युद्धकान्ड - प्रसंग पांचवा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


उभा राहिला वीर मंदार जैसा । मनाहूनि पूढें बळें वेग तैसा । रुपें कर्कशू पाहतां पाहवेना । बहूसाल उंचाट त्या राहवेना ॥१॥
अकस्मात तो व्योमपंथें उडाला । मही झोंकली पन्नगा भार जाला । बहू झोंकिलें कूर्म वाराह दंती । झडा चांचरें ते धरा सांवरीती ॥२॥
स्फुरद्रूप सर्वांग वाजे झडाडां । उडाले नभीं वृक्ष वातें फडाडां । असंभाव्य पिंजारिलें पुच्छ मागें । नभोमंडळीं जातसे लागवेगें ॥३॥
बहू लंघिली पोक ळा वेग केला । द्विपें पांचही शीघ्र टाकूनि गेला । उडाला बळें पांच सिंधू अगाधू । पुढें देखिला साहवा क्षीरसिंधूं ॥४॥
तयाच्या तिरीं उंच आकाशपंथें । विरें देखिलें रम्य द्रोणाचळातें । तया मस्तकीं दिव्य वल्ली अपारा । प्रभा फांकली तेजकल्लोळ सैरा ॥५॥
पुढें देखतां मारुता सांवरेना । धरीतां बळें तेज हाता चढेना । महा औषधी दिव्य शैल्या निशैल्या । कपी देखतां सर्वही गुप्त जाल्या ॥६॥
तया पर्वताची बहू स्तूचि केली । परी नायकें सर्वही व्यर्थ गेली । बहूसाल त्या आचळें गर्व केला । पुढें मारुता कोप तात्काळ आला ॥७॥
महा थोर धिक्कार केला तयासी । बळें शीघ्र उत्पाटिलें पर्वतासी । गिरी घेतला पुच्छ वेष्टीत माथां । कपीराज तो चालिला व्योमपंथा ॥८॥
रणीं जाहला सर्व संहार जेथें । महावीर आला अकस्मात तेथें । निशा दाटली अंधकारें दिसेना । गिरी ठेवितां देखिली सर्व जेना ॥९॥
पिता पावला तो बळें मारुतीचा । रणीं वास नेला तया औषधींचा । सुगंधेंचि ते वीर आरोग्य जाले । कपी सर्वही मृत्यु मारूनि ठेले ॥१०॥
दळेंशीं बळें ऊठला रामराजा । स्फुराणें रणीं गर्जती वीरफौजा । पुढें मारुतें घेतलें पर्वताला । क्षिराब्धीतटीं शीघ्र ठेवूनि आला ॥११॥
तुलेना गती शक्ति माहा विराची । कळेना करी कोण संख्या बळाची । दिसे पाहतां वानरू वेषधारी । परी जाणिजे सत्य हा त्रीपुरारी ॥१२॥
निशींच्या पदें चारि कोटी उडाला । गिरी दों पदीं शीघ्र घेऊनि आला । पुन्हां मागुती तीपदामाजिं नेला । प्रभातेचि चौथे पदीं प्राप्त जाला ॥१३॥
सहस्रक गांवें गिरी स्थूळ मोठा । असंभाव्य या मारुतीचा चपेटा । उडाला नभीं योजनें कोटि सोळा । नसे शोधिताम दूसरा या भुगोळा ॥१४॥
बहू पंथ चाले रवी भार नाना । बहू भार वाहे फणी तो उडेना । गुरूडासि तो आचळू हालवेना। दुजी साम्यता ब्रह्मगोळीं दिसेना ॥१५॥
पुढें मारुती भव्य आनंदरूपी । नभोमंडळीं भानु जैसा प्रतापी । महावीर तैसा दळामाजिं आला । समस्तांसि देखोनि आनंद जाला ॥१६॥
सखा तो जिवाचा असे दूरि देशीं । सदा लागलें चित्त हें त्याजपाशीं । पुढें पाहतां तो अकस्मात आला । तयासारिखें जाहलें मारुताला ॥१७॥
कपीनें कसें पाहिलें राघवासी । पुढें देखिलें लेभियानें धनासी । तया बाळकें देखिलें जननीला । तयासारिखें जाहलें मारुताला ॥१८॥
नमस्कारिलें त्या रघूनायकासी । उभा राहिला हात जोडोनि पाशीं । म्हणे धन्य गा धन्य वीरा उदारा । कपी काय द्यावें तुझ्या ऊपकारा ॥१९॥
अगा मारुती तूझिया ऊपकारें । जिवा ऋण जालें बहूसाल भार । सदा सर्वदा आमुची थोर चिंता । समस्तांसि तूं एकला प्राणदाता ॥२०॥
म्हणे मारुती सर्व स्वामीप्रतापें । प्रभू काय कीजेल म्यां दीनरूपें । समर्था तुझेनी कृपेवीण कांहीं । स्वत: अल्पही कार्य होणार नाही ॥२१॥
बहूतांपरी मारुतें स्तूति केली । मनोवृत्ति ते राघवाची निवाली । पुढें राघवें रुद्रे संतुष्ट केला । बहूतांपरी आदरें गौरवीला ॥२२॥
प्रसंगें कपीनाथ सुग्रीव बोले । म्हणे मारुती प्राण त्वां रक्षियेले । कुळामाजिं जालसि पूर्ण प्रतापी । कपींचीं कुळें सर्वही श्र्लाघ्यरूपी ॥२३॥
कपी सर्वही बाणजाळें निमाले । तुझीया प्रतापें पुन्हां जन्म जाले । प्रसंगें सखा राघवें निर्मिलासी । कपींकारणें तूं बहू कष्टलासी ॥२४॥
तया बोलतां मारुता सूख जालें । पुन्हां मारुतेंही बहू तोषवीलें । असो हे बहूसाल पाल्हाळगोवी । कथा राहिली ते पुढें चालवावी ॥२५॥
कपीनाथ बोले रघुनायकासी । न ये रावणू चंडदु:खे रणासी । तरी शीघ्र लंकापुरी जाळवावी । समर्थें कपीलगिं आज्ञा करावी ॥२६॥
पुढें बोलिजे सुग्रिवालगिं देवें । तुम्हीं कल्पिलें कार्य सिद्धीस न्यावें । कपी रामआज्ञेस घेऊनि वेगीं । विरांलगिं आज्ञा करी ते प्रसंगीं ॥२७॥
तुम्हीं लागवेगें चुडया पाजळीजे । बळें शीघ्र लंकापुरी दग्ध कीजे । करीं घेतले उंच बांधूनि भारे । कपी धांवती एकमेकां पुढारे ॥२८॥
चुडया पावकें सर्वही दीप्त केल्या । अकस्मात लंकापुरीमाजिं नेल्या । बळाचे कपी धांवती लक्ष कोटी । चुडया खेळती थोर आनंद पोटीं ॥२९॥
शिखा लागतां शीघ्र जाले उमाळे । निळे पींवळे श्वेत आरक्त काळे । बळू लागला चंड वारा भरारां । पुरीमाजिं तो वन्हि धांवे सरारां ॥३०॥
गृहागोपुरा जाहला एक वेळा । असंभाव्य हेलावती तीव्र ज्वाळा दिशा दाटल्या धूत्र आकाशपंथें । पिडा जाहली खेचरां भूचरांतें ॥३१॥
मळें धूविलीं तीं तया रावणानें । सळें ऊसणें घेतलें पावकानें । बळें लागतां थोर कोपें कडाडी । बळें माजला वन्हि पोटीं धडाडी ॥३२॥
बळें क्रोध आला तया पावकाला । वरी वात वेगीं बळें साह्य जाला । सिखा चालिल्या अंतराळीं धडाडां । जळों लागली दिव्य लंका भडाडां ॥३३॥
अपारें घरें गोपुरें रम्य सारें । बहूसाल दामोदरें थोरथोरें । पडों लागलीं दग्ध होतां धबाबां । महा राक्षसी तोंड घेती खबाबां ॥३४॥
ध्वनी राक्षसांची असंभाव्य जाली । मुखें बोलती आगि रे आगि आली । किती एक राक्षेस धांवूनि आले । अकस्मात ते वीर सर्वै मिळाले ॥३५॥
बळें धांवली ते असंभाव्य सेना । पुढें जावया लाग कोठें दिसेना । शिखा धांवती वन्हिच्या पाठिमागें । पळाळे बळी प्राण घेऊनि वेगें ॥३६॥
बळें सूटलीं वैभवें राक्षसांचीं । बहू दाटलीं वाट प्रेतें विरांचीं । कितीएक ते धीट नेटें जळाले । कितीएक ते वीर मागें पळाले ॥३७॥
त्रिकूटाचळीं थोर आकांत जाला । असंभाव्य राक्षेस कीती निमाला । स्रिया बाळकें जेथ जेथें पळालीं । शिखा लागतां तेथ तेथें जळाळीं ॥३८॥
पळायासि मागें पुढें रीघ नाहीं । जळाले पुरीमाजिं ते सर्व कांहीं । बहू कुंजरें शाकटें अश्र्व नाना । निमाले रथी सारथी सर्व सेना ॥३९॥
सहस्रें दहा भूवनें रावणाचीं । जळालीं बहू संपदा वैभवाची । सुवस्ता अळंकार दिव्यांबरांचीं । सुगंधेल आज्यादि नाना  रसांचीं ॥४०॥
गुरें वांसरें जाळिलीं पावकानें । बहू हाट बाजार केणीदुकानें । बहूतांजणांचें बहू बित्त गेलें । त्रिकूटाचळा पावकें शुद्ध केलें ॥४१॥
बहू वेवसायी भले मोठमोठे । भुसारी जरी जोहरी आणि चाटे । जळालें बहू वित्त हाणोनि घेती । धरेना कदा सांवरेना रुदंती ॥४२॥
सभामंडपीं राक्षसीं हांक नेली । म्हणे पाहतां काय लंका जळाली । दहा योजनें तीसरा भाग जो कां । बळें जाळिली वानरीं सर्व लंका ॥४३॥
तया रावणा वाटली सर्व चिंता । म्हणे पा।ठवावें रणीं कोण आतां । न दीसे मुखीं मंदली सर्व शोभा । पुढें बोलिला शीघ्र कुंभा निकुंभा ॥४४॥
म्हणे वानरीं जाळिली सर्व लंका । तयांशीं करा युद्ध टाकूनि शंका । तयां सांगतां सर्व ऊदीत जाले । महावीर ते सात युद्धा निघाले ॥४५॥
बळी कुंभ नीकुंभ जंघ प्रजंघे । दळें सिद्ध केलीं बळें लागवेगें । महावीर झुंजार तो वीरुपाक्षू । दळीं चालिला क्रोधून शोणिताक्षू ॥४६॥
बळी सातही ते रथारूढ जाले । महावीर राक्षेस सर्वै मिळाले । बळें चालिलीं राक्षसांचीं अपारें । भुमी शेष सांडूं म्हणे थोर भारें॥४७॥
बहू दग्ध लंकापुरी होय जेथें । बळें चालिले भार तेणेंचि पंथें । निमिष्यांत कुंभें विरें तेचि काळीं । महा मेघ तो पाडिला बाणजाळीं ॥४८॥
बळें मातला वन्हि तो वीझवीला । त्रिकूटाचळीं लोक आनंदवीला । विझाली पुरी शीघ्र तेणेंचि मार्गें । निघाली पुढें वाहिनी लागवेगें ॥४९॥
रणामंडळा पारखे वीर आले । कपी द्रूमपाणी बळें सिद्ध जाले । समस्तांपुढें अंगदू वीर रागें । रणीं लोटला क्रोधनू लागवेगें ॥५०॥
बळें फोडिली हांक कल्पात जैसी । रणीं मांडलें युद्ध दोघांजणांशीं । विरें विंधिलें वानरांलगिं बाणीं । कपी कोपला अंगदू शैलपाणी ॥५१॥
गिरी टाकितां क्रोधनू गुप्त जाला । महा पर्वताचे तळीं तो निमाला । तया साव्हया शोणिताक्षू निघाला । तयें अंगदू भेदिला भग्र केला ॥५२॥
रणीं वीर लक्षूनियां बाण घाली । बळें गेलिया अंग भेदूनि भालीं । उणें देखतां शीघ्र मैंदें द्विवीदें । तरू घेतला हांक देऊनि क्रोधें ॥५३॥
कपीवर धांवोनि युद्धासि आला । रणीं अंगदालगिं तो साह्य जाला । तईं शीघ्र येरीकडे लागवेगें । बळें धांवले ते विरश्रीत रागें ॥५४॥
प्रजंघें युपाक्षें तया शोणिताक्षा । दिल्हें पूट धांवोनि घेऊनि पक्षा । त्रिवर्गा त्रिवर्गीं रणीं युद्ध जालें । शरीं राक्षसीम व्योम संपूर्ण केलें ॥५५॥
शिळा शीखरें वृक्ष पाषाणघातें । कपीवीर ते हाणिती राक्षसातें । समांरगणीं दूर टाकोनि शंका । बळी नीकुरें भेदिती एकमेकां ॥५६॥
तंई अंगदें थोर अद्‍भूत केलें । बळें वाड झुंबाड ते उन्मुळीलें । प्रजंघासि हाकूनि क्रोधें बहूतें । रणीं झोडिला पाडिला वृक्षघातें ॥५७॥
पुढें देखिलें त्या युपाक्षासि मैंदे । बळें गर्जला तो कपी घोर नादें । रणीं झुंजतां थोर आवेश मैंदा । शिळा टाकितां जाहला चूर्ण चेंदा ॥५८॥
द्बिवीदें किरें पाडिला शोणिताक्षू । उणा देखिला सर्व नैऋत्यपक्षू । तिघां राक्षसां थोर संहार जाला । रणमाजिं युद्धासि तो कुंभ आला ॥५९॥
पिता कुंभकर्ण महावीर जैसा । तयासारिखा लोटला कुंभ तैसा । उभा रे उभा तूं रणामाजिं मैंदा । अरें अंगदा जासि कोठें द्बिवीदा ॥६०॥
बहू विक्रमें पाडिलें राक्षसांशीं । रणीं ऊसनें शीघ्र घेतों तुम्हांशीं । क्षणीं तेंचि कोदंड घेऊनि हातीं । कपी मैंद तो भेदिला बाणघातीं ॥६१॥
नवां बाणघातीं कपी भग्र केला । रणामाजिं तो प्रेत होऊनि ठेला । द्बिवीदासि दाही शरीं तेचि काळीं । विरें राक्षसें पाडिलें बाणजाळीं ॥६२॥
पुढें पाहतां देखिलें अंगदाला । कपीवीर तो वृक्ष घेऊनि आला । बळें हाणितां खीळिले हस्त बाणीं । चळेना कपीवीर तो वज्रठाणीं ॥६३॥
उभा राहिला बाण झेलीत कैसा । कुठारातळीं छेदिजे वृक्ष जैसा । तया अंगदा शीघ्र प्राणांत आलें । रघूनायका वानरीं जाणवीलें ॥६४॥
मुखें बोलती अंगदू वीर गेला । कपीनाथ सुग्रीव तैसा उडाला । रथारूढ होऊनि कोदंड हातें । बळें मोडिलें तोडिलें वृक्षघातें ॥६५॥
रणीं कुंभ तो मल्लयुद्धासि आला । बळें तोडिता जाहला सुग्रिवाला । तया सुग्रिवें दीधली वज्रमुष्टी । रणीं पाडिला कुंभ तो प्रेतसृष्टी ॥६६॥
महावीर तो धाडिला मृत्युपंथें । निकुंभें रणीं हाकिलें सुग्रिवातें । कपीनाथ सुग्रीव घालूनि मागेम । पुढें धांवला मारुती लागवेगें ॥६७॥
 तया राक्षसेम भेदिलें मारुताला । कपीवीर किंचीत मूर्छीत जाला । पुढें ऊठला तो कपी काळ जैसा । मनामाजिं आवेश अद्‍भूत तैसा ॥६८॥
महापर्वतू घेतला मारुतानें । निकुंभावरी टाकिला थोर त्राणें । गिरी टाकितां शांति जाली तयाची । फळी फूटली सर्वही राक्षसांची ॥६९॥
त्रिकूटाचळामाजिं घायाळ गेले । रिपू प्राण घेऊनि तैसे पळाले । भयातूर ते सांगती रावणाला । बळी तो विरें वीर सर्वे निमाला ॥७०॥
बहू दु:ख जालें तया रावणाशीं । पुढें धाडिलें शीघ्र तीघां सुतांशीं । विशालाक्ष मक्राक्ष आणी खरातें । रणा पाठवीलें तिघां कूमरातें ॥७१॥
तिघेही दळेंशी बळें सिद्ध जाले । असंभाव्य ते भार मागें मिळाले । महा विक्रमें झेलिती वीर खर्गें । समारंगणीं पावले लागवेगें ॥७२॥
बडंगें लोहो मूसळें शूळपाणी । कटार्‍या सुर्‍या तोमरें चापपाणी । बहू खेटकें भुद्रलें आणि भाले । महावीर राक्षेस युद्धा निघाले ॥७३॥
कपीवाहिनीचा असंभाव्य थावा । प्रतापें बळें शीघ्र केला उठावा । शिळा शीखरें हाणिती राखसांतें । रिपू मारिती वानरां बाणघातें ॥७४॥
महायुद्ध आरंभिलें एकमेकां । तयां भीडतां तो धरी काळ शंका । रणीं राक्षसां पाडिलें घोर मारें । कपीवीर ते गर्जती भूभुकारें ॥७५॥
रणामाजिं मक्राक्ष तो शीघ्र कोपे । पुढें चालिला चापपाणी प्रतापें । स्वयें आपुलें सैन्य घालूनि मागें । कपी भेदिता जाहला लागवेगें ॥७६॥
बळें सोडिलीं राक्षसें बाणजाळें । तुटों लागती वानरांचीं शिसाळें । थटाटां रणीं तूटती पादपाणी । शरीरें बहूसाल विक्राळवाणी ॥७७॥
देहे खोंचलें थोर माहा विरांचे । झरे लागले वाहती शोणिताचे । रिपू झुंजतां राक्षसें भग्र केले । कितीएक ते भार मागें पळाले ॥७८॥
बळें धांवती बाण ते लागवेगें । पळाले बळाचे कपी सर्व मागें । कपींचीं दळें भंगिलीं राक्षसानें । तया मस्तकू तूकिला राघवानें ॥७९॥
रणीं मांडिला थोर कल्पांत सृष्टी । बहूतां विरीं दीधली त्यासि पृष्ठी । रणामाजिं कोणासही राहवेना । करी घोर संधान तें साहवेना ॥८०॥
म्हणे राम हो कोण सामर्थ्य याचें । रणीं भंगिलें सैन्य गोळांगुळांचें । वरी अंतराळीं बहू बाणजाळें । क्षणामाजिं तें तोडिलें शीघ्र काळें ॥८१॥
उभा राहिला राम वज्रांगठाणें । गुणीं लविलें चाप चंद्रार्धबाणें । टणत्कारिलें सात बोटीं थरारी । महाचंड ब्रह्मांड घोषें गरारी ॥८२॥
बळें राक्षसें व्योम संपूर्ण केलें । रणीं राघवें शीघ्र छेदूनि नेलें । पुढें घेतला दूसरा बाण रामें । गुणीं लविला थोर शत्रू विराभें ॥८३॥
विरें मागुतें थोर संधान केलें । रिपूचें रणा शीर छेदूनि नेलें । महावीर मक्राक्ष तो बाणघातें । निमाला रणीं चालिला मृत्युपंथें ॥८४॥
पुढें राम पाचारिला त्या खरानें । विशालाक्ष ऊठावला थोर त्राणें । म्हणे राजपुत्रा बरें युद्ध केलें । रणीं विक्रमें शीर छेदूनि नेलें ॥८५॥
असे सर्वदा तो जयो प्राप्त कैंचा । करी ग्रास राहू रवीमंडळींचा । प्रतीउत्तरें बोलिला राम वाणी । बळें बूजिलें भूमिआकाश बाणीं ॥८६॥
तिहीं राक्षसीं घोर संधान केलें । विरां वाटलें थोर कल्पांत जालें । पुढें तोडिले सर्वही बाण रामें । प्रतापें रणामाजिं त्या पूर्णकामें ॥८७॥
प्रतापें रणीं राघवें बाणघातें । रिपू दोघेहि धाडिले मृत्युपंथें । रणीं राक्षसां थोर संहार जाला । समाचार गेला तया रावणाला ॥८८॥
पुढें रावणानें बहू दु:ख केलें । नसे अंतरीं सौख्य टाकून गेलें । दशग्रीव बोले विरा इंद्रजीता । प्रतापें रणामाजिं तूं जाय आतां ॥८९॥
रिसां वानरांची असंभाव्य सेना । तुजावेगळी सर्व संहारवेना । उभा राहिला शीघ्र ऊदीत जाला । म्हणे शीघ्र संहारितों वैरियाला ॥९०॥
दळें चालिलीं राक्षसांचीं अचाटें । पुढें वानिती भाट वेताळथाटें । बळी रावणी तो रथारूढ जाला । बहूसाल वाद्यें दळेंशीं निघाला ॥९१॥
रणामाजिं येवोनियां होम केला । महा भीम कृत्या रथ प्राप्त जाला । रथारूढ होवोनि वेगीं उडाला । नभोमंडळामाजिं तो गुप्त जाला ॥९२॥
असंभाव्य तीं मोकळीं बाणजाळें । बळें धांवती प्रेरिले दूत काळें । कपींची तुटों लागलीं कंठनाळें । रणी लोटती वीर प्रेतें सुकाळे ॥९३॥
असंभाव्य सामर्थ्य त्या रावणाचें । कळेना कळा कोण कापटय याचें । कदा नेणती बापुडे देव कांहीं । रणी पाडितो वीर सन्मूख नाहीं ॥९४॥
बहू खोंचली ते असंभाव्य सेना । दिशा दाटल्या बाणजाळीं दिसेना । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । पुढें मारुतीचा पिता शीघ्र आला ॥९५॥
निरूपी अती आदरें राघवाशीं । म्हणे अंगिरी अस्र योजी त्वरेंशीं । पुढें राम तात्काळ तें अस्र घाली । तयें तूतलें शीर कृत्या निमाली ॥९६॥
पुढें रावणी भूतळामाजिं आला । रणामंडळीं मृत्यु जैसा उदेला । भयासूर तो वीर घोरप्रतापी । शरा सोडिता जाहला काळरूपी ॥९७॥
समस्तीं अकस्मात तो देखियेला । तया एक वेळा बहू भार केला । कपीवीर ऊठावले शीघ्र काळें । शिळा शीखरें टाकिती बाणजाळें ॥९८॥
रणीं रावणी एकला वीर जेठी । कपी लोटले लक्ष कोटयानुकोटी । रिसीं वानरीं थोर कल्लोळ केला । बळें ताडिते जाहले राक्षसांला ॥९९॥
बळें फेंकिला शूळ त्या मारुतानें । गदा घेतली शीघ्र बीभीषणानें । परीघासि घेऊनियां शीघ्र धांवे । कुमूद करीं वेग नेटें उठावे ॥१००॥
कपीऋषभा थोर आवेश आला । शतघ्नीस घेऊनि सन्मूख जाला । द्विवीदें बळें सोडिलें चक्र कैसें । महा पर्वतीं चालिलें वज्र जैसें ॥१०१॥
सुगंधें विरें ताडिला शस्रघातें । गिरीशृंग तो टाकिला जांबुवंतें । शिळा टाकिली चंद त्या अंगदानें । महा खड्‍ग तें मोकलीलें नळानें ॥१०२॥
बहू गा निळें झोंकिला तो विशाळू । कपी सुग्रिवें टाकिला चंड शैलू । सुमित्रासुतें राघवें तेचि काळीं । रिपू रावणी विंधिला बाणजाळीं ॥१०३॥
बहूतांमधीं एकला इंद्रजीतू । रणीं वेढिला काळ जैसा कृतांतू । बळें वानरांचा बहू मार जाला । रिपू राक्षसें अंतरीं तुच्छ केला ॥१०४॥
बहुतां जणांचा बहू एक मेळा । निमिष्यांत तोडूनि नेला स्वलीला । पुढें राक्षसें घोर संधान केलें । विरें विक्रमें सर्व सामर्थ्य नेलें ॥१०५॥
रिपूचीं दळें पाडिलीं इंद्रजीतें । रणामाजिं जालीं असंभाव्य प्रेतें । रिसें वानरें राम सौमित्र बाणीं । बळें भेदुनी चालिला चापपाणी ॥१०६॥
पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेला । समाचार सांगेल हा रावणाला । ऐकतां वैर नासे । म्हणे दास निर्वैर सूखें विलासे ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP