आत्माराम - समास १
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥
जयासि लटिका आळ आला । जो मायागौरीपासून झाला । जाला नाहीं तया अरूपाला । रूप कैचें ॥१॥
तेथें स्तवनाचा विचार । न घडे निर्गुण निर्विकार । तैसियासीच नमस्कार । भावबळें माझा ॥२॥
जयाचेनि वेदशास्त्रें पुराणें । जयाचेनि नाना निरूपणें । जयाचेनि खुख लाधणें । शब्दीं नि:शब्द ॥३॥
जें शब्दासी आकळेना । शब्दें-विण तें कळेना । ऐसेंहि घडेना । जये स्वरूपीं ॥४॥
ऐसें सर्वत्र संचलें । तर्का न जाय अनु-मानलें । तें जयेचेनि प्राप्त झालें । आत्मरूप ॥५॥
नमन तियेचे निजपदा । माया वाग्देवी शारदा । जिचेनि प्रवर्तती संवादा । संत महानुभाव ॥६॥
वंदीन सद्रुरु स्वामी । जेथें राहिलें मी तो तो मी । निवारिली निजधामीं । पांचही जणें ॥७॥
तया निजपदापैलीकडे । आनंदें वृत्ति वावडे । पद लाधलिया जोडे । तद्रूप होवोनि ॥८॥
स्वामीकृपेचा लोट आला । मानस सरोवरीं सामावला । पूर्ण होतां उचंबळला । आनंदउद्रार माझा ॥९॥
सद्रुरुकृपेचें बळ । माझे ठायीं जालें तुंबळ । तेणें गुणें स्वानंदजळ । हेलावूं लागे ॥१०॥
आतां नमस्कारीन राम । जो योग्यांचें निजधाम । विश्रांतीचा निजविश्राम । जये ठायीं ॥११॥
जो नांवारूपां वेगळा । जो मायेहून निराळा । जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥१२॥
जेथें भांबावला तर्क । जेथें पांगुळला विवेक । तेथें शब्दाचें कौतुक । केवीं घडे ॥१३॥
जयाकारणें योगी उदास । वनवासी फिरती तापस । नाना साधनें सायास । ज्याकारणें करिती ॥१४॥
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम । उपमाचि नाहीं निरूपम । रूप जयाचें ॥१५॥
आतां वंदीन सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते । माझीं वचनें प्राकृतें । सांगेन तयांसी ॥१६॥
तयांचें वर्णावें स्वरूप । तरी ते स्वरूपाचे बाप । जें वेदास सांगवेना रूप । तें जयापासोनी प्रगटे ॥१७॥
आतां शिष्या सावधान । ऐक सांगतों गुह्य ज्ञान । तेणें तुझें समाधान । अधिक होय ॥१८॥
तूं आशंका नाहीं घेतली । परी चिंता मज लागली । जे तुझी भ्रांति फिटली । नाहीं अद्यापि ॥१९॥
दासबोधीचे समासीं । निर्भूळ केले मीपणासी । त्या निजपणीं वृत्तीसी । पालट दिसेना ॥२०॥
म्हणोनि न पुसतां सांगणें । घडलें शिष्या तुजकारणें । आतां तरी सोय धरणें । श्रवण मननीं ॥२१॥
चातकपक्षी वरचेवरी । चंचू पसरोनि थेंब धरी। जीवन सर्वही अव्हेरी । भूमंडळींचें ॥२२॥
तैसा शब्दवर्षाव होतां । असोन दावी व्यग्रता । श्रवणपुटीं सामावितां । मनन करावें ॥२३॥
लाग जाणोनि शब्दाचा । आवांका धरावा मनाचा । शब्दांतील गर्भाचा । सांठा धरावा ॥२४॥
अरे तूं कोणाचा । कोठून आलसि कैंचा । ऐसा विचार पूर्वींचा । घेई बापा ॥२५॥
अरे तुवां जन्मांतर घेतलें । काय मानितोसि आपुलें । ऐसें त्वां विचारिलें । पाहिजे आतां ॥२६॥
येथें तुझें कोणी नाहीं । भुलला आहेस काई । चुकोनि आलासी जाई । जेथील तेथें ॥२७॥
तूं समर्थाचें लेकरूं । अभिमानें घेतला संसारू । तो टाकितां पैलपारू । पावसी बापा ॥२८॥
ईश्वरापासोनि झालासी । परंतु त्यास चुकलासी । म्हणोनि हें दु:ख भोगिसी । वेगळेपणें ॥२९॥
आणि विश्वाससी या बोला । तरी मी घालीन रे तुजला । लावसी सकळ वैभवाला । जेथिंचा तेथें ॥३०॥
तुझें अढळपद गेलें । तुज मायेनें वेड लविलें । तें जरी तुझें तुज दिधलें । मज काय देशी ॥३१॥
जितुकें कांहीं नासोन जाईल । जें अशाश्वत असेल । तुजसमागमें न येईल । तितुकें देईन ॥३२॥
मजहि तें कासया व्हावें । तुजपासूनि टाकावें । तुवां टाकिलें तरी न्यावें । तुजसमागमें ॥३३॥
भूषण भिक्षेचें टाकिलें । अमरपद प्राप्त झालें । तरी तुझें काय गेलें । सांग बाला ॥३४॥
नाशिवंत तितुकें देशी । तरी पद प्राप्त निश्चयेंसीं । यामध्यें लालची करिसी । स्वहित न घडे ॥३५॥
तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें । आतां तूं आपलें । मानूंचि नको ॥३६॥
इतुकें स्वामी बोलले । अज्ञान घेऊन निघाले । तंव शिश्यें आक्षेपिलें । विनीत होवोनि ॥३७॥
आतां पुढिलिये समासीं । संवाद होईल उभयांसीं । तेणें स्वानंदसिंधूसी भरितें दाटे ॥३८॥
इति श्रीआत्माराम । रामदासी पूर्णकाम । ऐका सावध धर्म । सांगिजेल ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP