रत्नावली - तृतीय अंक

‘ रत्नावली’ नाटकात हर्षाने प्राकृत भाषांपैकी शौरसेनीचा मुख्यत्वेंकरून उपयोग केला आहे.


( नंतर मदनिका येते.)

मदनिका —— ( आकाशांत ) कौशांबिके , महाराजांच्या जवळ तूं कांचनमालेला पाहिलेंस किंवा नाही ? ( कान देऊन ऐकून ) काय म्हणालीस ? ‘‘ तिला येऊन गेल्याला कितीतरी वेळ झाला !’’ तर आता कुठे पाहूं ? ( समोर बघून ) ही तर कांचनमाला इकडेच येत आहे ; तोपर्यंत हिच्यापाशी जातें .

( मग कांचनमाला येते.)

कांचनमाला —— ( थट्टेने ) शाबास , अरे वसंतका , शाबास ! सागरिकेची भेट ( सख्य ) आणि वासवदत्तेशीं भांडण घडवून आणण्याच्या या धोरणाने तूं अमात्य यौगंधरायणावर मात केलीस !

मदनिका —— ( जवळ जाऊन स्मित करून ,) गडे कांचनमाले , वसंतकाने आज काय केले म्हणून त्याची अशी स्तुति करीत आहेस ?

कांचनमाला —— अग मदनिके , तुला हे विचारून काय करायचे आहे ? तुला हे गुपित राखतां येणार नाही .

मदनिका —— जर कोणाच्याहि समोर मी सांगितलं तर मला महाराणींच्या पायांची शपथ आहे .

कांचनमाला —— ऐक तर . आज राजवाड्य़ांतून परत येतांना चित्रशाळेच्या दाराशीं वसंतकाचे सुसंगतेशीं झालेले बोलणे मी ऐकिलें .

मदनिका —— ( उत्सुकतेने ) सखे , काय ( कोणते ) ?

कांचनमाला —— असेः सुसंगते , सागरिकेखेरीज प्रिय मित्राचे मन ताळ्य़ावर नसण्याचें दुसरे कोणतेंहि कारण नाही . म्हणून ते ताळ्यावर आणण्याचा उपाय शोधून काढ .

मदनिका —— मग सुसंगता काय म्हणाली ?

कांचनमाला —— तेव्हा मी असें बोलली चित्रफलकाच्या प्रकाराने संशयखोर झालेल्या महाराणीने सागरिकेला माझ्या हाती सोपवितांना जी वस्त्रभूषणें अनुग्रह म्हणून मला दिली त्यांनीच आज राणीसाहेबांसारख्या सजविलेल्या सागरिकेला घेऊन आणि मोहि कांचनमालेचा पोषाख करून रात्र पडल्यावर ( सूर्य मावळ्यावर ) इथे येईन . तूंसुद्धा इथे राहून वाट पाहा . नंतर मोगरीच्या मांडवांत तिच्याशी महाराजांची भेट होईल .

मदनिका —— सुसंगते , खरोखर तूं दुष्टनष्ट आहेस ; कारण तूं सेवकांवर माया करणार्‍या महाराणींशी अशी प्रातारणा करीत आहेस !

कांचनमाला —— अग मदनिके , आता तूं कुठे चालली आहेस ?

मदनिका —— महाराजांची प्रकृति ठीक नसल्यामुळे त्यांच्या खुशालीची बातमी काढण्यासाठी तूं गेलीस ; तुला उशीर झाला म्हणून काळजी करणार्‍या महाराणींनी मला तुझ्याकडे ( बातमी ) काढण्यासाठी पाठविलें आहे .

कांचनमाला —— जी अशा रीतीने विश्वास ठेविते ती महाराणी अगदीच भोळी ! ( थोडें जाऊन आणि पाहून ) हे महाराज प्रकृति ठीक नसल्याचा सबबीवर , आपली प्रेमविव्हळ स्थिति झाकून , हस्तिदंती कमानीच्या गच्चीवर बसलेले दिसतात . तर ये . हकीकत महाराणीला सांगू . ( जातात .)

प्रवेशक समाप्त

( नंतर प्रेमविव्हळ झाल्याचा अभिनय करीत असलेला राजा बसलेल्या स्थितीत दिसतो.)

राजा —— ( सुस्कारा सोडून )

हे हृदया , आता मदनाग्नीने दिलेल्या ह्या वेदना सोसणें भाग आहे ! ह्यांचा नाश ( उपशम ) करणें शक्य नाही . तर तिच्यासाठी तूं उगीच कां झुरत आहेस ? कारण मी मूर्खाने त्या वेळी मोठ्या प्रयासाने मिळालेला स्निग्ध चंदनरसाप्रमाणे ( सुगंधी शीतल ) स्पर्श असलेला तिचा हात पुष्कळ काळ ( आपल्या हातांत ) घेऊन तुझ्या हृदयावर ठेविला नाही . १ .

अहो , केवढें मोठें नवल !

मग स्वभावतः अस्थिर ( चंचल ) आणि अणुरूपामुळे सापडणें कठीण ; तरीसुद्धा माझ्या या मनाचा मदनाने सगळ्या बाणांनी एकदम कसा वेध केला ? २ .

( वर पाहून) अरे पुष्पचापा ( मदना)

मदनाच्या बाणांची पांच ही संख्या ठरलेली आहे ; आमच्यासारखेच असंख्य लोक बहुतकरून त्यांचे निशाण अशी जी जगांत कीर्ति झालेली आहे ती तुझ्या बाबतीत आता उलट झालेली आहे ; कारण तुझ्या असंख्य बाणांनी प्रहार केलेला हा मी एकटा निराश्रित कामुक मनुष्य तूं पांच या अवस्थेला नेलास ( ठार केलास ) स्थितींत असलेल्या स्वतःची वाटत नाही . उदाहणार्थ ——

ती सगळ्यांना आपलें चरित्र समजलें म्हणून लाजेने तोंड लपविते ( खाली करते ) ; दोघी आपापसांत बोलतांना बघून आपल्याविषयीच गोष्टी बोलत आहेत अशी कल्पना करते . सख्या हसू लागल्या की अगदी गोंधळून दीनवाणी होते ; माझी लाडकी मनांत बहुतांशी ( घर केलेल्या ) भीतीने व्याकुळ झाली आहे .

आणि मी तिची बातमी काढण्यासाठी वसंतकाला पाठविले आहे . कां बरे तो उशीर करीत आहे .

( मग आनंदित विदूषक येतो.)

विदूषक —— ( अगदी खुषींत येऊन ) ह्यः ह्यः ! अरे , माझी अशी अटकळ आहे की , कौशांबीचे राज्य मिळण्यानेहि प्रिय मित्राच्या मनांत जेवढें प्रेम उत्पन्न होणार नाही तितकें माझ्याकडून आज आवडतें बोलणें ऐकून होईल . तोपावेतो प्रिय मित्राच्या कानांवर घालतो . ( थोडे चालून आणि पाहून ) हे काय ? हा प्रिय मित्र ज्या अर्थी याच दिशेकडे पाहत उभा आहे त्या अर्थी मला वाटते तो माझीच वाट पाहत आहे . यास्तव याच्यापाशी जातों . ( जवळ जाऊन ) प्रिय मित्राचा जयजयकार असो ! अरे दोस्ता , इच्छित कार्य तडीस गेल्यामुळे तुझे नशीब बलवत्तर आहे असे म्हणावयास हवें !

राजा —— ( आनंदाने ) मित्रा , लाडकी सागरिका सुखरूप आहे ना ?

विदूषक —— ( आनंदाने ) अरे , लवकरच स्वतःच पाहून समजेल तुला !

राजा —— ( समाधानाने ) मित्रा , प्रियेची भेटहि होईल ना ?

विदूषक —— ( फुशारकीने ) अरे , बृहस्पतीच्या बुद्धिवैभवाचा तिरस्कार करणारा हा मी तुझा मंत्री असल्यावर कां म्हणून होणार नाही ?

राजा —— ( हसून ) आश्चर्य नव्हे ! तुझ्या बाबतीत काय शक्य नाहीं ? यासाठी सांग . मुळापासून ( पाल्हाळाने ) ऐकायची इच्छा आहे .

विदूषक —— ( कानांत ) असे , असें !

राजा —— ( खूष होऊन ) मित्रा , हें तुला बक्षीस . ( हातांतून कडे काढून तें देतो .)

विदूषक —— ( कडे घालून स्वतःकडे निरखून ) असूं दे , असेंच करतों . जातों आणि आपला हा निखळ सोन्याच्या कड्य़ाने भूषविलेला हात बायकोला दाखवितों .

राजा —— ( हात धरून थांबवून ) मित्रा , मागून दाखविशील रे . प्रथम पाहा बरें अजून दिवस किती राहिला आहे ?

विदूषक —— ( पाहून ) अरे , बघ बघ ! हा भगवान सूर्य मनोमन प्रेमाने अंतःकरण भरून गेल्यामुळे , संध्यारूपी प्रियेशीं जणू संकेत करून , मावळत्या डोंगराच्या शिखरावरील अरण्याकडे निघाला आहे .

राजा —— ( पाहून आनंदाने ) मित्रा , छान वर्णन केलंस ! दिवस संपत ( बुडायला ) आला . उदाहरणार्थः ( दिवसभर ) जगभर हिंडल्यामुळे ( संचार केल्यामुळे ) लांबच लांब ( कंटाळवाणा ) असा रस्ता ओलांडून पुन्हा उजाडत उगवतीकडे येण्याला आपला एकचाकी रथ कसा समर्थ होईल या काळजीने जड ओझे वागविणारा , संध्याकाळी ( मावळताना ) आपल्याकडे ओढून ( खेचून ) घेतल्यावर शिल्लक राहिलेला किरणांचा पसारा हीच सोन्याच्या आरांची ठळक रांग असलेला , हा सूर्य मावळतीच्या डोंगरावर थांबून सर्व दिशांचे चक्र ( चाक ) समूह जणू आपल्याकडे खेचून आणीत आहे . .

हे कमलिनि ( हे कमलमुखि ), मी अस्ताला जातों ( येतों ), माझी ही मावळण्याची वेळ ( ही माझी प्रतिज्ञा ) ! रात्री मिटलेल्या तुला मींच उमलविणें योग्य ( झोपी गेलेल्या तुला मीच जागी करावयास हवें ) ! हा मावळतीच्या शिखरावर किरण ठेविलेला , ( हा दुःखाने खाली वाकलेल्या मस्तकावर हात ठेविलेला ) सूर्य ( विद्वानांत श्रेष्ठ ) कमलिनीच्या ठिकाणी ( कमळें धारण करणार्‍या नायिकेच्या ठिकाणी ) विश्वास उत्पन्न करतो . .

तर ऊठ . दोघे तिथेच मोगरीच्या मांडवांत जाऊन प्रियतमेच्या भेटीची वाट पाहूं !

विदूषक —— लाख बोललास ! ( उठतो . पाहून ) अरे दोस्ता , बघ , बघ . अरण्यांच्या विरळ रांगांची मांडणी दाटीने ( घट्ट ) करणारा , ( डबक्यांतील ) घट्ट चिखल ( अंगावर ) घेतलेली गलेलठ्ठ ( धष्टपुष्ट ) रानडुकरें आणि रानरेडे यांच्याप्रमाणे तुकतुकीत काळसर असा दाट काळोख पूर्व दिशा झाकून दूर पसरत आहे .

राजा —— ( आनंदाने , सभोवती पाहून ) मित्रा , सुरेख वर्णन केलेंस .

स्पष्टीकरणार्थः

शंकराच्या कंठासारख्या तुकतुकीत सावळ्या रंगाच्या ह्या काळोखाच्या लाटा आधी पूर्व दिशेलाच व्यापून टाकतात ; मागून दुसर्‍याहि दिशेला ( पसरतात ) ; हळूहळू पसरत पर्वत , वृक्ष आणि नगर यांचे निरनिराळे भाग झाकतात ; आणि त्यानंतर दाट होणार्‍या या लाटा लोंकांची दृष्टि अंधळी करतात ( हिरावून घेतात .) ७ .

तर मला दाखव .

विदूषक —— यावें , यावें , प्रिय मित्राने ! ( जाऊं लागतात .)

विदूषक —— ( बारकाईने पाहून ) अरे गड्य़ा , झाडी दाट असल्यामुळे जणू काळोखाच्या पुंजक्यासारखे असलेले हे मकरंदोद्यान जवळ आले . आता इथे रस्ता कसा

सापडणार ?

राजा —— ( वास घेऊन ) मित्रा , हो पुढे . अरे इथे वाट चांगली माहितीची आहे . स्पष्टीकरणार्थः

ही सोनचाफ्यांची रांग निश्चित ; हा तो जवळ निर्गुंडीचा मनोहर ( डेरेदार ) वृक्षः तसेंच बकुळीच्या झाडांची ही दाट राई ; ही पाडळीची या नांवाच्या फुलझाडांची ओळ . या ठिकाणी अधिक दाट झालेल्या काळोखाने न दिसणारीहि ( झाकलेलीसुद्धा ) वाट , निरनिराळे वास वारंवार घेऊन अशा प्रकारे ओळखू आलेल्या वृक्षांच्या ( परिचित ) खुणांनी चांगली स्पष्ट समजत आहे . ८ .

( दोघे चालण्यास आरंभ करतात.)

विदूषक —— अरे , ज्या मांडवांत झेपावणार्‍या धुंद भ्रमरांनी युक्त अशा बकुळाच्या फुलांच्या वासाने सर्व दिशा दरवळून गेल्या आहेत आणि जो गुळगुळीत पाचूरत्नांच्या दगडांनी केलेल्या फरसबंदीने चालतांना पायांना होणार्‍या सुखाने समजत आहे , अशा या त्याच मोगरीच्या मांडवांत आपण दोघे येऊन पोचलों . याकरिता मी महाराणीचा वेष घेणार्‍या सागरिकेला लगोलग घेऊन येईपावेतो आपण इथेच थांबा .

राजा —— मित्रा , जलदी कर तर .

विदूषक —— गड्य़ा उतावीळ होऊं नकोस . हा मी आलों . ( जातों .)

राजा —— तोपर्यंत मीहि या पाचूच्या दगडी ओट्यावर बसून प्रियेच्या भेटीच्या वेळी वाट पाहतो . ( बसून विचार करीत ) ओहो ! आपल्या पत्नीची भेट टाळणार्‍या कामुकाला नवीन ( परिचयाच्या ) परक्या स्त्रीच्या भेटीची अनिर्वचनीय उत्कट इच्छा असते . उदाहणार्थः भेटीच्या स्थळीं असलेली कामिनी , भीतीने , प्रेमाने ओथंबलेल्या ( प्रसन्न झालेल्या ) दृष्टीने , प्रियकराच्या मुखाकडे पाहत नाही ; गळां मिठी मारतांना गाढ प्रेमाने स्तन ( छातीला ) भिडवीत नाही ; मोठ्य़ा खटाटोपाने धरून ठेविली तरीसुद्धा एकसारखी ‘ जाते ’ असें म्हणते . असें असूनहि ती कामिनी अधिक सुखविते . ९ .

अरेच्या , वसंतक कसा उशीर करीत आहे ? देवी वासवदत्तेला ही बातमी समजली तर नसेल ना ?

( तेवढ्यात वासवदत्ता आणि कांचनमाला येतात.)

वासवदत्ता —— गडे कांचनमाले , खरेंच का माझे कपडे करून सागरिका नेमल्या जागीं आर्यपुत्राला भेटणार आहे ?

कांचनमाला —— महाराणीला मी खोटें कसें सांगेन ? किंवा चित्रशाळेच्या दाराशीं बसलेल्या वसंतकाला ( पाहून ) तुझा माझ्यावर विश्वास बसेल .

वासवदत्ता —— मग तिथेच जाऊं , आपण दोघी !

कांचनमाला —— यावें , यावें महाराणीने ! ( जाऊ लागतात .)

( नंतर बुरखा घेतलेला वसंतक येतो.)

विदूषक —— ( कान देऊन ) ज्या अर्थी चित्रशाळेच्या दाराशीं पावलांचा आवाज ऐकू येत आहे त्या अर्थी सागरिका आली असें मला वाटते .

कांचनमाला —— महाराणी , ही ती चित्रशाळा ! म्हणून तोपावेतो वसंतकाला खूण करतें . ( चुटकी वाजविते .)

विदूषक —— ( आनंदाने जवळ जाऊन , मंद हसून ) सुसंगते , तुझी वेषभूषा खरोखर हुबेहूब कांचनमालेसारखी आहे . आता सागरिका कुठे आहे ?

कांचनमाला —— ( बोटाने दाखवीत ) अरे , ही !

विदूषक —— ( पाहून आश्चर्याने ) ही हुबेहुब वासवदत्ता !

वासवदत्ता —— ( घाबरून स्वतःशीं ) काय ? मला याने ओळखलें ! जाते तर . ( जाऊं लागते .)

विदूषक —— बाई सागरिके , अशी ये . ( वासवदत्ता हसून कांचनमालेकडे पाहते .)

कांचनमाला —— ( एकीकडे , विदूषकाला बोटाने चूप करून — धमकावून ) नीचा , हें बोलणे लक्षात ठेव ( विसरू नकोस ) !

विदूषक —— सागरिकेने त्वरा करावी , त्वरा करावी . हा भगवान् चंद्र पूर्व दिशेकडून वर येत आहे .

वासवदत्ता —— ( गोंधळून , एकीकडे ) भगवान् चंद्रा तुला नमस्कार असो . काही वेळ तुझें शरीर क्षितिजाच्या आड असूं दे म्हणजे याचे प्रेमाचे चाळे पाहायला मिळतील . ( सगळे जाऊं लागतात .)

राजा —— ( उत्सुकतेने स्वतःशी ) प्रियेची भेट लवकर होणार असूनहि माझे हे मन का इतके उतावीळ झालें आहे ? किंवा प्रेमामुळे होणारा असह्य दाह ( प्रिय वस्तु ) समीप असतांना जेवढा सतावून सोडतो तेवढा सुरवातीला छळीत नाही ; पावसाळ्यांत पाऊस येण्याची वेळ अगदी नजीक आली म्हणजे त्या दिवशीं अंगाची अतिशय तलखी होते . १०

विदूषक —— ( ऐकून ) बाई सागरिके , हा प्रिय मित्र तुलाच उद्देशून विरहवेदनेने व्याकुळ होऊन बोलत आहे . यासाठी तूं थांब . तूं आल्याचे त्याला सांगतो . ( वासवदत्ता डोकें हलवून खूण करते .)

विदूषक —— ( राजापाशी जाऊन ) अरे दोस्ता , सुदैवाने खैर केली ; या सागरिकेला मी आणिलें .

राजा —— ( आनंदाने , एकदम उठून ) मित्रा , कुठाय ती ? कुठाय ती ?

विदूषक —— अरे , ही !

राजा —— ( जवळ जाऊन ) लाडके सागरिके , तुझें मुख म्हणजे चंद ; डोळे म्हणजे दोन निळी कमळें ; हात कमळांचे अनुकरण करणारे ; तुझ्या दोन मांड्या केळीच्या गाभ्यासारख्या ; दोन बाहु कमळाच्या देठांसारखे ! अशा रीतीने सर्व अवयव विशेष सुखद असलेल्या सुंदरी , लगबगीने , भीति न बाळगता , मला मिठी मारून मदनाच्या दाहाने पिचलेल्या अवयवांना शांत कर ; ये , ये ! ११ .

वासवदत्ता —— ( एकीकडे ) कांचनमाले , आर्यपुत्र स्वतः असे ( लाडीगोडीने ) बोलत आहेत . ओळख पटल्यावर पुन्हा माझ्याशी कसें बोलतील ? सगळेंच नवल !

कांचनमाला —— ( एकीकडे ) महाराणी , हें असेंच ! फिरून अविचारी माणसांना काय करणें शक्य नाही ? त्यांच्या बाबतीत सर्व संभवतें !

विदूषक —— बाई सागरिके , विश्वास ठेवून माझ्या प्रिय मित्राशी बोल . याचे कान आजपर्यंत कायमच्या रुसलेल्या ( क्रोधागारांत गेलेल्या ) देवी वासवदत्तेच्या घालूनपाडून बोलण्यांनी किटले आहेत . तुझ्या लाडिक , लाघवी आणि गोड शब्दांच्या मांडणीने त्याला आनंदित कर .

वासवदत्ता —— ( एकीकडे , रागाने , स्मित करून ) अग कांचनमाले , मी अशी टोचून बोलणारी आणि आर्य वसंतक तेवढा गोडबोल्या !

कांचनमाला —— ( एकीकडे , बोटाने चूप करीत ) नीचा , हें बोलणें लक्षात ठेव .

विदूषक —— ( पाहून ) अरे मित्रा , पाहा ; पाहा ! हा रागावलेल्या स्त्रीच्या गालाप्रमाणे ( लालसर ) असा भगवान् चंद्र पूर्वदिशा उजळीत उगवला आहे .

राजा —— ( निरखून , उत्कट अभिलाषाने ) लाडके , बघ , बघ !

तुझ्या मुखाने ज्याचें सौन्दर्यरूपी सगळे धन हिरावून घेतलें आहे असा चंद्र , उदयगिरीच्या माथ्यावर चढून , जणू बदला घेण्यासाठी , किरण हात वर फेकून उचलून समोर पूर्व दिशेला उभा आहे . १२ .

हे लाडके , उगवतांना याने बुद्धीचा मंदपणा ( शीतल गुण ) प्रकट केला नाही का ? कारण हा तुझा मुखचंद्र , त्या आकाशस्थ चंद्राप्रमाणे कमळाच्या सौंदर्यावर मात करीत नाही का ? डोळ्यांना समाधान ( आल्हाद ) देत नाही का ? नुसत्या नेत्रकटाक्षाने प्रेमाचा दाह वाढवीत नाही का ? तुझें चंद्राप्रमाणे असणारे मुख अस्तित्वांत असतांना हा दुसरा चंद्र उगवत आहे ! त्याला चंद्राला अमृताचा गर्व असेल तर या चंद्रमुखाच्या ठिकाणीं तुझ्याहि तोंडल्यासारख्या लाल चुटुक ओठांत तें आहेच ! १ .

वासवदत्ता —— ( रागाने , बुरखा दूर सारून ) आर्यपुत्र , खरेंच मी सागरिका ! तुझे मन सागरिकेवर जडल्यामुळे तुला सगळेच सागरिकामय दिसत आहे !

राजा —— ( पाहून , आश्चर्याने , एकीकडे ) हाय , धिक्कार ! घात झाला ! कोण ? देवी वासवदत्ता ! मित्रा , हे काय ?

विदूषक —— ( कष्टी होऊन ) अरे दोस्ता , दुसरे काय ! आपल्या हे अंगलट आलें ( जिवावर बेतलें ) !

राजा —— ( बसून , हात जोडून ) लाडके वासवदत्ते , रागावूं नकोस , क्षमा कर !

वासवदत्ता —— ( त्याच्याकडे तोंड वळवून , अश्रु गाळीत ) आर्यपुत्रा , असे नको म्हणू ! आता प्रिये हे शब्द मला सोडून गेले आहेत . ( मला लावितां येणार नाहीत ) !

विदूषक —— ( स्वतःशीं ) आता इथे कोणती युक्ति लढवू ? ठीक ! असें करतों . ( मोठ्याने ) बाईसाहेब , आपण खरोखर उदार ! तेव्हा प्रिय मित्राचा एवढा एक अपराध पोटात घाला .

वासवदत्ता —— आर्या वसंतका , मी म्हणते की , पहिल्या भेटीला अडथळा आणणार्‍या मीच यांचा अपराध केला आहे .

राजा —— अशा रीतीने मुद्देमालासह गुन्हा करितांना पाहिल्यावर बोलूं तरी काय ? तरी सुद्धा विनंती करतो . महाराणी , हा पामर डोकें ठेवून तुझ्या पायांवरील लाखेने आलेली थोडीशी तांबुस झाक पुसून टाकील ; परंतु तुझ्या मुखरूपी चंद्रावर क्रोधरूपी राहू ग्रहाने आणिलेली लाली , माझ्यावर मर्जी प्रसन्न असेल तरच , मला नाहीशी करितां येईल . १ . ( पायां पडतो .)

वासवदत्ता —— ( हाताने थांबवून ) आर्यपुत्रा , उभे राहा , उठा ! आर्यपुत्रांचे मन असें आहे , हें कळूनसवरूनहि जें माणूस रागावते ते निलाजरें म्हणावयास हवें ! तेव्हां आर्यपुत्रांनी आनंदात असावें ! मी जातें . ( जाऊं लागते .)

कांचनमाला —— बाईसाहेब महाराजांच्यावर मेहेरबानी करा . अशा रीतीने पाया पडलेल्या महाराजांना अव्हेरून गेलेल्या महाराणीला पश्चातापय होईल .

वासवदत्ता —— दीडशहाणे , अक्कलशून्ये , दूर हो . या बाबतीत पश्चातापाचे काय कारण ? तर ये , दोघी जाऊं या . ( जातात .)

राजा —— महाराणी , प्रसन्न हो , रागावूं नकोस ! (‘ आताम्रतामपनयामि ...’ हा श्लोक पुन्हा म्हणतो .)

विदूषक —— अरे , ऊठ . ती महाराणी वासवदत्ता गेली . तर इथे ओसाडीत का शोक करीत आहेस ?

राजा —— ( तोंड वर करून ) अनुग्रह न करितां कशी देवी निघून गेली ?

विदूषक —— ज्या अर्थी आपण शरीराने अद्याप धडधाकट ( सुखरूप ) आहों त्या अर्थी तिने अनुग्रह केला नाही कसा ? ( तिने अनुग्रह केल्याशिवाय का आपण शरिराने सुखरूप आहों ?)

राजा —— हत् मूर्खा , माझी थट्टा का करतोस ? मी म्हणतो तुझ्यामुळेच ही संकटपरंपरा आमच्यावर कोसळली . कारण ——

प्रेमाविषयी अतिशय आदर असल्यामुळे प्रत्येक दिवशी आमचे परस्परांवरील प्रेम उत्तम रीतीने ( निर्विघ्न ) वाढले . पूर्वी न केलेला हा अपराध मी केलेला पाहून आज ही

असोशिक — असहिष्णु प्रिया नक्की जीव देईल ! कारण जिवाभावाने केलेल्या प्रेमाच्या संबंधांतील कपट ( प्रतारणा ) मुळीच सहन करवत नाही ( उघड्या डोळ्यांनी बघवत नाही ) ! १ .

विदूषक —— अरे , रागावलेली , महाराणी काय करील कळत नाही . पण माझा अंदाज आहे की , सागरिकेचे जिणें हालाचे होणार !

राजा —— मित्रा , मी सुद्धा ह्याच काळजीत आहे . हे प्रिय सागरिके !

( नंतर वासवदत्तेचे कपडे केलेली सागरिका येते.)

सागरिका —— ( खिन्न होऊन ) सुदैवाने महाराणीचे हे कपडे घालून या गायनशाळेंतून बाहेर पडतांना मला कोणीहि पाहिले नाही . तेव्हा आता इथे काय करूं ?

( आसवें आणूनय विचार करते.)

विदूषक —— अरे , गोंधळल्यासारखा का उभा आहेस ? अपराधावर इलाज - शिक्षा शोधून काढ .

राजा —— मित्रा , त्याचाच विचार चालूं आहे . महाराणीला खूष करण्याखेरीज दुसरा उपाय दिसत नाही ! तर ये . तिकडेच जाऊं दोघे . ( जातात .)

सागरिका —— ( विचार करून ) आता स्वतःच आपल्याला टांगून मरून जाणे परवडेल ; म्हणजे निदान भेटीची बातमी समजलेल्या महाराणीकडून पाणउतारा तरी होणार नाही . यासाठी अशोकाच्या झाडाकडे जाऊन ठरविल्याप्रमाणे करिते . ( जाते .)

विदूषक —— ( ऐकून ) थांब , जरा उभा राहा ! अरे पावलांचा आवाज येत आहे . मला वाटते . पश्चात्ताप होऊन महाराणी कदाचित् परत येईल .

राजा —— मित्रा , खरोखर महाराणी मनाने मोठी आहे . कदाचित् असेंहि घडेल ! तेव्हा लागलीच खात्री करून घे .

विदूषक —— जशी आपली आज्ञा ! ( इतस्ततः हिंडतो .)

सागरिका —— ( जवळ जाऊन ) म्हणून या मोगरीच्या वेलीचा फास तयार करून , अशोकाच्या झाडाला टांगून घेऊन आत्महत्या करिते . ( वेलीचा फास तयार करीत )

हाय हाय ! बाबा , आई आता ही कपाळकरंटी , अनाथ , निराधार अशी मी मरते . ( गळ्याला वेलीचा फास लाविते .)

विदूषक —— ( पाहून ) कोण ही ? हें काय ? देवी वासवदत्ता ! ( गोंधळून मोठ्याने ) अरे मित्रा , धाव , धाव ! ही देवी वासवदत्ता स्वतः आपल्याला टांगून गळफास लावून मारीत आहे .

राजा —— ( गळ्यांतून फास दूर करून ) अग अविचारिणी , साहसी मुली हा काय अविचार ( भलतेसलते ) आरंभिला आहेस ?

तुझ्या गळ्यांत फास असला म्हणजे माझे प्राण कंठाशी येतात ;

म्हणून तुला परावृत्त करण्याची ही खटपट माझ्या फायद्याची आहे . हे लाडके , अविचार सोड ! १ .

सागरिका —— ( राजाला पाहून ) ओहो , हे काय ? हे महाराज ! ( आनंदाने स्वतःशी ) खरे सांगायचे तर यांना पाहून माझी आणखी जगण्याची उत्कट इच्छा बळावली . किंवा यांना पाहून धन्य होईन आणि आनंदाने प्राण सोडीन . ( मोठ्याने ) सोडावे महाराजांनी . मी दुसर्‍याच्या ताब्यात आहे . मरण्याची अशी संधि पुन्हा सापडणार नाही .

( पुन्हा गळ्याला फास लाविण्यास आरंभ करते.)

राजा —— ( न्याहाळून आनंदाने ) हें काय ? माझी लाडकी सागरिका ! ( गळ्यातून फास ओढून , बाजूस करून ) हे जीविताच्या स्वामिनी , तुझे हे अत्यंत अविचारांचे कृत्य एकदम थांबव ! अग , हा वेलीचा फास तत्काळ काढ . चंचल ( जावयास निघालेले ) प्राणसुद्धा वाचविण्यासाठी ( अडविण्यासाठी ) इथे एकान्तांत थोडा वेळ माझ्या गळ्याला बाहूंचा फास ( मिठी ) घाल ! १७ .

( बाहु गळ्याभोवती ठेवून स्पर्शाच्या आनंदाचा अभिनय करून विदूषकाला) मित्रा, मेघ नसताना पडलेला हा पाऊस !

विदूषकः —— अरे , जर अवेळी येणार्‍या वावटळीसारखी महाराणी वासवदत्ता येणार नसली तर तुझें हें बोलणे खरें !

( मग वासवदत्ता आणि कांचनमाला येतात.)

वासवदत्ता —— गडे कांचनमाले , तशा प्रकारे पाया पडलेल्या त्या आर्यपुत्रांना झिडकारून येण्यांत मी फार कठोर वागले . तर आता स्वतःच जाऊन आर्यपुत्रांची मनधरणी

करिते .

कांचनमाला —— महाराणीच्या दुसर्‍या कोणाला असे बोलता येईल ? ते महाराजच कपटी झालेले चालतील ; पण महाराणीने तसे होऊं नये ! म्हणून यावे , यावे महाराणीने ! ( इकडेतिकडे हिंडतात .)

राजा —— हे सुंदरी , अजूनहि तुझ्या थंडपणामुळे ( उदासीन वृत्तीने ) आमचे मनोरथ फुकट जाणार ना ?

कांचनमाला —— ( कान देऊन ) ज्या अर्थी महाराजांचे बोलणें जवळ ऐकू येत आहे त्या अर्थी मला वाटते तुझीच मनधरणी करण्यासाठी ते येत आहेत . महाराणीने जवळ जावे .

वासवदत्ता —— ( आनंदाने ) तर दृष्टीस पडतांच मागून जातें आणि गळा मिठी घालून खूष करिते .

विदूषक —— गडे सागरिके , विश्वासाने प्रिय मित्राशी बोल .

वासवदत्ता —— ( ऐकून , खिन्नपणे ) कांचनमाले , सागरिकासुद्धा इथे आहे . तर ऐकू . कळल्यावर जवळ जाईन . ( तसे करते .)

सागरिका —— महाराज , या खोट्या - फसव्या सौजन्याचा काय उपयोग ? अशाने प्राणांपेक्षासुद्धा अधिक प्रिय देवीशीं आपण प्रतारणा करीत आहा ?

राजा —— अग , तूं खोटारडी आहेस . कारण हिचे स्तन रागाच्या सुस्कार्‍यांनी खालीवर होऊं लागले म्हणजे माझा भीतीने थरकाप होतो ! हिने अबोला धरला म्हणजे मी गोड - गोड बोलू लागतों ! तसेंच हिचे मुख , भिवया वाकड्या केल्यामुळे क्रोधायमान झाले म्हणजे , मी हिच्या पायांवर लोटांगण घालतो ! अशा रीतीने आमच्या जन्मजात कुलीनप्रमाणे उत्पन्न केलेली नुसती सेवाच देवीच्या ( वाट्याला ) ; पण मनोमन स्नेहाच्या रज्जूने ( बंधनाने ) वाढीस लाविलेले म्हणून अवीट गोडी असलेले जें प्रेम ते फक्त तुझ्यावर ( च ) ! १८ .

वासवदत्ता —— ( जवळ जाऊन रागाने ) आर्यपुत्रा , हे शोभते ना ? हें छान दिसतें ना !

राजा —— ( पाहून आश्चर्याने ) महाराणी , कारण नसतांना मला निखंदणे तुला शोभत नाही . तूंच आहेस अशा समजुतीने , वेषभूषा सारखी असल्यामुळे फसून , आम्ही इथे आलो . तर क्षमा कर . ( पाया पडतो .)

वासवदत्ता —— ( रागाने ) आर्यपुत्रा , उठा , उभे राहा . माझ्या थोर कुळांतील जन्मामुळे अजूनहि ( माझी ) खुशामत करून आपण कां कष्टी होता ?

राजा —— ( स्वतःशी ) हेसुद्धा महाराणीने ऐकिले ना ? यास्तव महाराणीला खूष करण्याविषयी आम्ही पूर्ण निराश झालों आहो . ( तोंड खाली करून उभा राहतो .)

विदूषकः —— बाईसाहेब , तुम्ही खरोखर आपल्याला टांगून घेऊन मरत आहां म्हणून सारख्या वेषभूषेने फसून मी प्रिय मित्राला इथे आणिले . जर माझ्या बोलण्याचा भरवसा नसेल तर हा वेलीचा फास बघा . ( वेलीचा फास दाखवितो .)

वासवदत्ता —— ( रागाने ) अग कांचनमाले , याच फासाने बांधून घे ( आपल्या बरोबर ) या ब्राह्मणाला ! आणि या उद्धट मुलीला पुढे चालू दे .

कांचनमाला —— जशी महाराणीची आज्ञा ! ( वेलीचा फास गळ्याला बांधून वसंतकाला बडविते .) नीचा , लुब्र्य़ा भोग आपल्या उद्धटपणाचे फळ ! सागरिके तूंहि हो पुढे .

सागरिका —— ( स्वतःशी ) मला पापिणीला आपल्या इच्छेप्रमाणे मरतांहि आलें नाही !

विदूषक —— ( दुःखाने ) अरे दोस्ता , महाराणीच्या तावडीतून माझी सुटका करायची या गोष्टीची आठवण असू दे . ( राजाकडे बघतो .)

( वासवदत्ता राजाकडे पाहणार्‍या सागरिकेला व वसंतकाला घेऊन कांचनमालेसह जाते.)

राजा —— ( दुःखाने ) अरेरे ! केवढे संकट !

पुष्कळ काळ टिकलेल्या रागामुळे ज्याचे प्रेमळ हास्य हिरावून घेतले आहे असे महाराणीचे ते प्रसन्न मुख मी डोळ्यावमोर आणूं ? किंवा तसेच भ्यालेल्या आणि राग अनावर झालेल्या वासवदत्तेने धमकाविलेल्या सागरिकेचा विचार करूं ? का इथून बांधून नेलेल्या वसंतकाची काळजी वाहूं ? सर्व प्रकारांनी गांजलेल्या मला क्षणभरहि सुख ( शांति ) लाभत नाही ! १९ .

तर आता इथे थांबण्याचा काय उपयोग ? महाराणीलाच प्रसन्न करण्यासाठी अंतःपुरांत जातो . ( सर्व जातात .)

‘ संकेत’ नावाचा तिसरा अंक समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP