शिवरात्रमाहात्म्य - अभंग ५१ ते ५५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५१.
आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥
कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥
लखलखित टके पताका डोलती । तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥
नाना सुमनांची शय्या आरुवर । करिती उपचार सिद्धि आड ॥४॥
आले अकस्मात तयाचियेपाशीं । पाहतां सर्वांसी नवल वाटे ॥५॥
दिव्य दएह झाले पांचांचे ते काळीं । विमानीं बैसली लागवेगें ॥६॥
पारधी देखोनी तटस्थ राहिला । दूतीं तया केला उपदेश ॥७॥
शिवरात्री आजी जागरण उपवास । केला तेणें दोष सर्व गेला ॥८॥
करोनी पारणें होईं शिवभक्त । आशापाशीं चित्त गोवूं नको ॥९॥
अखंड कीर्तन शिवनामाचें करीं । तेणें मोक्षपुरी पावसील ॥१०॥
पुढिल्या शिवरात्री नेऊं कैलासासी । सांगोनियां त्यासी गेले वेगीं ॥११॥
नामा ह्मणे मोक्ष झाला त्या पांचासी । वस्ति चंद्रापाशीं केली त्यांनीं ॥१२॥

५२.
तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥
संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें । त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥
दुसर्‍या शिवरात्री पूजिलें शंकरा । करोनियां बरा भाव शुद्ध ॥३॥
विमानीं वाहोनी स्वस्थानीं स्थापिला । येथूनि संपला कथाभाग ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । जाणो-नियां जप करा त्यांचा ॥५॥

५३.
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥
पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं । जपावीं सज्जनीं वारंवार ॥४॥

५४.
नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥
संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥
सहस्त्रमुखें शेष वाखाणितां कीर्ती । नाहीं तया तृप्ति आजीवरी ॥३॥
पशु पक्षी तृण कीटक अपार । नामें गेले पार उतरोनि ॥४॥
कापुराचे राशी पडे अग्निकण । तैसें नाम जाण पातकासी ॥५॥
नामाग्नीनें दोष जळती एकसरा । कैवल्य जे धरा बसल्या ठायीं ॥६॥
नामा म्हने धन्य नामाचा प्रताप । ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥

५५.
लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥
अनेक पुराणीं अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥
मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा । कैलासीं चा राणी तोष पावे ॥३॥
नामा म्हणे मन करोनि निश्चळ । करा गदा-रोळ नामघोष ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP