सदस्यत्वाबाबत अपात्रता .
१०२ . ( १ ) एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तसा सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल ,
ती अशी ---
( क ) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याचे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून अन्य असे , भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद तिने धारण केले असेल तर ;
( ख ) ती मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषित झालेली असेल तर ;
( ग ) ती अविमुक्त नादार असेल तर ;
( घ ) ती भारताची नागरिक नसेल , अथवा तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्ब संपादिले असेल अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर ;
( ड ) ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली अशा सदस्यत्वासाठी अपात्र झाली असेल तर ,
[ स्पष्टीकरण --- या खंडाच्या प्रयोजनांकरता ] एखादी व्यक्ती संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढयाच कारणाने ती भारत सरकारच्या किंवा अशा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील लाभपद धारण करते असे मानले जाणार नाही .
[ ( २ ) एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास दहाव्या अनुसूचीअन्वये अपात्र असेल तर , ती अशा सदस्यत्वासाठी अपात्र होईल . ]