( नंतर रत्नमाला घेऊन डोळ्य़ांत अश्रू असलेली सुसंगता येते.)
सुसंगता —— ( दीनपणाने सुस्कारा सोडून ) हे प्रियसखे सागरिके , लाजाळूच्या झाडा , मैत्रिणींविषयी मयाळू , मनाने थोर , दिसण्यांत प्रसन्न असलेल्या सखे , आता तुला मी कुठे पाहूं ? ( रडते . वर पाहून , सुस्कारा टाकून ) दृष्ट दैवा , निर्दया , जर तूं त्या प्रकारचे अलौकिक , डोळे दिपविणारें सौंदर्य निर्माण केलेस तर मग त्याची अशी भलतीच उज्जयिनीस पाठविणें ही अवस्था कां केलीस ? आणि ही रत्नांची माळसुद्धा जगण्याची आशा सोडिलेल्या तिने कोणीतरी ब्राह्मणाला दान कर असे म्हणून माझ्या हातीं दिली . तेव्हा तोपर्यंत एखाद्या ब्राह्मणाला शोधते . ( पडद्याकडे पाहून ) ओहो , हें काय ? हा ब्राह्मण वसंतक इकडेच येत आहे . तर ही यालाच दान करिते .
( नंतर आनंदित वसंतक येतो)
विदूषकः —— ह्यः ह्यः ! ओहो ! आज प्रिय मित्राने खूष केलेल्या माननीय वासवदत्तेने माझी सुटका केली आणि आपल्या हातांनी दिलेल्या मोदकांनी आणि लाडूंनी माझे पोट चांगलें तुडुंब भरून टाकिले . आणि दुसरें म्हणजे ही रेशमी वस्त्रांची जोडी आणि कानांतील अलंकार ( भिकबाळी ) दिली . तर आता प्रिय मित्राला भेटतो . ( इकडेतिकडे हिंडतो .)
सुसंगता —— ( रडत एकदम जवळ जाऊन ) आर्या वसंतका , थोडा वेळ थांब तूं !
विदूषक —— ( पाहून ) काय ? सुसंगता ! सुसंगते , इथे रडतेस कां ? सागरिकेवर एखादें संकट तर आले नाही ना ?
सुसंगता —— तेंच सांगणार आहे . त्या बिचारीला उज्जयिनीला नेलें अशी राणीने वदंता पसरविली आणि मध्यरात्र झाल्यावर कुठे नेले ते कळलें नाही !
विदूषक —— ( खिन्नपणे ) बाई सागरिके , हें मात्र राणीने अगदी निर्दयपणाचे कृत्य केले . पुढे काय ?
सुसंगता —— ही रत्नांची माळ तिने , जगण्याची आशा सोडून , आर्य वसंतकाला दान कर असे म्हणून माझ्या हातीं दिली . एवढ्यासाठी तूं ही घे .
विदूषक ——( डोळ्य़ांत पाणी आणून , कानांवर हात ठेवून ) बाई सुसंगते अशा प्रसंगी ही घेण्याला माझा हात पुढे होत नाही . ( दोघे रडतात .)
सुसंगता —— ( हात जोडून ) तिच्यावर मेहरबानी करून ही तूं घे !
विदूषक —— ( विचारपूर्वक ) किंवा आण म्हणजे हिच्या योगानेच सागरिकेच्या विरहाने आळसावलेल्या प्रिय मित्राचे रंजन करीन ( मित्राला रिझवीन ) ! ( सुसंगता वसंतकाच्या हातात रत्नमाला देते .)
विदूषक —— ( घेऊन , न्याहाळून , आश्चर्याने ) बाई सुसंगते , असला बहुमोल दागिना हिच्यापाशी आला असा ?
सुसंगता —— आर्या , मीहि तिला जिज्ञासेने विचारिले होते .
विदूषक —— तेव्हा ती काय म्हणाली ?
सुसंगता —— त्या वेळी वर बघून एक लांब सुस्कारा सोडून ‘‘ सुसंगते , आता तुला ही गोष्ट कळून काय उपयोग ?’’ असें म्हणून ती रडू लागली .
विदूषक —— साधारण मनुष्याला सहजी न मिळणार्या या दागिन्याने खरेंच सांगितलेच आहे की , ती खात्रीने थोर कुळांत जन्मलेली आहे . सुसंगते , प्रिय मित्र आता कुठे आहे ?
सुसंगता —— आर्या , हे महाराज राणीच्या मंदिरातून बाहेर पडून स्फटिकाच्या वाड्याकडे गेले . यास्तव तुम्ही जा . मीहि देवी वासवदत्तेची शुश्रूषा करिते .
( दोघे जातात.)
प्रवेशक समाप्त
( नंतर राजा आसनावर बसलेल्या स्थितीत पडदा उघडतो.)
राजा —— ( विचार करून )
महाराणी पोटभर रडण्यामुळे जशी प्रसन्न झाली तशी फसव्या लबाडीच्या शपथांनी , लाडीगोडीच्या बोलण्याने , ( तिच्या ) कलाप्रमाणे जास्तीत जास्त वागण्याने , अतिशय गयावया करण्याने , फिरफिरून पायां पडण्यानी , मैत्रिणीच्या एकसारख्या विनवण्यांनी , प्रसन्न झाली नाही ; कारण तिने स्वतःच आपला राग , आसवांच्या पाण्याने जणू धुऊन काढिल्याप्रमाणे , घालविला . १ .
( विरहवेदनेने सुस्कारा टाकून) महाराणीचा रुसवा काढिल्यावर आता सागरिकेची काळजीच तेवढी मला सतावीत आहे. कारण ती कमळीच्या गाभ्याप्रमाणे अगदी नाजुक देह असलेली माझी प्रियतमा ( अतिशय लाडकी), पहिल्या ( गाढ) प्रेमामुळे घट्ट गळां मिठी मारण्याच्या वेळी एकरूप होऊन, तत्काळ मदनाच्या आंत घुसणार्या बाणांच्या छिद्रांनी केलेल्या वाटांनी, माझ्या अंतःकरणांत प्रवेश करीत आहे असे मला वाटते. २.
( विचार करून) माझें भरवशाचें कुळ जो वसंतक त्याला महाराणीने डांबून ( बंधनात) ठेविलें आहे. तेव्हा कोणाच्या समोर आसवें गाळूं ! ( सुस्कारा सोडतो.)
( नंतर विदूषक येतो.)
विदूषक —— ( इकडेतिकडे हिंडून , पाहून आणि आश्चर्याने ) जोरदार विरहवेदनांनी अतिशय क्षीण झालेला पण आकर्षक बांधा असलेला हा प्रिय मित्र , उगवलेल्या बीजेच्या चंद्रासारखा अधिक सुंदर दिसत आहे . तेव्हा याला भेटतो . ( जवळ जाऊन ) तुझें कल्याण होवो ! अरे , तुझे दैव जोरावर आहे ; कारण महाराणीच्या तावडींत सापडलों
असतांहि ( सुटून ) पुन्हा मी या आपल्या डोळ्य़ांनी तुला पाहिले !
राजा —— ( बघून आनंदाने ) ओहो , वसंतक आला ! मित्रा , आलिंगन दे मला . ( विदूषक आलिंगन देतो .) तुझ्या कपड्यांवरूनच तुझ्यावर महाराणीने अनुग्रह केला हे मला समजलें . तर आता सागरिकेची काय बातमी ते सांग . ( विदूषक गोंधळून तोंड खाली करून उभा राहतो .)
राजा —— मित्रा , बोलत का नाहीस ?
विदूषक —— प्रतिकूल असल्यामुळे तुला ते सांगवत नाही .
राजा —— ( खिन्नपणे , घाईने ) मित्रा , काय ? प्रतिकूल ! तिने प्राण दिला हें उघडच खरेंच नाही का ? प्रिये सागरिके , हाय ! ( मूर्च्छा आल्याचा अभिनय करतो .)
विदूषक ——( लगबगीने ) प्रिय मित्राने धीर धरावा . निर्धास्त राहावें !
राजा —— ( सावध होऊन , डोळ्यांत पाणी आणून )
हे प्राणांनो , माझें बोलणे ऐका . अतिशय अनुदार अशा मला खुशाल सोडा ; तुम्हीतरी अनुकूल ( उदार ) व्हा . हे मूर्खांनो , जर तुम्ही लगबगीने गेला नाही तर तिच्या भेटीला
मुकाल ; कारण ती गजगमिनी एव्हांना खूप लांब गेली असेल ! ३ .
विदूषक —— अरे , भलतीच - वेडीवाकडी समजूत करून घेऊं नकोस . त्या बापडीला महाराणीने उज्जयिनीला धाडिलें असे ऐकण्यांत - कानांवर आहे . म्हणून प्रतिकूल असल्यामुळे मी सांगितले नाही .
राजा —— काय ? उज्जयिनीला रवानगी केली ! हाय , राणीचा माझ्या विषयीचा आदर पूर्ण नामशेष झाला . मित्रा , कोणी तुला हें सांगितलें ?
विदूषक —— अरे , सुसंगतेने ! दुसरें असें माझ्या हाती तिने कोणत्यातरी हेतूने ही रत्नमाला पाठविली आहे .
राजा —— दुसरा कोणता हेतु ? मला धीर देणें हाच ! तर मित्रा , आण . ( विदूषक देतो .)
राजा —— ( रत्नमाला घेऊन , न्याहाळून , छातीवर ठेवून ) अरेरे ! तिच्या कंठाचें आलिंगन अनुभवून खाली पडलेल्या हिच्यामुळे ही माझी काया , सारखी अवस्था झालेल्या
मैत्रिणीसारखी , निर्धास्त होत आहे . ४ .
मित्रा , तू घाल ही गळ्यांत म्हणजे हिच्याकडे पाहूनसुद्धा आम्हांला धीर ( संतोष ) वाटेल .
विदूषक —— अरे , जशी महाराजांची आज्ञा . ( गळ्य़ांत घालतो .)
राजा —— ( डोळ्यांत पाणी आणून , सुस्कारा सोडून ) मित्रा , प्रियेची दुसर्यांदा भेट मुष्कील !
विदूषक —— ( दिशांकडे पाहून , घाबरून ) अरे , इथे असे मोठ्याने बोलूं नकोस . कोणीहि कोणत्याहि वेळी इथे येतात .
( नंतर वेळूचा दंड हाती असलेली वसुंधरा येते.)
वसुंधरा —— ( जवळ जाऊन ) महाराजांचा जयजयकार असो . हा रुमण्वताचा भाचा विजयवर्मा काहीतरी गोड ( चांगली , अनुकूल ) बातमी सांगण्याच्या इच्छेने दारात उभा आहे .
राजा —— वसुंधरे , लागलीच आंत घेऊन ये .
वसुंधरा —— जशी महाराजांची आज्ञा ! ( बाहेर जाऊन व विजयवर्म्याच्या सह पुन्हा आंत येऊन ) विजयवर्म्या , हे महाराज . आर्यांनी जवळ यावें .
विजयवर्मा —— ( जवळ जाऊन ) महाराजांचा विजय असो ! महाराज , सुदैवाने , रुमण्वताच्या विजयाने आपला उत्कर्ष होत आहे .
राजा —— शाबास , रुमण्वता , शाबास ! झटकन् मोठी कामगिरी पार पाडलीस ! विजयवर्म्या , इथे बस . ( विजयवर्मा बसतो .)
राजा —— ( संतोषाने ) विजयवर्म्या , कोसलांच्या राजाला जिंकले ना ?
विजयवर्मा —— महाराजांच्या सामर्थ्याने !
राजा —— विजयवर्म्या , तर सांग हकीकत ; अगदी खुलासेवार ऐकायची माझी इच्छा आहे .
विजयवर्मा —— महाराज , ऐकावी . इथून महाराजांच्या आज्ञेनुसार , थोड्य़ाच दिवसांनी कित्येक हत्ती , घोडे , पायदळ यांच्यामुळे अजिंक्य असे अफाट सैन्य घेऊन रुमण्वान् निघाला आणि विंध्य पर्वतांतील किल्ल्याच्या आश्रयाला राहिलेल्या कोसलराजाची वाट अडवून आपल्या सैन्याचा नीट तळ देण्यास ( त्याने ) आरंभ केला .
राजा —— पुढे , नंतर ?
विजयवर्मा —— नंतर कोसलराजानेहि , अतिशय गर्वाने , अपमान सहन न होऊन , बहुसंख्य हत्ती असलेले आपले सगळे सैन्य जय्यत तयार केले .
विदूषक —— अरे , लवकर सांग , माझे काळीज कापत - धडधडत आहे .
राजा —— पुढे , नंतर ?
विजयवर्मा —— महाराज , मनाचा धडा केलेल्या त्याने युद्धासाठी विंध्य पर्वतांतून बाहेर पडून लागलीच , दुसर्या विंध्यपर्वताप्रमाणे , उत्कृष्ट गजसेनेच्या खेचाखेचीच्या ( आघाडीवरच्या ) मांडणीने दिशांचे कानेकोपरे व्यापिले आणि तो कोसलराज सामोरा गेला . इच्छिलेले समोरासमोर युद्ध मिळाल्यामुळे आनंद दुणावलेल्या , भराभर बाण
सोडणार्या , माजलेल्या हत्तींच्या समूहांनी ज्याचा पायदळाचा चेंदामेंदाय केला आहे अशा रुमण्वताने ताबडतोब हल्ला करून त्याचें स्वागत केले . ५ .
रुमण्वताने एकट्य़ानेच , आपल्या मुख्य सैन्याचा मोड झाल्यावर , अस्त्रांनी शिरस्त्राणें उडवून लाविलेली मस्तकें ज्या ठिकाणी शस्त्रांच्या प्रहारांनी कापलेली आहेत , म्हणून थोडा वेळ जेथे रक्ताची नदी पसरली आहे , जेथे शस्त्रांचा खणखणाट होत आहे , जेथे चिलखतांतून अग्नीच्या ठिणग्या बाहेर निघत आहेत , अशा युद्धाच्या आघाडीवर त्या
कोसलांच्या राजाला बोलावून , माजलेल्या हत्तीवर असताना , शेकडों बाणांनी त्याला ठार केले . ६ .
विदूषक —— आपला जयजयकार असो ! आपण जिंकलो ( विजयी झालों ). ( नाचतो .)
राजा —— शाबास कोसलराजा , शाबास ! कारण शत्रूसुद्धा ज्याच्या पराक्रमाचे असे पोवाडे गातात त्याचें मरणहि स्तुत्य ! मग , पुढे ?
विजयवर्मा —— महाराज , नंतर माझा थोरला भाऊ जयवर्मा याला कोसलाच्या गादीवर बसवून रुमण्वान्सुद्धा , प्रहरांनी जखमी झालेले , बहुसंख्य हत्ती असलेले जे सगळे सैन्य त्या सैन्याच्या मागोमाग हळूहळू येत आहेच .
राजा —— वसुंधरे , यौगंधरायणाला सांग की , माझ्या कृपेची निदर्शक मोठी बक्षिशी याला द्यावी !
वसुंधरा —— जशी महाराजांची आज्ञा ! ( विजयवर्म्याबरोबर जाते .)
( मग कांचनमाला येते.)
कांचनमाला —— महाराणीची मला अशी आज्ञा आहेः गडे कांचनमाले , जा आणि या जादुगाराला आर्यपुत्रांच्या समोर हजर कर . ( इकडेतिकडे हिंडून आणि पाहून ) हे महाराज ! तर यांच्यापाशी जाते . ( जवळ जाऊन ) महाराजांचा जयजयकार असो ! महाराज , महाराणीची विनंती आहेः उज्जयिनीहून हा संवरणसिद्धि नांवाचा जादुगार आला आहे . तेव्हा महाराजांनी याची भेट घ्यावी .
राजा —— आम्हांला जादूची आवड आहे . यास्तव लागलीच आंत आण .
कांचनमाला —— जशी महाराजांची आज्ञा ! ( बाहेर जाऊन , मोरचेल हाती असलेल्या जादुगारासह परत येते .) महाराज , हा जादुगार .
ऐन्द्रजालिक —— ( जवळ जाऊन ) महाराजांचा जयजयकार असो ! ( मोरचेल फिरवून )
जादुगार म्हणून ज्याचे नाव आहे अशा इंद्राच्या पायांना प्रणाम करा . तसेंच , ज्याची कीर्ति ( जादुगार म्हणून ) चांगली गाजलेली सुस्थिर आहे अशा शंबरालाहि ! ७ .
महाराज कौशांबीराज , फार काय सांगावे ? पृथ्वीवर चंद्र , आकाशांत पर्वत , पाण्यांत अग्नि , य भर दिवसां रात्रीचा आरंभ , दाखवूं का ? आज्ञा द्या . ८
विदूषक —— अरे मित्रा लक्ष दे . याचा रुबाब असा आहे की , त्यामुळे काहीहि शक्य वाटते .
ऐन्द्रजालिक —— महाराज , फार वटवट कशाला ? मनात जे जे पाहावे अशी इच्छा असेल ते ते गुरूच्या मंत्रांच्या सामर्थ्याने मी दाखवितो . ९ .
राजा —— भल्या माणसा , थोडा थांब . कांचनमाले , महाराणीला सांग की , हा जादुगार तुझाच ( गावचाच ) आहे , हें ठिकाण लोकांपासून दूर ( एकान्ताचें ) आहे . तर ये . दोघे मिळूनच पाहूं .
कांचनमाला —— जशी महाराजांची आज्ञा ! ( बाहेर जाऊन वासवदत्तेला बरोबर घेऊन येते .)
वासवदत्ता —— कांचनमाले , उज्जयिनीहून आलेला आहे म्हणून त्या जादुगाराकडे माझा ओढा आहे .
कांचनमाला —— महाराणीचा हा माहेरच्या क्षत्रिय घराण्याविषयींचा मोठा आदर ! यावें , यावें बाईसाहेबांनी !
कांचनमाला —— बाईसाहेब , हे महाराज . तर महाराणीने जवळ जावें .
वासवदत्ता —— ( जवळ जाऊन ) आर्यपुत्रांचा जय होवो !
राजा —— महाराणी , याने बढाई तर फारच मारली . तेव्हा आता उभयता इथे बसूनच पाहूं . ( वासवदत्ता बसते .)
राजा —— भल्या माणसा , वेगवेगळ्य़ा जादूच्या प्रयोगांना सुरुवात कर .
ऐन्द्रजालिक —— जशी महाराजांची आज्ञा ! ( निरनिराळे हावभाव करून , मोरचेल फिरवून )
आकाशांतहि विष्णु , शंकर आणि ब्रह्मदेव ज्यांत मुख्य आहेत असे देव आणि इंद्र , तसेंच सिद्ध आणि विद्याधर यांच्या स्त्रियांचा नाचणारा समूह यांचे दर्शन मी घडवितो . १० .
( सगळे आश्चर्याने पाहतात.)
राजा —— ( वर पाहून , आसनावरून उतरून ) नवल , नवल ! महाराणी , पाहाः
महाराणी , आकाशांत , कमळावर हा ब्रह्मदेव ; हा चंद्रकोर शिरोभूषण असलेला शंकर ; इकडे तो चार हातांत ( अनुक्रमें ) धनुष्य , तरवार गदा आणि चक्र ही चिन्हें असणारा
( दैत्यांचा नाश करणारा) विष्णु; ऐरावतावर बसलेला हा देवांचा राजा ( इंद्र-) सुद्धा; तसेंच ते दुसरे देव; आणि ज्यांच्या चंचल पायांतील पैंजण छुमछुम करीत आहेत अशा ह्या अप्सरा नाचत आहेत.
वासवदत्ता —— आश्चर्य , आश्चर्य !
विदूषक —— ( एकीकडे ) अरे लेका गारुड्या , हे देव आणि अप्सरा दाखवून काय उपयोग ? जर तुला यांना खूष करावयाचे असेल तर सागरिका दाखव !
( नंतर वसुंधरा येते.)
वसुंधरा —— महाराजांचा विजय असो ! अमात्य यौगंधरायण महाराजांच्या पायांशी असें सादर करतो ( कळवितो ) की , विक्रमबाहूने हा मुख्य मंत्री वसुभूति , कंचुकी बरोबर देऊन पाठविला आहे . यास्तव याचा शुभ वेळी महाराजांनी याची भेट घ्यावी . मीहि शिलकी काम संपवून आलोंच !
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , तूर्त गारुड राहूं दे . मामाकडून ( आजोळाहून ) मुख्य मंत्री आदरणीय वसुभूति आला आहे ; तेव्हा तूर्त आर्यपुत्रांनी याची गाठ घ्यावी .
राजा —— जशी महाराणीची इच्छा ! ( गारुड्यास ) भल्या माणसा , आता थांबव ( पुरे कर ).
ऐद्रजालिक —— ( पुन्हा मोरचेल फिरवितो ) जशी महाराजांची आज्ञा ! ( निघताना ) माझा आणखी एक खेळ महाराजांनी बघावा !
राजा —— भल्या माणसा , ठीक . पाहूं .
वासवदत्ता —— कांचनमाले , तूं जा , याला इनाम ( बिदागी ) दे .
कांचनमाला —— जशी महाराणीची आज्ञा ! ( गारुड्याला घेऊन जाते )
राजा —— वसंतका , सामोरा जाऊन वसुभूतीला आंत आण .
विदूषक —— जशी महाराजांची आज्ञा ! ( जातो .)
( नंतर वसंतक सामोरा गेलेला वसुभूति आणि बाभ्रव्य येतात.)
वसुभूति —— ( भोवताली बघून ) अबब ! केवढें वत्सराजाचें सामर्थ्य ( ऐश्वर्य ) । उदाहरणार्थ ,
मी सुलक्षणी ( उमद्या ) घोड्यांकडे नीट पाहूं लागतो तों विजयी हत्तीने मला वेधून घेतले ; राजांच्या गप्पासप्पांत ( गोतावळ्य़ांत ) थोडा वेळ बसतो तेवढ्यांत मला संगीताच्या आवाजाने भारून टाकले ; ओहो ! देवडीच्या जागीं ( पहिल्या चौकांत ) देखील लागलीच विक्रमबाहूच्या ( सिंहलराजाच्या ) ऐश्वर्याचा मला विसर पडला आणि देवडीवर असतांनाच वाढलेल्या मोठ्या आश्चर्याने ( जिज्ञासेने ) माझी अवस्था खेडवळासारखी केली ! १२ .
बाभ्रव्य —— वसुभूते , पुष्कळ काळानंतर आज महाराज भेटणार म्हणून खरें बोलायचें तर अतिशय आनंदाने मला नवीन —— अनिर्वचनीय स्थितीचा अनुभव येत आहे . कारण आज माझा आनंद म्हातारपणाला मदत करीत आहे . कारण भयाच्या अधीन झाल्यामुळे तो आनंद म्हातारपणांतील कंप अधिक वाढवीत आहे ; अंधुक ( मंद झालेली ) दृष्टि आसवांच्या पाण्याने पूर्ण झाकीत आहे आणि अक्षरें अस्पष्ट उमटणारें भाषण अडखळण्याममुळे अधिक अस्फुट करीत आहे . १३ .
विदूषक —— ( पुढे होऊन ) यावें , यावें अमात्याने !
वसुभूति —— ( विदूषकाच्या गळ्य़ांत रत्नमाला पाहून , एकीकडे ) बाभ्रव्या , महाराजांनी राजकन्येला निघण्याच्या वेळी जी दिली तीच ही रत्नमाला असें मला वाटतें !
बाभ्रव्य —— अमात्या , आहे सारखेपणा ! तेव्हा ही कशी सापडली हें वसंतकाला विचारूं का ?
वसुभूति —— बाभ्रव्या , नको , नको तसें करू ! समृद्ध राजघराण्यांत रत्नांची रेलचेल - लयलूट असल्यामुळे सारखी रत्ने सापडणें कठीण नाही !
विदूषक —— ( राजाला उद्देशून ) हे महाराज ! तेव्हा अमात्याने जवळ जावें .
वसुभूतिः —— ( जवळ जाऊन ) महाराजांचा विजय असो !
राजा —— ( उठून ) नमस्कार करतो .
वसुभूति — तुझी पुष्कळ - सर्व बाजूंनी भरभराट होवो !
राजा —— आसन , आसन ( आणा ) पूजनीय ( अमात्यासाठी ) !
विदूषक —— ( आसन आणून ) अहो , हें आसन . बसावें अमात्याने .
( वसुभूति बसतो.)
बाभ्रव्य —— महाराज , बाभ्रव्य प्रणाम करीत आहे .
राजा —— ( पाठीवर हात ठेवून ) बाभ्रव्या , इथे बस .
विदूषक —— अमात्या , ही महाराणी वासवदत्ता नमस्कार करीत आहे .
वासवदत्ता —— आर्या , पायां पडतें .
वसुभूति —— चिरंजीविनी , वत्सराजासारखा मुलगा होवो . ( सगळे बसतात .)
राजा —— पूज्य वसुभूति , माननीय सिंहलराजा खुशाल आहे ना ?
वसुभूति —— ( वर पाहून आणि सुस्कारा सोडून ) महाराज , मी अभागी आपल्याला काय कळवूं हें मला समजत नाही . ( तोंड खाली करून बसतो .)
वासवदत्ता —— ( दुःखाने स्वतःशी ) हाय हाय ! धिक्कार , धिक्कार ! आता वसुभूति काय सांगेल ?
राजा —— वसुभूते , सांग ! अशा रीतीने मला कां गोंधळात पाडतोस ?
बाभ्रव्य —— ( एकीकडे ) पुष्कळ वेळहि थांबून जे सांगायचे ते आताच सांग .
वसुभूति —— ( डोळ्य़ांत पाणी आणून ) महाराज , सांगवत नाही ; तरीसुद्धा हा अभागी मी सांगतो . जी ही आपली रत्नावली नावाची दीर्घायुषी मुलगी सिंहल देशाच्या राजाने , वासवदत्ता जळाल्याचें ऐकून , महाराजांना अगोदर मागणी घातल्यावरून , दिली -
राजा —— ( एकीकडे ) महाराणी , तुझ्या मामाचा मंत्री हे काय खोटे सांगत आहे ?
वासवदत्ता —— ( विचार करून ) आर्यपुत्रा , या बाबतीत कोण खोटें बोलत आहे हे मलाहि माहीत नाही .
विदूषक —— तिचें काय झालें ?
वसुभूति —— आणि आम्ही तुमच्याकडे घेऊन येत असतां नौका फुटल्यामुळे ती समुद्रात बुडाली . ( खाली मान घालून रडत बसतो .)
वासवदत्ता —— ( डोळ्य़ांत पाणी आणून ) हाय , मज अभागिनीचा घात झाला ! हे भगिनी रत्नावली , आता कुठे आहेस तूं ? मला प्रत्युत्तर दे .
( बेशुद्ध होऊन पडते.)
राजा —— धीर धर , निर्धास्त रहा ! दैवाची गति कळणें कठीण ! अग , नौका फुटून बुडालेले आणि वांचलेले ( वर आलेले ) हे दोघेच तुला उदाहरणपुरावा ! ( आणि वसुभूति
आणि बाभ्रव्य यांच्याकडे बोट दाखवितो .)
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , हे बरोबर आहे . पण इतके कोठून माझें भाग्य ?
राजा —— ( एकीकडे ) बाभ्रव्या , असे का हे मला बिलकुल कळले नाही !
बाभ्रव्य —— महाराज , ऐका .
( पडद्यांत मोठा गोंगाट)
ज्वाळांच्या लोळांनी उंच हवेल्यांना सोनेरी कळसांची जणू शोभा देणारी , निबिड उद्यानांतील वृक्षांचे शेंडे जळाल्यामुळे अतिशय प्रखर उष्णता सुचविणारी , धुराच्या लोटांनी
क्रीडापर्वताला पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे निळसर करणारी , आणि भडक्याने ( दाहाने ) स्त्रियांना घाबरवून सोडणारी ही आग इथे राणीवशांत एकाएकी भडकली आहे !
( सगळे गोंधळून घाबरून पाहतात.)
राजा —— हे काय ? अंतःपुरात आग ! ( लगबगीने उठून ) अरेरे ! देवी वासवदत्ता जळून गेली !
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , वाचवा , वाचवा ।
राजा —— अरे , हे काय ? फार घाईमुळे महाराणी शेजारी आहे हेसुद्धा मला समजले नाही . ( महाराणीचा हात धरून आणि कुरवाळून ) महाराणी , धीर धर , निर्धास्त हो !
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , मी आपल्यासाठी बोललें नाही . तर निर्दय अशा मी बेड्यांनी बांधिलेली सागरिका या ठिकाणी संकटांत आहे . आर्यपुत्रांनी तिला वाचवावें !
राजा —— महाराणी , हे काय ? सागरिका संकटांत आहे . हा मी जातो .
वसुभूति —— महाराज , उगीच का टोळाप्रमाणे वागतां ?
बाभ्रव्य —— महाराज , वसुभूति योग्य बोलला .
विदूषक —— ( राजाचे उपरणें ओढून ) हत् मूर्खा , सागरिका संकटांत आहे . अजूनहि मी का जिवंत आहे ? ( आगीत शिरण्याचा अभिनय करून , धुराने जेरीस आल्याचा
अभिनय करतो .)
हे अग्ने , धुराचे लोट बंद कर ; शांत हो ! वरवर जाणारें ज्वाळांचे मोठे वलय काय म्हणून तयार करीत आहेस ? जो मी प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे प्रखर दाहक - शक्ति असलेल्या प्रियेच्या विरहाग्नीने जळलों नाही त्याला तूं काय करणार ? ( कसा जाळणार ?) १६ .
वासवदत्ता —— दुःखाला कारण होणार्या माझ्या बोलण्यावरून आर्यपुत्रांनी का असे ठरविले ? तर मीहि आर्यपुत्रांच्याच मागोमाग जातें !
विदूषक —— ( वळून पुढे होऊन ) बाईसाहेब , मीहि तुमचा वाटाड्या होतो .
वसुभूति —— वत्सराज आगीत शिरले का ? यास्तव राजकन्येच्या मृत्यु पाहिलेल्या मी इथेंच ( आगीतच ) आपली आहुति देणें उचित !
बाभ्रव्य —— ( डोळ्य़ांत पाणी आणून ) महाराज , कारणच नसतांना हें भरताचे कुळ धोक्याच्या तागडीत ( संकटांत ) का घातलेत ? किंवा वटवटीचा काय उपयोग ? मीहि
( स्वामि-) भक्तीला शोभण्यासारखें वागतों. ( सगळे आगीत शिरल्याचा अभिनय करतात.)
राजा —— ( आपल्या उजव्या खांद्याचे स्फुरण पाहून ) अशा स्थितीत असलेल्या मला याचे फळ कोठून ? ( समोर बघून , आनंदमिश्र खिन्नपणे ) आग सागरिकेच्या नजीक आहे
का ? यास्तव लगोलगच मी हिच्याजवळ जातों .
( नंतर बेड्यांनी बांधलेली सागरिका दिसते.)
सागरिका —— ( सभोवती पाहून ) हाय , धिक्कार ! आग सर्व बाजूंनी भडकली आहे . आज अग्नि सुदैवाने माझ्या यातनांचा शेवट करील !
राजा —— ( घाईने जवळ जाऊन ) अग लाडके , अजूनहि उदासीन ( थंड ) का आहेस ?
सागरिका —— ( राजाला बघून स्वतःशी ) काय ? आर्यपुत्र ! तर यांना पाहून पुन्हा माझी जगण्याची हौस बळावली . ( मोठ्याने ) महाराज , मला वाचवा !
राजा —— भित्रे , भिऊ नकोस .
हे प्रियतमे , हे दाट धुराचे लोट काही वेळ सोस ; ( समोर पाहून ) अरेरे , हाय ! तुझ्या स्तनांवरून गळलेले - खाली पडलेले हे वस्त्र जळत आहे ; ( पाहून ) वारंवार अडखळत आहेस का ? ( काळजीपूर्वक पाहून ) काय ? तुला बेड्यांनी बांधिलेले आहे ? माझा आधार घे म्हणजे ताबडतोब तुला इथून बाहेर नेतो . १७ .
( गळा मिठी घालून, डोळे मिटून स्पर्शाच्या सुखाचा अभिनय करीत) अरेच्या, क्षणभरात माझा दाह शांत झाला. प्रिये, धीर धर, निर्धास्त हो !
हे लाडके , ( शरिराला ) भिडत असूनहि अग्नि तुला जाळणार नाही हे स्पष्ट आहे ; कारण तुझा हा स्पर्श दाहच दूर ( नाहीसा ) करतो . १८ .
( डोळे उघडून आणि न्याहाळून) अहो, मोठे नवल ! ती भडकलेली आग कुठे आहे ! हे अंतःपुर पूर्वीप्रमाणेच आहे. काय? अशा रीतीने ह्यांचे रूप आकळतां येत नाही !
वासवदत्ता —— ( राजाचें शरीर चाचपीत आनंदाने ) सुदैवाने आर्यपुत्रांचें शरीर सुरक्षित आहे !
राजा —— हा बाभ्रव्य .
बाभ्रव्य —— आमच्या जिवात जीव आला .
राजा —— हा वसुभूति .
वसुभूति —— महाराज , सुदैवाने तुमचा उत्कर्ष होवो !
राजा —— हा वसंतक .
विदूषक —— आपला जयजयकार होवो !
राजा —— ( विचार करून , कल्पनेने ) हें स्वप्न असे वाटते . हे गारुड तर नव्हे ना ?
विदूषक —— अरे , शंका घेऊ नकोस . ही जादू ! त्या लेकाच्या जादुगाराने सांगितले होते की , महाराजांनी माझा एक खेळ अवश्यच पाहावयास हवा . तेव्हा हाच तो खेळ !
राजा —— महाराणी , तू सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे या सागरिकेला आणिलें .
वासवदत्ता —— ( हसून ) आर्यपुत्रा , आपलें सगळें प्रेमप्रकरण समजलें !
वसुभूति —— ( सागरिकेला पाहिल्यावर , एकीकडे ) बाभ्रव्या , ही राजकन्येसारखी आहे .
बाभ्रव्य —— अमात्या , माझ्याहि मनांत हेंच आहे .
वसुभूति ——( मोठ्याने , राजाला उद्देशून ) महाराज , ही मुलगी कुठली ?
राजा —— महाराणीला माहीत आहे .
वसुभूति —— महाराणी , ही मुलगी कुठली ?
वासवदत्ता —— अमात्या , समुद्रापासून ही लाभली असें सांगून अमात्य यौगंधरायणाने माझ्या स्वाधीन केली . म्हणूनच सागरिका असे हिला म्हणतात !
राजा —— ( स्वतःशी ) काय ? यौगंधरायणाने तुझ्या स्वाधीन केली ! मला न कळविता तो वाटेल ते कसे करतो ?
वसुभूति —— ( एकीकडे ) बाभ्रव्या , ज्या अर्थी वसंतकाच्या गळ्य़ांतील रत्नमाला ( तिच्या रत्नमालेच्या ) हुबेहूब सारखी , आणि हिचाहि लाभ समुद्रापासून , त्या अर्थी ही नक्की सिंहलराजाची मुलगी रत्नावली ! ( जवळ जाऊन , मोठ्याने ) चिरंजीव राजकन्ये रत्नावली , तुझी अशी दुःखद अवस्था झाली !
सागरिका —— ( वसुभूतीला पाहून , डोळ्य़ांत पाणी आणून ) कोण ? अमात्य वसुभूति !
वसुभूति —— मज कपाळकरंट्याचा घात झाला . ( जमिनीवर कोसळतो .)
सागरिका —— मज अभागिनीचा घात झाला . अहो बाबा , अग आई , कुठे आहेस ? मला प्रत्युत्तर दे . ( स्वतःला पाडून घेऊन बेशुद्ध होते .)
वासवदत्ता —— ( रत्नावलीला मिठी घालून ) भगिनी , धीर धर , निर्धास्त हो !
विदूषक —— ( स्वतःशी ) रत्नावलीला बघून आरंभीच मी ओळखलें की साधारण माणसाचा असा बहुमोल अलंकार नसतो .
वसुभूति —— ( उठून ) राजकन्ये , धीर धर , निर्धास्त हो ! अग ही तुझी थोरली बहीण दुःखी आहे . तर हिला आलिंगन दे .
रत्नावली —— ( सावध होऊन , राजाकडे कटाक्ष टाकून , स्वतःशी ) अपराधी असल्यामुळे मला महाराणीला तोंड दाखविणे शक्य नाही . ( तोंड खाली करून उभी राहते .)
वासवदत्ता —— ( डोळ्य़ांत पाणी आणून , दोन हात पसरून ) अतिशय निष्ठुर मुली , ये . प्रिय भगिनी , आता प्रेम व्यक्त कर . ( गळ्य़ाला मिठी घालते .)
( रत्नावली चूक झाल्याचा अभिनय करते.)
वासवदत्ता —— ( एकीकडे ) आर्यपुत्रा , या माझ्या निष्ठुरपणाची मला लाज वाटते . तर लागोलग हिच्या या बेड्या काढा .
राजा —— ( समाधानाने ) जशी देवीची इच्छा ! ( सागरिकेच्या बेड्या काढतो .)
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , अमात्य यौगंधरायणाने इतका वेळपर्यंत मला दुष्टपणा करायला लाविले . त्याने ज्याने माहीत असूनहि मला सांगितले नाही !
( नंतर यौगंधरायण येतो.)
यौगंधरायण ——
माझ्या सांगण्यावरून देवी वासवदत्तेशी पतीची झालेली ताटातूट सर्वांना माहीत झाली तेव्हा —— त्या महाराणीला पतीच्या दुसर्या स्त्रीशी होणार्या सहवासाने मोठे दुःख झाले . महाराजांना होणारी जगाच्या राजपदाची ही प्राप्ति तिचे समाधान करील हे खरे ; तरीसुद्धा लाजेने मला हिला तोंड दाखविणे शक्य नाही ! १९ .
किंवा काय करणें शक्य आहे ? अतिशय आदरणीयांच्या बाबतीतसुद्धा इच्छेविरूद्ध ( प्रतिकूल ) वागायला लाविणारें , अशा प्रकारचें हे स्वामिभक्तीचे असिधारा व्रत !
( नीट पाहून) ही महाराजांची स्वारी ! तर जवळ जातो. ( जवळ जाऊन) महाराजांचा विजय असो, विजय असो ! ( पाया पडून) महाराज, न सांगतासवरता जे केलें त्याची क्षमा असावी !
राजा —— सांग , न सांगता काय केलेस ?
यौगन्धरायण —— महाराजांनी आसनावर बसावे . सगळे सादर करतो .
( राजासह सगळे योग्य जागी बसतात.)
यौगंधरायण —— महाराज ऐका . ही जी सिंहलराजाची मुलगी तिला मांत्रिकाने असे सांगितले होते की , जो हिला वरील तो सार्वभौम राजा होईल ! नंतर त्यावर विसंबून आम्ही महाराजांसाठी परोपरींनी मागणी केली असतांहि सिंहलराजाने देवी वासवदत्तेला सवतीच्या रूपाने होणारा मनस्ताप टाळण्याच्या हेतूने जेव्हा कन्या दिली नाही ——
राजा —— तेव्हा काय ?
यौगंधरायण —— ( लाजेने ) तेव्हा लावाणकांतील आगीने महाराणी जळली अशी वदंता उठवून त्याच्याकडे बाभ्रव्याला धाडिले .
राजा —— यौगंधरायणा , त्याच्या पुढील माझ्या कानी आहे ; पण हिला महाराणीच्या स्वाधीन कोणत्या विचाराने केलेस ?
विदूषक —— अरे , याचा हेतु मला समजला . न सांगतासुद्धा हे समजतेच की , ही राणीवशांत असली म्हणजे महाराजांना अनायासे दिसेल .
राजा —— यौगंधरायणा , तुझा हेतु वसंतकाने ओळखला !
यौगंधरायण —— जशी महाराजाची आज्ञा !
राजा —— गारुड पाचें प्रकरणहि , मला वाटते , तुझीच युक्ति !
यौगंधरायण —— नाहीतर ( एरवी ) अंतःपुरांत जखडलेली ही महाराजांना कशी दिसली असती ? आणि ही दिसली नसती तर वसुभूतीने हिला कसे ओळखले असते ?
( हसून) आता ओळख पटलेल्या मामेबहिणीचें काय करायचें या बाबतीत महाराणीच प्रमाण ( निर्णय करणारी) !
वासवदत्ता —— ( स्मित करून ) आर्य अमात्या , स्पष्टच का सांगत नाहीस की , आर्यपुत्रांना रत्नावली दे . ( रत्नावलीला आपल्या अलंकारांनी सजवून , हातांत धरून , राजापाशी जाऊन ) महाराज , या रत्नावलीचा स्वीकार करा !
राजा —— ( आनंदाने दोन हात पसरून ) महाराणीचा अनुग्रह कोणाला मोठा — महत्त्वाचा वाटत नाही ? ( सागरिकेचा स्वीकार करतो .)
वासवदत्ता —— आर्यपुत्रा , हिच्या माहेरची ( आईवडिलांकडील ) माणसे लांब आहेत . तेव्हा असे करा की , ज्यामुळे हिला माहेरच्या नातलगांची आठवण होणार नाही .
( अर्पण करते.)
राजा —— जशी राणीसाहेबांची आज्ञा !
विदूषक —— ( आनंदाने नाचतो ) आता खरोखर पृथ्वी प्रिय मित्राच्या हाती आली .
वसुभूति —— राजकन्ये , वासवदत्तेला नमस्कार करून मान दे .
( रत्नावली तसे करते.)
बाभ्रव्य —— महाराणी , देवी ही पदवी तुला लाविणें सर्वस्वी योग्य आहे . आता आमचे श्रम फळाला आले .
यौगंधरायण —— महाराज , तुमची आणखी कोणती सेवा करू ते सांगा .
राजा —— याच्या पलीकडेहि इष्ट गोष्ट कोणती ? कारण
विक्रमबाहु आमच्या बरोबरीचा झाला ; पृथ्वीतलावरील धन आणि तसेंच जगाच्या ( राजाच्या ) प्राप्तीचे मुख्य कारण अशी ही आवडती सागरिका मिळाली ; बहीण सापडल्यामुळे महाराणीला संतोष झाला आणि मी कोसल देशाला जिंकिलें ( मांडलिक केले ). तूं सर्वश्रेष्ठ सचिव असतानां , ज्याची इच्छा ( अभिलाषा ) मी करावीं अशी कोणतीहि ( एकहि ) गोष्ट उरलेली नाही ! २० .
तरीसुद्धा हें असावें . ( भरतवाक्य )
वेळच्या वेळी आवश्यक तितका पाऊन पाडून इंद्राने पृथ्वीवर धान्याची लयलूट ( समृद्धि ) करावी ; श्रेष्ठ ( विद्वान् ) ब्राह्मणांनी शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे यज्ञांनी देवांना संतुष्ट करावें ; आणि आनंद वाढविणारा साधुलोकांचा सहवास प्रलयापर्यंत व्हावा ( लाभावा ). वज्राप्रमाणे कठोर आणि अजिंक्य असे दृष्ट लोकांचे भाषण पूर्णपणें नाश पावो . २१ . ( सर्व जातात .)
‘ एन्द्रजालिक’ नावाचा चवथा अंक समाप्त.