कुलदैवत ओव्या - ओवी २०
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेलगंगा
रामतीर्थावर भेट देजो पांडुरंगा
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बंधान
गीरजा माही माय तोडे पापाचे बंधन
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेल नार
दुरुन दिसते नदी नर्मदेची धार
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी भयसा
संबाच्या दर्शनाले जाऊ देसीन काइसा
माहा नमस्कार देवा गा निशान गडाले
नाही येनं झालं सीवरातीच्या पारन्याले
माहा नमस्कार देवा गा पाह्यरीला केला
कैलासीचा पोहा दरबारी गेला
देवामंधी देव देवा गा नागदुवर पावला
पाचा नारयाचा झेला तोरनी लावला
झाडी वर्हाडाची देवा गा जागा हे थोपची
चिंतामनापासी जोत जये कापुराची
पश्चमदार देवा गा पश्चम करजो
लाह्यार्या मोठ्यावर देवा किरपा ठेवजो
अगीन दार देवा गा अगनीचं दार
भोया भक्तिवाना तू गा दुरुन पाया पर
सुतायाची कांडी देवा गा उडे वरच्यावर
वडाची पारंबी चित्र शायेवर
पोहा गेला देवदरबारी देवा गा झाला पारोपारी
चित्र शायेवर भरली देवाची कचेरी
गडावरी गड देवा गा कितीक रचले
कैलासीचे राजे जाऊन सिखरी बैसले
गडामधी गड देवा गा चवर्याचा बाका
तोंडी आला थुका तुम्ही धुनी टाकू नका
चला जाऊ पाहू देवा गा गिरजाची रांधनी
तिच्या सयपाकाले आहे सुक्कीर चांदनी
चला जाऊ पाहू देवा गा गिरजाचा ईरोला
सव्वा खंडीचा रोठ केला अवघा कैलास जेवला
गडावरी गड देवा गा गडाखाली आड
रेसमाचा दोर पानी भरे गिरजा नार
सव्वा मनाची कुदयी देवा गा मनाचा वासला
अवधापर्यंत तासला वर चवर्या बसोला
मायची घेतली चोयी देवा गा बापाचा घेतला सेला
कैलासी राजा लेक तीर्थासी गेला
खांदावरी पडशी देवा गा घे माह्या चातुरा
घे माह्या चातुरा तुही पह्यली यातरा
निंबानारश्यानं देवा गा पडशी झाली जड
पडशी झाली जड कैसा येंगू चवर्या गड
महादेवाच्या वाटेनं देवा गा दवना मोठा दाट
भगत अरवट दवना मोडून केली वाट
महादेवाच्या वाटेनं देवा गा दवना आला फुला
दवना आला फुला बास शंकराले गेला
महादेवाच्या वाटेनं दवना आला गोंडा
कैलासीच्या राजा तुहा तिही लोकी झेंडा
नदीले आला पूर देवा गा जाब मारे थोप
भोया शंकुर टाके गयातला गोफ
पानी पडू पडू गा देवा हिरवं झालं रान
हिरवं झालं रान सुटलं गवयाचं धन
पानी पडू पडू गा देवा हिरवा झाला चारा
हिरवा झाला चारा सुटला गवयाचा गोर्हा
सकायच्या पाह्यरा देवा गा गिरजाले चेव येते
गिरजाले चेव येते चवदा भुवान झाडते
महादेवा राजा देवा गा जातीचा बनिया
सोन्याचा ताजवा त्यानं तोलली दुनिया
महादेवा जातो देवा गा आखीन येईन
तुह्या सतवानं चवदा भुवान पाहीन
येतो देवा येतो रे देवा गा येतो तुयावरी
सवर्नाची सुरी नको ठेवू गयावरी
भुईकुंडावरी देवा गाय चितीन पसरली
गिरजा आंगोईले गेली साडी चोयी इसरली
महादेवा़च्या वाटेनं देवा सांडलं खाखस
सांडलं खाखस पोहा चालला हासत
महादेवा जातो देवा गा संगं काय नेता
घरी माता पिता आहे सोन्याच्या मुदता
गिरजा मायेचा चुडा, देवा गा कोर्या कागदात
उजीड पडला त्याईचा चवदा भुवनात
गिरजा मायेचा चुडा देवा गा कशानं टिचला
चवसर खेलता हात दुमता पडला
गिरजा मायेचा चुडा देवा गा दुधाची उकयी
गिरजा माही माय मनाची मोकयी
सकायच्या पाह्यरी देवा गा कोमावला बाग
कोमावला बाग गिरजा पानी वलू लाग
पानी वलू वलू देवा गा हिरवा झाला बाग
केयीच्या पानावर लेहेरा मारे डोम्या नाग
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2012
TOP