जितकें थोर ब्रह्मांड ॥ तैसेंच आकाश प्रचंड ॥ तेथें घट मठ हें बंड ॥ वेगळें व्यर्थ भावावें ॥१॥
तैसा निर्विकार जगजेठी ॥ न चलती द्वैतभावाच्या गोष्टी ॥ तेथें कैंची रावणाची भेटी ॥ बाह्यदृष्टी त्यजीं कां ॥२॥
मयजा म्हणे जानकीसी ॥ सर्वव्यापक अयोध्यावासी ॥ किंवा आहे एकदेशी ॥ सांग मजपाशीं निश्र्चयें ॥३॥
यावरी त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले विदेहराजनंदिनी ॥ म्हणे त्रिपुटी गेल्या जेथें विरूनी ॥ तटस्थ वाणी निगमांची ॥४॥
ध्येय ध्याता ध्यान ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ॥ नुरे भजक भज्य भजन ॥ सांग रावण तेथें कैंचा ॥५॥
जें जें दिसे ते ते नाशिवंत ॥ वस्तु एक अभेद शाश्र्वत ॥ मंदोदरी आणि सीता तेथ ॥ कोणीकडे पहाव्या ॥६॥
दोरावर दिसे विखार ॥ शुक्तिकेचे ठायीं रजत साचार ॥ तैसाच मायेचा प्रकार ॥ मिथ्याविकार जाणपां ॥७॥
मयकन्या सावध होय ॥ दृष्टीनें सर्व पाहे अद्वय ॥ निर्विकार वस्तु निरामय ॥ हाही न साहे शब्द जेथें ॥८॥
वस्तु अव्यक्त अनाम ॥ तेथें राम हेंही न साहे नाम ॥ ऐसे जयासी कळे वर्म ॥ आत्माराम तोचि पैं ॥९॥
ऐसा जो जाहला परिपूर्ण ॥ त्यास समाधि आणि विधान ॥ बोलणें आणि मौन ॥ दोनी त्याची विरालीं ॥११०॥
ऐसें जगन्माता बोलत ॥ मयजा ब्रह्मानंदे डुल्लत ॥ समाधि ग्रासोनि तटस्थ ॥ विराला हेत सर्वही ॥११॥
बोलणें आणि संवाद ॥ खुंटोनि जाहला अभेद ॥ ओतला एक ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्रुरु ॥१२॥
आनंद जिरवून अंतरीं ॥ सावध जाहली मंदोदरी ॥ जगन्मातेचे चरण धरी ॥ सद्द अंतरी होऊनियां ॥१३॥
म्हणे संशय निरसला पूर्ण ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥ विदेहकन्येचे चरण ॥ वारंवार धरी मग ॥१४॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ धन्य तो दिवस साचार ॥ सत्संगें आत्मविचार ॥ सारासार होय पैं ॥१५॥
भागीरथी सर्वत्र पवित्र ॥ परी प्रयागमहिमा अपार ॥ तैसा रामविजय परिकर ॥ मंदोदरीसंवाद हा ॥१६॥
सर्वत्रां सुलभ ते भीमा ॥ परी पंढरीस अगाध महिमा ॥ स्नान करितां कर्मांकर्मां ॥ पासूनि मुक्त होईंजे ॥१७॥
असो सीतेची आज्ञा घेउनी ॥ स्वधामा गेली मयनंदिनी ॥ रावणाप्रती जाऊनी ॥ वर्तमान सांगतसे ॥१८॥
तप्तलोहावरी उदक पडलें ॥ तें माघारें निघे एकवेळे ॥ परी जानकी कदा काळें ॥ वश नव्हे तुम्हासी ॥१९॥
मृगजळी बुडेल अगस्ति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥ हेंही घडे परी सीता सती ॥ वश नोहे तुम्हांतें ॥१२०॥
जे गोष्टीनें होय अनर्थ ॥ आपले कुळाचा होय घात ॥ ऐशिया बुद्धीनें पंडित ॥ काळत्रयीं न वर्तती ॥२१॥
हातीचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंच घ्यावें शेण ॥ गोड शर्करा वोसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२२॥
मुक्तें सांडोनि परिकरें ॥ कां पदरीं बांधावीं खापरें ॥ वोसंडूनि रायकेळें आदरें ॥ अर्कीफळें कां भक्षावी ॥२३॥
याकरितां द्विपंचवदना ॥ सोडावी रामाची अंगना ॥ कायावाचामनें जाणा ॥ रघुनंदना शरण रिघावें ॥२४॥
परसतीचा अभिलाष ॥ महापुरुषास ठेवणें दोष ॥ बळवंतावरी बांधणें कास ॥ मग अनर्थास काय उणें ॥२५॥
विवसी हे परम सीता ॥ अनर्थकारक घोर वनिता ॥ हे नेऊन द्यावी रघुनाथा ॥ तरीच तुम्हां कल्याण ॥२६॥
महासर्प उशी घेउनी ॥ कैसा निजेल सुखशयनीं ॥ बळेंच गृहास लाविल्या अग्नि ॥ मग अनर्थासि काय उणें ॥२७॥
परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणोनि प्राशन करणें विष ॥ करितां परनिंदा द्वेष ॥ मग अनर्थासी काय उणें ॥२८॥
परम साधु बिभीषण ॥ तुमचा अविवेक देखोन ॥ अयोध्यापतीस गेला शरण ॥ जन्ममरण चुकविलें ॥२९॥
परम प्रतापी रघुनंदन ॥ उदधीवरी तारिले पाषाण ॥ हा प्रताप तुम्ही जाणून ॥ द्वेषबुद्धि कां धरितां ॥१३०॥
ऐशिया शब्दसुमनेंकरून ॥ मयजेनें पूजिला रावण ॥ मग प्रत्युत्तर हांसोन ॥ देता झाला ते काळी ॥३१॥
प्रिये तूं बोलसी वचनें ॥ तीं मज मानलीं बहुत गुणें ॥ परी आपुला पुरुषार्थ टाकणें ॥ तरी जिणें व्यर्थ लोकीं ॥३२॥
चिरंजीव जाहला बिभीषण ॥ प्रळयी तरी पावेल मरण ॥ तोंवरी देहलोभ धरून ॥ बैसतां काय सार्थक ॥३३॥
कल्पपर्यंत जीवूनी ॥ पडिले शरीर बंदिखानीं या पुरुषार्थासी शुभ कल्याणी ॥ मानी कोण सांगपां ॥३४॥
आदि पुरुष रघुनंदन ॥ हें मी जाणें सर्व वर्तमान ॥ तो मजसी युद्धकामना धरून ॥ सागर उतरूनि आला आहे ॥३५॥
त्याची वासना न पुरवितां ॥ कदा माघारी नेदी सीता ॥ तरी मी आपुल्या पुरुषार्था दावोनि राघवा जिंकीन ॥३६॥
ऐसें ऐकोनि ते अवसरीं ॥ चिंताक्रांत होऊनि मंदोदरी ॥ प्रवेशली निजमंदिरी ॥ क्लेशचक्रीं पडियेली ॥३७॥
असो आतां यावरी ॥ रावण चढला गोपुरीं ॥ जैसा बलाहक पर्वतशिखरीं ॥ कृष्णवर्ण उतरला ॥३८॥
चपळेहून तेज आगळे ॥ आंगी अलंकार मिरविले ॥ दाही छत्रे ते वेळे ॥ मस्तकावरी विराजती ॥३९॥
भोंवते सेवकजन बहुत ॥ उपभोग देती समस्त ॥ इकडे बिभीषण रामासी दावित ॥ रावण गोपुरीं चढला तो ॥१४०॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ हा परम उंच सुवेळागिरी ॥ अवघे वळंघोनियां वरी ॥ लंकापुरी पाहूं चला ॥४१॥
ऐसें बोलतां अयोध्याधीश ॥ उठले तत्काळ कपिपुरुष ॥ सुवेळाचळीं आसपास ॥ चढले तेव्हां वायुवेगें ॥४२॥
जैशा कनकाचळावरी ॥ चढल्या निर्जरांच्या हारी ॥ तैसा वानरांसह ते अवसरीं ॥ अयोध्याविहारी चढतसे ॥४३॥
रघुपतीचे दोनी कर ॥ धरिती बिभीषण सूर्यकुमर ॥ सुवेळाचळीं रघुवीर ॥ कैसा शोभला ते काळीं ॥४४॥
उदयाचळावरी बाळमित्र ॥ ऐरावतावरी सहस्रनेत्र ॥ कैलासावरी कर्पूरगौर ॥ त्रिभुवनेश्र्वर दिसे तेवीं ॥४५॥
जो लावण्यमृतसागर ॥ स्मरारिमित्र मनोहर ॥ झळकती समुद्रदत्त अलंकार ॥ चपळेहूनि तेजागळे ॥४६॥
तेणें शोभला अयोध्यानाथ ॥ दिव्य पीतवसन विराजत ॥ असो गोपुरावरी लंकानाथ ॥ विलोकित रामाकडे ॥४७॥
वानरांसहित रावणारी ॥ शोभतसे सुवेळाद्रीवरी ॥ जैसा इंद्रादि सकळ सुरवरीं ॥ वैकुंठपति वेष्टिला ॥४८॥
कीं अनंत श्रुत्यर्थ समवेत ॥ तो वेदोनारायण विराजत ॥ किंबाहुना वृक्षांसहित ॥ कल्पद्रुम विराजे ॥४९॥
तैसा महावीरीं वेष्टित ॥ शोभतसे सीताकांत ॥ परी ते समयीं सूर्यसुत ॥ कर्म अद्भुत करिता जाहला ॥१५०॥