चक्रव्यूह कथा - माहिती व विवेचन
श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.
नामदेवांच्या छापील गाथांमध्यें अनेक कवींच्या काव्यांची भेसळ दिसते व ज्ञानेश्वरकालीन आद्य नामदेवांचें काव्य कुठलें तें बरोबर कळत नाहीं. या काव्यांत विष्णुदास नामा हें कविनाम वारंवार येते. शुकाख्यानावरुन असें दिसतें कीं त्याचा कर्ता विष्णुदास नामा हा इसवी सन १५९५ मध्यें हयात होता. परंतु विष्णुदास नामा हें अभिधान विष्णुचा दास या अर्थी अनेकांनी वापरलें असण्याची शक्यता वाटते. विष्णुदास नाम्याची बुधबावणी छापली आहे. या बाबतींत अजून संशोधन व्हावयाचें असून त्याबद्दल उपलब्ध माहिती ऑक्टोबर १९६२ च्या महाराष्ट साहित्यपत्रिकेंत मिळेल.
विष्णुदास नाम्यानें भारत लिहिलें व तें एकाकाळी फार प्रसिद्ध होतें. त्याच्या प्रती ठिकठिकाणी आढळतात. हा भारतकार विष्णुदास नामा कोण हा एक मोठा प्रश्न आहे. कृष्णदास दामा हा प्राचीन कवि भारत नामदेवांनी लिहिल्याचें आदरपूर्वक सांगतो, परंतु उपलब्ध भारताची भाषा यादवकालीन नाहीं. भारताच्या निरनिराळ्या प्रतींत विलक्षण फरक आढळतो. आदिपर्वाची ओवी संख्या दोन हजारापासून चार हजारापर्यंत आढळते. कांहीं पर्वांत मूळ गाभा असून ओवीसंख्या निरनिराळ्या काळीं त्यांत भर घालून फुगवली असें दिसतेंतर कांहीं पर्वोच्याप्रतीत इतकी भिन्नता आढळतें की त्यांचें कर्ते निरनिराळे होतें कीं काय असा संशय उत्पन्न होतो. भारताची अनेक पर्वे महानुभावीय मठांत आढळतात. नामदेवांचा उल्लेख महानुभावीय ग्रंथात येतो व त्यांनी महानुभावीय उपदेश घेतला असें स्मृतिस्थळाकार सांगतात.
हें भारत प्रकाशित करण्याचा आजपर्यंत प्रयत्न झाला नाहीं. स्वर्गारोहण पर्व इ. स. १८८८ मध्यें छापल्याचा कै. आजगांवकरांनी उल्लेख केंला आहे. भारताची सुटी प्रकरणे देखिल आढळतात. छापील गाथेंतली म्हाळसेनकथा (द्रोणपर्व) ही उपलब्ध हस्तलिखितांत आढलेलीं नाहीं. अनंतव्रतकथा (वनपर्व) अप्रकाशित असून एकाद्शीमहात्म्याच्या एका प्रतींत ती कथा शांतिपर्वांत असल्याचा उल्लेख आढळला.
चक्रव्यूह्कथेचें हस्तलिखित धुळें येथील राजवाडे संशोधनमंदिरांत एका महानुभावीय बाडांत आहे. तें स्वतंत्र आख्यान असल्याचा समज बरोबर नसून तें द्रोंणपर्वंच असल्याचें महाराष्ट्र सरकारच्या औंध वाचनालयांतील द्रोणपर्वाशी तुलना करतां आढळून आले चक्रव्यूहकथेंत नमनापूर्वी आणखी १९ ओव्या होत्या असें दिसतें, त्यांतल्या १५ व सोळावीचा कांहीं भाग उपलब्ध नाहींत. या १९ ओव्या औंध प्रतींत नाहींत. त्याच्या पुढच्या तीन ओव्या महानुभावीय घाटणीच्या आहेत. औंध प्रतींत व अन्यत्र त्या निराळ्या असून त्याम्त गणपती व सरखती यांना नमन आहे. चक्रव्यूहकथें प्रत्यक्ष द्रोणवध नाहीं. ६२२ ओवीपुढें कांहीं तरी भाग गळला असावा. औंध प्रतींत हा भाग सुमारे शंभर ओव्यांचा विस्तृत आहे, परंतु कदाचित् तो अगदीं थोडया ओव्यांचा मुळांत असूं शकेल. द्रोणपर्वाच्या अन्य प्रती पाहतां चक्रव्यूहकथा जास्तीत जास्त मूळ गाभा दर्शविते असा तर्क होतो. या निरनिराळ्या प्रतींत इतका फरक आहे कीं पाठभेद देणें शक्य नाही. मूळ गाभा शोधून नंतर पाठमेद शोघणें जरूर आहे.
तिसर्या प्रसंगाशेवटी ‘तें सांगें विष्णुदास पंडीतें’, चवथ्या प्रसंगा अखेर ‘ते सांगैल कवि कृस्ण पंडीतें’ व पांचव्या अध्यायाशेवटीं ‘म्हणे पंडित विष्णुदास’ असें म्हटलेलें आढळतें. पांचव्या अध्यायांत ‘पंडितें’ असेंच पाहिजे व मात्रा गळाली असावी. विष्णुदास स्वत:ला पंडित म्हणवीत नसून तो पंडितांना गोष्ट सांगत आहे. कवि स्वत:ला ‘कृष्ण’ नांव देतो व कथे शेवटीं स्वत:ला ‘दास श्रीकृष्णाचा’ म्हणवतो, अशा ओळी औंध प्रतींत नाहींत, भारतच्या कर्णपर्वाच्या एका प्रतींत कांहीं ठिकाणीं विष्णुदास नामा याला ‘कृष्णदास अथवा कृष्णदास नामा’ हें नांव लावलेले आढळतें ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे. ओव्यांत साडेतीन चरणी व चार ओव्यांचे मिश्रण दिसतें.
चक्रव्यूहकथेचे हस्तलिखित फार अशुद्ध आहे. तृतीय वचनी ‘भीमें’ ऐवजी ‘भीम’ ‘राखतील’ ऐवजी ‘राखतीले’ असें त्यांत आढळतें. कित्येक ठिकाणीं विनाकारण रफार आहे तर अनेक ठिकाणीं हवा तेथें तो नाहीं. ‘न’ ऐवजी ‘ण’ फारच आहे, छापतांना औंध प्रतीचा उपयोग करून जरूर त्या दुरुस्त्या केल्या. ‘ण’ ऐवजी ‘न’ व असे ईतर प्रयोग बदलले नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP