युद्धकान्ड - प्रसंग तीसरा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


पुढें चालिला शीघ्र तो रामराजा । कपी धांवती वीर वेष्टीत फौजा । करीं हस्त घेऊनि बीभीषणाचा । बळें वेंघलें शृंग त्या पर्वताचा ॥१॥
कितीएक ते राहिले भार मागें । बळें वेंघलें शृग तो लागवेगें । पुढें शीघ्र आटोपिलें जातजातां । मिळाले कपी राम सौमित्र माथां ॥२॥
सुवेळागिरीशीखरीं राम पाहे । अती साजिरा त्रीकुटू शोभताहे । उभा रावणू गोपुरीं थोर धीट । तिथें पावला सुग्रिवाचा चपेट ॥३॥
कवे घातली पेटला शीघ्र कोपा । बळें रावणू ताडिला चंड थापा । बळें झाडिलीं तोडिलीं दिव्य छत्रें । म्हणे जानकी आणिली या कुपात्रें ॥४॥
पुढें देखतां रावणा क्रोध आला । पदीं झाडिलें ताडिलें सुग्रिवाला । मदें मातले दूर टाकून शंका । कळा लविली नीकरें एकमेकां ॥५॥
बहू कोपले मल्लयुद्धासि आले । रिपू भीडतां अंग अंगीं मिळाले । बळें हाणिती पृष्ठिसी वज्रमुष्टी । दणाणीतसे त्रीकुटीं सर्व सृष्टी ॥६॥
विरश्रीबळें वीर झोंबीस आले । झडा चांचरा भूतळामाजिं गेले । पुढें रावणें देह संकोचवीलें । अनर्थास भीऊनि गंतव्य केलें ॥७॥
कपीनाथ तो येथ घेऊनि आला । रिपूगर्व हो सर्वही भग्र केला । नमस्कारिलें राघवा ते प्रसंगीं । कपीभार ते सर्व आनंदसंगीं ॥८॥
कपीशीं सुवेळाचळा राम आला । असंभाव्य तो वीरमेळा मिळाला । दळें भूतळीं लोटले भार सैरा । पुढें आणिलें राजनीतीविचारा ॥९॥
कपी शोधितां शोधितां लक्ष कोटी । तयांमाजिं हा अंगदू वीरजेठी । बळें आगळा दक्ष चातुर्य जाणे । वयें अल्प लावण्य तारुण्य बाणे ॥१०॥
स्तुती उत्तरीं राम बोले तयासी । म्हणे धन्य गा अंगदा गूणराशी । मिळालसि तूं आमुच्या स्नेहवादा । विवेकें तुवां सोडिलें पितृद्वंद्वा ॥११॥
बहूतांपरी राघवें गौरवीला । तेणें शोभला शीघ्र ऊदीत जाला । प्रतीउत्तरें अंगदें स्तूति केली । उभा दृष्टि हे रामपायींच ठेली ॥१२॥
पुढें आपुला विक्रमू वाड बोले । महावीर ते सर्व चक्कीत जाले । तया अंगदा थोर आवेश आला । तेणें राघवा थोर संतोष जाला ॥१३॥
म्हणे रामराणा तया अंगदासी । त्रिकूटाचळीं भेट रे रावणासी । तयां सांगरे भीम पुरुषार्थ माझा । वदे सर्व संहारिशी कोण काजा ॥१४॥
प्रसंगोत्तरें अंगदा त्वां वदावें । बहूतांपरी रावणा बोधवावें । सिताकारणीं युद्ध मागून घ्यावें । परी शेवटीं भाग तोडून यावें ॥१५॥
नमस्कारिलें त्या रघूनायकाला । समस्तांसि सन्मानिलें सिद्ध जाला । कपी राम आज्ञेसि घेऊनि माथां । उडाला बळें चालिला व्योमपंथा ॥१६॥
नभामाजिं झेंपावला वेग केला । बळें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला । अकस्मात खालावला व्योमपंथें । रिपूची सभा बैसली भीम जेथें ॥१७॥
पुढें पावला तो सभेमाजिं कैसा । कपी राक्षसां भासला काळ जैसा । रिपू शस्रपाणी बळें सिद्ध जाले । उगे सर्व कोणासि कोणी न बोले ॥१८॥
कपीनें सभा सर्व आमान्य केली । पुढें रावणू लक्षिला भेटि जाली । मनीं पाहतो तो रिपू उच्च होतो । महापुच्छसिंहासनीं बैसला तो ॥१९॥
रिपू सर्वही बैसले स्तबध जाले । तयांलगिं हा अंगदू काय बोले । पुढें बोलतां बोलतां येरयेरां । बहुसाल धिक्कारिलें थोरथोरां ॥२०॥
बहूतांपरीच्या बहू शब्दयाती । महावीर तोंडागळे गर्जताती । रिपू घोर तो आपुलाल्या वगत्रें । बळें मातले हाणिती शब्न्दशस्रें ॥२१॥
बहू बोलती बोल नानापरीचे । महा युक्तिचे भक्ति संख्या रसाचे । तयां बोलतां मातला शब्दसिंधू । असंख्यात संख्या नसे तो अगाधू ॥२२॥
बहूतांपरी रावणू बोधवीला । परी नायके मानसीं गर्व केला । म्हणे काय रे पाहतां घ्या कपीला । महावीर तो अंगदू आक्रमीला ॥२३॥
कपीनें बळें थोर उड्डाण केलें । सभामंडपामस्तकीं शीघ्र नेलें । रिपू घोर तेही भयातूर जाले । धिराचे बहू स्तंभ झोकें उडाले ॥२४॥
विरें अंगदें त्रीकुटीं ख्याति केली । नभीं अंतराळीं बळें झेंप गेली । बळाचे भुजीं मल्ल राक्षेस कैसे । गळाले तळीं मारिले सर्प जैसे ॥२५॥
पुढें अंगदू भेटला रामचंद्रा । नमस्कारिलें आदरें त्या नरेंद्रा । कपी सर्वही तो समाचार सांगे । म्हणे शत्रुचा गर्वताठा न भंगे ॥३६॥
बहू बोलिलों जी तया रावणासी । परी नायके मातका गर्वराशी । भिजेना जळामाजिं पाषाण जैसा । धरीना मनीं सांगतां शब्द तैसा ॥२७॥
बहूसाल त्या रावणें गर्व केला । रघूनायका कोप तात्काळ आला । म्हणे राम गा सुग्रिवा ये प्रसंगीं । त्रिकूटाचळू पालथा घालिं वेगीं ॥२८॥
कपींद्रू वदे शीघ्र सेनापतीला । निळें सर्व सैन्यास संकेत केला । बळें चालिलीं तीं दळें वानरांचीं । अयूधें करीं शैल शृंगादिकांचीं ॥२९॥
कपी क्षोभले गजती मेघ जैसे । बळें भार ऊठावले शीघ्र तैसे । महा घोर घोषें भुमीकंप जाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ॥३०॥
हुडे कोट आटोपिले लंकनाथें । कपीभार झेंपावले व्योमपंथें । महायुद्ध आरंभिलें एकमेका । बळें घेतली वानरीं शीघ्र लंका ॥३१॥
त्रिकूटाचळीं वानरीं वेग केला । कपीराक्षसांतें महामार जाला । बहू कोपले वीर ते चंडकोपा । बळें हाणिती मस्तकीं वज्रथापा ॥३२॥
ग्रिवा तोडिती मोडि ती पंजरांतें । कपी झोडिती पाडिती वृक्षघातें । रिपू भांडतां थोर आवेश पोटीं । बलें ओढिती हात घालेनि झोंटी ॥३३॥
कपी कोपले गर्जती युद्धकाळीं । शिळा टाकिती पाडिती दुर्गपौळीं । गिरी हाणिती थोर नेटें धडाडी । बलें लागतां दिव्य लंका धडाडी ॥३४॥
त्रिकूटाचळीं लोटली सर्व सेना । असंभाव्य ते भार लंका दिसेना । कपी क्षोभले गर्जती काळ जैसे । दळेंशीं बळें धांवती वीर तैसे ॥३५॥
दळें पायिंची थोर अश्र्वा गजांचीं । रणीं चालिलीं दाट थाटें स्थांचीं । बहू भार शृंगारिले राक्षसांचे । महावीर ते घोर नानापरींचे ॥३६॥
रणीं पातली ते भयातूर सेना । रजें मातलीं चंद्रसूर्यो दिसेना । बहूसाल वाद्यें बहूतांपरींचीं । महा कर्कशें वाजती राक्षसांचीं ॥३७॥
समारंगणीं चालिले राजभारे । दळें दाटलीं वानरांचीं अपारें । बळें हाणिती एकमेकां धबाबां । झरे लागले शोणिताचे * थबाबां ॥३८॥
पुढें धांविले पायिंचे शस्रधारी । जया देखतां रोम आंगीं थरारी । कपीराक्षसांतें महामार जाला । तेणें शोणिताचा नदीपूर आला ॥३९॥
रणीं तोडिती वीर वीरां धसासां । भगाडें बहू पाडिती ते घसासां । बळें टोंचिती शूळ पोटीं भसासां । शिरें फोडिती मुष्टिघातें ठसासां ॥४०॥
पुढें झुंजतां भार तो मृत्यु पावे । करीती बळें वीर मागें उठावे । कपी कोपले थोर काळाग्रि जालें । रिपू पायिंचे सर्वही भग्र केले ॥४१॥
निमाले रणीं देह त्या पायिंच्यांचे । बळें ऊठले भार त्या राउतांचे । देहे टाकिती झुंजती स्वामिकाजा । पुढें धांवती वीर मागील फौजा ॥४२॥
कपी झुंजतां भंगल्या अश्वयाती । रणीं लेटिलीया बळें भदजाती । गिरीसारिखे थोर कीकोटघोषें । गजीं वानरां त्रासिलें हो विशेषें ॥४३॥
कपीराज ते हाणिती मत्त हस्तें । बळें झोडिती कुंजरें खस्तव्यस्तें । दळें पायिंची अश्वरत्नें अपारें । रणीं पाडिलीं कुंजरें थोरथोरें ॥४४॥
कळेना महामार त्या वानरांचा । रणीं थोरसंहार केला गजांचा । तया पृष्ठिभागीं पुन्हां भार आले । रिपू वानरीं सर्व संहार केले ॥४५॥
पुढें चालिले भार नाना रथांचे । बहू बाणजाळें कपीसैन्य खोंचे । रणीं धांवती चक्रचाली घडाडां । कपी टाकिती चंडशीळा धडाडां ॥४६॥
रथीं सारथी सर्वही चूर्ण केले । महावीर ते भार मागूनि आले । रणीं राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । जयो वानरां शीघ्र ठाकून आला ॥४७॥
रणीं मारुतें पाडिला जंबुमाळी । सुखेणें विदूणा पुढें तेचि काळीं । विरें सुग्रिवें क्षिप्र भट्टांसि द्वंद्वें । बळें सोडिलें वज्रमुष्टीस मैंदें ॥४८॥
द्बिवीदा करें वज्रस्पर्शू निमाला । बळ ताडिलें शीघ्र प्रातीपनाला । रणीं लक्ष्मणें भेदिलें वीरुपाक्षा । चतुर्थाशिं रामें शरें एक शिक्षा ॥४९॥
दळीं राक्षसांचे हाहाकार जाला । दळेंशीं नळें वीरुपाक्षू निमाला । कपी राक्षसांचे बहुसाल सेना । रणीं माजलें युद्ध तें वोहटेना ॥५०॥
निशी प्राप्त जाली रणीं घोर मारेम । महावीर ते झुंजती अंधकारें । बळें हाणती कोण कोणा कळेना । विरश्रीबळें मातले ते ढळेना ॥५१॥
पुढें शीघ्र चंद्रोदयो शुद्ध जाला । दिसों लागले राक्षसां वानरांला । रिपू हाणती एकमेकां कडाडां । नद्या वाहती शोणिताच्या भडाडां ॥५२॥
कपी वीर चंद्रोदयाच्या उजेडे । बळें हाणिती एकमेकां निवाडें । दळें भांडती राक्षसां वानरांचीं । असंभाव्य भ्यासूर प्रेतें विरांचीं ॥५३॥
कपी तापले कोपले वीर जेठी । बलें तोडिले दैत्य कोटयानुकोटी । समारंगणीं आटली सर्व सेना । रणीं राक्षसां येश येतां दिसेना ॥५४॥
क्षयो प्राप्त जाला बहू राक्षसांतें । पुढें युद्ध आरंभिलें इंद्रजीतें । दिसे पाहतां सर्वही येश गेलें । तया राक्षसें शीघ्र कापटय केलें ॥५५॥
अकस्मात तो इंद्रजीतू उडाला । नभोमंडळीं रावणी गुप्त जाला । पुढें घोर नीशाचरें तेचि काळीं । कपी पाडिले सर्वही सर्पजाळीं ॥५६॥
बहू सर्प झेंपावले व्योमपंथें । बलें धांवती वानरी सैन्य जेथें । महा काळ कर्कोट नानापरींचे । रणीं पाडिती भार गोळांगुळांचे ॥५७॥
कपींची पडों लागली सर्व सेना । पुढें पाहतां युद्धकर्ता दिसेना । गमे सर्व आकाश व्यालें विखारीं । बळें झोंबती सर्पकूळें जिव्हारीं ॥५८॥
कपीभार ते सर्व निर्जीव जाले । निचेष्टीत ते रामसौभित्र केले । रिपू पाडिले थोर आनंद जाला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥५९॥
नमस्कारिला राव तो आदरेंसीं । तेणें पुत्र आलिंगिला सौख्यराशी । अती आदरें सुंदरें रम्य सारें । पिता अंगिंचीं दे अलंकार चीरें ॥६०॥
म्हणे हो रणीं शांति केली रिपूची । बळें सर्वही त्या रिसां वानरांची । बहूतांपरी राव संतोषवीला । निरोपोंचि तो भूवनामाजिं गेला ॥६१॥
बहू सूख जालें तया रावणाशीं । तेणें शीघ्र पाचारिलें त्रीजटेशीं । म्हणे हो विमानीं सिता बैसवावी । रिपू मारिले शीघ्र तेथेंचि न्यावी ॥६२॥
रणीं पाडिले ते तये दाखवावे । सिता वीट मानील ऐसें करावें । बहूतांपरी रावणें । शीकवीली । वनामाजिं ते त्रीजटा शीघ्र गेली ॥६३॥
पुसे जानकी ते तया त्रीजटेला । सभामंडपी कोण वृत्तांत जाला । म्हणे त्रीजटा सोडिं चिंता स्वभावें । रणामंडळा राजआज्ञेस जावें ॥६४॥
अहो जानकी दु:ख चिंतीन तूंतें । तरी देह माझा पडो वज्रघातें ।  म्हणे सोडिं चिंता सिते सर्व कांहीं । तया लंकनाथ जयो प्राप्त नाहीं ॥६५॥
सिता ऐकतां शोक सांडूनि ठेली । तये त्रीजटेची बहू स्तूति केली । पुढें बैसल्या शीघ्र दोघी विमानीं । रणामेदिनीं पावल्या घोरबाणी ॥६६॥
पुढें पाहतां लक्ष कोटयानुकोटी । रणीं पाडिले हुंबती वीर जेठी । धडें तूटलीं राक्षसां वानरांची । शिरें दाटलीं घोर माहाविरांचीं ॥६७॥
भयासूर हा घोर संहार जाला । रणीं राक्षसां वानरां अंत आला । असंभाव्य उत्पाटिले वृक्ष जैसे । रणीं भग्र केले महावीर तैसे ॥६८॥
असंभाव्य ते तूटले पादपानी । धडे मस्तकें थोर विक्राळवाणी । बहू जाहली मेदमांसें चिडाणी । महा दर्प ते माजली वोरढाणी ॥६९॥
रणी एक ते छेदिलें सर्व अंगीं । तेणें काळिजें दीसती पृष्ठिभागीं । शिरें तोडिलीं मेंदु नीघे बरारां । बहु घाय तें रक्त वाहे झरारां ॥७०॥
कितीएक ते वीर जाले उताणे । किती पालथे दीसती दैन्यवाणे । कितीएक ते वीर घालूनि मेटें । भुमी पीटिती थोर दु:खें ललाटें ॥७१॥
कितीएक भूमी वमीती अशुद्धें । कितीएक ते मोडलें माजमध्यें । कितीएक ते वीर चौरंग जाले । कितीएक ते दूधडी भग्र केले ॥७२॥
कितीएक ते मुंडकीहीन जाले । कितीएक वक्षास्थळीं चूर्ण केले । कितीएक तीं तूटलीं जानुघोटीं । कितीएक ते कंठ बोटीं ललाटीं ॥७३॥
कितीएक वोटारिती तीव्र डोळे । निघाले वहू पोटिंचे मांसगोळे । पितें चारटें फोफसें रक्त मेंदु । शिसें आंतडीं कांतडीं मूळ कंद ॥७४॥
कितीएक जाली शिरें चूर चेंदा । बहू दाटलासे रणीं रक्तरेंदा । कितीएक हुंकारिती दैन्यवाणीं । कितीएक ते मागती अन्नपाणी ॥७५॥
कितीएक ते खूडिती पादपाणी । कितीएक ते शब्द कारुण्यवाणी । कितीएक ते दंशिती भूमि दंतीं । कितीएक ते लागले मृत्युपंथीं ॥७६॥
शिरें राक्षसांचीं धडें वानरांचीं । रणीं लागलीं एकमेकां विरांचीं । विरां शाकटां कुंजराघोडियांचीं । रिसां वानरां सर्व इत्यादिकांचीं ॥७७॥
नदीं शोणिताचे महापूर जाती । धडे कोथळे फूगळे वाहताती । शिरें पादपाणी बहू मांसमाळा । धनू खेटकें भातडया त्या विशाळा ॥७८॥
गिधें श्वापदें तीं असंभाव्य आलीं । स्वइच्छा बहू मांस भक्षूं निघालीं । भुतें सर्वही औट कोटी मिळालीं । बहूतांपरींचीं बहू तृप्त जालीं ॥७९॥
पुढें जानकी बोलिली त्रीजटेशीं । रणीं पाडिलें सर्वही वानरांशीं । महावीर ते कोण वेळा तयांतें । म्हणे त्रीजटे दाखवीं सर्व मातें ॥८०॥
रणीं त्रीजटा दाखवी जानकीसी । महा वीर ते पाडिले नागपाशीं । दिसे राम सौमित्र तोही निमाला । पुढें जानकीनें महाशोक केला ॥८१॥
बहूतापरी जानकी शांत केली । तये त्रीजटा शीघ्र घेऊनि गेली । समाचार सांगे तया रावणाला । वनामाजिं आली सिता रक्षणाला ॥८२॥
कपी सर्वही पावले मृत्युपंथू । जिती मारुती आणि नैरृत्यनाथू । जयालगिं जाली दया राघवाची । पहाया तया शक्ति काळासि कैंची ॥८३॥
रणें शोधिलीं सर्व बीभीषणानें । विरांलगिं अश्र्वासिलें थोर मानें । पुढें दृष्टिनें पाहिलें राघवानें । गरूडास्र नीरूपिलें व्योम जानें ॥८४॥
तयालगिं प्रायोजिलें शीघ्र पंथें । असंभाव्य झेंपावले व्योमपंथें । उडया घालिती पक्षिकूळें झडाडां । बळें तोडिती सर्पकूळें तडाडां ॥८५॥
विहंगी तिहीं सर्पसंहार केला । कपीभार तो मोकळा सिद्ध जाला । गिरीशीखरीं सर्व सेना घडाडी । त्रिकुटाचळीं घोष तेणें धडाडी ॥८६॥
म्हणे रावणू थोर आश्चर्य जालें । कपीचक्र तें सर्व निर्जीव केलें । सुतें वैरियां दाविली थोर ख्याती । रणीं मागुती ते कपी गर्जताती ॥८७॥
रणीं शत्रु जिंकील धूत्राक्षनामा । तया पाठवीजे प्रभू सार्वभामा । पुढें मंत्र ऐकों नका मंत्रियांचा । वदे रावणू आदरें त्यासि वाचा ॥८८॥
म्हणे गा विरा शीघ्र तूं ते प्रंसगीं । रिपूलगिं मारावया जाय वेगीं । अलंकार देऊनियां तोषवीला । महावीर धूत्राक्ष युद्धा निघाला ॥८९॥
रणी वीर धूम्राक्ष तो वज्रदंष्ट्री । तिचा अंकपू चालिला भार पृष्ठी । रणामंडळीं थोर संहार केला । पुढें राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला ॥९०॥
बहू युद्ध केलें तया राक्षसानें । महावीर धूम्राक्ष त्या अंकपानें । बळें दोघेही मारिलं मारुतीनें । रणीं वज्रदंष्ट्री तया अंगदानें ॥९१॥
महा वीर ते झुंजतां भग्र जाले । बहुसाल घायाळ धाकें पळाले । तिहीं सर्व सांगीतली युद्धवार्ता । तेणें रावणामानसीं थोर चिंता ॥९२॥
रणीं राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । प्रहस्तू पुढें शीघ्र युद्धा निघाला । कपीराक्षसां थोर संहार जाला । निळें झोडिला पाडिला भग्र केला ॥९३॥
पुढें रावणू चालिला लागवेगें । तयालगिं मंदोदरी नीति सांगे । न मानीत तो चालिला आवरेना । बळें लोटली ते असंभाव्य सेना ॥९४॥
महा वीर झुंजार ते भार आले । बहूसाल शृंगारमंडेत जाले । बळें पुत्रप्रधानमेळा मिळाला । रणामंडळा रावणू शीघ्र आला ॥९५॥
बहू त्रासिलें सैन्य गोळांगुळांचें । रिपूबाणजाळें बहू सैन्य खोंचे । महा वीर तेही बळें मग्र चेले । पळले कपी राघवाआड गेले ॥९६॥
बहू त्रासिलों राक्षसांचेनि बाणीं । कपीभार ते बोलिले दैन्यवाणी । बळें कांपती खोंचती देति धांपा । बळें रक्षिं गा राघवा मायबापा ॥९७॥
तया देखतां राम  कार्मूक ओढी । पुढें शीघ्र सौमित्र तो हात जोडी । म्हणे वीर तो स्थीर व्हावें समर्थें । करीतों बळें भग्र त्या रावणातें ॥९८॥
रणीं रावणा वीर सामर्थ्य नेलें । नेट नील माया तया भग्र केलें । पुढें शीघ्र पाचारिलें रावणाला । महावीर सौमित्र युद्धा निघाला ॥९९॥
सुमित्रासुता रावणा युद्ध आता । पुढें देइजे आदरें चित्त श्रोता । म्हणे दास हा वीर कोदडपाणी । रणीं रावणालगिं त्रासील बाणीं ॥१००॥


References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP