अध्याय १० वा - श्लोक १ ते १०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


शुद्ध -ज्ञान -दानीं । होती तूं चतुर । तुज नमस्कार । गुरुराया ॥१॥

गुरुराया तूं चि । करिसी । प्रफुल्ल । सुरम्य कमळ । विद्यारूप ॥२॥

परेचा विषय । स्वस्वरूप -स्थिति । तेथें तुज रति । सर्वकाळ ॥३॥

संसार -तमासी । होसी तूं भास्कर । तुज नमस्कार । गुरुराया ॥४॥

बळ तुझें थोर । अनंत आपर । नाहीं पारावार । तयालागीं ॥५॥

अवस्था तुरीय । तारुण्य -संपन्न । तियेचें लालन । करिसी तूं ॥६॥

सकळ विश्वासी । पाळिसी साचार । तुज नमस्कार । गुरुराया ॥७॥

मांगल्य -रत्नांची । तूं चि एक ठेव । तूं चि एक देव । पूजनीय ॥८॥

साधुसंतजन । हें चि कोणी वन । तूं एक चंदन । तयांतील ॥९॥

स्वानुभूतीचा तूं । राजराजेश्वर । तुज नमस्कार । गुरुराया ॥१०॥

सुज्ञजनचित्त - । रूपी जो चकोर । तयासी साचार । चंद्रमा तूं ॥११॥

वेदरहस्याचा । सागर तूं साचा । तेविं मदनाचा । मदन तूं ॥१२॥

तूं चि शुद्ध -भावें । भजावया स्थान । श्रीगुरो , वंदन । करीं तुज ॥१३॥

प्रपंचस्वरूपी । मत्त । कुंजराचें । भेदिसी तूं साचें । गंडस्थळ ॥१४॥

नमो गुरुराया । एक तूं केवळ । उत्पत्तीचें स्थळ । विश्वाचिया ॥१५॥

तुझ्या कृपारूपी । गणेशाचें बळ । लाभतां सकळ । विद्यांमाजीं ॥१६॥

होतसे प्रवेश । अज्ञ बाळाचा हि । तिळमात्र नाहीं । शंका येथें ॥१७॥

सद्‍गुरो , आपुलें । उदार वचन । देई वर -दान । अभयाचें ॥१८॥

तरी नव -रस - । सुधाब्धीचा ठाव । मग सुखेनैव । घेऊं येई ॥१९॥

आपुल्या स्नेहाची । देवी वागेश्वरी । जरी अंगिकारी । मुक्यातें हि ॥२०॥

तरी तो प्रबंधीं । बृहस्पतीशीं हि । करूं शके पाहीं । पैजहोड ॥२१॥

जयाचिया माथां । पडे पद्म -हस्त । कृपाद्दष्टि होत । जयावरी ॥२२॥

असोनि तो जीव । तयालागीं साची । शिव -स्वरूपाची । योग्यता ये ॥२३॥

ऐशा सर्व गोष्टी । सामर्थ्यें ज्या होती । तें मी वानूं किती । वाचा -बळें ॥२४॥

काय सांगा रंग । लावोनियां चांग । उजळावें अंग । आदित्याचें ॥२५॥

अहो कल्प -वृक्ष । असे जो सहज । तया पुष्प -साज । कासयासी ? ॥२६॥

कापुरा सुगंध । कासयानें द्यावा । केविं क्षीरार्णवा । पाहूणेर ॥२७॥

काय अमृतातें । वाढावें पक्वान्न । चंदना लेपन । कासयाचें ? ॥२८॥

नभासी मंडप । घालवेना जैसा । श्रीगुरु तो तैसा । वर्णवेना ! ॥२९॥

श्रीगुरु -सामर्थ्य । कळावें संपूर्ण । ऐसें तों साधन । असे कोठें ? ॥३०॥

म्हणोनि निवांत । राहोनियां भलें । नमन मीं केलें । श्रीगुरूसी ॥३१॥

बुद्धीचिया बळें । गुरु -महिमान । यथार्थ वर्णन । करूं जावें ॥३२॥

तरी मोतियासी । अभ्रकाचें पुट । तैसी च ती गत । होय तेथें ॥३३॥

मढवावें जैसें । रजतें । सुवर्ण । तैसें हें स्तवन । श्रीगुरूचें ॥३४॥

म्हणोनियां आतां । स्वीकारोनि मौन । धरावे चरण । हें चि भलें ॥३५॥

ज्ञानदेव म्हणे । ममत्वें जी तुम्हीं । कृपा केली स्वामी । मजवरी ॥३६॥

तेणें कृष्णार्जुन - । संगमीं प्रत्यक्ष । झालों वट -वृक्ष । प्रयागींचा ॥३७॥

मागां उपमन्यु । जो का बाळभक्त । दुधासाठीं हट्ट । घेई जेव्हां ॥३८॥

तेव्हां नीळकंठ । क्षीराब्धीची वाटी । तयाचिया ओठीं । लावी जैसा ॥३९॥

किंवा ध्रुवबाळ । रुसोनियां गेला । कौतुकें तयाला । श्रीविष्णूंनीं ॥४०॥

ध्रुवपदरूपी । भातुकलें भलें । देनोनियां केलें । आनंदित ॥४१॥

तैसें भगवद्नीता - । नामें सर्वश्रेष्ठ । पावन जो ग्रंथ । अध्यात्माचा ॥४२॥

सकळ शास्त्रांचें । विश्रांतीचें स्थान । तयाचें व्याख्यान । करावया ॥४३॥

दिलें बळ तुम्हीं । मज गुरुराया । प्राकृतीं गावया । ओंवीछंदें ॥४४॥

शब्दाचिया रानीं । वाचा -वृक्षा भला । विवेकें फळला । आढळेना ॥४५॥

परी तुम्ही माझी । वाणी च ती आतां । केली कल्प -लता । विवेकाची ॥४६॥

तादात्म्या झाली । होती देहाशीं च । आतां बुद्धि साच । आत्मरूप ॥४७॥

मग ब्रह्मानंद - । भांडारासी जागा । कां न व्हावी सांगा । सर्वथा ती ॥४८॥

आणि गीतार्थाच्या । क्षीरसागरांत । झोंपलें निवांत । मन माझें ॥४९॥

आपुलें हें ऐसें । सामर्थ्य अपार । सद्‍गुरो , साचार । वर्णूं कैसें ॥५०॥

परी धिटाईनें । गेलों जें बोलून । कृपेनें सहन । करावें तें ॥५१॥

गीतेचा पूर्वार्घ । आपुल्या प्रसादें । वर्णिला विनोदें । ओंवीबद्ध ॥५२॥

पहिल्या अध्यायीं । अर्जुनाचा खेड । योग तो विशद । दुज्यामाजीं ॥५३॥

परी ज्ञान -योग । आणि बुद्धि -योग । दाखविला चांग । विभागोनि ॥५४॥

तृतीय अध्यायीं । केवळ कर्माचें । थोरपण साचें । वाखाणिलें ॥५५॥

चतुर्थ अध्यायीं । तें चि कर्म भलें । साड्‍ग प्रकटिलें । ज्ञानासह ॥५६॥

पांचव्या अध्याया - । माझारीं उचित । केलें जें सूचित । योगतत्त्व ॥५७॥

तें चि सहाव्यांत । सांगितलें स्पष्ट । अष्टांगांसहित । विवरोनि ॥५८॥

जेणें जीव -शिव । होती एकवट । योग -स्थिति नीट । दाविली ती ॥५९॥

आणि योगभ्रष्टां । मिळे कोण गति । सर्व उपपत्ति । सांगितली ॥६०॥

सप्तमाध्यायांत । प्रकृतीची मात । प्रारंभीं साद्यंत । विवरिली ॥६१॥

उदार भक्ताचें । चार हि प्रकार । वर्णिले साचार । मग पुढें ॥६२॥

अष्टमांत । सप्त - । प्रश्नांचीं उत्तरें । आरंभीं विस्तारें । निवेदिलीं ॥६३॥

पुढें योग्यायोग्य । प्रयाण -समय । वर्णोनि अध्याय । संपविला ॥६४॥

आतां असंख्यात । वेदांतील देखा । अंतर्गत जो का । अभिप्राय ॥६५॥

तो चि सामावला । महाभारतांत । एक लक्ष ग्रंथ । असे ज्याचा ॥६६॥

आणि सर्व महा - । भारतांत भला । असे सांठवला । आशय जो ॥६७॥

तोचि -सप्त -शत - । श्लोकीं जो आशय । तो चि एक होय । नवव्यांत ॥६९॥

म्हणोनि त्यांतील । अभिप्राय नीट । सर्वथा प्रकट । करावया ॥७०॥

कृपेविण मज । नाहीं झालें धैर्य । मी तों वायां काय । गर्व करूं ॥७१॥

अहो ढेपी राब - । गुळा -साखरेच्या । एका चि रसाच्या । होती जरी ॥७२॥

तरी प्रत्येकाची । भिन्न स्वाद रुचि । तैसी च ती स्थिति । अध्यायांची ॥७३॥

कोणी ब्रह्मरूप । जाणोनि आपण । करिती वर्णन । मग त्याचें ॥७४॥

कोणी स्वयें ब्रह्म - । तादात्म्य पावून । देती दाखवून । ब्रह्म -रूप ॥७५॥

कोणी जाणूं जातां । ज्ञेयीं होती लीन । ज्ञाता -ज्ञान -भान । विसरोनि ॥७६॥

ऐसे हे अध्याय । एकैक उत्तम । परी तो नवम । शब्दातीत ॥७७॥

तयाचा हि येथें । केला अनुवाद । प्रभो हा प्रसाद । आपुला चि ॥७८॥

सूर्याचिया परी । प्रकाशली साची । छाटी वसिष्ठाची । जैशा रीती ॥७९॥

किंवा शापभ्रष्ट । त्रिशंकूच्यासाठीं । केली प्रतिसृष्टि । विश्वामित्रें ॥८०॥

नळें राम -नामें । पाषाण तारून । सागरावरून । सैन्य नेलें ॥८१॥

जन्मतां चि जैसें । करोनि उड्डाण । झोंबे हनुमान ‍ । सूर्यबिंबा ॥८२॥

एका आचमनें । नातरी साचार । प्राशिला सागर । अगस्तीनें ॥८३॥

तैसें तुम्हीं मज । मुक्याचिया मुखें । बोलविलें सुखें । बोलातीत ॥८४॥

राम -रावणाचें । युद्ध निरुपम । तैसा चि नवम । अध्याय तो ॥८५॥

तयाचिया तोला । तो चि एक साच । वर्णन । ऐसें च । साजे तेथें ॥८६॥

जया तत्त्वज्ञातें । आकळे गीतार्थ । निर्णय हा सार्थ । वाटे तया ॥८७॥

नऊ हि अध्याय । ऐसे हे पहिले । यथामति भले वर्णिले मीं ॥८८॥

ऐका श्रोतेजन । आतां उत्तरार्ध । करीन विशद । ग्रंथाचा ह्या ॥८९॥

अध्यायीं प्रस्तुत । देव भगवंत । विभूति समस्त । सांगती ज्या ॥९०॥

तयांचें सुंदर । आणि रसपूर्ण । करीन वर्णन । मराठींत ॥९१॥

देश -भोषेचिया । सौंदर्यें येथील । शृंगारा जिंकील । शांतरस ॥९२॥

आणि ओंव्या तरी । तो चि अलंकार । होईल साचार । साहित्यासी ॥९३॥

पाहतां संस्कृत । मूळ गीताग्रंथ । आणि प्राकृतांत । टीका त्याची ॥९४॥

मग दोहोंतील । अभिप्राय भला । जरी आकळला । यथार्थत्वें ॥९५॥

तरी वाचकातें । नये ओळखितां । कोणता तत्त्वतां । मूळ ग्रंथ ॥९६॥

जेथें स्वसौंदर्यें । सुंदर शरीर । होय अलंकार । अलंकारा ॥९७॥

तेथें अलंकृत । केलें कोणी कोणा । जैसा करवेना । निवाडा हा ॥९८॥

संस्कृत आणिक । प्राकृत ह्या भाषा । स्व -सौंदर्यें तैशा । विराजती ॥९९॥

एका भावार्थाच्या । सुखासनीं चांग । ऐका अंतरंग । चोखाळोनि ॥१००॥

कैसा होऊं लागे । रसांचा वर्षाव । उठावला भाव । प्रकटितां ॥१०१॥

आणि चतुरता । म्हणे हो सर्वथा । लाभली प्रतिष्ठा । आम्हालागीं ॥१०२॥

तैसें मराठीचें । लुटोनि लावण्य । आणिलें तारुण्य । रसांलागीं ॥१०३॥

मग अगणित । ऐसें गीता -सार । गुंफिलें सुंदर । शब्दांमाजीं ॥१०४॥

चतुर -चित्तासी । चमत्कारभूत । जगद्‍गुरु श्रेष्ठ । यादवेंद्र ॥१०५॥

हरि पार्थासंगें । ऐसें बोलूं लागे । ज्ञानदेव सांगे । निवृत्तीचा ॥१०६॥

श्रीभगवानुवाच -

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकम्यया ॥१॥

म्हणे सर्वां परी । होसी तूं तत्पर । श्रवणीं साचार । धनंजया ॥१०७॥

आम्हीं मागील जें । केलें निरूपण । तुझें अवधान । पाहिलें तें ॥१०८॥

तंव नव्हे अल्प । पुरें आहे भलें । प्रत्ययासी आलें । आमुचिया ॥१०९॥

घालोनि पहावें । घटीं जळ थोडें । धड तरी पुढें । भरावा तो ॥११०॥

तैसें तुझें लक्ष । पाहोनियां चांग । ऐकवावें साङ्ग । ऐसें वाटे ॥१११॥

ठेवणें घडेल । नृतन सेवक । तरी आधीं देख । तयावरी ॥११२॥

सर्व हि पातोन । कसीं चोख तरी । करावा भांडारी । तो चि जैसा ॥११३॥

तैसा पार्था , आतां । भक्त सर्वोत्तम । माझें निज -धाम । झालासी तूं ॥११४॥

अर्जुनाची ऐसी । योग्यता पाहोन । बोले नारायण । प्रेमभरें ॥११५॥

पाहोनि पर्वत । वृष्टि करी मेघ । तैसा तो श्रीरंग । कृपा -सिंधु ॥११६॥

म्हणे अभिप्राय । ऐक सव्यसाची । सांगितला तो चि । पुन्हां सांगूं ॥११७॥

पेरावेंसें वाटे । वर्षोवर्षीं शेत । पीक वृद्धिंगत । होय जरी ॥११८॥

आणि परिश्रम । करावया चांग । येई ना उबग । मग तेथें ॥११९॥

वारंवार पुटें । देतां सुवर्णास । तयाचा तो कस । वाढे जरी ॥१२०॥

तरी मग तें चि । शुद्ध करायास । मनासी उल्हास । वाटतसे ॥१२१॥

म्हणोनियां तुज । वाटूं नये भार । नाहीं उपकार । येथें कांहीं ॥१२२॥

जाण बाळालागीं । लेववावें लेणें । बाळ तें का जाणे । शृंगारातें ॥१२४॥

परी तो सर्वथा । सुखाचा सोहळा । मातेसी च झाला । जैशा रीती ॥१२५॥

तैसें तुझें हित । तुज होय प्राप्त । तों तों दुणावत । सुख माझें ॥१२६॥

उपमा द्दष्टांत । आतां कासयासी । मज आवडसी । हें चि खरें ॥१२७॥

म्हणोनि बोलतां । तृप्ति न हो साच । वाटे बोलिलें च । बोलावेंसें ॥१२८॥

असे ह्या चि साठीं । तें चि तें सांगेन । देईं अवधान । धनंजया ॥१२९॥

तरी ऐकें आतां । मर्मज्ञ तूं साच । वाक्य हि तैसें च । श्रेष्ठ माझें ॥३०॥

आलें परब्रह्म । अक्षरें लेवून । तुज आलिंगन । द्यावयासी ॥१३१॥

परी यथार्थत्वें । नेणसी तूं मातें । उभा मी जो येथें । विश्व चि तें ॥१३२॥

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥२॥

येथ वेद ते हि । मौनावले पाहीं । मन -पवन हीं । पांगुळलीं ॥१३३॥

मावळले रवि - । शशी रात्रीविण । तयांसी दर्शन । नाहीं माझें ॥१३४॥

अगाअ उदरींचा । गर्भ जाणे काय । जननीचें वय । आपुलिया ? ॥१३५॥

पार्था , तैसें माझ्या । स्वरूपाचें ज्ञान । देवांसी हि जाण । होत नाहीं ॥१३६॥

नेणे जळचर । समुद्राचें मान । मशका गगन । नोलांडवे ॥१३७॥

तेंविं महर्षिंचें । ज्ञान धनंजया । मज देखावया । असमर्थ ॥१३८॥

केवढा मी कोण । कवणापासोन । जाहलों उत्पन्न । केव्हां कोठें ॥१३९॥

एक एक कल्प । निघोनियां जाय । न होई निर्णय । परी ह्याचा ॥१४०॥

ऋषि थोर थोर । तैसे चि ते देव । आणिक हें सर्व । भूतजात ॥१४१॥

तयां सर्वांचें हि । मूळ मी म्हणोन । सर्वथा कठिण । जाणावया ॥१४२॥

पर्वतावरोन । उतरलें पाणी । जाईल चढोनि । जरी पुन्हां ॥१४३॥

ना तरी वाढतां । झाड उंच उंच । जरी मूळाला च । पोंचेल तें ॥१४४॥

तरी जग झालें । जें माझ्यापासोन । तया जगा ज्ञान । होय माझें ! ॥१४५॥

ना तरी अर्जुना । अंकुरामाझारीं । सामावेल जरी । वटवृक्ष ॥१४६॥

तरंगीं सागर । जरी सांठवेल । राहील भूगोल । अणूमाजीं ॥१४७॥

तरी ऋषि देव । जीव मदुद्भूत । जाणाया समर्थ । होती मातें ! ॥१४८॥

ऐसा मी अगम्य । तरी जरी कोणी । सर्वं हि सांडोनि । बाह्य वृत्ति ॥१४९॥

सर्वेंद्रियांलागीं । होय पाठमोरा । वळोनि माघारा । झडकरी ॥१५०॥

महाभूतांचिया । चढे माथ्यावरी । देहभाव दूरी । ठेवोनियां ॥१५१॥

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ‍ ।

असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥३॥

राहोनियां स्थिर । मग तिये स्थानीं । उन्मन -नयनीं । आपुलिया ॥१५२॥

अर्जुना निर्मळ । आत्म -प्रकाशांत । अजत्व निभ्रांत । देखे माझें ॥१५३॥

सकळ लोकांचा । मीच महेश्वर । असें पैलतीर । आदीचें हि ॥१५४॥

ऐशा मज येथें । ह्यापरी साचार । तत्त्वतां जो नर । जाणतसे ॥१५५॥

जणूं तो परीस । जाण पाषाणांत । जैसें कीं अमृत । रसांमाजीं ॥१५६॥

तैसा मनुष्यांत । माझा चि तो अंश । संशय ना लेश -। मात्र येथें ॥१५७॥

चालतीबोलती । ज्ञानाची तो मृर्ति । तदंगें तीं होती । सौख्यांकुर ॥१५८॥

भासे मनुष्यत्व । तयाचिया ठायीं । भ्रांतिस्तव पाहीं । लोकालागीं ॥१५९॥

अगा सांपडला । हिरा कापुरांत । वरी अवचित । पडे नीर ॥१६०॥

तरी सांग तेथें । तो का विरघळे । अस्तित्व वेगळें । राहे त्याचें ॥१६१॥

तैसा माया -संग । न बाधे तयातें । जरी दिसे येथें । देह -धारी ॥१६२॥

पाहें धनंजया । सर्व दोष तया । जाती सोडोनियां । स्वभावें चि ॥१६३॥

सोडोनियां जाती । ज्यापरी मुजंग । लागतां चि आग । चंदनासी ॥१६४॥

तैसें जयालागीं । झालें माझें ज्ञान । संकल्प सोडोन । जाती तया ॥१६५॥

असो , आतां कैसें । व्हावें माझें ज्ञान । ऐसें तुझें मन । जरी कल्पी ॥१६६॥

कैसें माझें रूप । कैसें माझें भाव । सांगेन तें सर्व । ऐक आतां ॥१६७॥

भिन्न भिन्न भूतीं । प्रकृतिसारिखे । होवोनियां देखें । भिन्न भिन्न ॥१६८॥

विखुरले जे का । सर्व त्रैलोक्यांत । भाव ते यथार्थ । निरूपीन ॥१६९॥

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥४॥

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥५॥

जाण पार्था बुद्धि । भाव हा प्रथम । ज्ञान जें निःसीम । तो चि दुजा ॥१७०॥

सहनसिद्धि किंवा । क्षमा , असंमोह । भाव निःसंदेह । माझे चि हे ॥१७१॥

तेविं सत्य आणि । शम दम दोन्ही । असे जें का जनीं । सुख दुःख ॥१७२॥

आणि होय जें का । अस्तित्व नास्तित्व । सर्व हि ते भाव । जाण माझे ॥१७३॥

भय निर्भयता । अहिंसा समता । तेविं पंडु -सुता । तपोदान ॥१७४॥

आणिक संतोष । यश अपकीर्ति । भाव हे दिसती । सर्वत्र जे ॥१७५॥

भूतांचिया ठायीं । माझ्या चि पासोन । होती ते निर्माण । धनंजया ॥१७६॥

जैसीं होती भूतें । भिन्न भिन्न पाहीं । तैसें भाव ते हि । वेगळाले ॥१७७॥

उपजती कोणी । माझ्या जाणिवेंत । कोणी नेणिवेंत । जन्म घेती ॥१७८॥

प्रकाश आणिक । अंधार हीं दोन्ही । सूर्या चि पासोनि । होती जैसीं ॥१७९॥

होतां सूर्योदय । प्रकाश तो देख । आणिक काळोख । अस्तमानीं ॥१८०॥

माझें ज्ञानाज्ञान । हें तों भावाधीन । म्हणोनियां भिन्न । भाव भूतीं ॥१८१॥

भरोनि राहिले । ऐसे माझे वर्तन । जयांच्या आधीन । राहोनियां ॥१८३॥

भाव ते अकरा । सांगेन आणिक । सृष्टीचे पालक । असती जे ॥१८४॥

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥६॥

सर्व गुणीं श्रेष्ठ । ज्ञाते महर्षींत । सप्तर्षि विख्यात । कश्यपादि ॥१८५॥

चौदा मनूंतील । मूळ मुख्य देख । स्वायंभुवादिक । चार मनु ॥१८६॥

सृष्टीचा व्यापार । चालावा म्हणोनि । झाले माझ्या मनीं । अकरा हें ॥१८७॥

पाहें स्वर्गादिक । लोकांची व्यवस्था । नव्हती च पार्था । जिये वेळीं ॥१८८॥

आणि त्रैलोक्याचा । मांड हा जो भला । नव्हता मांडला । तो हि कांहीं ॥१८९॥

जेव्हां पंचमहा - । भूतांचा समुदाय । नव्हता च कार्य - । प्रवण तो ॥१९०॥

तेव्हां कश्यपादि । सप्त मुनि भले । आणि मनु झाले । चार हि ते ॥१९१॥

तयांनीं च मग । अष्ट लोकपाट । निर्निले सकल । इंद्रादिक ॥१९२॥

आठ हि दिशांचे । तयां स्वामी केलें । तयांनीं निर्मिले । मग लोक ॥१९३॥

म्हणोनि अकरा । राजे हे साचार । सर्व ते इतर । प्रजा ह्यांची ॥१९४॥

ऐशापरी विश्व - । विस्तार सकळ । माझा चि केवळ । ओळख तूं ॥१९५॥

पाहें आरंभीं तों । बीज तें एकलें । विरूढतां झालें । तें चि बुंध ॥१९६॥

तया बुंधांतून । निघतां अंकुर । वाढला विस्तार । फांद्यांचा तो ॥१९७॥

तया फांद्यांतें हि । मग थोर सान । डहाळ्या फुटोन । पसरती ॥१९८॥

फुटे डहाळ्यांसी । पालवी कोंवळी । पानें तीं हि भलीं । कोंवळीं च ॥१९९॥

पालवीमधून । मग फूल फळ । ऐसें चि सकळ । वृक्षत्व हें ॥२००॥

परी पाहूं जातां । वृक्षाचा विस्तार । मूळ तें साचार । बीज एक ॥२०१॥

तैसें मूळारंभीं । तत्त्व मी एकलें । मग तें चि व्यालें । मनालागीं ॥२०२॥

कश्यपादि मुनि । आणि मनु चार । तेथें चि साचार । उपजले ॥२०३॥

मग लोक -पाळ । तयांनीं निर्मिले । लोक -पाळीं केले । नाना लोक ॥२०४॥

आणि मग तयां । लोकां चि पासोन । जाहलें निर्माण । प्रजाजात ॥२०५॥

ऐशापरी सर्व । विश्वीं एक मी च । माझा चि गा साच । पसारा हा ॥२०६॥

परी जयालागीं । मानेल हें वीरा । भावाचिया द्वारा । जाणेल तो ॥२०७॥

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।

सोऽविकम्पेन योगेन युज्येत नात्र संशयः ॥७॥

बुध्द्यादिक भाव । त्या माझ्या विभूति । व्यापोनि राहाती । जग सारें ॥२०८॥

म्हणोनि ब्रह्मादि - । पिपीलिकावेरीं । वस्तु न दुसरी । मजविण ॥२०९॥

ज्ञानाची जागृति । झाली पूर्णपणें । जो हें तत्त्व जाणे । तयालागीं ॥२१०॥

तेणें उच्च -नीच - । भेदाचें दुःस्वप्न । गेलें मावळोन । तयाचें गा ॥२११॥

मग मी आणिक । माझिया विभूति । व्यापियेल्या व्यक्ति । तयांनीं ज्या ॥२१२॥

सकळ हीं एक । प्रतीति ऐसी च । तया आली साच । एकत्वाची ॥२१३॥

ऐशा निःसंदेह । ऐक्यभावें भला । मनोद्वारा झाला । मद्रूप जो ॥२१४॥

पार्था , कृतार्थता । पावला तो साच । संशय नाहीं च । येथें कांहीं ॥२१५॥

कीं जो ऐक्यभावें । मज भजे कोणी । तयाच्य भजनीं । मी च नांदें ॥२१६॥

म्हणोनि अभेद - । भक्तियोग चांग । सर्वथा अभंग । निःशंक हा ॥२१७॥

आचरितां मध्यें । आला प्रत्यवाय । तरी तो हि होय । सुखालागीं ॥२१८॥

सुखालागीं कैसा । होय तरी पाहीं । मागां षष्ठाध्यायीं । निरूपिलें ॥२१९॥

कैसी ती अभेद - । भक्ति ऐसा ध्वनि । जरी तुझे मनीं । तरी ऐक ॥२२०॥

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते ।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥८॥

सर्व जगालागीं । मी च जन्मदाता । सर्वांसी पोषिता । मी च एक ॥२२१॥

तरंगांचा जन्म । जळामाजीं होय । जळ चि आश्रय । तरंगांसी ॥२२२॥

आणि सर्वांठायीं । तयां जळ एक । जीवन हि देख । जळ चि तें ॥२२३॥

तैसा विश्वीं एक । मी च परिपूर्ण । नाहीं मजवीण । दुजें कांहीं ॥२२४॥

ओळखोनि ऐशा । सर्व -व्यापकातें । मज भलतेथें । भजती जे ॥२२५॥

सत्य प्रेम -भावें । चित्त प्रफुल्लित । झालें अखंडित । जयांचें गा ॥२२६॥

जैसा नभोरूप । होवोनि नभांव । वायु अविरत । खेळतसे ॥२२७॥

तैशापरी देश - । काळ -वर्तमान । सर्व हि मानोन । मद्रूप तें ॥२२८॥

जगद्रूपा मज । आत्मज्ञ ते भक्त । भावें ह्रदयांत । सांठवोनि ॥२२९॥

त्रैलोक्यामाझारीं । सुखें निरंतर । करिती विहार । पंडुसुता ॥२३०॥

पडे द्दष्टीलागीं । जगीं जो जो जीव । मानावा तो देव । मनोभावें ॥२३१॥

माझा भक्ति -योग । हा चि ऐसें जाण । निश्चयेंकरोन । कपि -ध्वजा ॥२३२॥

मच्चित्ता मद्नतप्राणा बोधयन्तः परस्परम् ‍ ।

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥९॥

जाहलें मद्रूप । भक्तांचें तें चित्त । प्राण तो हि तप्त । मद्रूपीं च ॥२३३॥

जन्म -मरणाची । विसरले वार्ता । मद्रुपीं रंगतां । ज्ञानबोधें ॥२३४॥

मग बोधाचिया । धुंदीमाजीं देख । नाचूं लागे लागे सुख । संवादाचें ॥२३५॥

आतां एकमेकां । बोध चि तो द्यावा । बोध चि तो घ्यावा । ऐसें होय ॥२३६॥

जैसीं जवळील । सरोवरें दोन । तुडुंब भरोन । एक होती ॥२३७॥

उचंबळतां चि । मग परस्पर । तरंग आधार । तरंगांसी ॥२३८॥

एकमेकां भक्तां । तैसी भेटी होतां । उसळती लाटा । स्वानंदाच्या ॥२३९॥

तेथें आम्त -ज्ञान । शोभे आत्म -ज्ञानें । ज्ञानाचें च लेणें । लेवोनियां ॥२४०॥

पाहें धनंयया । जैसें एका सूर्या । यावें ओवाळाया । प्रतिसूर्यें ॥२४१॥

किंवा शीतरश्मि । चंद्रालागीं एका । भेटावा जणूं का । दुजा चंद्र ॥२४२॥

ना तरी संगम । तुल्य जलौघांचा । व्हावा जैसा साचा । प्रयागीं तो ॥२४३॥

सामरस्याचा च । तैसा पूर लोटे । जेव्हां भक्त भेटे । भक्तालागीं ॥२४४॥

लोटतां तो पूर । तयावरी सांचे । अष्ट सात्त्विकाचें । पुराड तें ॥२४५॥

पार्था , संवादाचा । चतुष्पथ भला । तेथें भक्त झाला । अधिपति ॥२४६॥

मग ब्रह्मानंद । येतां बहरून । जाय ओसरून । देह -भाव ॥२४७॥

रंगतं मद्रूपीं । भक्त तृप्त होती । उदंड गर्जती । धन्योद्नारें ॥२४८॥

सद्‍गुरु शिष्यासी । एकांतीं नेवोन । ॐ काराची खूण । दाखवी जी ॥२४९॥

तो चि उपदेश । मेघांच्या समान । सांगती गर्जोन । त्रैलोक्यासी ॥२५०॥

अंतरींचा राखूं । नेणें मकरंद । पद्म -कळी मुग्ध । उमलतां ॥२५१॥

मग रायारंकां । सर्वांसी समान । देतसे भोजन । सुगंधाचें ॥२५२॥

तैसे चि ते मातें । वर्णिती विश्वांत । स्वानंद -भरांत । येवोनियां ॥२५३॥

होतां संकीर्तनीं । आनंद -निर्भर । बोलाचा विसर । पडे तयां ॥२५४॥

तया विसरांत । विरोनि ते जाती । अंगें -जीवें होती । तदाकार ॥२५५॥

नेणती ते रात्र । नेणती ते दिन । उरे कैसें भान । प्रेम -रंगीं ! ॥२५६॥

सर्वांगसंपूर्ण । ऐसें माझें सुख । करिती जे देख । आपुलेंसें ॥२५७॥

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ‍ ।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥१०॥

तयां बहुमोल । जें जें आम्हीं द्यावें । लाधलें स्वभावें । आधीं चि तें ॥२५८॥

कीं ते जया पंथें । निघाले निःशंख । भोगावया सुख । सायुज्याचें ॥२५९॥

पाहोनि तो पंथ । स्वर्ग -मोक्ष पार्था । वाटती सर्वथा । आडमार्ग ॥२६०॥

म्हणोनि तयांनीं । प्रेम केलें साच । द्यावें जरी तें च । आम्हीं तयां ॥२६१॥

तयांनीं च आम्हां । करोनि स्वाधीन । आम्हांजवळून । घेतलें तें ॥२६२॥

तें चि प्रेम --सुख । आगळें वाढावें । आम्हीं तों करावें । एवढें च ! ॥२६३॥

पडूं नये तेथें । काळाची नजर । कर्तव्य साचार । आमुचें हें ॥२६४॥

लाडकें बाळक । खेळावया लागे । धांवे तयामागें । माउली ती ॥२६५॥

प्रेमाची पाखर । घालोनि साचार । तया निरंतर । संरक्षिते ॥२६६॥

आणि बाळ मागे । खेळ जो जो कांहीं । करोनि तो देई । सोनियाचा ॥२६७॥

तैसा भक्तांचा तो । उपासना -मार्ग । चोखळोनि चांग । ठेवितों मी ॥२६८॥

तेणें चि ते योग्य । होती पंडु -मुता । सुखें सायुज्यता । पावावया ॥२६९॥

तयांच्या भक्तीचा । करावा परिपोष । आवडे विशेष । हें चि मज ॥२७०॥

पाहें भक्तांसी तों । माझी च आवड । मज वाटे गोड । एक भाव ॥२७१॥

आमुचिया घरीं । साच दुर्मीळता । जाण पंडु -सुता । प्रेमळांची ॥२७२॥

जे का मोक्ष -काम । तयां दिली मुक्ति । तेविं स्वर्ग -प्राप्ति । स्वर्गेच्छूंस ॥२७३॥

काय सांगूं फार । आपुलें शरीर । वेंचिलें साचार । इंदिरेसी ॥२७४॥

परी मुक्तीहून । आगळें निःशंक । ऐसें जें साजूक । प्रेम -सुख ॥२७५॥

पार्था , आमुचिया । प्रेमळासाठींच । ठेविलें तें साच । राखोनियां ॥२७६॥

ऐशापरी आम्ही । वेंचोनि सकळ । करितों जवळ । प्रेमळांसी ॥२७७॥

काय सांगूं ऐशा । नव्हेत ह्या गोष्टी । कीं ज्या सामावती । बोलामाजीं ॥२७८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP