यामुळें ( प्रथम ) लक्ष्मीचें जें स्मरण झालें, त्यानें ( जाग्रत झालेल्या संस्कारामुळें ) उत्पन्न झालेलें आहे. अर्थात्, ह्या दोन्ही स्मरणांत, सादृश्यमूलक असण्याच्या दृष्टीनें कांहींच फरक नाहीं. सादृश्यमूलक याचा अर्थ, सदृश वस्तूंचेंच स्मरण असा कांहीं होत नाहीं. तसा झाला असता तर, वरील स्मरणालंकारांत समुद्रमंथनाचा समावेश झालाच नसता. आतां, “ सौभित्रे ननु सेव्यताम्-” इत्यादि श्लोकांत, स्मृति व्यंग्य आहे, आणि म्हणून ती प्रधान ( अलंकार्य ) आहे; म्हणूनच तिची व्यावृत्ति करण्याकरतां, आम्ही केलेल्या लक्षणांत, अव्यंग्य हें विशेषण घातलें आहे. ” असें जें तुम्ही म्हटलें आहे, त्यावर आमचें म्हणणें हें कीं, ह्या श्लोकांतील स्मृति व्यंग्य अतएव प्रधान अशी नाहीं. पण ह्या श्लोकांत, विप्रलंभशृंगार हा प्रधान व्यंग्य आहे व म्हणूनच अलंकार्य अशा ह्या विप्रलंभांत, जानकी ही आलंबनविभाव आहे; रात्रीचा समय हा उद्दीपनविभाव आहे; ( रामाला होणारा ) संताप हा अनुभाव आहे.