मुक्ताबाईची समाधी - अभंग १ ते १०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१
तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥
म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥
येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं ॥३॥
चहूं युगा आदि स्थळ पुरातन । आले नारायण गोदातीरीं ॥४॥
नामा म्हणे येथें रहावें ह्रषिकेशी । विजयादशमीशीं सिद्ध होऊं ॥५॥
२
देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥
निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥
अनादि जें स्थळ दाविलें नारायणें । मन प्रतिष्ठाना येते जहाले ॥३॥
चक्रतीर्थीं पोहा म्हणती आला थोर । वैष्णवांचे भार उतरले ॥४॥
नामा म्हणे हरी सहज आली वाट । आपेगांव कोठें सांगा स्वामी ॥५॥
३
मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज ॥१॥
भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि । तयाची समाधि आपेगांवीं ॥२॥
आपेगांवीं आले देव ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य यांचें कुळ धन्य यांचा वंश । धन्य यांचें कुशीं योगिराज ॥४॥
नामा म्हणे आम्हां दाविलें नारायणें । जालीं चौघीजणें याचि क्षेत्रीं ॥५॥
४
निवृत्ति मुक्ताईनें पाहुनि स्थळ डोळां । आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥
तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हां आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर कोरान्नाचें अन्न । सांभाळी सोपान मजलागीं ॥३॥
तुझ्या योगें हरि क्रमियेलें काळा । फुटलासे मेळा तापसांचा ॥४॥
नामा म्हणे यांचें कळविविलें मन । करी समाधान पांडुरंग ॥५॥
५
पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥१॥
चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥
दशमीचे दिवशीं निघाले बाहेर । उठावले भार वैष्णवांचे ॥३॥
वेरूळ नगर असे पुरातन । विश्वकर्मा यानें कीर्ति केली ॥४॥
अगाध तें पुण्य बोलताती ऋषि । जावें वेरुळासी नामा म्हणे ॥५॥
६
मुक्ताई उदासी जाली असे फार । आत्मा हें शरीर रक्षूं नये ॥१॥
त्यागिले आहार अन्नपाणी सकळीं । निवृत्तिराज तळमळी मनामाजीं ॥२॥
गंधर्वा सुरगण उठले सहमेळा । गेले ते वेरूळा अवघेजण ॥३॥
वेरुळाचा महिमा सांगे ह्रषिकेशी । जवा आगळी काशी म्हणोनियां ॥४॥
वेरुळाची यात्रा केली यथासांग । मग पांडुरंग विघते जाले ॥५॥
चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार । पाहावें तापीतीर नामा म्हणे ॥६॥
७
निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥
वेधली चित्तवृत्ति स्वरूपीं निमग्न । नाहीं देहभान मुक्ताईला ॥२॥
अवघेजण जपती जपे नारायण । चालती घेऊन मध्यभागीं ॥३॥
निवृत्तिराजें धरिली मुक्ताई हातीं । सांभाळित जाती निशिदिनीं ॥४॥
पदोपदीं जपे निवृत्तिराज करें । आणिक ऋषीश्वर सांभाळिती ॥५॥
नामा म्हणे देवा जातां तातडीनें । पुढें स्थळ कोण नेमियेलें ॥६॥
८
तापीचिये तीरीं महत्ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥१॥
वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२॥
तेथें परशुरामें मारियेला बाण । पाह्ती पुरातन पश्चिमेस ॥३॥
पाहिलें माय आम्हीं तापीतीर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
धन्य तापीतीर दिसे मनोहर । दोही थडी भार पताकांचे ॥५॥
नामा म्हणे हरी आवडीचें स्थळ । कण्हेर कमळ उदय जाला ॥६॥
९
फुलले अनेक तरुवर तेथ । दुर्वा दर्भ आंत डंवरले ॥१॥
करंज जांभळी लागली एक थाटी । वरी बहु दाटी तरुवरांची ॥२॥
अमृतफळें अपार विस्तारले फार । त्यामाजीं मयूर टाहो देती ॥३॥
कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन । तरुवर सुमनें परिमळते ॥४॥
पारिजातकांची दाटी थाटी जाली भारी । आंत मैलागिरी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे देवा भला हा एकांत । मार्कडेयें तप केलें ॥६॥
१०
सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या ॥१॥
सिताफळी भरित अवघी तापीथडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥२॥
तापीतीरीं ऋषि आणि शारंगधर । पाठीमागें भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर । धन्य तापीतीर योगियांचें ॥४॥
उष्णकाळीं छाया आवडती फार । म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ ॥५॥
नामा म्हणे देवा रंगलें अंतःकरण । उतरती विमानें गंधर्वांची ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP