आपल्या चावड्यांवर उभ्या राहिलेल्या , पुष्ट स्तनांमुळे वारंवार खाली वाकलेल्या , शंकराने आशाळभूतपणाने (अभिलाषबुद्धीने ) तीन डोळे जिच्यावर रोखले आहेत अशा , (त्यामुळे ) जिच्या शरिराला रोमांच , घाम आणि कांपरे सुटलें आणि म्हणून जी लाजेने चूर झाली आहे अशा पार्वतीने शंकराच्या पूजेसाठी त्याच्या डोक्यावर पडावीं या हेतूनें उधळलेली , पण दोघांच्यामध्ये विखुरलेली ओंजळींतील फुले आपलें सर्वांचे रक्षण करोत १
उत्कंठेमुळे (हुरहुरीमुळे ) घाई करणारी , जन्मजात लाजेने माघारी फिरणारी , सख्यांनी उत्तेजनपर शब्दांनी पुन्हा सामोरी नेलेली , शंकराला समोर पाहून भति आणि प्रेम यांनी भारून गेलेली आणि रोमांचित झालेली , पहिल्या भेटीत शंकराने हसत हसत आलिंगन दिलेली पार्वती आपणां सर्वांचे कल्याण करो २
रागाने लाल झालेल्या डोळ्य़ांनी पाहिल्यामुळे ते (दक्षिण , गार्हपत्य आणि आहवनीय ) तीनहि अग्नि विझवून टाकले ; अवखळ (प्रमथ ) गणांनी पागोटी हिसकवून घेतल्यामुळे भीतीने गांजलेले ऋृत्विज भुईवर पडत होते ; दक्ष (शंकराची ) करुणा भाकीत होता , ह्याची पत्नी केविलवाणा आक्रोश करीत होती आणि देवांनीहि सुबाल्या केला होता ; अशी (दक्षाच्या ) यज्ञाचा विध्वंस कसा केला याची ही माहिती पार्वतीला सांगतांना हसणारा शंकर सर्वांचे रक्षण करो ३
नक्षत्राधिपति चंद्र उत्कर्ष पावला आहे ; देवांना नमस्कार असो ; श्रेष्ठ ब्राह्मणांची संकटें नाहीशी होवोत ; आणि पृथ्वीवर धान्याची लयलूट होवो . चंद्राप्रमाणे (आल्हाद करणारें ) शरीर असलेला सर्वोत्कृष्ट राजा पराक्रमाने विलसो ४
सूत्रधार ——कंटाळवाणी लांबण पुरे ! आज वसंतोत्सवांत मोठ्या मानाने मला बोलावून राजा श्रीहर्षाच्या निरनिराळ्य़ा दिशा आणि प्रदेश यांतून आलेल्या , चरणकमळांच्या आश्रित (मांडलिक ) राजलोकांनी आज्ञा केली आहे . ती अशी ——‘आमचे महाराज श्रीहर्ष यांनी नवीन कथानक रचून सजविलेली रत्नावली नावाची नाटिका लिहिली आहे ;
आणि कर्णोपकर्णीं ती आमच्या कानांवर आलेली आहे ; पण तिचा प्रयोग आम्ही पाहिला नाही . तर सगळ्य़ा लोकांची मनें उल्हसित करणार्या , त्याच राजाविषयीच्या मोठ्या आदराने आणि आमच्यावर मेहेरबानी करण्याच्या हेतूने तूं (त्या नाटिकेचा ) बिनचक प्रयोग कर .’ तर आता योग्य वेष करून यांची इच्छा पूर्ण करतो .
आहो ! आणि सर्व प्रेक्षकांची मनें मी काबीज केली आहेत असा माझा दृढ विश्वास आहे . कारण —— श्रीहर्ष हुशार (निपुण ) कवि आहे ; ही प्रेक्षक मंडळीसुद्धा गुणांची चाहती आहेत ; आणि जगांत वत्सराज उदयनाचें चरित्र (पराक्रम ) मन मोहून टाकणारे आहे ; आणि नाटकाचा प्रयोग करण्यांत आमचा हातखंडा आहे . या बाबतीत प्रत्येक गोष्ट वेगवेगळी (एकएकटी ) देखील इच्छित फळ मिळवून देणारी आहे ; माझे नशीब जोरावर असल्यामुळे हे सर्व गुण जमून एकत्र आलेले आहेत . मग (निश्चित फलप्राप्तीसंबंधीं ) काय सांगावें ? ५
तर मध्यंतरी घरी जातों आणि पत्नीला हाक मारून गाण्याची मैफल सुरू करतो . (इतस्ततः हिंडून आणि पडद्याकडे पाहून ) हें आमचे घर . थोडासा आंत जातो . (आत जाऊन ) अग ए , जराशी इकडे ये बघूं .
( प्रवेश करून )
नटी —— अहो , ही मी आले . मी कोणती कामगिरी बजवावी याची आज्ञा आपण मला करावी .
सूत्रधारः —— अग , हे राजेलोक रत्नावली पाहण्यासाठी अगदी अधीर झाले आहेत . तर कपडे घाल .
नटी —— (काळजीने ) अहो , आता आपली विवंचना संपली . तर कां बरे नाचत नाही ? मला कपाळकरंटीला पुन्हा एकुलती एक मुलगी . तशांतहि आपण तिला कोठे तरी लांबच्या ठिकाणीं द्यावयाचें ठरविलें आहे . अशा रीतीने दूर देशी राहत असलेल्या जावयाशीं हिचे लग्न कसे (निर्विघ्न ) पार पडणार ह्या काळजीने मला शरीराचीसुद्धा शुद्ध राहत नाही , मग नाचण्याची कोठून ?
सूत्रधार —— अग , लांब आहे म्हणून काळजी करण्याचे कारण नाही . पाहा . अनुकूल दैव , इष्ट वस्तु दुसर्या बेटांत असली तरी , समुद्राच्या पोटांत असली तरी आणि दिशेच्या कानाकोपर्यांत असली तरी ती आणून तात्काळ भेटविते ६( पडद्यांत ) शाबास , सूत्रधारा , शाबास ! हें ठीक आहे . शंका कोणती ? (‘ द्विपात् ’ इत्यादि म्हणतो ).
सूत्रधार —— (ऐकून , आनंदाने ) अग , निस्संशय हा तर माझा धाकटा भाऊ , यौगंधरायणाची भूमिका घेऊन आलाच . तर ये . आपण उभयतांहि (आपापल्या भूमिकांना योग्य ) कपडे घालण्यासाठी तयार होऊं या . (दोघे जातात .)
प्रस्तावना समाप्त
( नंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे यौगंधरायण प्रवेश करितो .)
यौगंधरायण —— हें ठिक आहे . शंका कोणती ? (‘द्विपात् ’ हा श्लोक पुन्हा म्हणून ) एरवी (असें नसते तर ) सिद्ध पुरुषाच्या सांगण्यावर विसंबून (वत्सराजासाठी ) मागणी घातलेल्या सिंहल देशाच्या राज्यकन्येला , समुद्रांत बळकट नाव फुटून बुडण्याची वेळ आली असतांना (तरण्यासाठी आश्रयार्थ ) फळी कोठून सापडली असती ? आणि सिंहल देशांतून परत येणार्या कौशांबीच्या व्यापार्याने तशा (कठीण ) अवस्थेंत असलेल्या तिचा धीर देऊन आदर कोठून केला असता ? आणि रत्नमालेच्या (दागिन्याच्या ) खुणेवरून (राजकन्या आहे अशी ) ओळख पटल्यामुळे येथे कशी आणिली असती ? (आनंदाने ) आमच्या महाराजांची सर्व बाजूंनी भरभराट होत आहे . (विचार करून ) आणि मीहिं हिला आदरपूर्वक महाराणीच्या (वासवदत्तेच्या ) हाती देण्यात योग्य तेच केले . आणि मी (असे ) ऐकिले आहे की , बाभ्रव्य नावाच्या आपल्या कंचुकीची , सिंहलेश्वराचा (विक्रमबाहूचा ) प्रधान वसुभूति याच्यासह , मोठ्या प्रयासानेहि समुद्र तरून गेल्यावर , कोसल देशाच्या नाशासाठी निघालेल्या रुमण्वताशी गाठ पडली . तर अशा प्रकारे महाराजांची कामगिरी सिद्धीस गेली असूनहि मला संतोष (किंवा र्धैर्य ) वाटत नाही ; म्हणून सेवकाचा धर्म खरोखर गहन (कठीण ) आहे . का म्हणून ——
महाराजांच्या भरभराटीस कारण होणार्या ह्या हाती घेतलेल्या कामांत अशा रीतीने दैवाने हात (हाताचा आधार ) दिल्यावर , यशाची (फळाची ) खात्री आहे हें खरे ; तरीसुद्धा स्वतःच्या बुद्धीप्रमाणे वागत असल्यामुळे मला महाराज काय म्हणतील याची भीतीच वाटते ! ७
( पडद्यांत गोंगाट )
यौगंधरायण —— (ऐकून ) अहाहा ! ज्या अर्थी हा गाण्यामुळे गोड वाटणारा आणि ठेक्यावर वाजविलेल्या मधुर पखवाजामागून येणारा नागरिकांच्या टाळ्य़ांचा कडकडाट समोरून ऐकू येत आहे , त्या अर्थी मला असे वाटते की , मदनोत्सवामुळे अधिक वाढलेला नागरिकांचा आनंद पाहावा म्हणून महाराज राजवाड्याच्या दिशेने निघाले आहेत . जे हे —— ज्यांची युद्धाची भाषा बंद झालेली आहे , जे प्रजेविषयी वत्सल आहेत , ज्यांना प्रजाजनांच्या हृदयांत स्थान आहे असे , वसंतक (विदूषक ) ज्यांचा आवडता आहे असे , आपण सुरू केलेला (मदन ) महोत्सव पाहण्यासाठी आतुर झालेले वत्सराज (उदयन ), (ज्याच्या शरीराची नांवनिशाणी उरलेली नाही , रति ज्याची पत्नी आहे , जो लोकांच्या मनांत उत्पन्न होतो , वसंत ऋृतु ज्याचा प्रिय मित्र आहे अशा मूर्तिमंत मदनाप्रमाणे आपल्यासाठी सुरू झालेला महोत्सव पाहण्यासाठी ,) इकडे येत आहेत ८
( वर पाहून ) अरेच्या , महाराजांची स्वारी राजवाड्यावर चढून गेलीच ! तोपावेतो घरी जाऊन शिल्लक राहिलेल्या कामाकडे लक्ष पुरवितों . ( जातो ). विष्कंभक समाप्त
( नंतर आसनावर बसलेला , वसंतोत्सवाला साजेसा वेष केलेला राजा आणि विदूषक दृष्टीस पडतात .)
राजा —— (आनंदाने पाहून ) गड्या वसंतका ,
विदूषक —— महाराजांनी आज्ञा करावी .
राजा —— राज्यांतील शत्रूंचा पूर्ण पाडाव केलेला आहे , (राज्यकारभाराची ) सगळी जबाबदारी दक्ष (प्रवीण ) मंत्र्यांवर सोपविली आहे ; प्रजेचा उत्तम तऱ्हेने सांभाळ करून तिला संतुष्ट केलें आहे आणि तिची सर्व संकटांपासून सुटका केली आहे ; (शिवाय वरील ) प्रद्योतची मुलगी (वासवदत्ता ), वसंत ऋतूची (उद्दीपक ) वेळ (हंगाम ) आणि तूं या सर्व कारणांनी मदनाला आपल्या नांवाच्या (उत्सवाने ) यथेच्छ संतोष होवो ; परंतु मी मात्र हा मोठा उत्सव माझा (माझ्या आनंदासाठी ) आहे असे मानितों ९
विदूषक —— (आनंदाने ) गड्या मित्रा , खरोखर , तू म्हणतेास तसेंच आहे . पण मला आपले असे वाटते की , हा मदनमहोत्सव आपला नाही , कामदेवाचा नाही तर माझा एकट्याचा , भटुरग्याचा आहे ; यास्तव जानी दोस्त असे बोलत आहे . (पाहून ) मग याचा काय उपयोग ? ही मदनमहोत्सवाची शोभा पाहा तर खरी ! (ज्या महोत्सवांत ) दारूने झिंगलेल्या कामातुर स्त्रियांनी आपणहून घेतलेल्या पिचकार्यांनी मारलेल्या पाण्याच्या फवार्यांनी नाचणार्या नागरिकांनी (कामी लोकांनी ) नवल वाटण्यास लाविलें आहे ; सभोवती वर्तुळाकार असलेल्या ढोलांच्या आणि अनिर्बंध (यथेष्ट ) सुरू केलेया ‘चर्चरी ’ गीताच्या आवाजाने निनादून गेल्यामुळे (गावी जाणारे ) रस्ते तोंडाशी गजबजून गेले आहेत आणि उधळलेल्या अमाप सुगंधी गुलालाने दिशांची तोंडे तांबुसपिवळी केलेली आहेत .
राजा —— (आनंदाने सभोवार बघून ) ओहो , नागरिकांच्या आनंदाला उधाण आले आहे . उदाहरणार्थ केशराच्या चूर्णाने पिवळसर तांबुस झालेल्या आणि म्हणून सूर्योदयाच्या वेळेचा आभास निर्माण करणार्या , इतस्ततः सतत फेकलेल्या सुगंधी गुलालाने (अबीराने ), विपुल सोन्याच्या दागिन्यांच्या प्रकाशामुळे , अशोकाच्या गजर्यांनी आपल्या ओझ्याने मस्तकें नमविल्यामुळे , ही कौशांबी , जिच्यातील लोक जणू सोन्याच्या रसाच्या कोंदणांत बसविले आहेत अशी , प्राधान्याने पिवळी धमक दिसते . (ज्या कौशांबीने ) आपल्या वेषभूषेवरून जाण्यास योग्य (कळण्यासारख्या ) स्वतःच्या संपत्तीने कुबेराच्या भरलेल्या खजिन्यावर ताण केली आहे १०
आणि भरीला , सर्व बाजूंनी कारंजातून उडालेल्या पाण्याच्या अविच्छिन्न धारांनी भिजलेल्या , आणि लागलीच काही काळ जोराने तुडविल्यामुळे झालेल्या जेथील चिखलांत क्रीडा केली आहे अशा प्रशस्त (एैसपैस ) अंगणांत यथेच्द क्रीडा करणार्या सुंदरींच्या गालांवरून ओघळणार्या शेंदरी रंगामुळे तांबुस वर्णाच्या पायांच्या छापानी (राजवाड्या -) पुढची फरसबंदी जमीन (चालणार्या ) लोकांमुळे शेंदरी रंगाची होत आहे ११
( पाहून ) प्रिय मित्राने हीहि , चतुर लोकांनी पाण्याने भरलेल्या पिचकार्यांनी पाण्याचा मारा केल्यामुळे केलेल्या स् स् आवाजामुळे लक्ष वेधणारी , वेश्यांची लीला बघावी .
राजा —— (पाहून ) गड्या , तुझे निरीक्षण तंतोतंत बरोबर आहे !
कशावरून ——
ह्या (मदनमहोत्सवांत ) उधळलेल्या गुलालाने झालेल्या अंधारांत (मस्तकावरील ) रत्नालंकारांच्या किरणसमूहांनी थोडासा दिसणारा , ज्यांच्या फणांच्या आकाराच्या पिचकार्या वर उचललेल्या आहेत (किंवा उभारलेल्या फणांप्रमाणे ज्यांचा आकार आहे अशा पिचकार्या घेतलेल्या आहेत ) असा हा सापांचा (किंवा जारांचा ) घोळका आज मला जणू पाताळाची आठवण करून देत आहे १२
विदूषक —— (बघून ) अरे मित्रा , पाहा , बघ तर ! खरोखर , ही मदनिका मदनाच्या तावडीत सापडल्यामुळे चळून जाऊन (क्षुब्ध होऊन ) वसंत ऋतूचें निदर्शक असे नृत्य करीत , चूतलतिकेला बरोबर घेऊन इकडेच येत आहे ; यास्तव प्रिय दोस्ताने (तिच्याकडे ) पाहावे .
मदनिका —— (गीते )
मदनाचा आवडता दूत , अनेक आंब्यांच्या झाडांना मोहोराने भरून टाकणारा , (प्रियकराविषयीचा ) प्रेमाचा रुसवा काढून टाकणारा , दक्षिणेचा (सौजन्ययुक्त ) वारा वाहत आहे १३
बकुळींच्या आणि अशोकांच्या वृक्षांना फुलविणारा , प्रियकारांच्या भेटीसाठी आतुर झालेला , (प्रियकरांची ) प्रतिक्षा करण्यास असमर्थ असा तरुणींचा मेळावा तळमळत आहे . किंवा बकुळींच्या आणि अशोकांच्या वृक्षांना फुलविणारा , आतुर प्रियकरांची भेट घडविणारा , प्रतीक्षा करणें अशक्य करणारा आणि युवति नाव सार्थ करणारा (दक्षिणवायु ) तळमळावयास लावीत आहे १४
अथवा
या ऋतूंत चैत्र महिना अगोदर लोकांची मनें बोटचेपी (दुबळी ) करतो ; नंतर शिरकाव करण्याची संधि मिळालेल्या फुलेंरूपी बाणांनी काम त्यांवर प्रहार करतो १५
राजा —— (निरखून पाहून ) ओहो , यांचा हा क्रीडेंतील मनोसोक्त आनंद अवीट आहे . उदाहरणार्थ धृंद झालेल्या (स्त्रीच्या ) विसकटलेल्या म्हणून खाली लोंबणार्या वेणींतील माळेप्रमाणे , कौशल्याने गुंफलेल्या गजर्याची शोभा नाहीशी झाली आहे ; आणि हे पायांत घातलेले पैंजण दुप्पट मोठ्याने छूम्छुम् आवाज करीत आहेत ; (तसेंच ) स्तनांच्या ओझ्याने पार वाकलेला कटिप्रदेश (कमर ) मोडून जाईल याची पर्वा न करतां , खेळांत गढलेल्या ह्या स्त्रीचा कांपरे सुटल्यामुळे अस्ताव्यस्त झालेला हा मोत्यांचा सर , जणू दुःखाने वक्षःस्थळावर एकसारखा आपटत आहे १६
विदूषक —— गड्या दोस्ता , मीहि ह्या दासींच्या घोळक्यांत नाचून मदनमहोत्सवाचा मान करतो .
राजा —— (स्मित करून ) मित्रा , कर असे !
विदूषक —— जशी महाराजांची आज्ञा . (उठून दोघी दासींच्या मध्ये नाचतो . गडे मदनिके , गडे चूतलतिके , मलासुद्धा हें चर्चरीगीत शिकवा .)
दोघी —— मूर्ख माणसा , खरोखर ही चर्चरी नव्हे ; खरोखर हा द्विपदीचा भाग आहे .
विदूषक —— (आनंदाने ) ह्या खडीसारखरेचे काय मोदक करतात ?
मदनिका —— (खो खो हसून ) मुळीच नाही . हे (द्विपदगीत ) खरोखर म्हणायचे असतें .
विदूषक ——(निराश होऊन ) जर गाणें असेल तर हे नकोच मला . प्रियमित्राच्याच जवळ जाणें अधिक चांगलें . (जाऊ लागतो .)
दोघी —— (हात पकडून ) ये , आपण खेळू या . वसंतका , निघालास कुठे ? (असें म्हणून दोघी पुष्कळ प्रकारांनी वसंतकाला ओढतात . पण विदूषक जोर करून निसटतो .)
विदूषक —— (राजापाशी येऊन ) मित्रा , दोघींनी मला नाचविलें . नाही , तसे नाही . मी आपणहून नाचणें झाल्यावर पळून आलों .
राजा —— छान केलंस !
चूतलतिका —— गडे मदनिके , आपण दोघी खरेंच पुष्कळ वेळ खेळलो . आता इकडे ये ; आपण तोपावेतो राणीसाहेबांचा निरोप महाराजांना सांगू या .
मदनिका —— ये . झटपट करूं या .
दोघी —— (जवळ जाऊन ) महाराजांचा विजय असो . महाराज , राणीसाहेबांची आज्ञा आहे . (याप्रमाणे भाषण अपुरें राहिले असतांना लाज वाटल्याचा अभिनय करून ) नव्हे तसे नव्हे , विनंती आहे !
राजा —— (आनंदाने हसून , आदरपूर्वक ) मला वाटते की , ‘आज्ञा आहे ’ हा प्रयोगच सुंदर आहे ; विशेषेकरून आज ह्या मदनमहोत्सवाच्या वेळी ! तर सांग बरे काय आहे राणीसाहेबांची आज्ञा !
विदूषक —— अग शिनळीचे , काय ! (म्हणतेस )? राणीसाहेबांची आज्ञा आहे ?
चेटी —— राणीची अशी प्रार्थना आहे ——‘‘आज खरोखर मकरंदोद्यानांत जाऊन रक्त अशोक वृक्षाच्या तळाशीं बसविलेल्या भगवान् मदनाची मी पूजा करणार आहे . तेथे (त्या वेळी ) आपण माझ्यापाशी असावें .’’
राजा —— (आनंदाने ) मित्रा , (एका ) उत्सवांतून दुसरा उत्सव निघाला असें म्हणावयास हवे !
विदूषक —— अरे मित्रा , ऊठ कसा . तेथेच जाऊं या ; म्हणजे मला भटाच्या पोराला तेथे जाऊन (मी ) आशीर्वाद दिल्यावर काहीतरी वाण मिळेल .
राजा —— मदनिके , जा आणि राणीला सांग की , हा मी आलोच मकरंदोद्यानांत !
चेटी —— जशी महाराजांची आज्ञा .
राजा —— गड्या , मकरंदोद्यानाची वाट दाखव .
विदूषक —— महाराजांनी यावें , (असें ) यावें . (वाट चालूं लागतात .)
विदूषक —— (पुढे पाहून ) हें ते मकरंदोद्यान . असा ये ; आपण आंत जाऊं या . (आत जातात .)
विदूषक —— (पाहून आश्चर्याने ) अरे मित्रा , पाहा , बघ तर . खरोखर हे प्रसिद्ध मकरंदोद्यान तू आलास म्हणून जणू आदर दाखवीत असल्याप्रमाणे दिसत आहे . (ज्या उद्यानांत ) मलयगिरीवरील वार्याने हलविलेल्या , कलमी आंब्यांच्या उमलावयास झालेल्या मोहोरांतील परागांच्या थराने उत्तम वस्त्राचा चांदवा तयार केलेला आहे ; (आणि जे ) धुंद झालेल्या भ्रमरांनी केलेल्या गुंजनाशीं कोळिळांचे कूजनरूपी संगीत मिसळल्यामुळे सुखदायक झाले आहे . तर आपण याकडे बघावे .
राजा —— (भोवती बघून ) मकरंदोद्यानाची शोभा काय वर्णावी ! कारण यांत , वर डोकावणार्या पोवळ्य़ांप्रमाणे झगझगीत (चमकदार ) कोवळ्य़ा पालवीमुळे लालसर कांति असणारे , मधुकरांच्या रांगांनी केलेल्या अस्पष्ट आणि गोड गुंजारवाने ,
अस्फुट उमटणार्या अशा बोलण्याचा डौल दाखविणारे मलयपर्वताकडील वार्याच्या तडाख्यांनी हलणार्या फांद्यांच्या समूहांनी वारंवार झोकांडे खाणारे ते वृक्ष , वसंतोत्सवातील मद्याने उन्माद होऊन जणू झिंगल्यासारखे (दिसत आहेत .) १७ .
आणि असें , मुळाशी तोंडातील चुळीने शिंपडलेले मद्य , बकुळीची झाडें आपल्या फुलांच्या सड्याने जणू सुवासिक करीत आहेत . (किंवा मुळाशीं टाकलेली मद्याची चूळ बकुळीची झाडें आपल्या फुलांच्या सड्याने झाकून टाकीत आहेत ); आज तरुण स्त्रीच्या मुखरूपी चंद्रावर मद्याची थोडी लाली चढली असताना चाफ्याची फुलें पुष्कळ काळानंतर उमलली आहेत ; आणि अशोक वृक्षांना पायांनी लाथ मारतांना होणार्या पैंजणांचा आवाज ऐकून भ्रमरांचे थवे गुंजारव करून (पैंजणांच्या ) छुमछुमीचे जणू अनुकरण करीत आहेत ! १८
विदूषक —— (ऐकून ) गड्या दोस्ता , पैंजणांच्या नादाचें अनुकरण करणारे हे भृंगे नाहीत . हा राणीच्या परिवारांतील दासींच्या पैंजणांचा आवाजच आहे !
राजा —— मित्रा , तूं बरोबर ताडलेंस .
( नंतर सुंदर कपडे केलेली वासवदत्ता , कांचनमाला आणि हातांत पूजासाहित्य घेतलेली सागरिका आणि ऐश्वर्याला साजेसा लवाजमा प्रवेश करतात .)
वासवदत्ता —— ए कांचनमाले , मकरंदोद्यानाची वाट दाखव .
कांचनमाला —— यावें , राणीसाहेबांनी यावें .
वासवदत्ता —— (चालून ) ए कांचनमाले , ज्या ठिकाणी मी भगवान मदनाची पूजा करणार आहें तो रक्त अशोक वृक्ष येथून किती लांब आहे ?
कांचनमाला —— राणीसरकार , जवळच आहे , बाईसाहेबांना दिसला नाहीका ? खरोखर ही ती दाटीवाटीने उमललेल्या फुलांनी शोभणारी , राणीसाहेबांनी आपली मानलेली , मोगर्याची वेल . जिला अकाली (ऋतु नसताना ) फुलें येतील अशा विश्वासाने महाराजांच्या बुद्धीचा खटाटोप सुरू आहे . (ती ) ही दुसरी बटमोगरी . हिच्या पलीकडे दिसतोच आहे तो अशोक ; तेथे राणीसाहेब पूजा करणार आहेत .
वासवदत्ता — यावे , बाईसाहेबांनी यावे . (सगळ्य़ाजणी चालू लागतात .)
वासवदत्ता —— ज्याची (जेथे ) मी पूजा करणार आहे तो हा रक्त अशोक वृक्ष . तर आता पूजेला उपयोगी पडणारें साहित्य माझ्याजवळ आण ——दे .
सागरिका —— (जवळ जाऊन ) राणीसरकार , हें सर्व तयार आहे . निष्काळजीपणा ! ज्याच्याच दृष्टीच्या टप्यांत येऊं न द्यावी म्हणून मी हिला लपविले त्याच्याच दृष्टीस ही आता पडणार ! काही हरकत नाही . असें बोलते . (मोठ्याने ) अग सागरिके , आज मदनमहोत्सवांत दासदासी गुंतले असतांना तूं साळुंकी (पक्ष्याला ) सोडून का म्हणून येथे आलीस ? तर याच पावली लगोलग तेथेच परत जा . हे सगळे पूजासाहित्य कांचनमालेच्या हातांत दे .
सागरिका —— जशी महाराणींची आज्ञा . (काही पावलें जाऊन स्वतःशी ) साळुंकीला मी तर सुसंगतेपाशी दिले आहे . जशी बाबांच्या राणीवंशात भगवान् मदनाची पूजा करतात तशीच इथेहि करतात किंवा दुसर्या काही रीतीने ? हे देखील पाहण्याची मला उत्सुकता आहे ! एवढ्यासाठी दिसणार नाही अशी (उभी ) राहून बघते . इथे पूजेची वेळ होईपर्यंत मी देखील भगवान् कामदेवाच्या पूजेसाठी फुलें गोळा करते . (फुले गोळा करण्याचा अभिनय करते .)
वासवदत्ता —— कांचनमाले , भगवान् कामदेवाची (मूर्ति , प्रतिमा ) अशोकाच्या मुळाशी मांड .
कांचनमाला —— अरे मित्रा , ज्या अर्थी पैंजणाची छुम्छुम् ऐकू येण्याची बंद झाली आहे त्या अर्थी महाराणी अशोकाच्या बुंध्याशी आली आहे असे मला वाटते .
राजा —— गड्या , बिनचूक हेरलेस . बघ ही महाराणी . जी ही बहुतकरून फुलाप्रमाणे अगदी नाजूक बांधा (शरीर ) असणारी , नेमधर्माने , व्रतोपवासाने ,—— कमर कृश झालेली , मदनाच्या शेजारी उभी राहिल्यामुळे (त्याच्या ) धनुष्याच्या काठीप्रमाणे दिसते १९
तर ये , आपण दोघे जवळ जाऊं (जवळ जाऊन ) लाडके वासवदत्ते ,
वासवदत्ता —— (बघून ) हे काय ? इकडची स्वारी ! आर्यपुत्रांचा विजय असो ! हे आसन . स्वारींनी याच्यावर बसावे . (राजा बसण्याचा अभिनय करतो .)
कांचनमाला —— बाईसाहेब , डेरेदार तांबड्या अशोक वृक्षाच्या समीप जाऊन आपल्या हाताने फुले , केशर चंदन आणि वस्त्रे वाहून भगवान् कामदेवाची आपण पूजा करावी .
वासवदत्ता —— पूजासाहित्य मजजवळ दे ——आण . (कांचनमाला जवळ नेते . वासवदत्ता त्याप्रमाणे (पूजा ) करते .)
राजा —— लाडके , नुकत्याच केलेल्या (अभ्यंग ) स्नानाने जिचे सौंदर्य अधिक निर्दोष झालेले आहे , करडईच्या फुलांच्या लाल रंगाने जिच्या लुगड्याचा पदर सुंदर आणि झगझगीत (देदीप्यमान ) दिसत आहे , अशी तूं , मदनाची पूजा करीत असतां , नुकतेंच (मुळाशी ) पाणी घातल्यामुळे जिला अधिक टवटवी आली आहे अशा , करडईच्या फुलांप्रमाणे असलेल्या रंगामुळे आकर्षक आणि प्रकाशणार्या किरणांमुळे रमणीय अशा , समुद्राला शोभा आणणार्या आणि कोवळ्य़ा पालवीने युक्त अशा वृक्षापासून जन्मलेल्या वेलीप्रमाणे खुलून दिसतेस ! २०
लाडके , कामदेवाच्या पूजेत गढून गेलेल्या हाताने , तूं स्पर्श करतांच तुझा स्पर्श होताच हा अशोक जणू दुसरी कोवळीकोवळी पालवी फुटल्यासारखा दिसत आहे २१
आज ह्या अनंगाला (कामदेवाला ) आपण शरीरविरहित आहों याबद्दल स्वतःला निखंदावेंसे वाटेल ; कारण त्याला तू हात लावण्यामुळे होणारा आनंद मिळाला नाही २२
कांचनमाला —— बाईसाहेब , भगवान् मदनाची पूजा झाली . तर (आता ) महाराजांचा साजेसा सत्कार करावा .
वासवदत्ता —— त्यासाठी फुले आणि गंध मला दे .
कांचनमाला —— बाईसाहेब , हे सगळें तयार आहे . (वासवदत्ता राजाची पूजा केल्याचा अभिनय करते .)
सागरिका —— (फुले गोळा करून ) हाय हाय , धिक्कार असो मला ! फुलांच्या हावेने मन ठिकाणावर नसल्यामुळे मी किती (फार ) उशीरच केला ! आता ह्या निर्गुंडीच्या झाडामागे लपून पाहते . (पाहून ) हा प्रतिमारूपी मदनाहून वेगळा मूर्तिमंत कामदेवच आहे का ? आमच्या बाबांच्या राणीवंशात चित्रांतल्या -मदना -ची पूजा होते . यास्तव मीहि ह्या फुलांनी इथे उभी राहूनच भगवान् मदनाची पूजा करते . (फुलें फेकते .) भगवान् मदना , तुला नमस्कार असो . तुझें दर्शन माझे कल्याण (भलें ) करो . पाहण्यासारखे जें हाते तें मी पाहिले . तुझे दर्शन माझ्या बाबतीत निष्फळ (वांझ ) ठरणार नाही . केवढे नवल ! मी बघितले तरी वारंवार बघावेसे वाटते . तर जोपर्यंत मला कोणीहि पाहिले नाही तोपर्यंतच जातें कशी !
कांचनमाला —— आर्या वसंतका , ये आता तूंहि आशीर्वाद देऊन वाण घे .
( विदूषक जवळ जातो .)
वासवदत्ता —— (गंध , फुलें आणि अलंकार अगोदर देऊन ) आर्या , आशीर्वाद देऊन वाण घे . (देते )
विदूषक —— (आनंदाने घेऊन ) बाईसाहेबांचे कल्याण होवो !
( पडद्यांत भाट गातो .)
आता संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या कडेला गेलेल्या सूर्याने आपले सर्व किरण मावळतीकडे फेकले असता , राज्यसभेत एकाच वेळी गोळा झालेले हे राजेलोक (लोकांच्या ) डोळ्य़ांना अतिशय आल्हाद देणार्या , आकाशांत वरवर चढणार्या सूर्यविकासी कमळांची शोभा त्यांना मिटवून हिरावून घेणार्या किरणांच्याप्रमाणे , प्रजेचा उत्तम प्रतिपाळ केल्यामुळे डोळे आनंदाने प्रेमाने ओसंडावयास लाविणार्या उदयनाच्या , कमळांप्रमाणे शोभा उत्पन्न करणार्या पायांची सेवा करण्याची वर मान करून वाट पाहत आहेत २३
सागरिका —— (ऐकून , आनंदाने परत फिरून , राजाकडे आशाळभूतपणाने पाहून ) हें काय ? हा तो प्रसिद्ध राजा उदयन , ज्याच्याशीं बाबांनी माझा वाङ्निश्चय केला आहे . दुसर्यांच्या आज्ञेत वागावें लागल्यामुळे जरी माझे शरीर रोडावलें असले तरी ह्याला पाहिल्यापासून ह्या देहाची मला फार आस्था वाटू लागली आहे .
राजा —— उत्सवाच्या सोहळ्य़ांत मनें गुंतल्यामुळे आपल्याला सायंसंध्येची वेळ टळून गेल्याचेंसुद्धा समजले नाही हें आश्चर्य आहे ! महाराणी , बघ . विरहाने विव्हळ झालेली कामिनी आपल्या निस्तेज (फिकट ) मुखावरून ज्याप्रमाणे प्रियकर अंतःकरणांत असल्याचें (सुचविते ) त्याप्रमाणे ही पूर्व दिशा लवकर उगवणार्या चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या चेहर्याने , चंद्र उदयगिरीच्या तटाआड दडल्याचे सुचविते २४
महाराणी , आता निघू या . राजवाड्याच्या आंतच जाऊ या .
( सर्व उठून चालू लागतात .)
सागरिका —— अरेच्या , महाराणी निघाली . काही हरकत नाही . घाईने जाते . (राजाकडे अभिलाषबुद्धीने -हपापल्यासारखे -पाहून , सुस्कारा सोडून ) धिक्कार असो ! मला अभागिनीला ह्या पुरुषाकडे भरपूर वेळ (पोटभर ) पाहतां देखील आलें नाही . (राजाकडे पाहत जाते .)
राजा —— (हिंडतफिरत )
महाराणी , पाहा ! चंद्राच्या सौंदर्याची हेटाळणी करणार्या तुझ्या मुखकमळाने सर्वतोपरी वरताण केलेली कमळें एकाएकी निस्तेज झाली (काळवंडली ) आहेत ! तुझ्या परिवारांतील वेश्यांची गाणी ऐकून भ्रमरी जणू शरम वाटल्याप्रमाणे हळू ——मुकाट्याने ——कळ्य़ांच्या पोटांत (पोकळीत ) लपत आहेत २५
( सर्व जातात .)
‘ मदनमहोत्सव ’ नावाचा पहिला अंक समाप्त .