अध्याय चोवीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥

कळेल समुद्राचा अंत ॥ सांपडेल अंबराचें गणित ॥ त्याहून रामकथा अद्भुत ॥ नलगे अंत कवणातें ॥१॥

अद्भुत धांवे प्रभंजन ॥ त्याची मोट बांधवेल आकर्षून ॥ परी या रघुपतीचे चरण ॥ वर्णितां अंत न कळेची ॥२॥

सहस्रवदनेंकरून ॥ वर्णी काद्रवेयकुळभूषण ॥ नेति नेति म्हणोन ॥ वेदही तेथे तटस्थ ॥३॥

रघुवीरगुणांची सरोवरपाळ ॥ तेथें व्यास वाल्मीक हे मराळ ॥ ज्यांच्या मतीमाजी सकळ ॥ ब्रह्मांड हे ठेंगणें ॥४॥

तिहीं गुण वर्णितां अपार ॥ अंत न कळेचि साचार ॥ तेथें मानवशलभ पामर ॥ गुणांवर केविं क्रमी ॥५॥

तरी सांडोनि अभिमान ॥ वर्णावे रघुपतीचे गुण ॥ गंगाप्रदेश म्हणोन ॥ तृषाक्रांता केवि सोसवे ॥६॥

तैसे सीतावल्लभाचे गुण ॥ वर्णावे यथामतिकरोन ॥ असो पूर्वाध्यायीं अनुसंधान ॥ आला रघुवीर सुवेळे ॥७॥

आतां वाग्देवी परम डोळस ॥ उघडी युद्धकांडमांदुस ॥ त्यांतील साहित्यरत्नें विशेष ॥ ग्राहक पंडित तयांचे ॥८॥

रावणाचीं दाही छत्रें ॥ छेदोनि पाडिलीं सौमित्रें ॥ परम म्लान दाही वक्रें ॥ मयजापतीची जाहली ॥९॥

सकळ प्रधानांसहित ॥ विचारा बैसला लंकानाथ ॥ माझे तरी दोन हेत ॥ कैसे पुरती नेणें मी ॥१०॥

रामलक्ष्मणां संहारूनी ॥ वश्य व्हावी जनकनंदिनी ॥ यावेगळी माझे मनीं ॥ चिंता दुसरी नसेचि ॥११॥

तंव वज्रदंष्ट्र म्हणे लंकानाथा ॥ सीतेची भीड कासया धरितां ॥ बळेंचि आणोनि तत्वतां ॥ कामना आपुली पुरविजे ॥१२॥

मग बोले दशकंधर ॥ मज विरिंचीचा शाप थोर ॥ परस्त्रीवरी करितां बलात्कार ॥ शतचूर्ण तरु होय पैं ॥१३॥

मृगपतीचे फुटले नयन ॥ कीं व्याघ्राचे हस्त टाकिले तोडोन ॥ कीं भुजंगाचे दांत पाडून ॥ केली दीन गारोडिये ॥१४॥

वनी सर्वांत श्रेष्ठ वारण ॥ परी सिंह देखतां तात्काळ मरण ॥ तैसा मी शापबंधनें पूर्ण ॥ बळक्षीण जाहलों ॥१५॥

तरी ते जनकजा मनींहूनी ॥ आपणचि वश्य होईल शयनीं ॥ ऐसी करणी करा कोणी ॥ राघवीं मन विटे तिचें ॥१६॥

मग विद्युज्जिह्व प्रधान ॥ जो कापट्यविद्येमाजी प्रवीण ॥ तो म्हणे मी निर्मीन ॥ रघुत्तमाचें शिरकमळ ॥१७॥

आणि राघवहस्तींचे कोदंड ॥ मायामय निर्मीन प्रचंड ॥ तेणें सीतेचें हृदयखंड ॥ असत्य न वाटे सहसाही ॥१८॥

ऐसें ऐकतांचि लंकापति ॥ परम संतोषला पावला चित्तीं ॥ जैसा मद्यपी पाहतां पंथीं ॥ तंव शिंदीवन देखिलें ॥१९॥

आधीच जारकर्मीं रत ॥ त्यांत स्त्रीराज्य जाहलें प्राप्त ॥ कीं श्र्वानें वमन अकस्मात ॥ दृष्टीं देखिलें तेधवां ॥२०॥

कीं निंबोळ्या देखतां बहुवस ॥ परम संतोषे वायस ॥ तैसा हर्षला लंकेश ॥ वचन ऐकतां तयाचें ॥२१॥

विद्युज्जिव्हासी म्हणे लंकापति ॥ आम्हांमध्ये तूं केवळ बृहस्पती ॥ तरी शीघ्र शिरधनुष्यांप्रति ॥ घेवोनि येईं अशोकवना ॥२२॥

कापट्यवेषी विद्युज्जिव्हा ॥ वस्त्राभरणी गौरविलें तेव्हां ॥ कृत्रिम निर्मिले तेधवां ॥ तर्क करितां नेणवेची ॥२३॥

इकडे आधी लंकानाथ ॥ प्रवेशला अशोकवनांत ॥ तों अधोवदनें तटस्थ ॥ जगन्माता बैसली ॥२४॥

सीतेजवळी उभा रावण ॥ जैसा कमळिणीसमीप वारण ॥ कीं हरिणीजवळी येऊन ॥ व्याघ्र उभा ठाकला ॥२५॥

याउपरी राक्षसपाळ ॥ सीतेजवळी बोले अमंगळ ॥ म्हणे तुवां धैर्य धरिलेंसे सबळ ॥ परी ते निष्फळ जाहलें ॥२६॥

मजलागीं तूं आतां वरीं ॥ तुझें सेवेसी मंदोदरी ॥ तुझे आज्ञेत लंकानगरी ॥ वर्तवीन जानकीये ॥२७॥

तुझीया पतीस जाहले मरण ॥ आधी ते ऐके वर्तमान ॥ सागरीं सेतू बांधोन ॥ सुवेळेसी सर्व आले ॥२८॥

तंव आमचा प्रधान प्रहस्त ॥ निमेषामाजी गेला सेनासमवेत ॥ राम सौमित्र होते निद्रिस्थ ॥ तंव घाला तिहीं घातला ॥२९॥

तुझीया पतीचे शिरकमळ ॥ प्रहस्तें छेदिलें तात्काळ ॥ सांवळे कबंध विशाळ ॥ सुवेळेसी पडियेलें ॥३०॥

वधावा जो लक्ष्मण ॥ तंव तो अयोध्येसी गेला पळून ॥ आमचा बंधु बिभीषण ॥ तोही तेथेंचि पडियेला ॥३१॥

सुग्रीव आणि अंगद ॥ त्यांचाही केला शिरच्छेद ॥ जांबुवंत आणि मैंद ॥ यांचे जानुचरण खंडिले ॥३२॥

नळ नीळ अंजनीसुत ॥ निजले ठायीं केले चूर्णवत ॥ वरकड मर्कटें सैन्य बहुत ॥ राक्षसी सर्व गिळियेलीं ॥३३॥

सेतू पाडिला समग्र ॥ मग कोठें पळतील वानर ॥ शोणिताचे वाहती पूर ॥ जाती भेटों सागरातें ॥३४॥

हें जरी तूं असत्य मानिसी ॥ तरी आतांचि येईल प्रत्ययासी ॥ विद्युज्जिव्ह वेगेंसी ॥ शिर घेवोनि पातला ॥३५॥

तेणें धनुष्य आणि शिर ते वेळे ॥ रामवल्लभेपुढें आणोनि ठेविलें ॥ मुख राजस सांवळे ॥ शोणितें माखलें ते काळी ॥३६॥

किरीटकुंडलें मंडित वदन ॥ सरळ नासिक झळकती दशन ॥ कपाळी केशर आकर्ण नयन ॥ आरक्त रेखांकित जें ॥३७॥

ऐसे देखतां जनकनंदिनी ॥ मूर्च्छना येऊनि पडे धरणी ॥ की अग्नीत पडली कमळिणी ॥ जाय करपोनी जयापरी ॥३८॥

तंव ते दशकंठरिपूची प्रिया ॥ उठे मूर्च्छना सांवरूनियां ॥ हृदयी शिरकमळ धरोनियां ॥ शोक करी अद्भुत ॥३९॥

अहो ते त्रिभुवनपतीची राणी ॥ शोकार्णवीं बुडाली ते क्षणी ॥ तो शोक सांगता उलथे धरणी ॥ कवीची वाणी कुंठित ॥४०॥

म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा जगन्मोहना ॥ अनंतगुणसंपन्ना ॥ काय ऐसें हे केले ॥४१॥

चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ रघुवीरा श्रमलेति वनांत ॥ कोमळ चरणी बहुत ॥ कंटक हरळ रूतले ॥४२॥

मजकारणें श्रमलां काननी ॥ अहा सीता म्हणवोनी ॥ तृण पाषाण हृदय धरोनी ॥ उद्धरिले की रघुपती ॥४३॥

मजकारणें वाळी मारिला ॥ सूर्यसुत मित्र केला ॥ हनुमंत शुद्धीसी धाडिला ॥ शिळीं बांधिला सागर ॥४४॥

सुवेळे येवोनि सत्वर ॥ वैरियांशी यश दिधले अपार ॥ कां संपविला अवतार ॥ मज भवपुरीं लोटिलें ॥४५॥

रविकुलावतंस श्रावणारी ॥ त्याची स्नुषा मी जनककुमारी ॥ अयोध्याधीशा तुझी अंतुरी ॥ सोडवील आतां मज कवण ॥४६॥

मी परदेशी ये दीन ॥ रघुवीरा कोणासी जाऊं शरण ॥ सूर्यवंशी संपूर्ण ॥ डाग लागला यावरी ॥४७॥

वाल्मीकानें भविष्य केलें ॥ ते अवघें आजि बुडालें ॥ जंबुकें जाऊनि मारिलें ॥ पंचाननासी नवल हें ॥४८॥

अजाखुरींच्या जीवनी ॥ सिंह अडखळोनि पडला कैसेनी ॥ की मूषकाचिये वदनीं ॥ पंचानन सांठवे ॥४९॥

कर्पूराचे पुतळे केवळ ॥ तिहीं उभा ग्रासिला वडवानळ ॥ जगद्भक्षक जो जगीं काळ ॥ त्यासी भूतानें ग्रासिलें ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP