नासिकेतोपाख्यान - अध्याय १५

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

अवधारा मुनिवर्य समस्त ॥ म्हणे ऋषि नासिकेत ॥ जे म्यां देखिले साद्यंत ॥ ते ते निश्चिती सांगेन ॥१॥

अति रमणीय नानास्थाने ॥ सुवर्णमय विचित्र भुवने ॥ यमधर्मराजे तेणे ॥ तयां धार्मिकांलागी निर्मिली ॥२॥

तयांमाजी पुण्यवंत ॥ दिव्याभरणी विभूषित ॥ धर्मभूपाळ असे पाळित ॥ सेवेसी यमदूत तिष्ठती ॥३॥

अति विनीत जोडिल्या करी ॥ उभे असती अहोरात्री ॥ पुण्यसंतति ते संसारी ॥ पवित्रापरी भोगिती ॥४॥

ऐसिया धार्मिकांप्रती ॥ राजधानी अमरावती ॥ आतां पूर्वद्वारे प्रवेश करिती ॥ तेही निश्चिती अवधारा ॥५॥

आश्विनकार्तिकमासी ॥ जे अर्पिती इंधनांसी ॥ शीतनिवारणविश्रांतीसी ॥ उष्णतेसी जे देती ॥६॥

ग्रीष्मकाळी देख ॥ दान देती शीतलोदक ॥ ते पुण्यपरायण लोक ॥ भोगिती सुख सूर्यलोकी ॥७॥

वसंती करिती पुष्पदान ॥ नानापरिमळ फलार्पण ॥ सुगंधचंदनादि शीतळ पवन ॥ तयांसी आगमन सूर्यलोकी ॥८॥

दुर्भिक्षी करिती अन्नदान ॥ सुभिक्षी वांटिती सुवर्ण ॥ ते भोगिती स्वर्गभुवन ॥ विराजमान दिव्यदेही ॥९॥

तयां नानाभोग सामोपचार ॥ अमर करिती जयजयकार ॥ यावत चंद्रदिवाकर ॥ सुख अपार भोगिती ॥१०॥

यालागी सर्वप्रयत्नेकरुन ॥ दान देती विचक्षण ॥ अगम्य तयांचे महिमान ॥ म्यां आपण देखिले ॥११॥

विष्णुभक्तांची जो पूजा करी ॥ द्विज पूजी सामोपचारी ॥ तो येतसे पूर्वद्वारी ॥ जयजयकारी गर्जत ॥१२॥

दिव्याभरणी विभूषित ॥ विचित्रवाद्ये गीत नृत्य ॥ पूर्वद्वारे ते येती भक्त ॥ हंसयुक्तविमानी ॥१३॥

अश्वगज विचित्राभरणी ॥ मयूरसारसांच्या दाटणी ॥ चक्रवाक तये भुवनी ॥ ऐसिये स्थानी विराजती ॥१४॥

कित्येक ते महासदनी ॥ क्रीडती धर्मप्रभावेकरुनी ॥ दिव्यदेही मुक्ताभरणी ॥ सौख्य समाधानी क्रीडती ॥१५॥

दिव्यस्त्रिया अलंकृत ॥ रत्नाभरणी विभूषित ॥ देवकन्या दीप्तिमंत ॥ शोभिवंत सुलक्षणी ॥१६॥

ऐशा मदनमोहिनी कामिनी ॥ गीतनृत्यवाद्यध्वनी ॥ उपासिती धार्मिकांलागुनी ॥ अनुदिनी सेवेसी तत्पर ॥१७॥

पूर्वपुण्याचिया सामर्थ्ये ॥ धार्मिकां उपासिती तेथे ॥ गमन करितां पूर्वपंथे ॥ ते म्यां निरुते देखिले ॥१८॥

बैसोनियां दिव्यविमानी ॥ क्रीडा करिती अनुदिनी ॥ चैत्ररथी नंदनवनी ॥ सहित कामिनी देवकन्या ॥१९॥

दाते दयाळु परमभक्त ॥ सत्यशील धर्मयुक्त ॥ दिव्यभोग भोगिती तेथ ॥ धर्मसंचितार्थ आपुला ॥२०॥

दयाधर्माचे हेंचि फळ ॥ सुख भोगिजे चिरकाळ ॥ धर्म सुखदायक केवळ ॥ बोलती सकळ पुराणे ॥२१॥ श्लोक ॥

अनित्यानि शरीराणि वैभवं न हि शाश्वतम ॥ मृत्युः सन्निहितो नित्यं कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥१॥ टीका ॥

शरीरे पाहतां अनित्य ॥ क्षणभंगुर नाशिवंत ॥ नाही वैभवांचे शाश्वत ॥ अंतवंत ठायींचे ॥२२॥

नित्य मृत्यु हा दुराग्रहे ॥ देहासवे लागला आहे ॥ ऐसे जाणोनि निःसंदेहे ॥ धर्मसंग्रह करावा ॥२३॥

यालागी ते सज्जन ॥ होवोनि धर्मपरायण ॥ सत्यस्वधर्मानुष्ठान ॥ सावधान निजनिष्ठे ॥२४॥ श्लोक ॥

धर्मस्य फलमिच्छंति धर्म कुर्वति केऽपि न ॥ न पापफलमिच्छंति पापं कुर्वत्यहर्निशम ॥२॥ टीका ॥

सुख भोगावे सर्वकाळ ॥ ऐसे इच्छिताती धर्माचे फळ ॥ परी तो धर्म न करिती केवळ ॥ पाप सकळ आचरिती ॥२५॥

इहपरलोकी दैन्य दुःख ॥ हे पापाचे फळ इच्छिती लोक ॥ पापाचे फळ तो नरक ॥ सुखदायक पुण्यफळ ॥२६॥

पुण्ये भोगिजे स्वर्गसंपत्ती ॥ पापे पापिये पतना जाती ॥ ऐसे जाणोनि मूढमती ॥ पाप आचरिती किमर्थ ॥२७॥

हे असो परी यारीती ॥ पापकारी पतना जाती ॥ पुण्यात्मे भोगिती स्वर्गसंपत्ती ॥ ते म्यां निश्चिती देखिले ॥२८॥

विमानरुढ ते एक ॥ परमपदा जाती धार्मिक ॥ दक्षिणद्वारे पापी सकळिक ॥ आणिती अंतक बांधोनिया ॥२९॥

एक गंधर्वगायने सुमनमाळा ॥ स्वर्गा येती विचित्रलीळा ॥ एक ते कंठी बांधोनि श्रृंखळा ॥ आणिती विशाळा घोरमार्गे ॥३०॥

एकासी दिव्य भोगसमृद्धी ॥ विराजमान परमपदी ॥ एक ते दुस्तर नरकनदी ॥ कल्पावधि पचताती ॥३१॥

एक हेमधामसिंहासनी ॥ सेवा करिती दिव्यकामिनी ॥ एकां तप्तलोह तनूलागुनी ॥ क्षेमालिंगन देवविती ॥३२॥

ऐसा यमपुरीचा वृत्तांत ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ पुढील कथेचा भावार्थ ॥ श्रोती सावचित्त परिसावा ॥३३॥

तुका सुंदररामी शरण ॥ श्रीगुरुकृपासुखसंपन्न ॥ तया नाही भवबंधन ॥ स्वानंदाघन सर्वकाळ ॥३४॥

॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने धर्मकीर्तनं नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥ ओव्या ॥३४॥ श्लोक ॥२॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ इति नासिकेतोपाख्याने पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP