नासिकेतोपाख्यान - अध्याय १९

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥ नासिकेत उवाच ॥ श्लोक ॥

शृणुध्वं महिमानं च धार्मिकाणां द्विजोत्तमाः ॥ गच्छंति येन मार्गेण स तेषां सुखदायकः ॥१॥

निष्कंटको निर्मलश्च सलिलं च पदे पदे ॥ सुपुष्पितफला वृक्षाः कुजद्विजसमाकुलाः ॥२॥ टीका ॥

नासिकेत ह्मणे द्विजोत्तमा ॥ ऐका दयाधर्माचा महिमा ॥ जे अनुष्ठिती निजधर्मा ॥ तेही तुह्मां सांगेन ॥१॥

जेणे मार्गे जाती धार्मिक ॥ तो मार्ग अति सुखदायक ॥ निर्मळ कोमळ निष्कंटक ॥ नाही आटक सर्वथा ॥२॥

पाउलो पाउली निर्मळ जळे ॥ वृक्षी घमघमीत पुष्पे फळे ॥ अति सुस्वाद सुपरिमळे ॥ वरी पक्षिकुळे नानायाती ॥३॥

कोकिळा कूंजती पंचमशब्द ॥ पक्षी करिती वेदानुवाद ॥ शुकसारसांप्रति संवाद ॥ परमानंद चालतां ॥४॥

मार्ग निर्मळ परिशुद्ध ॥ मकरंदी झेंपावत षट्पद ॥ मार्ग कोमळ अति सुखद ॥ चालती अगाध धर्मात्मे ॥५॥

वापीकूप सरिता तडाग ॥ निर्मळजळे भरली सांग ॥ सिद्धऋषि क्रीडारंग ॥ जाती तेणे मार्गे धार्मिक ॥६॥

विमानरुढ दिव्या भरणी ॥ नानागीत नृत्य वाद्यध्वनी ॥ पुढे नाचती नाचणी ॥ येताती ठाकोनी स्वर्गभुवना ॥७॥

भक्ष्य भोज्य नानादिव्यान्न ॥ दधि क्षीर अमृतपान ॥ अति आराम रमणीय स्थान ॥ धार्मिकांकारणे ते ठायी ॥८॥

जाई जुई नागचंपक ॥ देवदारु पारिजातक ॥ पुष्पयाती अलोकिक ॥ वर्षती देव सुरवर ॥९॥

पूर्वपुण्य त्यांचे गहन ॥ गो भू रत्ने हिरण्यदान ॥ भोगिती ते पुण्यपरायण ॥ सुखसंपन्न ते ठायी ॥१०॥

सिंहासने रत्नखचित ॥ दिव्याभरणी सालंकृत ॥ पूर्वपुण्याचे संचित ॥ भोगिती तेथे धर्मात्मे ॥११॥

दीर्घ मार्ग नाही त्यांप्रती ॥ स्वल्पमार्गे गमन करिती ॥ एवं धार्मिकांची स्थिती ॥ म्यां तुम्हांप्रती सांगीतली ॥१२॥

आतां ऐका आणिक एक ॥ म्यां देखिले परम कौतुक ॥ धर्मसभा बैसली सकळिक ॥ मुख्य नायक यमधर्म ॥१३॥

जैसा तारांगणी चंद्रमा ॥ तैसा विराजमान धर्मनामा ॥ तया सभेचा अगाध महिमा ॥ द्यावया उपमा असेना ॥१४॥

धर्मसभा शोभायमान ॥ बैसले सिद्ध ऋषितपोधन ॥ तंव नारदाचे आगमन ॥ दैदिप्यमान तेजस्वी ॥१५॥

रामनामे वीणा वाजत ॥ विष्णुपदे गीत गात ॥ प्रेमानंदे आनंदभरित ॥ सभेआंत प्रवेशला ॥१६॥

येतां देखोनि ब्रह्मसुत ॥ सकळ सभा आनंदभरित ॥ धर्मराज उठोनि त्वरित ॥ केला प्रणिपात साष्टांगी ॥१७॥

दिव्यसिंहासनी बैसवून ॥ केले अर्घ्यपाद्यादि पूजन ॥ सुमनमाळा दिव्य चंदन ॥ दिधले भोजन यथोक्त ॥१८॥

मग विनवी कर जोडून ॥ म्हणे दिधले दुर्लभ दर्शन ॥ झाले स्वामिया जे आगमन ॥ सनाथ संपूर्ण मज केले ॥१९॥

आजी माझा सफळ जन्म ॥ सफळ माझे क्रियाकर्म ॥ आजी माझा सफळ धर्म ॥ दर्शन उत्तम संतांचे ॥२०॥

आजी मज तुष्टला जगन्निवास ॥ दर्शने जाहलो कृतकृत्य ॥ परिसोन धर्मराजवचनार्थ ॥ ब्रह्मसुत संतोषला ॥२१॥

म्हणे ऐकगा धर्मराजा ॥ तुज देवे ठेविलेचि काजा ॥ धर्माधर्मविचार वोजा ॥ करोनि प्रजा नेमावा ॥२२॥

जो निर्मिता त्रिजगतीए ॥ तो यमदंड तुझे हाती ॥ धर्मनिर्णय विचारयुक्ती ॥ कैशा रीतीने पाहतोसी ॥२३॥

धर्माधर्मविचारासी ॥ पहावया आलो तुजपासी ॥ धर्मार्थकाममोक्षासी ॥ कैसा देतोसी धार्मिकां ॥२४॥

दानव मानव निशाचर ॥ तूंचि प्रमाण चराचर ॥ करिसी धर्माधर्मविचार ॥ ते पहावया साचार मी आलो ॥२५॥

ऐसे बोलोनि तयाप्रती ॥ राहिला मौन नारद महामती ॥ तंव तेचि समयी शीघ्रगती ॥ विमानपंक्ती आणविल्या ॥२६॥

नानावाद्ये तुरे अपार ॥ नाचती नाचणी मनोहर ॥ दुंदुभिवाद्यांचा महा गजर ॥ जयजयकारे महाघोष ॥२७॥

हस्ती अश्व श्रृंगारिले रथ ॥ मुक्ताभरणी सालंकृत ॥ ध्वज पताका छत्रयुक्त ॥ शोभा अद्भुत साजिरी ॥२८॥

तया विमानरुढ होऊन ॥ निघाला धर्मराज आपण ॥ सवे नारदादि मुनिगण ॥ दैदिप्यमान तेजस्वी ॥२९॥

एवं ऋषिसकळां समवेत ॥ विमानरुढ वैवस्वत ॥ निघाला वायुवेगे त्वरित ॥ वर्तमान दावित नारद ॥३०॥

अतिदुर्गम विषमस्थाने ॥ स्वर्ग नरक कवण्या माने ॥ महा पातकियांची दंडने ॥ सकळांकारणे दावित ॥३१॥

एवं पाहिली रुपे समस्त ॥ पापपुण्यांचे आचरित ॥ तेणे नारदमुनी विस्मित ॥ ऐसे बोलत यमधर्मा ॥३२॥

म्हणे परियेसी वैवस्वता ॥ विष्णुतुल्य प्रतापवंता ॥ त्रैलोक्यदंडन तुझिया माथां ॥ होसी शास्ता सकळांचा ॥३३॥ श्लोक ॥

नारद उवाच ॥

धर्माधर्मविचारार्थ स्थापितो हरिणा स्वयम ॥ धर्मस्य दर्शनार्थाय समायातो भवदगृहम ॥३॥ टीका ॥

धर्माधर्मविचाराकारणे ॥ तुज स्थापिले नारायणे ॥ तुझिया दर्शनासी जाणे ॥ झाले येणे मजलागी ॥३४॥

तरी तूं सांगे महामती ॥ धर्मविचाराची प्रत्युक्ती ॥ कवण्या कर्मा कैसी गती ॥ ते मजप्रति सांगपां ॥३५॥

ऐकोनि नारदाचे वचन ॥ यमधर्म म्हणे आपण ॥ माझे इतुकेचि कार्य जाण ॥ विचारप्रमाण वेदाज्ञा ॥३६॥

श्रीनारायणाचे आज्ञेसी ॥ अमान्य करिती जे वेदवचनासी ॥ नानापरी दंडूनि त्यांसी ॥ सत्यधर्मासी मेळवावे ॥३७॥

देवरायाचे आज्ञेप्रमाणे ॥ जे आचरती पुण्यजन ॥ तयांसी तैसेचि फल जाण ॥ येथे आपण भोगिती ॥३८॥

मज हरीने ठेविले आपण ॥ त्याची आज्ञा वेदवचन ॥ येथे न्याय अन्याय निवडून ॥ भोगिती जाण संचिते ॥३९॥

जे कर्मभूमीचे संचित ॥ केले ते भोगिती येथ ॥ यासी वेदाज्ञा समर्थ ॥ मी तंव स्थापित हरीचा ॥४०॥

ऐसे बोलोनि आपण ॥ नारदादिसहवर्तमान ॥ वेगी परतवोनी व्योमयान ॥ आले आपण सभेसी ॥४१॥

सुर नर आणि गंधर्व ॥ यक्ष किन्नरादिक सर्व ॥ सभाप्रविष्ट धर्मराव ॥ नारदादि सवे ऋषिगण ॥४२॥

सिंहासनी यमनाथ ॥ मिरवे जैसा बाळादित्य ॥ पाचारुनियां यमदूत ॥ स्वये आज्ञापि ते ऐका ॥४३॥ श्लोक ॥

यमधर्म उवाच ॥ भृत्या गच्छत भूलोकमृते तेजस्विवैष्णवान ॥ अवैष्णवान गृहीत्वा च आनयध्वं प्रयत्नतः ॥ टीका ॥

यमधर्म तयां दूतां ॥ झाला पृथ्वीवरी प्रेरिता ॥ तुम्ही महीवरी विचरतां ॥ वैष्णव तत्वतां त्यागावे ॥४४॥

अभक्त जे कां अनाचारी ॥ बांधोनि आणावे यमपुरी ॥ भक्तजन वर्जावे सर्वोपरी ॥ ममाज्ञेवरी सर्वथा ॥४५॥

ऐसी धर्मराज आज्ञा करी ॥ तै मस्तकी वंदिली किंकरी ॥ मग जोडिलिया करी ॥ प्रश्नोत्तरी ते बोलत ॥४६॥ श्लोक ॥

किं रुपं वैष्णवानां वाऽवैष्णवानां कथं भवेत ॥ त्वदुक्तं श्रोतुमिच्छामो वद तेषां हि लक्षणम ॥५॥ टीका ॥

दूत म्हणती वैवस्वता ॥ परियेसीं स्वामी यमनाथा ॥ कैसिया लक्षणी विष्णुभक्तां ॥ आम्ही तत्त्वतां जाणावे ॥४७॥

अभक्त वैष्णव ते कवण ॥ त्यांचे कैसे आहे लक्षण ॥ स्वामियांनी कृपा करुन ॥ उभयतांची चिन्हे सांगावी ॥४८॥

तंव धर्मराज झाला बोलता ॥ जयांचे गृही असे पवित्रता ॥ आणि सत्यवादी सर्वथा ॥ जे नर धर्मे वर्तती ॥४९॥

यथाशक्ति नित्यदान ॥ करिती अतिथींचे पूजन ॥ जयांचे मुखी नामसंकीर्तन ॥ ते वैष्णव जाणूनि त्यजावे ॥५०॥

कपिला धेनु जयाचे घरी ॥ प्रतिपाळिली बरवियापरी ॥ गोमये संमार्जन करी ॥ गृहाभीतरी यथोचित ॥५१॥

जेथे आपुलिया श्रद्धा भक्ती ॥ अवतारचित्रे लिहिली भिंती ॥ ते वैष्णव तुम्हां नागविती ॥ तुम्ही तयांप्रती वर्जावे ॥५२॥

आणिक ऐका सावधान ॥ जेथे द्वारावतीनाथाचे पूजन ॥ शालिग्रामशिळेसी जाण ॥ करिती अर्चन सर्वदा ॥५३॥

ते वैष्णव जाणावे हरिभक्त ॥ अखंड जप करिती एकांत ॥ भगवद्भजनी सावचित्त ॥ झणी तेथे आंतकाळ ॥५४॥

गोपिचंदनाचे टिळे जाण ॥ स्वागी चर्चित हरिचंदन ॥ हरिचरण तीर्थे आपण ॥ सर्वांग संपूर्ण सिंचिती ॥५५॥
हरिगुणनामांची कीर्ती ॥ पंवाडे देवतांचे वर्णिती ॥ नानावाद्ये विणे श्रुती ॥ रसाळ गाती हरिकथा ॥५६॥

तुळशीकाष्ठांची भूषणे ॥ माळा मिरवती अंगत्राणे ॥ शंखचक्रांची लांछने ॥ वैष्णव तेणे शोभती ॥५७॥

ऐसिया भूषणी बहुसाल ॥ जे जे पृथ्वीवरी देखाल ॥ तयांसी मानावे कैवल्य ॥ झणी पाहाल तयांकडे ॥५८॥

सकळ तीर्थाचेंही तीर्थ ॥ ऐसे श्रीहरीचे चरणतीर्थ ॥ जे प्राशन करिती यथोचित ॥ तुम्ही तेथे नवजावे ॥५९॥

हरिप्रसाद जयांसी आतुडे ॥ हरिनिर्माल्याचे अवघ्राण घडे ॥ हरिरत झाले जे निघडे ॥ झणी त्यांकडे पाहाल ॥६०॥

आणिक ऐका हरीचे दास ॥ सदा गंगास्नान घडे जयांस ॥ गोमतीतीरी षण्मास ॥ घडला वास जयांसी ॥६१॥

अगाध केदाराचे महिमान ॥ देवांदिकां दुर्लभ जाण ॥ तेथील जळ करी जो प्राशन ॥ तोही आपण वर्जावा ॥६२॥

अग्निहोत्र वैश्वदेव जेथ ॥ षट्कर्मे वेदविहित ॥ द्विजोत्तम आचरे जो यथोक्त ॥ तुम्ही तेथे नवजावे ॥६३॥

आणिकही तयांचे चिन्ह ॥ दूतहो ऐका सावधान ॥ जेथे देखाल हरिकीर्तन ॥ तेथे आपण नवजावे ॥६४॥

टाळ मृदुंगाचा गजर ॥ गरुडटक्यांचे संभार ॥ भक्त करिती जयजयकार ॥ तेथुनी सत्वर पळावे ॥६५॥

तुळसीपत्र शिरसा धरी ॥ कृष्णनामे क्रीडा करी ॥ सदा सचिंत अंतरी ॥ निरंतर श्रीहरिहेतु ॥६६॥

कृष्ण विष्णु हरि गोपाळ ॥ हृदयी नामांची जपमाळ ॥ ध्याती जे की सर्वकाळ ॥ तेही केवळ त्यागावे ॥६७॥

स्तवराज अनुस्मृती ॥ गीता गजेंद्रमोक्ष जे जपती ॥ सहस्त्रनामांच्या आवृत्ती ॥ नियमे करिती पारायणे ॥६८॥

अश्वत्थ धात्री बिल्व जाण ॥ हे पूजनकत्वे समसमान ॥ जेथे असती हे वृक्ष जाण ॥ तेंही स्थान त्यजावे ॥६९॥

केवळ तुळसीचे मूळ ॥ विस्तारे जाणा तीर्थ सकळ ॥ शाखा ते देव निर्मळ ॥ वेद केवळ ती पत्रे ॥७०॥

एवं तुळसीपाशी नारायण ॥ वृंदावन तेंचि विष्णुभुवन । तेथे न जावे आपण ॥ अगम्य ते स्थान तुम्हांसी ॥७१॥

श्रवणी रुद्राक्षांचे भूषण ॥ कंठी रुद्राक्षाभरण ॥ रुद्राक्षे मुगुट वर्धमान ॥ करी कंकणे रुद्राक्षांची ॥७२॥

स्मरती शिव अथवा केशव ॥ ऐशा लक्षणी जे महानुभाव ॥ तुम्ही न घ्यावे त्यांचे नाव ॥ ऐसे धर्मराव सांगत ॥७३॥

मंत्रे करिती विभूतिधारण ॥ सदाशिवनामाचे नित्य स्मरण ॥ नित्य करिती लिंगार्चन ॥ तेथे आपण नवजावे ॥७४॥

भगवद्भक्तांचे लक्षण ॥ यमधर्म सांगे आपण ॥ जेथे वसती भक्त सज्जन ॥ तेथे आपण नवजावे ॥७५॥

जयाचे वाचे हरिनाम ॥ हृदयी वोसंडे हरीचे प्रेम ॥ जयाचा सकळही मनोधर्म ॥ सत्य सर्वोत्तम भजनार्थ ॥७६॥

तरी दूत हो का तुम्ही आतां ॥ ममाज्ञे महीवरी विचरतां ॥ जेथे देखाल विष्णुभक्तां ॥ तेथे सर्वथा नवजावे ॥७७॥

ऐसे हरिभक्तांचे चिन्ह ॥ यमधर्मे केले कथन ॥ यावरी यमधर्म आपण ॥ करितो भाषण ते ऐका ॥७८॥

हरिभक्तांचे नामस्मरण ॥ करी त्या न बाधी भवबंधन ॥ तुका सुंदररामी शरण ॥ पुढील निरुपण अवधारा ॥७९॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने यमधर्माधर्मनिरुपणं नामैकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ ओंव्या ॥७९॥ श्लोक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP