पूर्वार्ध - अभंग ३०१ ते ४००
श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.
वृक्ष जे चंदनाच्या साथ । तयांना करी सुगंधीत । भृंगही जसा आपुल्या समान । करी कीटकाला ॥३०१॥
ऐसा जो करी आपुल्यासम । त्या गुरुवरी संपूर्ण । मुक्तानन्दा करी प्रेम । अत्यादरानें ॥२॥
मित्र नसे गुरुसमान । सर्वां करी जो आपुल्या समान । जीवत्वभास मारी म्हणुन । शत्रु नसे गुरुसमान ॥३॥
गुरुसम दाता नसे । क्षणांत ब्रह्मपदवी देतस । मुक्तानंदा, कांहीं करण्या हवें असे । तर करी गुरुसेवा ॥४॥
कर दोस्ती त्याच्याशीं । आपणासारिखे करणार्याशीं । सोडवुनी नामरूपाच्या जंजाळासी । करी आपुल्या समान ॥५॥
संग पावतां अग्नीशीं । विलीन करी आपुल्याशीं । पृथ्वी आश्रीता जशी । लीन करी आपणांत ॥६॥
मुक्तानंदा करी ततसंग । ज्याचा असा सतसंग । तुला करूनी घेइ आंगोपांग । विलीन स्वतं:त ॥७॥
मुख्यतः पाहिजे जाण । शिष्य अधिकारपूर्ण । न्यूनाधिकाधिकारानें म्हणुन । उजाडे उशीरा ॥८॥
जोंवरी नसे समर्पण । शिष्याच्या अंगीं पूर्ण । चित्ताच्या स्थिरतेची वाण । तोंवरी राही ॥९॥
शिष्यवृत्ती पूर्ण जोंवर्री । शिष्यामध्यें नसे अंतरीं । कृपा अपूर्ण तोंवरी । ऐसे जाण ॥३१०॥
जाणी श्रीगुरुच सर्वस्व । अर्पिलें श्रीगुरुला निजसर्वस्व । नंतर तें वापस । घेऊं शके कैसें ॥११॥
दिलें गुरुला तनमन । नमनानें झालें पुरें अमन । मुक्तानंदा आतां कोठून । शान्ती अशान्ती विचार ॥१२॥
गुरुभक्त बनला । परी काय वाचा मनाल । पूर्णतया गुरुसेवेला । न लवीलें ॥१३॥
गुरु आज्ञापालन । न करतां निष्ठेनें पूर्ण । नसेही सतत गुरुस्मरण । मुक्तानंदा, तो नाट्की ॥१४॥
आपुल्य उपद्रवाला । दुसर्यावरी ढकलला । निरुपद्रवी सुखी बनला । मग जसा कोणी ॥१५॥
मुक्तानंदा तूंही खरा । आपुल्याला पुरा । गुरुला अर्पिता साग । सुखातें पावशी ॥१६॥
सामावे पतीमध्यें पतिव्रता । शिष्य पावे तशी पूर्णता । गुरुमध्यें समर्पणा करतां । पूर्णपणें जेव्हां ॥१७॥
बिन्दु जसा सिन्धूंत । मिळतां पूर्ण सिंधु बनत । अस्तित्व नाहीं रहात । कांहीं त्याचें ॥१८॥
असेंच ज्यानें गुरुला । मुक्तानंदा अर्पिलें स्वतःला । पुन्हा वापस घेतला । मग शिष्य कसला ॥१९॥
शिष्यामध्यें जर दिसे । अपूर्णत्व असे । करण त्याचें असतसे । वंचना केवळ ॥३२०॥
पूर्णपणें न अर्पिलें । बाकी गुप्त राखीलें । वर म्हणीतले । प्राप्ती कां नाहीं ॥२१॥
आलस्य प्रमाद मंदत । सेवाभावीं उदासीनता । मुक्तानंदा तत्त्वतां । शिष्यलक्षण नोहे ॥२२॥
प्राचीन काळीं महर्षी । बारा वर्षे शिष्यासी । शासनसाधनानिशी । उत्तीर्ण पाववीती ॥२३॥
परिणामही अशा तपाचा । पूर्ण सिद्धी प्राप्तीचा । शिष्य सर्वाधिकारी होण्याचा । होतसे खास ॥२४॥
शिष्य आज्ञापालन हीन । मुक्तानंदा, शैव क्रियाहीन । नरनारी चारित्र्यव्रतहीन । कवडीमोलाचे ॥२५॥
गुरुगृहीं शिष्य राहुनि । पूर्ण तत्त्वपरीक्षा देऊनि । तेजस्वी ओजस्वी मनस्वी होऊनि ।मिळवी सिद्धावस्था ॥२६॥
मेधावी, तप्स्वी, मनस्वी । कष्टाळू देहाध्यवसायी । त्यागी लायक सर्वस्वी । शिष्य हा असे ॥२७॥
शिष्यत्वाचें सारें लक्षण । अंगीं असूनि संपूर्ण । मग समर्पणही पूर्ण । केलें पाहिजे ॥२८॥
जीवाभावाची सारी वृत्ती । शासनाग्निमध्यें देऊनि आहुती । वाचेल कांहीं जे मागुती । तोच आनन्द जाण ॥२९॥
गुरुशीं गुह्य कपट ठेऊन । मौनानें करी पाखण्डाचरण । मुक्तानन्दा ही महातपस्या जाण । परमार्थभ्रष्टतेची ॥३०॥
श्रीगुरुदर्शन बाहेरी । तसेंच तें अन्तरीं । चितमूल मध्यंतरी । मानूनि घेइ ॥३१॥
बाह्य व्यवहारा । सर्वस्वी जाणणारा । असतोही फल देणारा । गुरु अंतरीचा ॥३२॥
चित्त हवें शान्तीपूर्ण । तर ठेवी व्यवहार पूर्ण । गुरुशीं कपटावीण । मुक्तानंदा ॥३३॥
भक्तीमान दरिद्रीही असला । परी हरीगुरुप्रेमें भरला । भाग्यवान भला । असे तो ॥३४॥
पण दरिद्री जो भक्तींत । असे जरी धनवान । भिकारी रसहीन । काय कामाचा ॥३५॥
तेंच पुरें समर्पण । आपुलें स्व अर्पण । न ठेविलें कांहीं राखुन । स्वतःचें कांहीं ॥३६॥
श्रीगुरु अंतरवासी । सर्वज्ञ असा अससी । सर्व कांहीं जाणीशी । जें जें असे नसे ॥३७॥
जमाखर्च पुरा ठेवितो । तदनुसार आपणास देतो । मुक्तानंदा, म्हणुनि म्हणतो । सावधानानें राही ॥३८॥
भिऊं नको कष्टाला । जेथें जाशी तेथ तुला । दिसणार उभा ठाकला । याद राखी मुक्तानन्दा ॥३९॥
लाभला श्रीराम । श्रीकृष्ण प्राप्ती काम । दोन्हींचेंही धाम । कष्टच आहे ॥३४०॥
देखतां कष्टातें । भिऊं नको त्यातें । मुक्तानंदा आत्माराम प्राप्ती होते । कष्टांतुनी ॥४१॥
पातीव्रत्य महान । पतीला सोडुन । स्त्रीस कसली ह्याहुन । तपस्या अन्य ॥४२॥
भक्ताला भक्ति । भगवन्ताविण कोणती । मुक्तानंदा सतशिष्याप्रती । गुरुवीना कोण ॥४३॥
धर्मत्यागी राजत्यागी । पतीत्यागी व्रतत्यागी । मुक्तानंदा, गुरुत्यागी । पेक्षां जारिणी भली ॥४४॥
ठेवुनि नश्वर शरीर्र मोह । भटकीसी मांस प्रेमासह । कायापालट कांचनावह । मुक्तानन्दा, होइ का कधीं ॥४५॥
जन्मजन्मान्तरींचे मलदोष । विघ्नबाहुल्यांचा करूनि प्रकर्ष । जीवन बनवी सदोष । ह्माप्रमाणें ॥४६॥
करणीयाला अकरणीय । अकरणीयाला बनवी करणीय । करणी सारी यांचीच होय । मुक्तानंदा, सावधान ॥४७॥
प्रमादी आळशी मूढतायुक्त । तुझें मन कच्चें बहुत । तुला आणील गोत्यांत । याद ठेवी ॥४८॥
मुक्तानन्दा म्हणोनि । द्दढ होऊनि । बास करोनि । रहा नित्यानन्दीं ॥४९॥
दुर्बलाला भयवानाला । तसेंच परतंत्र असणार्याला । यत्न करीती पाडण्याला । सारे शत्रु ॥३५०॥
याद राख म्हणोनि । सावधान ठेवोनि । अचल राही स्थिरावोनि । नित्यानंद आश्रयीं ॥५१॥
जात्यांत जातां दोण भरडुं । कबीरा नावरे रडु । तैं देखोनि बोला वोसंडु । लागे महात्मा एक ॥५२॥
कबीरा रडुं नकोस । खुंटयाच्या जे आसपास । दाणे राह्ती आश्रयास । पिसले न जाती ॥५३॥
मन गुरुला अर्पवी । सारा भार सोपवी । तनु ही समर्पवी । गुरुचरणीं वाहुनी ॥५४॥
तव ह्रदयमंदिरीं । गुरुमूर्तीं स्थापना करी । परमानंद कोठें दूरी । असे मुक्तानन्दा ॥५५॥
परीक्षा गुरुघरची । मुक्तानंदा , कठीण असायची । दे सावधानाची । म्हणुनी म्हणतो ॥५६॥
श्रीगुरुसेवारत । यदि शिष्य रहात । कशास गरज पडत । कुठें जाण्याची ॥५७॥
असे सर्व तीर्थमय । पावन पुनीत होय । श्रीगुरुनित्यानंद-तोय । तुझें मुक्तानंदा ॥५८॥
आत्मस्वातंत्र्य कसें । परमश्रेष्ठ असे । अमृततुल्य जसे । आदरणीयही ॥५९॥
होण्यास त्याची प्राप्तता हवी गुरुतंत्रता । मुक्तानंदा हें तत्त्वता । जाणुनि घेई ॥६०॥
सत् शिष्यासाठीं पावन । तारक राही होऊन । महामंत्र ठेवला देऊन । श्रीगुरुनाम ॥६१॥
जयाची वाणी । गातसे गुरुगुणी । मुक्तानंदा, अन्य मंत्रापासुनि । कोणता लाभ ॥६२॥
हवें जर जपण्या । गुरुनामच ध्या। आणि ध्यान करण्या । श्रीगुरुरूपच ॥६३॥
करणे असेल पूजा । तरी श्रीगुरुमानसपूजा । नाहीं त्या समदूजा । मुक्तानन्दा कांहीं ॥६४॥
बहिरंग शिष्यांची । गणती लाखांची । अन्तरंग शिष्य मात्रची । असे क्कचित ॥६५॥
भावयुक्त अंतःकरण । गुरुला अर्पुनि पूर्ण । पावे नित्यानन्दपद संपूर्ण । अन्तरंग शिष्य ॥६६॥
सतशिष्याचें लक्षण । प्रप्तीविषयीं जो उदासीन । सर्व कामना त्यागुन । तो असे ॥६७॥
गुरुप्रेमानें भरूनि पूर्ण । मुक्तानंदा, आपुलें मन । श्रीगुरु नित्यानंदीं जडवुन । देई बा तूं ॥६८॥
मन वचन कर्म । द्वारा करी गुरुप्रेम । समजे गुरु परम । ईश्वरच कीं ॥६९॥
मुक्तानंदा गुरुवीण । न जाणी दैवत अन्य । त्यागी जो मीपण । शिष्य तो पूर्ण ॥३७०॥
चित्त ठेवी देऊनि । गुरुच्याच वचनीं । जाई गुरुमय बनुनी । चित्त जयाचें ॥७१॥
करी सर्व अर्पण । गुरुमध्यें जाई सामावुन । शिष्य तोच पूर्ण । म्हणावा ॥७२॥
शिष्यत्व लक्षणांनीं । पूर्णयुक्त न होवोनि । गुरुसंपदेलागोनि । कैसा पावशी ॥७३॥
मुक्तानंदा होइ आपण श्रीगुरुला अर्पण । गुरुही बनुन । स्वतःच जाशील ॥७४॥
ज्या शिष्यानें गुरुला । अर्पुनि पुरा आपणाला । श्रीगुरुस घेतला । पूरा पूर्ण ॥७५॥
असा शिष्य करी । प्राप्ती पुरी । पावी नित्यानन्द खरोखरी । कृतकृत्यही होतो ॥७६॥
योगाची किल्ली । ज्ञानसाधना भली । ज्यांत सामावली । शिष्यत्व तें होय ॥७७॥
मोक्षाचा मार्ग बरा । शिष्यत्वच खरा । मुक्तानंदा तूं पुरा । घे प्राप्त करूनि ॥७८॥
सर्व साधनांचा । शिष्यत्वांत समावेशाचा । सार्या तपःफलाचा । देखील ॥७९॥
शिष्याचा सर्वाधार । परमात्मा बनणार । मुक्तानंदा हो खरोखर । पुरा शिष्य ॥३८०॥
जो शिष्य स्वतःला । दे पुरा गुरुला । राही मग बनलेलाअ । अपणही गुरुच ॥८१॥
मुक्तानंदा तूं सर्व । त्याग करा अपूर्व । करी सेवाकार्य । श्रीगुरूचें ॥८२॥
निरपेक्षापूर्ण । स्वात्मनिर्भर होऊन । नसे कधीं ठेऊन । आश कसली ॥८३॥
निरपेक्ष निर्मोही पूर्ण । श्रीगुरुचें लक्षण । मुक्तानंदा तूं जाण । मुख्य असे हें ॥८४॥
पाहिजे होण्याला । गुरु गुरुच असला । गुरु गुरुत्व पूर्ण नसला । तर शिष्यही अपूर्ण ॥८५॥
ब्रह्मीं स्वतःला, ब्रह्मनिजप्रती । ऐशा अभेदा जे पूजीती । मुक्तानंदा ते हे असती । गुरु नित्यानंद ॥८६॥
शिष्याचें सगळे । शिष्यत्व घेतले । संसाराचा परमार्थ बळे । करूनि दाविला ॥८७॥
स्वस्वरूपीं भरविला । मुक्तानंदा गुरु असला । अहर्निश जाई मानला परमाराध्य ॥८८॥
न अजुनि पेरलें । तें दिसे उगवलेलें । असें कधीं का झालें । कोण्या काळीं ॥८९॥
बीजप्रद गुरु जरी । नसे जोंवरी तोंवरी । ज्ञानाचा उदय तरी । होईल कैसा ॥३९०॥
लाभ हानी पासोनि । दूर राहोनि । जवळीक नीतिनिष्ठेची करोनि । जीवना वितरी ॥९१॥
समबुद्धि समन्याय । असे परम निर्मोह । हें लक्षण होय । श्रीगुरूचें ॥९२॥
समताभाव । ज्याचा सहजस्वभाव । पूर्ण द्वेष होय । विषमते ठायीं ॥९३॥
महाशत्रु द्वैताचा । पूर्ण मित्र अद्वैताचा । मुक्तानन्दा, गुरु हा मानायाचा । आदरणीय ॥९४॥
जीवत्वभावाचा अभाव । स्त्रीजीवत्वा दे शिवत्व । द्दष्टींत ज्याच्या एकत्व । गुरु तो म्हणावा ॥९५॥
चराचराला मानी । आपुल्या सम समजोनि । राही मुलाबाळा वागवोनि । गृहस्थ जैसा ॥९६॥
वसुधैव कुटुम्बक वृत्ती । ठेवी सन्तानतुल्य विश्वाप्रती । मुक्तानंदा, सदुपदेशा देती । परमात्कार गुरु तो ॥९७॥
ज्यानें निजात्मशक्ति । देऊनि शिष्याप्रती । करविला जगती । शक्तिपात ॥९८॥
करकरूनी परब्रह्मानुभूति । जीव ब्रह्मजगतांती । मुक्तानंदा, एक करूनि ठेविती । गुरु तोच ॥९९॥
जागृत करी अंतरशक्ति । प्रकटवी बाह्म शक्ति । मुक्तानंदा, पूजी त्या गुरूप्रती । षड्चक्रभेदनकुशल ॥४००॥
N/A
References : N/A
Last Updated : July 01, 2011
TOP