ब्राह्मणांचे कसब - चाल पाचवी
हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.
ब्राह्यण जोशी शूद्रानें घर बांधलें म्हणजे घरभरणीच्या वेळी आपण ताजा स्वयंपाक खाऊन उरलेला शिळा पाक धरधण्यास ठेवून कसा जातो याविषयी.
॥ अभंग ॥
पाया उन्हामध्यें बिगारी खांदिती ॥
टोपली वाहाती मलम्याची ॥१॥
गगनीं पाहाडीं गवंडी चढती ॥
विटा त्या मांडिती गा-यामध्यें ॥२॥
माकडाचेपरी सुतार वेंगती ॥
लांकडें जोडिती कळाशीनें ॥३॥
पोटासाठीं सर्व यातना भोगिती ॥
नाहीं पोटीं भीती कामक-या ॥४॥
धामाचे पाझर थेंब टबकती ॥
सर्वदा झटती दया फुटें ॥५॥
श्रम पाहूनिया धनी खुष होती ॥
वचन बा देती जेवणाचें ॥६॥
अशा जेवणास वास्तू नांव देती ॥
खुशामती येती अखेरीस ॥७॥
देऊन मुहूर्त दिवस नेमिती ॥
नादीं लाविताती घरधनी ॥८॥
ब्राह्यणभोजन होम करविती ॥
ढाला उभारीती निशाणांच्या ॥९॥
थाप देऊनिया भोजन सारिती ॥
दक्षिणा ती घेती यथासांग ॥१०॥
संध्याकाळ झाला आशीर्वाद देती ॥
बुडवूनी जाती अज्ञान्याला ॥११॥
धनी कामगार तोंडाकडे पहाती ॥
शिळा पाक खाती सावकाश ॥१२॥
भोळया भाविकाला ठक फसविती ॥
अधोगती जाती जोती म्हणे ॥१३॥
॥अभंग ॥
जळो जळो तुमचें जिणें ॥
उद्योग्या आधीं ताजें खाणें ॥१॥
हे बा कृत्य लाजिरवाणें ॥
समजोत कपटी शहाणे ॥२॥
घ्यावी घ्यावी माझी भाक ॥
जरी कां सांगेन अनेक ॥३॥
स्वकष्टानें पोटें भरा ॥
जोती शिकवी फजितखोरा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP