संसदेत वापरावयाची भाषा .
१२० . ( १ ) सतराव्या भागामध्ये काहीही असले तरी , मात्र अनुच्छेद ३४८ च्या तरतुदींना अधीन राहून संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल :
परंतु , यस्थास्थिति , राज्यसभेचा सभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती , ज्या कोणत्याही सदस्यास हिंदीतून किंवा इंग्रजीतून आपले विचार नीटपणे व्यक्त करता येत नसतील त्याला आपल्या मातृभाषेत सभागृहाला संबोधून भाषण करण्याची अनुज्ञा देऊ शकेल .
( २ ) संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर , या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर हा अनुच्छेद , त्यातील " किंवा इंग्रजीतून " हे शब्द जणू काही गाळलेले असावेत त्याप्रमाणे प्रभावी होईल .
संसदेतील चर्चेवर निर्बंध .
१२१ . सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत , यात यापुढे तरतूद केल्यानुसार , त्या न्यायाधीशास पदावरुन दूर करण्याची विनंती करणारे समावेदन राष्ट्रपतीस सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय संसदेत कोणतीही चर्चा करता येणार नाही .
न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही .
१२२ . ( १ ) कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे , या कारणावरुन संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही .
( २ ) संसदेमधील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालनाचे विनियमन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे अधिकार या संविधानाद्वारे किंवा तदन्वये ज्याच्या ठायी निहित करण्यात आले आहेत अशा , संसदेच्या कोणत्याही अधिकार्याने किंवा सदस्याने त्या अधिकारांच्या केलेल्या वापराबाबत तो कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारितेस अधीन असणार नाही .