काव्यरचना - समाधान

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
प्राणीमात्रा सर्व निर्मीली ॥। साधने ती दिली ॥ परोपरी ॥१॥
पदार्थ निर्मून सर्वास पोशीले ॥ आनंदीत केले ॥ सर्वकाळ ॥२॥
त्यांपैकीं मानव बुद्वीमान केला ॥ सत्य वर्तायाला ॥ मासल्यांत ॥३॥
रंजलेगांजले अनाथा पोसावें ॥ प्रितीनें वागावें ॥ बंधूपरी ॥४॥
त्याच्या खटाटोपी आणा ध्यानीं मनीं ॥ उपकार मनीं ॥ जिवेंभावें ॥५॥
परपीडा देणें मानवा दुषण ॥ कळीचें साधन ॥ जगामाजीं ॥६॥
कृतज्ञ होऊनी मानी समाधान ॥ तृप्तीची ती खूण ॥ जोती म्हणे ॥७॥
२.
हेळसांड करी नियतवृत्तीची ॥ माता दुर्गुणांची ॥ संसारांत ॥१॥
रोगग्रस्त होतां दांतओठ खाती ॥ तेव्हां खवळती ॥ मनामधीं ॥२॥
सरकारावर व्यर्थ रागावती ॥ स्नेहास निंदीती ॥ कधींमधीं ॥३॥
समाधान नष्ट जातें बुद्वीबळ ॥ व्यर्थ तळमळ ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
माझीच योग्यता जास्ती आहे म्हणे ॥ दावी धीटपणें ॥ अज्ञान्यास ॥१॥
अजागळीं नाहीं दुध किंवा मुत्र ॥ मोक्ष वेदांतांत ॥ आहे म्हणे ॥२॥
मूढा लुटूनीयां प्रपंच करिती ॥ जगीं हंबरती ॥ झालों मुक्त ॥३॥
त्याला कैचें सुख समाधान सौख्य ॥ पापी हेच मुख्य ॥ जोती म्हणे ॥४॥
४.
आपली योग्यता नाहीं सद्‍गुणांत ॥ आणीना मनांत ॥ जसा मेंढा ॥१॥
आत्मज्ञान नाहीं मुल कलालाचा ॥ धंदा खाटकाचा ॥ ज्ञान सांगे ॥२॥
समाधान त्यानें केलें हद्दपार ॥ करा बोजवार ॥ शांततेचा ॥३॥
त्यास मुळीं नाहीं निर्मीकाची भीती ॥ अज्ञान्या नाहीं ती ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
नष्ट आचारानें रोगग्रस्त होती ॥ संताना नाडिती कांही वेळ ॥१॥
कल्पून प्राक्तन त्यास दोष देती ॥ शिमगा करीती ॥ त्याच्या नांवें ॥२॥
प्राक्तनांत होते तैसेच घडलें ॥ ब्रह्यानें लिहिलें ॥ खोटें नाहीं ॥३॥
अयोनीसंभव निर्मी नारायण ॥ खोटें समाधान ॥ जोती म्हणे ॥४॥
६.
स्वर्गाची शांतता कल्पून मनांत ॥ लिहिली ग्रंथांत ॥ तर्कबळे ॥१॥
कोठें आहे स्वर्ग पाहिले ते कोणी ॥ भिऊं नका मनीं ॥ दावा आम्हा ॥२॥
तुम्हावर प्रश्न दोरेवाले दादा ॥ पेटूं नका वादा ॥ आर्यदादा ॥३॥
खोटें बोलणा-या समाधान नाहीं ॥ शोधूनीयां पाहीं ॥ जोती म्हणे ॥४॥
७.
जशीं ज्यांचीं कर्मे तशीं फळे देती ॥ वळण लावीती ॥ संतानास ॥१॥
दुष्ट कर्मे तुम्ही अजीबात टाका ॥ पुढें नाहीं धोका ॥ मुलांबाळां ॥२॥
झालें गेलें सर्व मनीं झुरुं नका ॥ सत्यकर्मी विका ॥ आपुल्यास ॥३॥
खरें समाधान भोगा सावकाश ॥ आनंद जगास ॥ जोती म्हणे ॥४॥
८.
असंतोष राजा मच्छर प्रधान ॥ शिपाई दुर्जन ॥ कडीकोट ॥१॥
हेवा चोपदार मारीती किंकाळी ॥ द्यावे म्हणे बळी ॥ सद्‍गुणास ॥२॥
अज्ञानी रयत दारुबाज्ज करी ॥ तंटे घरीं दारीं ॥ सुख नाहीं ॥३॥
अशा वर्तनानें नाहीं समाधान ॥ खरे हे पाषाण ॥ जोती म्हणे ॥४॥
९.
दुष्ट आचारानें निचत्व पावती ॥ संकटीं पडती ॥ लागलीच ॥१॥
पश्चातापाअंतीं विचार करीती ॥ शुद्वीवर येती ॥ मनामध्यें ॥२॥
सुमार्गी लागतां होती महाजन ॥ होतसे कल्याण ॥ पदोपदीं ॥३॥
समाधान वृत्ती ज्याची अखंडीत ॥ सुखांत मंडीत ॥ जोती म्हणे ॥४॥
१०.
समाधान वृत्ती ज्याची अखंडीत ॥ संकटीं पडीती लागलीच ॥१॥
सत्य पाठबळ मनी दृढभाव ॥ करी धावाधाव ॥ दीनासाठीं ॥२॥
भल्या सॉक्रेटीसा विष त्या पाजीलें ॥ छळूनी मारिलें ॥ द्वेषाभावें ॥३॥
समाधान ज्याचा भंग झाला नाहीं ॥ ग्रंथांतरीं पाहीं ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP