श्रीगुरुदेवांचा आशीर्वाद
मुक्तेश्वरी नही जो मुक्तानन्दकी । वे कृपानंदधारा है नित्यानन्दकी ॥
जिसमे प्राप्ती सदा परमानन्दकी । ह्रदयानन्द तृप्ती जी सहजानन्दकी ॥१॥
निषिदिन करनेसे श्रवण मिटे ताप । मानव बनत मुक्तेश्वरीसे निष्पाप ॥
सतत अंतरसे करते रहो सोऽहम् जाप । मुक्तानंद सुख शांती पावे आपोआप ॥२॥
मुक्तेश्वरी के सम मराठी भाषमे । कुसुमेश्वरीके रसमय काव्यमे ॥
बना बहुजन हिताय च सुखाय । जिसमे आशीस दे गुरुराय ॥३॥
गुरुकृपा
नित्यनेमें श्रीमुक्तेश्वरी । पठण करती जे नरनारी ।
श्रीगुरुदेव तया धरूनि करीं । चालवी पुढत पुढती ॥१॥
येतां जातां करितां वंदन । तेंचि होतसे साधन ।
नमनानें होतां अमन । समाधि लागे ॥२॥
नका धरूं संशय । गुरुकृपा होईल काय ।
सद्गुरु माझा कोण होय । मुक्तानंदा आळवी ॥३॥
श्रीगुरुदेवें स्वीकारिले । अनुभवाचे बोल कथिले ।
स्फुरतां रचुनि दाविले । ओवींतुनि ॥४॥
श्रीमुक्तेश्वरीचें भाषांतर ।’ काव्यात्मक कर’ ।
ही आज्ञा झाल्यावर । गुरुदेवांची ॥५॥
शिवरात्रीच्या भुभ अवसरीं । लिहाया घेतली मुक्तेश्वरी ।
गुरुकृपेनें झाली पुरी । बुद्ध पौर्णिमेला ॥६॥
ॐ ’ सर्वं खल्विदं ब्रह्म ’ अस्ति । ऐशा अनुमभवयुक्त सिद्धांती । जयातें प्रतिपादती । ब्रह्मवादी ॥१॥
भक्तगण ज्या जगा म्हणती ।’ सर्वं वासुदेवमिति ’ । निसर्ग नांव ज्याला देती । जडवादी ॥२॥
कारणवादी कारण मानिती । त्या जड-चेतनात्मक जगाप्रती । असेच मुक्तानंदा वदती । नित्यानंद ॥३॥
विष्णुभक्तिविना जीवन । वैष्णव मानती रसहीन । शैव शिवपूजनावीण । जीवना शुष्क बोलती ॥४॥
ब्रह्मानन्दाविना जीवन । वेदान्ती जाणती प्रेतासमान । मुक्तानन्दा गुरुप्रेमावीण । जगणें मरण ॥५॥
जगामध्यें नांव झालें । बँकेमध्यें द्र्व्य सांठलें । संसारीं कीर्ती-पुष्प फुललें । बाह्म संपदा सारी ॥६॥
मुक्तानंदा, हे जाण । गुरु-ज्ञान-सम्पत्तीवीण । असे कंगाल पण । मनुष्य ऐसा ॥७॥
संसारी कोणी राजा असो । कोणी विजयी होवो । आसपास राहो । नौकर चाकर ॥८॥
घरीं घोडे बांधती । दरीं हत्ती झुलती । मुक्तानन्दा, गुरुप्रेमामृतमस्ती । विना सारें मृतवत ॥९॥
शैवासाठीं जसा शिव । बैराग्याला रामभाव । विष्णूला मानी वैष्णव ॥ सौराला सूर्य ॥१०॥
शक्ताला जशी शक्ति । मुक्तानंदा तुजप्रती । तव गुरु असती । नित्यानन्द ॥११॥
बौर्हूधर्मीयांचा शून्यवाद । भक्तांचें प्रेमपद । जसा लक्ष्य भेद । अर्थार्थोंचा ॥१२॥
निर्विकल्प समाधि योग्याला । चैतन्त ज्ञानीयाला । असेच मुक्तानन्द तुजला । नित्यानन्द ॥१३॥
पूर्व दिशेला धुंडोनि । पश्चिमेस देखोनि । येतां भटकोनि । दक्षिणेस ॥१४॥
उत्तरेला शोध घेऊन । गणेशपुरीला पातलों येऊन । ते वेळीं मुक्तानन्दास आंतुन । गवसला ह्रदयीं ॥१५॥
वेदान्ती छानुनी । निवडोनि भक्तीमधुनी । योगांत मोजमापुनी । देखिला कर्मीही ॥१६॥
स्तोत्रपाठी घोळ्घोळुनि । अंती सर्वही सोडोनि । चुप होतां मुक्तानन्दांनीं । अंतरीं देखिला ॥१७॥
तो ह्रदयीं नव्हता जधीं । राम नसे अयोध्यामधीं ॥ गोकुळांतही कधीं । कृष्ण नव्हता ॥१८॥
बद्रीनाथीं नारायण न वसे । कलीमाता कलकत्त्याला नसे । नन्दकिशोर न राहतसे । वृन्दावनीं ॥१९॥
काशीमध्यें शिव नाहीं । न रामेश्वरीं महादेवही । गुरुदत्ताविना राही । गिरनार ॥२०॥
नित्यानन्द अवतरतां अंतरीं । सर्वांत सर्व देखिलें ह्यापरी । सार्या गोकुळपुरीं । कृष्ण ही कृष्ण ॥२१॥
शिवपूर्ण काशी नगरी । गिरनारला दत्ताची फेरी । सर्व दिशांच्या अंतरीं । पूर्णात्मा पाहिला ॥२२॥
मृत्युभाव जोंवरी राही । मरण शील संसार होई । नित्यानन्द-कृपा-प्रसादें तरीही । मृत्यु अमृत्यु झाला ॥२३॥
मिथ्याला सत्य मानिला । अंतर अमृतोदय जधीं झाला । मुक्तानन्दानें सदासाठीं देखिला । अमरतेचा विलास ॥२४॥
महामंत्र जपला । पुरश्चरण घोकिला । पाळिलें तपानुष्ठानाला । दीर्घ काळ ॥२५॥
जपाचा जप कर करुनी । तपतपानें तप्त होऊनी । गेलें निरुत्साहित बनुनी । जीवन केवळ ॥२६॥
गुरुकृपेनें ते वेळीं । अन्तरींच्या अमर जपावळीं । सूर सोऽहम् तत्काळीं । ऐकविला ॥२७॥
ह्रदयाला तेव्हां मिळाला । नित्यानन्द सगळा । तेणें निपटलें जंजाळा । जपतपाच्या सर्व ॥२८॥
ऐकिलें बहुतांकडुनी । ह्रदयस्थ तो असे म्हणुनी । सांगितलें योगीयांनीं । ध्यानीं दिसे तो ॥२९॥
कोणी भ्रुकुटीं समजावी । कोणी यात्रेसाठीं सतावी । हठयोगांतच गठवी । कोणी कोणी ॥३०॥
जधीं नित्यानंद कृपा करी । तधीं मुक्तानंदानें अंतरीं । पूजिला त्याला सत्वरी । तो मीच म्हणुनी ॥३१॥
तुलसीदलानें शाळीग्राम पूजिला । बिल्वपत्रानें शिवलिंगाला । मूर्तिपूजा करण्याला । अर्चना केली ॥३२॥
स्तोत्रमंत्रानें पूजा करकरूनी । वृथा समय दवडोनी । केवळ बहिरंग साधनेनी । प्राप्ती नसे कांहीं ॥३३॥
परी जधीं ह्रदयांतली । ज्योतिर्मय दिव्यपूजा देखिली । तदा फलप्राप्ती झाली । पूजनाच्या सार्या ॥३४॥
सदोदित प्रणवसहित । पंचाक्षरी जपत । होतों मी ऐसा वेचीत । बहुत काल ॥३५॥
नित्यानन्द-दत्त सोऽहम् जप । होऊं लागला अंतरीं आपोआप । सुटला मग बाह्य जप । तेणेंकरोनी ॥३६॥
समजलों तेव्हां कीं खरा जप । होतो आपुल्या आप । म्हणोनि हेंचि सर्वोत्तम । कीं तो ऐकणें ॥३७॥
श्रीगुरुदेवांकडोनी । दोन अक्षरें प्राप्त करूनी । ती द्वयक्षरी पढुनी । ध्यातसेंही तींच ॥३८॥
तिचा केला अभ्यास । सोड आंत घेतां श्वास । अहं सोडतां उच्छ्वास । ऐसा जपीला ॥३९॥
सोऽहम् मंत्र जपतां । अन्य जप विसरलों सर्वथा । तेव्हां शांतीची तत्त्वता । प्राप्ती केली ॥४०॥
एकटा बालपणापासुनी । फिरलों बहुत स्थानीं । अनेकानेक महापुरुषही भेटोनी । भ्रमन्ती न थांबली ॥४१॥
परी येतां गणेशपुरीं । नित्यानंद भेटतां सत्वरी । थांबविलें त्यांनींच तरी । भटकणें माझें ॥४२॥
बंद झालें फिरणें । आणि बहुतजनांचे भरकटणें । थांबलें माझ्या स्थिरावण्यानें । खरोखरी ॥४३॥
बहुत प्रकारच्या द्दश्यांना । देखिलें भिन्न करूनि त्यांना । ग्राह्य कांहीं असतांना । त्याज्यही कांहीं ॥४४॥
सन्दुरु श्रीनित्यानंदांनीं । मूलतत्त्व कथितां विवरोनी । ग्राह्य त्याज्य एक करोनी । देखिलें तदा मी ॥४५॥
भारताच्या नाना खंडीं फिरलों । गुरुदेवांना शोधित बसलों । माती खाऊन राहिलों । अन्नाऐवजीं ॥४६॥
असल्यानें वस्त्रहीन । दरग्यावरची चादर ओढुन । घैर्य न सोडुन । गुजराण केली ॥४७॥
ह्याचा झाला परिणाम । अन्नपूर्णा धनधान्यपूर्ण । तसेंच वस्त्रभंडार भक्कम । ये वसण्या माझ्या ठायीं ॥४८॥
गुप्त साधन गुरुनें दिधलेलें । द्दढतेनें पाहिजे भजिलें । जप करूनि हवें ठेवलेलें । गुप्त रूपें ॥४९॥
पेरलेल्या बीजांतुनी । कालान्तरीं वृक्ष फोंफावुनी । फळां फुलां कारण होवुनी । बहरी जैसा ॥५०॥
ऐसाही गुरुप्रसाद । असे सर्व सिद्धीप्रद । मोहरें बहरे सुखद । फलदायी होऊनी ॥५१॥
राम रटा, वा शिव जपा हा । योग शिका, वा, कर्मरत रहा । गुरुगुण गाई तो पहा । लाभले ना कांहीं ॥५२॥
मुक्तानंदाच्या परमार्थ यात्रेचें । सर्व कष्ट श्रमांचें । लाभतां नित्यानन्दविश्रांतीचें । परिमार्जन झालें ॥५३॥
महर्षि यांच्या द्वारा रचित । सर्व शास्त्रच यथार्थ । मुक्तानंदा, स्वाध्याय तुजप्रीत्यर्थ । तब गुरु नित्यानंद ॥५४॥
मुक्तानंदा, आपुल्या मार्गानें । वाटचाल करी द्दढतेनें । बहु येती नाना विघ्नें । अडचणीही अनेक ॥५५॥
भेटतील जन बहुत । करतील भ्रष्ट पथ । न ऐकतां कोणाचे मत । विसरूं नको नित्यानंदा ॥५६॥
खास अशा मित्राला । शोध शोधुन घ्या त्याला । साथ सदा देणार्याला । सहारा मिळेल ॥५७॥
निद्रा सुखाची येईल । मांसाप्रती केवळ । आसक्ति ठेवुनि कां असाल । मांसजात सारीं एक ॥५८॥
साधका, नकोस भटकूं पोटासाठीं । नको हिंडु धुंडु पैशासाठीं । शोध घेत राही रामासाठीं । वसे सर्व त्याच्या ठायीं ॥५९॥
व्यसनें मम चित्तीं । बहु प्रकारचीं होतीं । हळुहळूं परंतु तीं । पुरुषार्थानें सुटलीं ॥६०॥
अखेर व्यसनाचा एका । पुरा व्यसनी बनलों पक्का । सुटलें न कोणतें, तें ऐका । नित्यानंद-स्मरण ॥६१॥
जीवनयात्रीं मनुष्या भेटती । त्याच्या लायक जे असती । थोडया बहुत दिसांसाठीं । मित्र अनेक ॥६२॥
परी जो सदासाठीं । मित्र योग्य सांगण्यासाठीं । ऐसा महामित्र सर्वांपाठी । सद्गुरु केवळ ॥६३॥
असीम गुरुभक्तीविण । असे योगी कीं शून्य । शुष्क असे जाण । वेदान्तीही ॥६४॥
भक्त होतसे रसहीन । सुकतें षड्दर्शन । मुक्तनन्दा अमृतरसायन । नित्यानन्दस्मरण ॥६५॥
स्वतः भक्त बनतो । भगवन्ताला वगळतो । तो खरेंच करतो । चोरी अशी ही ॥६६॥
स्वतःला गुरुठाय़ीं अर्पितो । पुन्हा यात्रा-साधन शोधतो । तोही पहा करतो । चोरीच कीं अहा ॥६७॥
न पाळितां स्वतः अनुशासन । न करूं शकसी पर-शासन । पाळीशी जर तें पूर्ण । करशील तदा शासन ॥६८॥
गुरु न मानव । नसे तो देव । न व्यक्तीही होय । गुरुच तो केवळ ॥६८अ॥
करी अन्धकार-नाश । देह जो प्रकाश । प्रदाता असा खास । तोचि गुरु जाण ॥६९॥
अंधःकार-नाश न रविवीण । थंडीस उष्णता, क्षुधेला भोजन । असेंच गुरुज्ञानाविना अज्ञान । न पावे नाश ॥७०॥
ह्रदकमलाच्या परम अंतरीं । अनुभूतिजन्य परमानंदमयी । परम चैतन्य तुरीय नामधारी । जो आहे ॥७१॥
मुक्तानन्दा, तोचि देव जाण । असेही तो नित्यानंद । आणि तोची ही मुक्तानन्द । सर्वही तोच ॥७२॥
बहुभाषी आहे । नाना देशा पाहे । किती लाधल्याहे । पदव्या अनेक ॥७३॥
यशा तोटा नाहीं । मुक्तानंदा तरीही । भिकारी हा राही । आत्मानंदाविना ॥७४॥
’मी’ असे तों न देखिला राम । ज्ञानध्यानाग्नीमध्यें करितां ’ स्व ’ होम । सर्वत्र राम ही राम । देखिला तेव्हां ॥७५॥
चिदानन्द चिदस्वरूप पूर्ण मूर्ति । अन्तर्यामीं जयाला प्राप्ती । देहधारी तरी तया प्रती । वैकुण्ठ होय ॥७६॥
सद्गुरुप्रसाद लाभला । सर्व ठाव ठिकाणा उमगला ॥ आपपरभाव विलीन झाला । तेणेंकरोनी ॥७७॥
घेऊनि श्रद्धेची सोबत । पुढें पुढें जात असत । पुरुषार्थानेंही होतां प्रगत । कैलास दूरी नसे ॥७८॥
मोक्ष, भक्ति, ज्ञान । कैलास, परशिव, नित्यानंद । नांवें एकाचींच अनंत । स्थानही एक ॥७९॥
सर्वव्यापक ईश्वर । तुझ्याठायीं वसे निरनार । पाही, भज सत्वर । त्यालागोनि ॥८०॥
होईल विकसित पूर्ण । तुझें सारें जीवन । रड थांबेल संपूर्ण । साक्षात्कारानें ॥८१॥
परशिव सर्वव्यापी । व्यक्तींतला मतींतला भेद अपी । भेद मुक्ती-शास्त्राचाही । श्रमात्मक राही ॥८२॥
दूरूनि सोडी त्याला । मुक्तानन्दा तूं आपुल्या । अंतरीं बसण्याला । जाई वेगें ॥८३॥
शोधितां शोधितां त्याला । बहु दूर मी आला । दूर दूरही गेला । किती बहुत ॥८४॥
सर्वांना विचारलें । ना कोणीही सांगितलें । वापस लोटुनि सहज देखिलें । तों अंतरीं पाहिला ॥८५॥
अहो प्रियजन हो । मागें पुढें इकडे तिकडे हो । कशास जातं असे हो । माघारी फिरा ना ॥८६॥
अतंरीं अपुल्या । त्या धवल पूर्णाला । परम आनन्दाला । पाहुनी घ्याल ॥८७॥
जाऊं नका पुढें । येऊं नका मागें । नकोच वरती बघणें । पळ काढूं नका खालीं ॥८८॥
मुक्तानंदा, जिथल्या तिथें । जसाच्या तसाच इथें । तुझा तूंच आपुल्यामध्यें । मस्त रहा जा ॥८९॥
बन्धुहो ! अन्तरींचें धन असे । प्राप्त करा कसे । कारण मोलाचें तें असे । भारी बहुत ॥९०॥
न चोरूं शके कोणी चोर । ना सरकार लावु शके कर । सर्वस्वीं उपभोग घेणार । तुमचे तुम्हीच ॥९१॥
जप जपा, तप तपा । योग साधा, भक्तिगुण गा । यज्ञ यजा वा करा । दानधर्म ॥९२॥
बना त्यागी वा भोगी हवे जरी । मी पण न विसराल जोंवरी । अग्रेसर सर्वांत राही तरी । हा अहंकार ॥९३॥
आपुल्या आत्म्याला । मुक्तानन्दा, नको विसरण्याला । अग्रेसर सर्वांमधला । जो असे ॥९४॥
अहंकार नाश कराल । ओंकार स्वतः बनाल । परमात्मा दूर राहील । न जातां अहंकार ॥९५॥
जाती मत सम्प्रदायाच्या भेदांत । उंचनिचाच्या वादविवादांत । सर्व धर्म असतां रामांत । काळ दवडूं नको रे ॥९६॥
संप्रदाय म्हणजे रस्ता । मंदीर पुढें, मार्गीं जातां । सोडावा लागे रस्ता । मंदीरप्रवेश होण्या ॥९७॥
भेद-निवृत्ति, निर्विकार गती । प्राप्ताप्राप्तरहित मति । मुक्तानन्दा, स्थिर ब्रह्मात्मरति । परमप्राप्ती हीच ॥९८॥
सहस्त्रारही वैकुंठ । कैलास, गोलोक, देवलोक । योगीजनांचें तुर्यातीत स्थानक । मुक्तानंदा तव ठिकाण ॥९९॥
दिव्यातिदिव्य मधुर संगीत । जेथ होतसे ध्वनीत । अति रुचिर रस अनन्त । पाझरती जेथें ॥१००॥