युद्धकान्ड - प्रसंग सातवा
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
फणी रावणी वीर सन्मूख जाले । बळाचे महाकाळ जैसे उदेले । करायास निर्वाण ते एकमेकां । विरश्रीबळें सोडिली सर्व शंका ॥१॥
पुढें बोलता जाहला इंद्रजीतू । कृतांतापुढें निर्बळी मानवा तूं । मरायासि कां व्यर्थ आलसि येथें । निमिष्यांत मारीन रे प्राणघातें ॥२॥
रणामाजिं सन्मूख होतां बळेंशीं । समस्तां तुम्हां पाडिलें नागपाशीं । पुन्हां मागुती सर्वही बाणजाळीं । निमालेत माझ्या करें युद्धकाळीं ॥३॥
अरे काय झाली तुझी शक्ति तेथें । पुन: शीघ्र आलसि युद्धास येथें । तुवां आणिलें काय सामर्थ्य जाया । बळें दावितां निर्बळें व्यर्थ वायां ॥४॥
वृथा पुष्ट रे हा बहू राजभ्राता । नृपें ताडिला रे सभेमाजिं लाथा । समस्तांमध्यें रावणें भ्रष्टवीला । तुम्हां मर्कटांमाजिं तो श्रेष्ठ केला ॥५॥
बळें आपुल्या रे तुझे पादपाणी । नभामाजिं खंडून धाडीन बाणीं । समस्तां तुम्हां ठाउकी शक्ति माझी । रहाया पुढें काय रे प्राप्ति तूझी ॥६॥
बहू बोलिला वाजटू घोर शत्रू । प्रतीउत्तरें बोलिला तो सुमित्रू । मि हा कोण तूं नेणशी काय मूढा । वृथा विक्तमू बोलशी वाड पूढां ॥७॥
मही रुंद विस्तीर्ण छप्पन्न कोटी । गिरी दिग्गजांची असंभाव्य दाटी । तटाकें नद्या मातले भव्य सिंधू । वरी दाटली जीवसृष्टी अगाधू ॥८॥
असंभाव्य हा भार कोणा धरेना । न घेतां पुढें जीवसृष्टी उरेना । सहस्रां फणीचा असंभाव्य व्याळू । तयांमाजिं एकें फणीं हा भूगोळू ॥९॥
स्वभावें शिरीं ठेविजे पुष्प जैंसें । तयाचे परी घेतलें विश्व तैसें । तयाहून तो कोण आहे विशेषू । मुढ नेणसी कां स्वयें मीच शेषू ॥१०॥
भविष्योत्तरें सर्वही सत्य व्हावीं । बळं वैभवें राक्षसांचीं दिसावीं । म्हणूनी तुवां घेतलें येश युद्धीं । नभामाजिं जाऊनि कापटयबुद्धी ॥११॥
जनीं हीन त्याला बरी वेळ आली । अकस्मात ते कीर्ति होऊनि गेली । बळें आगळा राम आत्मा जगाचा । तयाहूनि रे विक्रमू कोण कैंचा ॥१२॥
तुह्मां पापरूपांमधें भक्त एकू । महावीर बीभीषणू पुण्यश्लोकू । तयाशीं सभामंडपीं गर्व केला । दिसेंदीस राक्षेस सवैं बुडाला ॥१३॥
रिपू बोलतो जाणरे सत्य वाणी । प्रतापें तुझें शीर छेदीन बाणीं । तया बोलितां ताविली भीमदृष्टी । उभा काळ जाळावया जीवसृष्टी ॥१४॥
बळ छेदिता जाहला वोष्ठ दंतीं । सिमा फांकली वैभवाची दिगंतीं । करारां रणीं खादल्या वज्रदाढा । शतें सोडिलीं बान वोढूनि मेढा ॥१५॥
बलें धांविलीं बाणजाळें उफाळें । लखाखीत सौदामिनीचेनि मेळे । तडाडीत घोषें कडाडीत आले । सुमित्रासुतें सर्व छेदून नेले ॥१६॥
पुन्हां कोपला तो रिपू कोटिगूणें । शतांचीं शतें सोडिले बाण तेणें । नभामाजिं ते बाण बाणीं सणाणा । कितीएक स्फुल्लिंग भालीं फणाणा ॥१७॥
असंभाव्य ते जाहला बाणवृष्टी । जळों लागली पावकें सर्व सृष्टी । अतीचंड ते दंड अद्भूत कैसे । महाकाळ कल्पांतिंचे मेघ जैसे ॥१८॥
कडाडां खडाडां गडाडां घडाडां । तडाडां थडाडां दडाडां धडाडां । बहूतांपरींचे बहू घोष झाले । ग्रहां चंद्रसूर्यादिकां कंप आले ॥१९॥
कितीएक सिंधूदकें तप्त जाली । कितीएक सिंधूदकें तीं उडाली । असंभाव्य त्यां दाटल्या बाणकोटी । बलें सोडिती पाडिती वीर जेठी ॥२०॥
नभामाजिं कल्पांत ते बाणजाळीं । महा युद्ध तें होतसे अंतराळीं । रिपू पेटले दोघही घोर मारा । भुमीं वृष्टि गारांपरी सर्व तारा ॥२१॥
वरी पाहतां बाणबाणीं खणाणां । रिपू एकमेकांसि तो भेदवेना । रथारूढ तो रावणी धांवताहे । पदीं चालतां शेषऋक्षां न साहे ॥२२॥
पुढें चालिला वीर तो जांबुवंतू । शिळा घेतली धांवता काळकेतू । बळें हांक देऊनियाम चक्रचालीं । उफाळें शिळा तो रथामाजिं घाली ॥२३॥
रथा मोडिलें पाडिलें भग्र केलें । सुमित्रासुता रावणी साम्य जालें । सुगंधें विरें वैभवें लागवेगें । महा अश्र्व ते चूर्ण केले प्रसंगें ॥२४॥
कपीनाथ बीभीषणें मारुतीनें । विरांलगिं सन्मानिलें थोर मानें । भले हो भले थोर आश्चर्य केलें । रिपूच्या रथा विक्रमें भ्मगवीलें ॥२५॥
नभीं सर्व आनंदली देवसृष्टी । बहूसाल संपादिली पुष्पवृष्टी । समस्तां मनीं थोर आनंद जाला । रिसीं वानरीं घोष अद्भूत केला ॥२६॥
म्हणे रावणी हा रिपू आवरेना । बहूसाल सामर्थ्य याचें सरेना । शरां मारितां सर्व तोडीत आहे । पुढें अग्रिअस्रासि तो सोडिताहे ॥२७॥
तयें सोडितां अस्र तैसें निघालें । धडाडीत तेम तेजपुंजाळ आलें । नभीं धूम्र दाटे असंभाव्य ज्वाळा । करूं पाहती भस्म नक्षत्रमाळा ॥२८॥
असंभाव्य ते चालिली वन्हिधाडी । मही सर्व आकाश तेणें कडाडी । बहूवर्ण ज्वाला शिखी धांवताती । कडाडीत नेटें कपींमाजिं येती ॥२९॥
कपी ऋक्ष तेणें भयातूर जाले । कितीएक ते धीर पोटीं गळाले । बहू सोडिला धीर नैरृत्यनाथें । म्हणे गा विरां सर्व गेलों अनर्थें ॥३०॥
सुमित्रासुतें देखिलें अग्रिअसा । पुढें सोडिता जाहला मेघ अस्रा । तया सोडितां मेघ तैसे उदेल । गिरीचे परी अंबरीं भार आले ॥३१॥
नभीं दीसती ते हुडे कोट झाडें । महामेघ गर्जोनि गंभीर वाडें । नभा व्यापिलें घोर अंधार जाला । दिसेना रणामाजिं दोन्ही दळांला ॥३२॥
नभीं चालिले ते बहू कीट काळे । झकाकीत सौदामिनीचेनि मेळें । बळें मेघधारा असंभाव्य गारा । सुटे कंप सूसाट घोषें थरारां ॥३३॥
प्रसंगी तये पाणजंजाळ जाला । रणामंडळीं तोय सद्भूत आलें । कितीएक झाडें भुमीं चूर्ण होती । पुरें पट्टणें सर्व वाहूनि जाती ॥३४॥
सुमित्रासुतें थोर अद्भूत केलें । जनांला गमे आजि कल्पांत आलें । बुडों लागले भार त्या राक्षसांचे । बहूसाल त्या धीर गेले विरांचे ॥३५॥
रणीं सोडिलें अस्त्र नेटें विझाल । बहू राक्षसां थोर कल्पांत आलें । त्वरें रावणी वायुअस्त्रास सोडी । असंभाव्य तो वाट नेटें झडाडी ॥३६॥
कडाडीत पाडे असंभाव्य झाडें । बळें पाडिलीं वाड झुंबाड झाडें । फुटों लागलीं शैलशृंगें खडाडां । कडे चालिले पर्वतांचे भडाडां ॥३७॥
भ्रमों लागलीं खेचरें प्रेत जालीं । गृहें गोपुरें एक वेळे उडालीं । बहूसाल तो वातआवर्त जाला । तया देखतां मेघ नेटें उडाला ॥३८॥
सुमित्रासुतें देखिला चंड वारा । गिरीअस्त्र सोडूनि केला निवारा । असंभाव्य तीं चाललीं शैलशृंगें । बहू वात निर्वात केला प्रसंगें ॥३९॥
गिरी चालिले ते असंभाव्य कैसे । नभीं धांवती मातले मेघ जैसे । महावीर तो वज्रअस्त्रासि सोडी । रणीं रावणी शैल तात्काळ तोडी ॥४०॥
रिपू राक्षसें शैल ते पिष्ट केले । बळें आपुल्या दिग्गजां आड नेले । पुढें जाहली ते बहू वज्रदाटी । त्या देखता जाहला वीर जेठी ॥४१॥
पुढें वीर सौमित्र ब्रह्मास्त्र सोडी । तयापासुनी वन्हि नेटें भडाडी । गमे कोटि विद्युल्लता एक वेळा । महा लोळ कल्लोळ भासे भुगोळा ॥४२॥
रणामंडळीं पावकें त्या अचाटें । जळों लागलीं सर्वहि वज्रथाटें । पुढें चालिल्या त्या असंभाव्य ज्वाळा । रणामंडळीं जाहली एक वेळा ॥४३॥
तया देखतां रावणी तेंचि सोडी । रणामंडळीं एकमेकांसि तोडी । रणामाजिं ताक्ताळ सन्मूख आले । महाज्वाळ ते एक होऊनि गेले ॥४४॥
पुढें घोर रुद्रास्त्र त्या रावणानें । बळें सोडिलें शीघ्र माहाविरानें । रणामाजिं तें चालिले एकवेळे । भुमीं पाय आकाशपंथीं शिसाळें ॥४५॥
बळें धांविले तें रणामाजिं कैसें । गिळाया भुगोळा महा विघ्न जैसें । तयां देखतां कंप माहाविरांसी । भयें मूर्छना घातली वानरांसी ॥४६॥
तया देखतां तो फणी सिद्ध जाला । पुढें सोडिलें शीघ्र माहेश्वराला । उठे मातला काळ कल्पांतकाळी । दिशा दाटल्या सर्व आकाशज्वाळीं ॥४७॥
रवी कोटि विघुल्लता एक वेळां । रणीं धांवती कंप जाला भुगोळा । महातेज हेलावलें तेचि काळीं । असंभाव्य तें चालिलें ब्रह्मगोळीं ॥४८॥
तया देखतां अस्त्र मागें पळालें । बहू कूळ तें खेचराचे जळाले । पुढें देखतां रावणी भ्रांत जाला । भये भूलला वारवेना तयाला ॥४९॥
मनीं भावितो कोण राखेल गेलें । कळेना मला व्यर्थ येथें जळालों । तंई शीघ्र रामानुजें काय केलें । प्रतिज्ञापणाला मनीं आठवीलें ॥५०॥
म्हणे हो मनीं शीर छेदूनि न्यावें । म्हणोनि बळें अस्त्र मागें वळावें । रणामंडळामाजिं वीरें सुभित्रें । बळें वारिलें अस्त्र तें वीजमंत्रें ॥५१॥
म्हणे मेघनादू मला विघ्र आलें । परी थोर आश्र्चर्य कां वांचवीलें । भला वीर सौमित्र हा वीर्यवंतू । मनासारिखें युद्ध मोठें करीतू ॥५२॥
असेना पुढें वीर होणार नाहीं । बहू देखिले पाहिले झुंजतांहि । महावीर हे सूर्यवंशी बळाचे । रिपूलगिं रक्षावया कोण कैंचे ॥५३॥
महावीर दोघे रणीं तेचि काळें । पुन्हां सोडिते जाहले बाणजाळें । रणामाजिं ते भेदिती एकमेकां । नभीं सोडिल्या बाणभाळीं अनेका ॥५४॥
रिपूंचीं रिपू तोडिती बाणजाळें । पुन्हां मागुती सोडिती ते उफाळे । विरें वीर तो भेदितांही ढळेना । विरश्रीबळें काय होतें कळेना ॥५५॥
पुढें काय केलें तया मेघनादें । रणीं हांक घेऊनि धांऊनि क्रोधें । महातेज पुंजाळ त्या शीघ्रकाळीं । बळें भेदिल्या तीन भाळी कपाळीं ॥५६॥
महावीर तो रावणी काळरूपी । पुराणा बहू काळ कापटयरूपी । सुमित्रासुत तो दिसे बाळलीला । बळें भेदिला रक्त वाहे कपाळा ॥५७॥
तया देखतां कोप नैरृत्यनाथा । पुढें चालिला पाववायासि वेथा । रणीं हांक देऊनि बीभीषणानें । गदा घेतली चालिला थोर त्राणें ॥५८॥
तया देखतां त्या दशग्रीवसूतें । रणीं विंधिला पाडिला बाणघातें । पुढें देखिला कोपला वीर गाढा । सुमित्रासुतें वाहिला चंड मेढा ॥५९॥
रणीं रावणी लक्षिला तेचि काळीं । बळें भेदिल्या बाणभाळी कपाळीं । नवां बाणघातें रिपू स्वस्थ केला । तया मेघनादा बहू खेद जाला ॥६०॥
कपाळीं बळें भेदिलें बाण वीरें । प्रवाहो बळें चालिला तो रुधीरें । महामस्तकामाजिं सर्वै बुडाले । कपाळावरी पिच्छ बाशिंग जालें ॥६१॥
म्हणे वीर बीभीषणू वीर छात्रा । बरें ऊसणें घेतलें गा सुमित्रा । रिपू रावणी तापला वीर कैसा । शुळें टोंचितां ऊठला सर्प जैसा ॥६२॥
महावीर निर्वाणिंचे बाण सोडी । लघू लाघवें शेष तात्काळ तोडी । असंभाव्य कोपानळें तीव्र ज्वाळा । मुखें सांडितां काळ कांपे चळाळां ॥६३॥
सिमा सांडिली थोर कल्पांत काळीं । महावीर ते खीळिले बाणजाळीं । बहू खोंचले देह दोघांजणांचे । झरे लागले वाहती शोणिताचे ॥६४॥
विरश्रीबळें दु:ख नाहीं प्रतापें । रणीं भेदिती एकमेकांस कोपें । बहू माजले युद्ध तें ओसरेना । बळें भीडती एकमेकां सरेना ॥६५॥
पुढें काय केलें सुमित्रासुतानें । गुणीं सज्जिलें त्या रवीचक्रबाणें । मुखीं धांवती त्या शिखा पावकाच्या । बहू चंचला कोटि विद्युल्लतेच्या ॥६६॥
कडाडीत कोपानळें बाणभाळीं । बळें सोडितां शीघ्र तैशी निघाली । भयातूर दोन्ही दळीं कंप जाले । ऋषी देव गंधर्व धाकें पळाले ॥६७॥
ग्रहादीक आकाशपंथीं जळाले । बहू खेचरें भार भूमीं गळाले । ध्वनी ऊठला घोर घोषें तडाखा । बळी कांपती ईतरां कोण लेखा ॥६८॥
सुमितासुतें शीघ्र संधान केलें । रणीं रावणीशीर छेदून नेलें । समस्तां सुरांलगिं आनंदवीलें । सुरेशामनींचें महा शल्य गेलें ॥६९॥
रणामाजिं तो इंद्रजीतू निमाला । समस्तां सुरांलगिं आनंद जाला । महाकंटकृ थोर संहार केला । त्रिलोकीं बहू कीर्तिचा घोष केला ॥७०॥
पुढें शेष सूगंध बीभीषणानें । दळें सर्वहि सिद्ध केलीं विरानें । कपीशीं सुवेळाचळा राम जेथें । महावीर ते चालिले सर्व तेथें ॥७१॥
प्रभू राम तो बंधुची वाट पाहो । उतावील पोटीं वियोगा न साहे । बहूसाल चिंता करी बांधवाची । म्हणे कोण वेळा सुमित्रासुताची ॥७२॥
तयां बोलतां भार तैसे उदेले । दळेंशीं बळें येश घेऊनि आले । समर्था प्रभूला नमस्कार केले । रघूनायका भेटले स्वस्थ जाले ॥७३॥
सुमितासुताचा देहे स्वस्थ जाला । पुढें राघवें वैद्य पाचारवीला । मुखें बोलिला राम तो वीरबाहो । करावा अती आदरें दिव्य देहो ॥७४॥
रणीं इंद्रजीतासि प्राणांत जालें । कपी ऋषभानें सवें शीर नेलें । निचेष्टीत काया रणीं स्तब्ध ठेली । प्रियेलागीं सांगावया भूज गेली ॥७५॥
त्रिकूटाचळीं भूवनें रावणाचीं । तया सारिखीं रम्य नीकुंबळेचीं । तया भूवनामाजिं सूलोचना ती । सुखें वैभवाची बरी वेळ जाती ॥७६॥
अकस्मात तेथें ध्वनी घोष जाला । परीचारिका सांगती भूज आला । भुमी रम्य राजांगणें पांचबंदी । पडे भूज तेथें स्रवें रक्तबिंदी ॥७७॥
मनामाजिं ते शंकली दिव्य बाळा । रणामाजिं भर्तार त्या कोण वेळा । भ्रमें चित्त दुश्चीत बाहेर आली । फणीचेपरी भूज ते ओळखीळी ॥७८॥
खुणें दाविलें लीहिलें पत्र हातें । म्हणे चालिलों मी पुढें मुक्तिपंथें । तुझ्याकारणें धाडिली मूळ बाहे । प्रिये चाल वेगीं तुझी वाट पाहें ॥७९॥
तया वाचितां थोर आकांत जाला । दुखामाजिं तो सौख्यसिंधू बुडाला । मनीं वैभवाची तिनें सांडि केली । त्रिकूटाचळा जावया सिद्ध जाली ॥८०॥
बहू पूतळ्या पिंजरे पक्षियाती । तये भोंवतीं भोंवतीं रूददाती । अहो माय आम्हांसि सांडून जाशी । तुझ्या वेगळीं सर्व आम्ही विदेशी ॥८१॥
तयालगिं संबोखिलें रम्य वाणीं । तुम्हां रक्षिता देव तो शूलपाणी । मिळाले बहू लोक ते दाटि जाली । शिबीकेमधें भूज वेगें निघाली ॥८२॥
विसोरे बहूसाल नानापरींचे । अलंकार भांडार ते सुंदरीचे । धनें संपदा पाहतां मीति नाहीं । तिनें वाटिलें लूटिलें सर्व कांहीं ॥८३॥
पुढें अश्विनीलगिं आरुढ जाली । बहू वेग लंकापुरीमाजिं गेली । नमस्कार केला तया रावणाला । पुढें टाकिलें पत्र आकांत जाला ॥८४॥
रणीं झुंजतां इंद्रजीतू निभाला । बहू नायकांचा ध्वनीघोष झाला । दुखें व्याप्त लंकापती आंग घाली । नसे मानसीं शुद्धि सर्वै उडाली ॥८५॥
प्रधानीं बहूतांपरी सांवरीला । पुढें रावणा कोप तात्काळ आला । म्हणे आजि संहारितों वैरियांला । दळेंशीं रणीं जावया सिद्ध जाला ॥८६॥
म्हणे सासुर्यालगिं सूलोचना ते । घडीनें घडी आमुची वेळ जाते । समर्था मला शीर आणून द्यावें । पुढें काय मानेल तैसें करावें ॥८७॥
शिरें आणितों आजि आठां जणांचीं । मुखें तीव्र क्रोधानळें रावणाचीं । रिपू दोघे बीभीषणा अंगदाचे । रिसा सुग्रिवा मारुता ऋषभाचे ॥८८॥
बहूसाल तो कोप रायासि आला । पुढें मंदिरामाजिं नेलें सुनेला । तियेलगिं मंदोदरी नीति सांगे । रघूनायका भेट वो लागवेगें ॥८९॥
अहो देखिलें स्वप्र म्यां घोरवाणें । निमाले रणीं सर्व राक्षेस प्राणें । नव्हे स्वप्र हें वाटतें सत्य आहे । दिलें राज्य बीभीषणालगिं पाहे ॥९०॥
ग्रह सूटले तूटले पाशबेडी । पुढें सोडिले देव तेतीस कोडी । त्रिलोकीं उभी राहिली रामगूढी । पुढें साच होईल ऐशीच प्रौढी ॥९१॥
म्हणोनि तुवां शीघ्र आतां उठावें । दिनाचे परी रामचंद्रा वदावें । करूणास्वरें राघवा आळवावें । बहूतांपरी शीर मागूनि घ्यावें ॥९२॥
त्वरें ऐकतां ऊठली शब्दनेटें । पुढें वानिती भाटवेताळथाटें । कपीवाहिनीनें महाद्भूत केलें । त्वरें बोलती जानकी पाठवीलें ॥९३॥
म्हणे राम हें सर्वथाही घडेना । रिपू मारिल्यावीण दृष्टी पडेना । असंभाव्य सेनासभा दाटली ते । पुढें शीघ्र सूलोचना भेटली ते ॥९४॥
पुढें देखतां राम सूखें निवाली । कृपा भाकितां ते नमस्कार घाली । कृपासागराची बहू स्तूति केली । सुशब्दें रघूनायकें तोषवीली ॥९५॥
प्रसंगीं तये थोर आश्र्चर्य जालें । निचेष्टीत शीरें बरें हास्य केलें । कृपें पाहिलें रामचंद्रें दयाळें । पती ऊठवीतों तुझा शीघ्र काळें ॥९६॥
खुणा दाविती वो वळावें दयाळा । सभे घालितां एकमेकांसि डोळा । कपीवीर ते सांगती कानगोष्टी । पुढें ऊठतां सर्व आटील सृष्टी ॥९७॥
वदे ऋक्षस्वामी बरेंसें विचारा । रिपू नूठवावा कदा ऊपकारा । वदे मारुती राघवालगिं रागें । रघूनायका सांडिली गोष्टि मागें ॥९८॥
उदासीन देखोनि सूलोचना ते । नमस्कार केला त्वरें चालिली ते । प्रभू सव्य घालूनियां शीघ्र गेली । मनोभावना सर्वही सिद्ध केली ॥९९॥
समुद्रातिरीं भीमकुंडा प्रचंडा । बळें चेतल्या वन्हिशीखा उदंडा । दशग्रीव मंदोदरी राजभारें । सवें चालिली गांवलोकें अपारें ॥१००॥
ऋषीदेवगंधर्वमांदी मिळाली । समस्तीं तियेची बहू स्तूति केली । करी ती ऋषीनायका अक्षवाणें । उडी घातली अग्रिमूखीं स्फुराणें ॥१०१॥
मनामाजिं होता मनांतील हेतू । पुढें देखिला इंद्रजीतू समर्थू । सती आदरें मुक्तिपंथास गेली । कथा राहिली पाहिजे चालवीली ॥१०२॥
फणीगर्भरत्नासि हो दग्ध केलें । म्हणे दास हें राक्षसी कृत्य जालें । पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेला । महाशक्ति भेदील रामानुजाला ॥१०३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP