पूर्वार्ध - अभंग ६०१ ते ७००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


मानसीं बन महान । राही यशस्वी होऊन । तसाच कीतीं मिळवून । जगामध्यें ॥६०१॥
लाभे त्याला मान । स्थिर ज्याचें मन । मानसी संज्ञा म्हणुन । त्याला देती ॥२॥
मन ज्याचें स्थिर पूर्ण । तो जरी भिक्षुक असून । जगीं शहानशहाहून । श्रेष्ठता पावे ॥३॥
मन तसा मानव । मनुजमन साधारण नव्ह । स्वर्गनरकाची ठेव । मनच असे कीं ॥४॥
मन स्थिर ज्याचें नाहीं । धनपती चक्रवर्ती असूनही । भिकारीच तो राही । नाहीं का ॥५॥
सुखनिद्रा कैसी अस्थिर मना । वितरे कसा प्रेममय जीवना । कसली शांती पावुनी असेना । सांग बरें मुक्तानंदा ॥६॥
पवित्रा ज्याचें मन । आणखी चारित्र्यवान । संसार त्याचा जरी कठीण । स्वर्गही बनेल ॥७॥
मन शुद्ध नसे । प्रज्ञा स्थिर न होतसे । बुद्धीही सविवेकसे । युक्त जेथ नाहीं ॥८॥
मुक्तानंदा तेथ जरी वसती । महादौलतपूर्ण महन्ती । करू शके का पण, ती । कांहीं तरी ॥९॥
उच्च नीच मानापमान । सुखदुःखादीचें मूळ कोण । मुक्तानंदा, आपुलेंच मन । जाणुनी घे हें ॥६१०॥
परमात्मा प्रसन्न । मग कशास हें रुदन । अपवित्रच तुझें मन । दूर तो भासे ॥११॥
अति मनोमालिन्य़ । दूर ठेवी शान्तीपासुन । शुद्ध निर्मल जातीचें मन । सुख पावे ॥१२॥
उत्तम जातीचे सद‍गुण । सात्त्विक प्रकारचें भोजन । आत्मशांती दे निर्मल मन । आणखी नको कांहीं ॥१३॥
वितरतां जितेंद्रियांनीं जीवन । जाल स्वतः सुखी होऊन । लोलुप जगीं कधींही न । सुख पावाल ॥१४॥
प्राप्त सारे, जेथ ब्रह्मचर्य । सावधानें करा रक्षणकार्य । काय करूं शके जो निर्वीर्य । जगामध्यें कांहीं ॥१५॥
वीर्यानें काव्यनिर्मिती । विर्याणें हो सुखप्राप्ती । वीर्यानेंच प्रेम प्रीती । प्राप्त होई ॥१६॥
वीर्यानें शक्ति । विर्यानेंच भक्ती । वीर्य रक्षील तुम्हा प्रती । सांभाळा वीर्य ॥१७॥
कुसंगतीपासोनी । रहा सदा बचावोनी । ना तर जाई स्वर्ग जळोनी । पुण्यमय ॥१८॥
जाळी शरीरा काष्टाग्नी । एकाच जन्मामधुनी । बहुत जन्मापरी अग्नी । कुसंगतीचा जाळी ॥१९॥
ब्रह्मचर्यपद । महान संपद । मूळ जें होतद । जीवनाचें पहा ॥६२०॥
ब्रह्मचर्या हेंचि तप । तेंचा तेज, पूजापाठ । मुक्तानंदा, आदरें करी रक्षण । ब्रह्मचयर्याचें ॥२१॥
एका वीर्यबिंदूपासुनी । मानवी विशाल देह बनुनी । अनंत शरीरें अनंत बिंदूंतुनी । प्राणाहुनी श्रेष्ठ ब्रह्मचर्य ॥२२॥
ब्रह्मचर्य जोंवरी । राही शरीरीं । शक्ती तोंवरी । टिकुनी राही ॥२३॥
जोंवरी तनु वीर्यपूर्ण । तोंवरी शांत मन संपूर्ण । मुक्तानंदा, वीर्यावीण । मानव कुठला ॥२४॥
लोकप्रिय वीर्ययुक्त मानव । स्वर्गरूपही असे वीर्य । मुक्तानंदा, वीर्याचें नष्टचर्य । नरक होय ॥२५॥
आदर्श विवाहित नरनारी । वीर्याची हानी न करी । पूर्ण गृहस्थ ब्रह्मचारी । बनुनी रहावें रहावें ॥२६॥
मुक्तानंदा, अति मैथुन । अनावश्यक वीर्याचें पतन । हेंचि नरकांतलें जीवन । समजुनी घेई ॥२७॥
वृक्ष फळें फुलें । ऋतूमध्यें सगळे । शेतांत पीक भलें । देते पृथ्वी ॥२८॥
ऋतुगामीचा गुण महान । पूर्ण ब्रह्मचर्यापालन । करूनि बना ऋतुमान । आदर्श हा असावा ॥२९॥
उंट बैल महिष वाघ ऋतुगामी । अधम श्वान माकडही न कमी । मुक्तानंदा मानव अधिक अधमी । होणार का? ॥६३०॥
वितरण्य़ सुखाचें जीवन तरी । नीतिवान बनविणें  हो पुत्रापुत्री । मुक्तानंदा, पाठ गिरवी संसारीं । ब्रह्मचर्याचा ॥३१॥
एकपत्नीव्रताचा अभाव । नाहीं पतिपत्नी भाव । मुक्तानंदा भ्रष्टशील स्वभाव ॥ नरका जोडी ॥३२॥
सदा परपुरुष परनारी विलास । रात्रंदिन इंद्रियलोलुपतेची आस । मुक्तानंदा रौरव नरक ह्याहुनी खास । कोठें असे ॥३३॥
नसे पूर्ण वय यौवन । धर्मयुक्त प्रेम जय असे न । मुक्तानंदा यमालोकाचा तो यज्ञ । कामभोगच ॥३४॥
संस्कृती आपुली महान । महातप ब्रह्मचर्य राखुन । मुक्तानंदा कशास राही डुबुन । पाश्चिमात्य नरकीं ॥३५॥
पौर्वात्य संस्कृतीचे नियम पूर्ण । देती परमात्मपद संपूर्ण । करी तपस्याचरण । संयमाचें ॥३६॥
पाश्चिमात्य जीवित । नरक अनियंत्रित । मुक्तानंदा परभ्रष्टाचारांत । स्वस्वर्ग कां दवडीसी ॥३७॥
शुद्ध निर्विकारी होत । रागद्वेषरहित । असावें एकाग्र चित्त । विद्यार्थ्यानें ॥३८॥
एकनिष्ठ, एकाग्र, एकचित्त । विद्यार्थी जो व्रतस्थ । पूर्ण यश प्राप्त । करूनि घेई ॥३९॥
करतेवेळीं विद्यार्जन । अन्य व्यवहारांतुन । विद्यार्थांनीं भाग घेऊन । असूं नये ॥६४०॥
विद्यार्जनापासुनी । विद्यार्थ्यांना हट्वुनी । मतमतांतरांत गुंतवुनी । आणखी तसेंच ॥४१॥
साम्मती विरोध राजनीतींतुन । अडकवणें नेत्यांचें सदोष वर्तन । विद्यार्थ्यांचेंही पतन । मार्गच्युतीनें ॥४२॥
पवित्र भावना आदर्श जीवन । ठेवी जो नियमित आचरण । विद्यार्थी तो राही बनुन । सम्माननीय ॥४३॥
विद्येचा कर सन्मान । सत्कार करून । मंत्रवत ग्रहण । केलें पाहिजे ॥४४॥
होतां परीक्षोत्तीर्ण । बने परमानन्दकारी दैवत पूर्ण । विद्या होतां अनुत्तीर्ण । हो दुःख संतापकारी ॥४५॥
विद्येमध्यें निष्ठ । ठेवणें हीच तत्त्वतां । असे उत्तीर्णता । समजुनी घेई ॥४६॥
यदि गुरुजनांप्रती । विद्यार्थी सम्मान देती । परामानन्दकारी होती । जीवनें त्यांचीं ॥४७॥
विद्यार्थ्यांचा धर्म । गुरुजनांचा सम्मान कर्म । सह-आचरणाचें हें मर्म । जाणाया हवें ॥४८॥
विद्या विद्यार्थी विद्यादाता मिळून । विद्या हो निर्विघ्न । बनुनी जाई पूर्ण । एकता पावतां ॥४९॥
अव्यभिचारी चित्तानें । विद्यार्जन करणें । मुक्तानंदा व्यभिचारी जिणें । सफलता न पावे ॥६५०॥
मुक्तानंदा जोंपर्यंत । विद्यार्जन-शोधन । हवेत एकात्मता पावुन । विद्या विद्यार्थी दाताही ॥५१॥
सार्‍या विद्यांची प्राप्ती । व्यवहारी वाअ परमार्थीं । आवड असेल त्या अर्थां । करूनी घेई ॥५२॥
विद्या सम्पद सौंदर्य दैवत । विद्याहीनास समज हीन । मुक्तानंदा तू विद्यावान । बनुनी जाई ॥५३॥
विद्या करी शान्तीपथ प्रदर्शन । ईश्वरत्वाचें करवी दर्शन । नराला दे नारायण बनवून । मुक्तानंदा प्राप्त कर विद्या ॥५४॥
पत्रकार एक । येऊनी समीप । वदे महात्माजी आप । संदेशा देई ॥५५॥
मी बोलता झाला । सन्देश जरी दिधला । ठीक होईल तो भला । जातां देवापाशीं ॥५६॥
जगतीं जरी पसरला । पण ईशसंदेशा वंचित झाला । मग काय प्रयोजनें राहिला । सांग बरें ॥५७॥
जो पावे योग्यता । सन्देश देण्यापुरता । त्याचा संदेश पुरता । पोहचे देवापर्यंत ॥५८॥
पोहोंचतां भगवन्तापर्यंत । मग पसरे विश्वांत । होऊनी परिणीत । सन्देश ऐसा ॥५९॥
आजकाल सन्देश देण्यांत । सारे मानीती पुरुषार्थ । मुक्तानन्दा, ज्याला सन्देश अप्राप्त । त्याचें कोण ऐके ॥६६०॥
ईश्वर गुरुसंदेशावीण । मुक्तानंदा, दुर्बल संदेश देणं । मनुष्या दुर्बल बनवणं । आपुल्यासारखे ॥६१॥
असतां ईश्वरी सन्देशहीन । मानवसंदेश दिला पसरवुन । परी परमसनदेप्राप्तीवाचुन । प्रयोजन नाहीं ॥६२॥
विना संदेश ईश्वरीय । संदेशाचें होता कार्य । नाटकातली नक्क्ल तें होय । मुक्तानंदा ॥६३॥
सुधारक संदेशवाहका । निजहृदयसुधार करीना, कां । मग संदेश पावशील फुका । परमेंश्वराचा ॥६४॥
संदेश तव बनेल तदा पूर्ण । नित्यानंदसागरी बुडुन । मुक्तानंदा तें जल बनृन । जधीं  जाशी ॥६५॥
ईश्वरीय संदेश । संदेश देण्याचाही आदेश । मुक्तानंदा पावशी जर विशेष । लायक होशी ॥६६॥
निर्धनापासुनी कसलें दान । गुणहीनाचें कोणतें गुणवर्णन । मुक्तानंदा, संदेश नसता पावुन्न । दुसर्‍यास काय देशी ॥६७॥
सर्वप्रथम संदेशाची प्राप्ती । तदनन्तर आत्मसात होतां ती । स्वयं करी जगाची व्याप्ती । अहेतुक स्फुरणानें ॥६८॥
पारमेश्वरी संदेश पूर्ण प्रकाशित । नित्यप्रती असे प्रज्वलित । तूं ऐकण्याचा सतत । करी यत्न ॥६९॥
प्रतिदिनीं सूर्योदय प्रातःकाळीं । अस्त तो सायंकाळीं । एकेक दिन घटिका असली । कमी होई ॥६७०॥
क्षणाक्षणानें आयुः क्षीणत । जातें संपूण ऐसें जीवित । संदेश पकट असा सूर्यांत । परिसोनि घेई ॥७१॥
इतिहास हा हजारों वर्षांचा । महाप्रतापी राजे महाराजांचा । देखतां देखतां दिवंगत झाल्याचा । महान असतांहीअ ॥७२॥
राजाचें राष्ट्र, धनिकाचें धन । बल त्याचें जो बलवान । समय येतां जाइ बनुन । स्वप्नकथाच ॥७३॥
मुक्तानंदा तूं ह्यापासुन । नश्वर राही जीवन । हा सन्देश घेऊन । ठेवी ॥७४॥
आकाशीं येती जाती । ढग वायुसंगें बदलती । पाटींपक्ष देश समृद्धी ती । समज तसेच ॥७५॥
निष्काम आत्माराम । बनण्याचा संदेश घेऊन । मुक्तानंदा त्यासी ढुंढुन । राही सदैव ॥७६॥
डिग्री पद्मभूषण । किताब भारतरत्न । ऐसा मानव सन्मान । व्यवहारी गौरव ॥७७॥
मुक्तानंदा ही बढाई । ईशसन्देशविना होई । प्लास्टिक फलफुलांची दिखाई । द्दष्टी पडे ॥७८॥
रे मुक्तानन्दा वितरी । संदेशमय आदर्श जीवना जरी । सन्देश देऊनी पुर्रेवाट तरी । होणार नाही ॥७९॥
मुक्तानन्दा नको जवळीक । जो गुरु दाम्मीक । अपूर्ण तो एक । गुरु बनला ॥६८०॥
गुरु म्हणवी सर्वांचा । शिष्य न झाला कोणाचा । मुक्तानंदा हा काय कामाचा । महामारी केवळ ॥८१॥
स्वतःतें साक्षात्कारी म्हणवी । ड्रग मदिरा संभोग योगा शिकवी । मुक्तानंदा, गुरु संबोधवी । नरकदूत असोनी ॥८२॥
भीतीनें निद्रा न ये रात्रीं । शिष्य राहण्याची न खात्री । सकाळीं बघे सर्वत्री । कोण पळाले ॥८३॥
म्हणे शिष्या नको संयम । स्वच्छंदीपणाच नियम । मुक्तानंदा, हें गुरुलक्षण । गुरु नसलेल्याचें ॥८४॥
गुरूचा सहवास । बद्ध ठेवी साधकास । संभवनीय नसे खास । मुक्तानंदा ॥८५॥
गुरुचा सहवास । बद्ध ठेवी साधकास । संभवनीय नसे खास । मुक्तानंदा ॥८६॥
मुक्तानंदा, वस्त्राचा रंग बदलला । परी ह्रदयपालट न झाला । गुरु कसा हा असला । हा तर रंगारी ॥८७॥
गुरु आसनारूढ झाला । न साधी शिष्यकल्याणाला । नावं सत्तेला भुलला । पशूच तो केवळ ॥८८॥
मुक्तानंदा, शिकला तो शिकविण्याला । न थोडेंही समजण्याला । मौलवी पंडीत पढवीती दूसर्‍याला । स्वतः कोरडे ॥८९॥
मुक्तानंदा प्रक्रिया नवी नवी । शब्दजालीं शिष्यातें फसवी । प्रत्यक्षानुभूती न दावी । गुरु तो खोटा ॥६९०॥
न करूं शके शक्तिपात । मुक्तानंदा,  ज्याच्या संगतींत । कुंडलिनीजागृती न होता । पाखाण्डी तो गुरु ॥९१॥
मुक्तानन्दा, ह्याहुनी अधिकतर । ठग कोण असणार । पैसे हो चोरणार । न पीडा ॥९२॥
बरी करी आधीव्याधी । परी ना पालटे स्वार्थी वृत्ती । काढील फार तर विभूती । टेनिस बॉलही ॥९३॥
ना देऊं शके अंतर आनंद । गुरु ऐसा दे शब्दच शब्द । प्रेमा न देतो, मुक्तानंद । ईश्वरी शापच जाण ॥९४॥
रात्रंदिनीं एकच वायु । जीवात्म्या देई आयु । जीवन्त ठेवी जीवू । प्रत्येकाचा ॥९५॥
त्यागी आणि अतिभोगी । संन्यासी यती गृहस्थी विरागी । जो असे ज्या मार्गीं । ह्या सर्वांचें ॥९६॥
एकच आश्रयस्थान । पृथ्वी असोन । अशा ह्या पूर्णज्ञान । द्वारा नित्यानंदप्राप्ती ॥९७॥
भय नको क्षुधातृष्णेपासुनी । विशालता पृथ्वीची जाणी । असे तब उदारहुनी । मोठी किती ॥९८॥
मुक्तानंदा तव अंतरीं । सर्व भांडार वसे तरी । सार्‍याची प्राप्ती करी । आंतुनी ॥९९॥
गुप्त दान देई । परमात्म्यास पोहचुनी तें जाई । शेतकरी समजोन घेई । दानाचें महत्त्व ॥७००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP