आत्माराम - समास ४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥
जें सकळ साधनाचें सार : जेणें पाविजे पैलपार । जेणें साधनें अपार । साधक सिद्ध झाले ॥१॥
तें हें जाणा रे श्रवण । करावें अध्यात्म निरूपण । मनन करितां समाधान । निजध्यासें पाविजे ॥२॥
संतसज्जन महानुभवी । परमार्थ चर्चा करीत जावी । हयगयही न करावी । ज्ञातेपणेंकरोनी ॥३॥
परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि होय तत्त्वतां । दिवसेंदिवस जाणतां । पालट होय ॥४॥
नित्य नवें श्रवण मनन । त्या ऐसें नाहीं साधन । म्हणोनि हें नित्य नूतन । केलें पाहिजे ॥५॥
जैसें ग्रंथीं बोलिलें । तैसें पाहिजे केलें । क्रियेच्या माथां आलें । निश्चितार्थ ॥६॥
जे ग्रंथीं जो विचार । वृत्ति होय तदाकार । म्हणोनि निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥७॥
शिष्य म्हणे जी सर्वज्ञा । सत्य करावी प्रतिज्ञा । नाशिवंत घेत साधना । वरपडें न करावें ॥८॥
अरे शिष्या मन घालावें । नाशिवंत तूं ओळखावें । साधन लागे करावें । प्रतिज्ञाच आहे ॥९॥
प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऐसें बोलतो हा कोण नाशिवंत केलें मदर्पण । यामध्यें तो आला ॥१०॥
तूं म्हणासी जें दिलें । घ्यावया कोण उरलें । अरे उरलें तेम झुरलें । माझेकडे ॥११॥
तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कांरे चोरितोसी । नाशिवंत देतां कचकतोसि । फट्‍रे पढतमूर्खा ॥१२॥
शिष्य विचारून बोले । स्वामी कांहीं नाहीं उरलें । अरे नाहीं बोलणें आलें । नाशिवंतामध्यें ॥१३॥
आहे म्हणतां कांहीं नाहीं । नाहीं शब्द गेला तोही । नाहीं नाहीं कांहीं । उरलें कीं ॥१४॥
येथें शून्या निरास झाला । आत्मा सदोदित संचला । पाहों जातां साधकाला । ठावचि नाहीं ॥१५॥
अभिन्न ज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होतां धन्य । वेगळेपणें वृत्ति शून्य । पावती प्राणी ॥१६॥
वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा । आत्मा दिसे नामता । वेरपडे होती ॥१७॥
आपुल्या डोळां देखिलें । तें नाशिवंतामध्यें आलें । ऐसें जाणोनि धरिलें । ते नाडले प्राणी ॥१८॥
जो पंचभूतांचा दास । तया पंचभूतीं वास । भोगी नीच नवी सावकाश । पुनरावृत्ति ॥१९॥
तों शिष्यें विनंति केली । म्हणे आशंका उद्भवली । पंचभूतांची सेवा केला । बहुतीं कीं ॥२०॥
सकळ सृष्टीमध्यें जन । संत साधू आणि सज्जन । करिती भूतांचें भजन । धातु पाषाणभूरर्ति ॥२१॥
कोणी नित्यमुक्त झाले । तेहि धातु पुजूं लागले । परंतु ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाहीं ॥२२॥
ऐसा शिष्याचा अंतर्भाव । जाणोनि आनंदे गुरुराव । म्हणे शीघ्रचि अनुभव । पावेल आतां ॥२३॥
ऐसें विचारूनि मनीं । कृपादृष्टीं न्याहाळूनी । शिष्याप्रती सुवचनीं । बोलते झाले ॥२४॥
प्राणी देह सांडून जाती । वासनाशरीरें असती । पुनरावृत्ति भोगिती । वासना उरलिया ॥२५॥
मूळमाया स्थूल-देहाचें । लिंगदेह वासनात्मकाचें । राहानें तया लिंगदेहाचें । अज्ञानडोहीं ॥२६॥
कारण देह अज्ञान । ज्ञान तो आत्मा जाण । तया नांव महाकारण । बोलिजे तें ॥२७॥
जरी मनाचा थारा तुटला । म्हणजे भवसिंधु आटला । प्राणी निश्चितार्थें सुटला । पुनरावृत्ती-पासोनी ॥२८॥
हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ । नि:संग आणि निर्मळ । आत्मा स्वयें ॥२९॥
संगातीत म्हणजे मोक्ष । तेथें कैंचें देखणें लक्ष । लक्ष आणि अलक्ष । दोहींस ठाव नाहीं ॥३०॥
आत्मा म्हणोनि देखण्यास मिठी । घालूं जातां मोक्ष तुटी । म्हणोनियां उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥३१॥
प्राप्त झालें अद्वैत ज्ञान । अभिन्नपणें जें विज्ञान । तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथें मी तूं नाहीं ॥३२॥
ऐशीं स्थिति जया पुरुषाची । तया पुनरावृत्ति कैंची । जाणोनि भक्ति केली दास्याची । देवासी अत्यंत ॥३३॥
पूर्वीं दास्यत्व होतें आलें । त्याचें स्वामित्व प्राप्त झालें । आणि तयाचें महत्त्व रक्षिलें । तरी थोर उपकार ॥३४॥
आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार करणें । आणि मजपाशीं सांगणें । अनुभव आपुला ॥३५॥
आतां पुढिलिये समासीं । शिष्य लाधेल अनुभवासी । दृढ करोनियां तयासी । सांगती स्वामी ॥३६॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम । ऐका साधनवर्म । आत्मज्ञानाचें ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP