श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग १ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.



मग उड्डाण केलें गरुडें । गगन आक्रमिलें चंडें ।
वरी आरुढले प्रचंडें । भक्त देव सकळिक ॥१॥
पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर ।
गिरीकडे पठार । शिखरीं गरुड उतरला ॥२॥
ते दिनीं समारंभ केला । महा उत्सव तरिसी जाला ।
जयजयकार प्रवर्तला । विमानें दाटलीं आकाशीं ॥३॥
दृष्टी देखावया कौतुक । शिवगण आले सकळिक ।
कर्ता ब्रह्मांडनायक ते कौतुक अवलोकिती ॥४॥
मुनि पुंडलिक उतरला । संगतीं वैष्णवांचा मेळा ।
समाधि लक्षण डोळां । पाहती देव सकळिक ॥५॥
हातें खाणोनि भूमिका । अमृत शिंपुनी सुगंधिका ।
महामंगळिक सुखा । वेदघोष आरंभिले ॥६॥
नामा म्हणे सुखसंगतीं । वैष्णव हरिनाम जर्जती ।
लक्ष्मी नारायेण क्षितीं । उतरोनि समाधि देताती ॥७॥


भक्तां समागमें हरी । सत्वर आले संवत्सरीं ।
ब्रह्मानंद परोपरी । चरण धरी सोपानदेव ॥१॥
भागीरथी सवें सरिता । धावोनि आली गंगा माता ।
यमुना सरस्वती उभयतां । एकात्मता कर्‍हेमाजीं ॥२॥
इंद्र चेंद्र तेहतीस कोडी । नवनाथ सिद्ध सौंगडी ।
भक्त सनकादिक प्रौढी । वेद परवडी गर्जती ॥३॥
गगनामाजीं देवांगना । वर्षाव करिती दिव्यसुमना ।
म्हणे निवृत्तीनाथ सोपाना । चरणावारी ठेवी तूं ॥४॥
पुष्पकारुढ जाले देव । आणिक मागुती आले सर्व ।
पांडुरंग दैव सदैव । सोपानदेव बाळमूर्ति ॥५॥
इंद्रनीळ पर्वत आहे । तेथोनि ठाव जावया पाहें ।
सप्तपाताळीं शेष वाहे । दीर्घदेह फणी असे ॥६॥
जावोनी त्यासी श्रुत करावें । गरुडासि बोलिलें देवरावें ।
मार्गीं चालिला लवलाहें । क्रमित जावें सप्तपाताळीं ॥७॥
नामा म्हणे अमृतकरीं । मुख कुरवाळोनी श्रीहरी ।
सोपान समाधिभीतरीं । आपण पुढारीं बैसले ॥८॥


ऐसा सोपान संबोखिला । महा उत्सव आनंद जाला ।
अभय वर दिधला । गर्जिन्नला देवराणा ॥१॥
म्हणे तूतें न विसंबे । संवत्सरीं असेन स्वयंभें ।
या वटेश्व्वरीं सगुण सुलभे । समारंभ प्रतिवर्षी ॥२॥
सिद्धसाधकाचें स्थळ । तो हा वटेश्वर सानुकुळ ।
यासी म्हणती सोडविल नीळकंठ । शीतळ प्रथम नाम ॥३॥
पूर्वीं हें ब्रह्मयाचें स्थान । तेणें येथें तप साधिलें गहन ।
प्रत्यक्ष शंकरा सुप्रसन्न । आशीर्वाचन बोलिले ॥४॥
इंद्रनीळ पर्वत रूप । प्रत्यक्ष नारायण स्वरूप ।
असे कौंडिण्यपुर समीप । माता साक्षेपें ॥५॥
ऋषिगण गंधर्व । क्षेत्रपाळ मल्हारी देव ।
इंद्र चंद्र ब्रह्मदेव । शुद्ध ठाव नेमिला ॥६॥
नामा म्हणे जनार्दन । बहुत संतोषला सोपान ।
अंगें ब्राह्मण सनातन । शुद्ध अधिष्ठान दिधलें ॥७॥


सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा ।
आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥
देव म्हणे कथा परिस । कोटयानुकोटी युगांस ।
आम्हीं होतों पंढरीस । अनंत कल्पें गेलीं ॥२॥
अनंत भक्तांचिया मेळीं । अनंत वैष्णवें भूमंडळीं ।
माजीं गवसले सकळीं । केली आगळी पुंडलिकें ॥३॥
येणें प्रसन्न केलें शंकरा । शंकरें मज दाखविलें निर्धारा ।
आपण राहोनि पाठमोरा । विश्व तारिलें कीर्तनें ॥४॥
भक्ताचेनि आराधनें । साधियेलें बहुत पुण्यें ।
माझें जालेंसे येणें । एक कारण पुंडलिकाचें ॥५॥
पूर्वापार पंढरीसी । होती विष्णुमात ऐशी ।
निर्धार करोनि मानसीं । अहर्निश अनुष्ठान ॥६॥
येथोनि पूर्वभाग पंढरी । पश्चिमभागीं ब्रह्मा अवधारी ।
अवतार कर्‍हे पाठारीं । महादेव शिखरीं मानदेसी ॥७॥
तेहतीस कोटी देवस्थळी । पूर्वा पश्चिम वैश्य मंडळी ।
उग्र तप साधिलें चंद्रमौळी । या इंद्रनीळ पर्वतावरी ॥८॥
द्रोणाचळ इंद्राचळ । हनुमंतें आणिला विशाळ ।
त्याच्या शाखा अधोमूळ । तो हा इंद्रनीळ पर्वत ॥९॥
येथें वल्ली सुवर्णाकार । गुप्त असती त्या निर्धार ।
दिसे अस्तमानीं अंधार । दीप आकार जगाप्रती ॥१०॥
येवोनियां दक्षिणद्वार । गोकर्ण महाबळेश्वर ।
पाताळद्वारीं पूजा शंकर । बेलपत्र अद्यापि निघती ॥११॥
नामा म्हणे देवाधिदेव । सांगितला स्वानुभाव ।
अधिष्ठान गुढाव । सोपानदेव निवांत ॥१२॥


पूर्वकथा संवत्सरनगरीं । सांगितली असे अवधारी ।
मग शेषाद्रि पर्वतावरी । गरुड शिखरीं उभा असे ॥१॥
धन्य धन्य हा सोपान । धन्य समाधि संपूर्ण ।
प्रत्यक्ष येऊनि नारायण । अभयदान दिधलेंसे ॥२॥
अनंत वैष्णव प्रेमळ । दिंडी पताका टाळ घोळ ।
रामकृष्ण नाम सरळ । भक्त सर्वकाळ नाचती ॥३॥
दिव्य उतरलीं विमानें । देव वर्षती सुमनें ॥
इंद्र चंद्र देवगणें । लोटांगण घालती ॥४॥
समाधिसुखाचा आनंद । अंगें करीतसे गोविंद ।
कथा सांगितली अभेद । श्रोते सन्निध सकळीं ॥५॥
म्हणती धन्य धन्य सोपान । देव पुरुष चतुरानन ।
संत महंत वैष्णव प्रमाण । रामकृष्ण गाताती ॥६॥
नामा म्हणे देवराव । मनोरथ पूर्ण करोनि सर्व ।
अपार गुणकीर्ति लाघव । न कळे माव कोणाशीं ॥७॥


सोपान समाधी बैसला । सकळीं पुष्पवर्षाव केला ।
जयजयकारें भूगोल कोंदला । आनंद दाटला महीवरी ॥१॥
धन्य धन्य हा सोपान । वर्णितसे श्रीभगवान ।
क्षणोक्षणीं माझी आठवण । उद्विग्न मन होतसे ॥२॥
नारद तुंबर अक्रूर उद्धव । पुंडलिकादि करूनि सर्व ।
मुनिदेवगण गंधर्व । स्तुतिस्तव बोलती ॥३॥
म्हणती चौघेजण भाग्याचे । जें निदान ब्रह्मादिकांचें ।
तें निजध्यान शंकराचें । सकळ जीवांची जीवनकळा ॥४॥
तो प्रत्यक्ष  येऊनि अनंत । याची परिचर्या करित ।
भक्ता साह्य होऊनि भगवंत । पूर्ण आर्त करावया ॥५॥
निजभक्तांचें कौतुक । करोनि ब्रह्मांडनायक ।
तया वर्णिती सनकादिक । वरकड मशक बापुडें ॥६॥
पुंडलिक विस्मयें बोलती । हे चौघे भाग्याच्या मूर्ती ।
यांच्या  नामें जग उद्धरती । पावे विश्रांति जगासी ॥७॥
नामा म्हणे सकळ जगाचा । उदय जाहलासे दैवाचा ॥
सुकाळ केला स्वानंदाचा । ब्रह्मविद्येचा मृत्युलोकीं ॥८॥


तूं सद्‌गुरु आनंद भरित । तुझा आदि ना अंत ।
तूं प्रकाशा प्रकाशमंत । तुज नमो स्वामिया ॥१॥
बुद्धिपालका वैभवा । तूं देवाधिदेवा ।
तूं जाणसी अंतरींचा गोवा । उगवीं उगवीं स्वामिया ॥२॥
तूं सत्त्वरूपाची चौघडी । आणि परेची पैलथडी ।
बोधभावें करी उघडी । पार उतरी स्वामिया ॥३॥
तूं विश्रांतीचें स्थळ । तूं निर्गुणानिगुण निर्मळ ।
निवृत्तिमतीचा विशाळ । पुरवी आळ सोपानाची ॥४॥


स्पष्ट जोडोनियां कर । मी दासानुदास अपार ।
प्रार्थना करुनि नमस्कार । उतरी पार भवाब्धि ॥१॥
निवृत्ति मुक्ताई परियेसी । योगीराज जाला उदयासी ।
वद्य कार्तिक मासीं । आळंकापुरीं जावें लागे ॥२॥
ज्ञानदेवें मागितला मान । देव वैष्णवांचें आगमन ।
येऊनि गंधर्वाचें विमान । विधि नारायण संपादिला ॥३॥
इंद्रनीळ पर्वत पुरातन  । पूर्वी येथें ब्रह्मयाचें स्थान ।
कौंडण्यपुरीं अंबिकाभुवन । महाब्रह्म योग माया ॥४॥
तिची भावें केली पूजा । परमार्थ साधिला स्वहित काजा ।
मुक्ताई आणि निवृत्तिराजा । सोपान सहजा सिद्ध जाले ॥५॥


धन्य कर्‍हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी ।
जैसें आळंकापुरीं । तैसें  पुण्यक्षेत्र हें ॥१॥
ऐसें अनुमानिलें स्थळ । पूर्दापार निर्मळ ।
सिद्धी पाववी आळ । माय बापा ॥२॥
मग सुमूहूर्त अमृतयोग । सिद्धा संकेत ज्ञानमार्ग ।
पहिला चंद्र स्वांग । गमन केलें योगिराजें ॥३॥
निवृत्ति सोपान मुक्ताई । आळंकापुरीहुनी आले पाही ।
मृदंग वाजती घाई । कीर्तन नवाई काय सांगू ॥४॥
सामाधि सावधान । सुखी ज्ञानेश्वर निधान ।
जाला पां स्थिर सोपान । भेटीलागीं ॥५॥
केलें समाधिस नमन । विज्ञापिले सर्वजन ।
करा आमुची बोळवण । शेवटींची ॥६॥

१०
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी ॥१॥
सोपानासी आम्हीं दिधलें वचन । चला अवघेजण समुदाय ॥२॥
आळंकापुरीची यात्रा केली सांग । मग पांडूरंग सिद्ध जाले ॥३॥
दुरोनि पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्‍हेतीरीं ॥५॥
नामा म्हणे देव गंधर्व सुरगण । चालिले सोपान समाधीसी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP