काव्यरचना - मानवांचा धर्म एक
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
१.
सर्वाचा निर्मिक अहे एक धनी ॥ त्याचें भय मनीं ॥ धरा सर्व ॥१॥
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा ॥ आनंद करावा ॥ भांडू नयें ॥२॥
धर्मराज्य भेद मानवा नसावे ॥ सत्यानें वर्तावें ॥ ईशासाठी ॥३॥
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों ॥ आर्यास सांगतों ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
निर्मीकानें जर एक पृथ्वी केली ॥ वाही भार भली ॥ सर्वत्रांचा ॥१॥
तृणवृक्षभार पाळी आम्हासाठीं ॥ फळे तीं गोमटीं ॥ छायेसह ॥२॥
सुखसोईसाठीं गरगर फेरे ॥ रात्रदिन सारें ॥ तीच करी ॥३॥
मानवांचे धर्म नसावे अनेक ॥ निर्मीक तो एक ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
प्राणीमात्रा सोई सुख करण्यास ॥ निर्मी पर्जन्यांस ॥ नद्यांसह ॥१॥
त्याचे सर्व पाणी वेगाने वाहती ॥ आयें कुरापती ॥ तीर्थ केली ॥२॥
दाढी डोई वेण्या मुढ भादरीती ॥ भट करिताती ॥ द्रव्यलूट ॥३॥
आर्यांनी कल्पीलीं थोतांडे हीं सारीं ॥ दगे सर्वोपरी । जोती म्हणे ॥४॥
४.
जप अनुष्ठानें पाऊस पाडीती ॥ आर्य कां मरती ॥ जळावीण ॥१॥
जळांत बुडतां गटांगळया खाती ॥ प्राणास मुकती ॥ तळीं बसे ॥२॥
फुगुनीयां वर जळीं तरंगती ॥ मजा ते दावीती ॥ मृत्युलोकी ॥३॥
अज्ञानी शुद्रांत भुदेव बनती ॥ भिक्षा कां मागती ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
जप अनुष्ठाने स्त्रिया मुलें होती ॥ दुजा कां करिती ॥ मुलासाठी? ॥१॥
भट ब्राह्यणांत बहु स्त्रिया वांझ ॥ अनुष्ठानीं बीज ॥ नाहीं का रे॥२॥
अनुष्ठानावीण विध्वा मुलें देती ॥ मारुनी टाकीती ॥ सांदींकोनीं ॥३॥
ज्याचीं जशीकर्मे तशीं फळा येती ॥ शिक्षा ती भॊगीती ॥ जोती म्हणे ॥४॥
६.
ईश म्हणे आर्य परशरामास ॥ वधी अर्भकांस ॥ क्षत्रीयांच्या ॥१॥
दांभीक पेशवे पानपतीं जाती ॥ पालथे पडती म्लेंच्छापुढें ॥२॥
मर्द रावबाजी इंग्रजास भ्याला ॥ गौप्रदानी झाला ॥ विठूरास ॥३॥
धूर्त आर्य नाना सोंवळें दावीतो ॥ गो-यासंगे खातो ॥ जोती म्हणे ॥४॥
७.
एक सूर्य सर्वां प्रकाशास देतो ॥ उद्योगा लावीतो ॥ प्राणीमात्रा ॥१॥
मानवासहीत प्राण्यांचे जीवन ॥ सर्वांचे पोषण ॥ तोच करी ॥२॥
सर्वा सूख देई जनकाच्या परी ॥ नच धरी दूरी ॥ कोणी एका ॥३॥
मानवांचा धर्म एकच असावा ॥ सत्यानें वर्तावा ॥ जोती म्हणे ॥४॥
८.
एक चंद्र नित्य भ्रमण करीतो ॥ सर्वा सूख देतो ॥ निशीदिनीं ॥१॥
भरती ओहोटी समुद्रास देतो ॥ जल हालवीतो ॥ क्षारांसह ॥२॥
पाणी तेंच गोड मेघा योगें होतें ॥ संतोषी करीतें ॥ सर्व प्राण्यां ॥३॥
मानवांचे साठीं बहु धर्म कसे ॥ झालां कां हो पिसे ॥ जोती म्हणे ॥४॥
९.
सर्वांसाठीं एक वायु केला खास ॥ घेती श्वासोच्छवास ॥ प्राणीमात्र ॥१॥
वृक्षवल्लीसह सर्वांचे जिवन ॥ करीतो पालन ॥ जगामाजीं ॥२॥
वायुच्या योगानें हवा शुद्व होती ॥ प्राण्या सूख देती ॥ निशीदिनीं ॥३॥
मानवांनो, तुम्ही ईशा नित्य भ्यावें ॥ सर्व सूखी व्हावें ॥ जोती म्हणे ॥४॥
१०.
इराणी धाडस दंगेखोर बंड ॥ स्वार्यात्या उदंड ॥ केल्या त्यांनीं ॥१॥
बळीस्थानी त्यांचें वरचस्व झालें ॥ क्षेत्र स्थापीलें ॥ अतोनात ॥२॥
आर्य अपभ्रंश इराण्यांचा झाला ॥ दिमाखें म्हणाला ॥ भट श्रेष्ठ ॥३॥
पाखांडेही सारीं वेद लपविती ॥ जगालागीं भीती ॥ जोती म्हणे ॥४॥
११.
क्षत्रियांनो, तुम्ही कष्टकरी व्हावें ॥ कुटुंबा पोसावें ॥ आनंदानें ॥१॥
नित्य मुलींमुलां शाळेंत घालावें ॥ अन्नदान द्यावें ॥ विद्यार्थ्यास ॥२॥
सार्वभौम सत्य स्वत: आचरावें ॥ सुखें वागवावें ॥ आर्य भटटा ॥३॥
अशा वर्तनानें सर्वां सुख द्याल ॥ स्वत: सुखी व्हाल ॥ जोती म्हणे ॥४॥
१२.
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावें ॥ भिक्षान्न मागावें ॥ पोटापूर्ते ॥१॥
विद्वान वृद्वांनी विद्यादान द्यावें ॥ भिक्षेकरी व्हावें ॥ गांवामध्यें ॥२॥
स्त्रीपुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या ॥ विद्या शिकवाव्या ॥ भेद नाहीं ॥३॥
स्व हितासाठी खर्च जे करीती ॥ अधोगती जाती ॥ जोती म्हणे ॥४॥
१३.
दुर्गुणांचा छंद ज्यास बा लागला ॥ भिक्षा घालण्याला ॥ पात्र नाहीं ॥१॥
खॊटें बोलणारा मद्यपी निव्वळ ॥ घाली ना अगळ ॥ तर्कटास ॥२॥
तर्क धर्म बळ राजद्रोही खळ ॥ शुद्रांत प्रबळ ॥ ज्ञान सांगे ॥३॥
अशा साह्य देतां माजवितां पोळ ॥ मानवासी राळ ॥ जोती म्हणे ॥४॥
१४.
मुळीं बुद्वी नाहीं पशुपक्षादिकां ॥ त्याजमध्यें हाका ॥ वेदवक्त्या ॥१॥
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्यणासी ॥ धरावे पोटाशीं ॥ बंधूपरी ॥२॥
मानव भांवडें सर्व एकसहा ॥ त्याजमध्यें आहां ॥ तुम्ही सर्व ॥३॥
बुद्वीसामर्थ्यानें सूख द्यावें घ्यावें ॥ दीनास पाळावें ॥ जोती म्हणे ॥४॥
१५.
स्वभाषा लिहावी भाषण करावें ॥ सद्गुणी असावें ॥ स्वभावांत ॥१॥
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ॥ शाळा तपासाव्या ॥ योग्य वेळीं ॥२॥
मुढ मांगासह ब्राह्य मुजोर ॥ मूळ सत्य सार ॥ त्यांस सांगा ॥३॥
निर्मीकाचा धर्म एक आहे सत्य ॥ व्यर्थ कां पांडीत्य ॥ जोती म्हणे ॥४॥
१६.
इंग्रजी लिहावें भाषण करावें ॥ जगांत त्यागावें ॥ व्यसनास ॥१॥
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ॥ शाळा तपासाव्या ॥ गांवोगांवीं ॥२॥
आवेशी ख्रिस्तास करा सत्यबोध ॥ करावे सावध ॥ बंधुपरी ॥३॥
सत्यावीण नाहीं जगीं अन्य धर्म ॥ कळवावें वर्म ॥ जोती म्हणे ॥४॥
१७.
यवनीं लिहावे भाषण करावें ॥ सर्वस्वी त्यागावें व्यसनास ॥१॥
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ॥ शाळा तपासाव्या ॥ नगरींच्या ॥२॥
सुनीशिया सर्व करा सत्यवादी ॥ त्याची जहामर्दी ॥ जगाठायीं ॥३॥
जगामाजीं एक सत्यधर्म खास ॥ सांगा सर्वत्रांस ॥ जोती म्हणे ॥४॥
१८.
तीन भाषेमध्यें सध्या जे निपूण ॥ सद्गुणी संपन्न ॥ मानवंत ॥१॥
चाळीशीच्यावर मुख्य दीक्षा घ्यावी ॥ गादी सांभाळावी ॥ समाजाची ॥२॥
क्षेत्री ख्रिस्ती महंमदी आळवावे ॥ सत्य वर्तवावें ॥ त्यांचे हस्तें ॥३॥
सत्यावीण नाहीं जगीं अन्य धर्म ॥ कळवावें वर्म ॥ जोती म्हणे ॥४॥
१९.
सर्व भाषेंमध्यें असे जो निपूण ॥ सद्गुणी संपन्न ॥ सत्यवादी ॥१॥
त्याला नको दीक्षा गादी पाठबळ ॥ वर्षाची अगळ ॥ त्याला नको ॥२॥
लेखी भांवडे तो अथवा ती सर्व ॥ करीना बा गर्व ॥ पाखांडाचा ॥३॥
सत्यावीण नाहीं त्यास मुख्य धर्म ॥ सत्य ज्याचें कर्म ॥ जोती म्हणे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP