अध्याय चोवीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


मशकाची झेंप लागतां ॥ कनकाद्रि पडला खालता ॥ श़ृगालांनी तत्वतां ॥ बांधिला कैसा ऐरावत ॥५१॥

खद्योततेजेंकरोनी ॥ कैसें ब्रह्मांड गेलें आहाळोनी ॥ पिपीलिकाउदरीं जाउनी ॥ सिंह कैसा सांठवला ॥५२॥

लागतां मक्षिकेचा पक्षवात ॥ भयभीत जाहला भोगीनाथ ॥ चित्रींच्या सर्पे अकस्मात ॥ अरुणानुज गिळियेला ॥५३॥

तैसें अघटित घडलें एथ ॥ राक्षसें जिंकिला रघुनाथ ॥ कर्माची गति गहन बहुत ॥ कैसा अनर्थ करूं आतां ॥५४॥

भूधरावतार लक्ष्मण ॥ कैसा रामासि गेला टाकोन ॥ तो अयोध्येसी जाऊन ॥ काय सांगेल भरतातें ॥५५॥

तत्काळ कौसल्या त्यजील प्राण ॥ होईल कैकयीचें समाधान ॥ लागेल सूर्यवंशासी दूषण ॥ जाहलें खंडण वंशाचें ॥५६॥

ऐसा शोक करी मंगलभगिनी ॥ मुखावरी मुख ठेउनि ॥ अश्रुधारा स्रवती ॥ नयनीं ॥ भिजे अवनी ते काळीं ॥५७॥

असो जानकी म्हणे दशमुखा ॥ हे होणार न चुके कर्मरेखा ॥ तरी मिथिलानाथ जनका ॥ समान मज अससी तूं ॥५८॥

आतां माहेर इतुकेंच करी ॥ वन्हिशेज रचोनि झडकरी ॥ या शिरासमवेत निर्धारीं ॥ अग्निमाजीं प्रवेशेन ॥५९॥

सत्व न सांडी जनकनंदिनी ॥ हें रावणासी कळले मनीं ॥ परम म्लानमुख होउनी ॥ गेला निघोनि सभेत ॥६०॥

रावण गेलिया जनकनंदिनी ॥ बुडाली शोकार्णवजीवनी ॥ तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा आली गुप्तरूपें ॥६१॥

ते क्षणक्षणां येऊन घेत जानकीचे दर्शन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ जें जें लंकेत वर्तलें ॥६२॥

रघुपतीचें जे कां हित ॥ तें बिभीषणासी करणें अगत्य ॥ तैशीच सरमा येऊन तेथ ॥ सांभाळीत जानकीतें ॥६३॥

नाना सूक्ष्म रूप धरीत ॥ राक्षस कापट्यही जाणत ॥ तितुकें जानकीस श्रुत करित ॥ क्षणक्षणां येऊनियां ॥६४॥

असो सरमा म्हणे जानकीसी ॥ माये शोक किमर्थ करिसी ॥ राम सुखी आहे सुवेळेसी ॥ सकळ सेनेसहित पैं ॥६५॥

तुज वश करावया ये क्षणीं ॥ रावणें कृत्रिम केली करणी ॥ बरवें पाहीं विचारूनी ॥ मूळ दृष्टीं घालोनियां ॥६६॥

जनकात्मजे तव स्वयंवरी ॥ चाप बैसलें रावणाचे उरीं ॥ तें तुझ्या पतीनें झडकरी ॥ द्विखंड करूनि टाकिले ॥६७॥

त्याहूनि चाप जड ये वेळे ॥ प्रहस्तें जाऊनि कैसें आणिलें ॥ कृत्रिमधनु मुंड आणिलें ॥ निर्मून त्याचसारिखें ॥६८॥

ऐसें सरमा जों बोलत ॥ तों धनुष्य शिर जाहलें गुप्त ॥ जैसा वात लागतां अकस्मात ॥ दीप जाय विझोनी ॥६९॥

कीं जलदजालाभीतरीं ॥ इंद्रधनुष्य उमटे क्षणभरी ॥ तैसें कोदंडही झडकरी ॥ गुप्त जाहलें तेधवां ॥७०॥

असो जानकी म्हणे सरमेप्रती ॥ धन्य हो माये तुझी मती ॥ राक्षसांच्या कापट्यगती ॥ तुज समजती सर्वही ॥७१॥

मग अयोध्यापतीची राणी ॥ सरमेसी जवळी बोलावूनी ॥ हृदयीं धरीत प्रीतीकरूनी ॥ म्हणे स्वामिनी होसी लंकेची ॥७२॥

तों देववाणी जाहली अकस्मात ॥ सुखरूप आहे अयोध्यानाथ ॥ सीतेचा आनंद अद्भुत ॥ अंबरामाजी न समाये ॥७३॥

असो इकडे लंकापती ॥ परम चिंताक्रांत एकांतीं ॥ बोलतसे मंदोदरीप्रती ॥ तेंच श्रोतीं परिसिजे ॥७४॥

मंदोदरी परम सज्ञान ॥ पतिव्रता गुणसंपन्न ॥ जिचें सौंदर्य पाहून ॥ मीनकेतन तटस्थ ॥७५॥

मयजेचें इच्छित मन ॥ घ्यावें जानकीचे दर्शन ॥ तो मंदोदरीस दशवदन ॥ बोलता जाहला ते वेळे ॥७६॥

रावण म्हणे शुभकल्याणी ॥ तुवां जाऊनि अशोकवनीं॥ बोधोनियां जनकनंदिनी ॥ मज शयनी वश करीं ॥७७॥

तूं पतिव्रतांमाजी मंडण ॥ एवढें कार्य दे साधून ॥ तंव ते मंदोदरी हास्यवदन ॥ अश्वय म्हणोनि उठली ॥७८॥

चंद्राचे ठायीं कलंक ॥ त्याहून विशेष मयजेचें मुख ॥ अशोकवना तात्काळिक ॥ येती जाहली पतिव्रता ॥७९॥

त्रिजटा म्हणे भूमिकुमरी ॥ तव दर्शना आली मंदोदरी ॥ ऐसें ऐकतां अंतरीं ॥ परम संतोषली जगन्माता ॥८०॥

ते चातुर्यसरोवरमराळिका ॥ मयजा सुगंधचंपककळिका ॥ जैसी सिंहस्थीं जान्हवी देखा ॥ भेटों जाय गौतमीतें ॥८१॥

सीतेचिया चरणांवरी ॥ मयजा जों नमस्कार करी ॥ तो सीतेनें धरूनि झडकरी ॥ हृदयी धरिली प्रीतीनें ॥८२॥

की त्या सिता असिता ॥ एके ठायी मीनल्या तत्वतां ॥ कीं इंदिरा आणि शिवकांता ॥ एकीस एक भेटती ॥८३॥

एक शची एक सरस्वती ॥ एक कृष्णा एक गोमती ॥ एक मंदाकिनी एक भोगावती ॥ मूर्तिमंत पातल्या ॥८४॥

असो वरद भाक विसरून ॥ स्वानंदसमुद्रीं जाहल्या लीन ॥ चतुःषष्ठी अंतःकरण ॥ विरून गेलें रघुनाथीं ॥८५॥

कीं वेदशास्त्रींच्या श्रुती ॥ ऐक्यत्वीं ऐक्यास येती ॥ तैशा आलिंगोनी बैसती ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८६॥

जे कां विषकंठवंद्यप्रिया ॥ तिजप्रति बोले दशकंठजाया ॥ आजी सुदिन म्हणोनियां ॥ दर्शन जाहलें माये तुझें ॥८७॥

क्षण एक निवांत राहून ॥ मयजा बोले सुवचन ॥ म्हणे सर्वांभूतिं समसमान ॥ रघुनंदन एक असे ॥८८॥

अनेक तरंग एक सागर ॥ बहुत घरें एक अंबर ॥ अनेक मणी एक सूत्र ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥८९॥

एक सुवर्ण बहु अलंकार ॥ बहु तरंग एक नीर ॥ बहुत मातृका एक ओंकार ॥ तैसा रघुवीर व्यापकत्वें ॥९०॥

एक शरीर अवयव अपार ॥ बहुत पत्रें एक तरुवर ॥ बहुत जळचरें एक नीर ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥९१॥

एक चाराचर सर्वांभूतीं ॥ तोच नांदे अयोध्यापति ॥ तरी दशमुखाची केलिया प्रीती ॥ काय स्थिति उणी होय ॥९२॥

सकळ देहीं अयोध्याधीश ॥ तरी वेगळा कां भाविसी लंकेश ॥ सीता दुराग्रह विशेष ॥ व्यर्थ कां करिसी सांग पां ॥९३॥

मयजेचा शब्द ऐकूनी ॥ हंसूनी बोले जनकनंदिनी ॥ अभेद एक चापपाणी ॥ सर्वांभूतीं भरलासे ॥९४॥

सर्वही घट मठ जाण ॥ काय फोडून घातलें गगन ॥ अभेद एक रघुनंदन ॥ दुजेपण तेथें कैेंचें ॥९५॥

मायिक भासे जगडंबर ॥ जैसा मृगजळाचा मिथ्या पूर ॥ वंध्यावल्लीचें पक्व फळ विचित्र ॥ मिथ्यामय लटिकेंचि ॥९६॥

स्वप्नींची संपदा पूर्ण ॥ किंवा आरशांतील धन ॥ कीं दरिद्रियाचे मनोरथ पूर्ण ॥ मिथ्यामय सर्वची ॥९७॥

मिथ्या अलंकार एक सुवर्ण ॥ मिथ्या तरंग एक जीवन ॥ अभेद एक रघुनंदन ॥ तेथें रावण कोण कैंचा ॥९८॥

ब्रह्मानंदस्वरूपावरी ॥ न दिसे दुजेपणाची कुसरी ॥ तेथें सीता आणि मंदोदरी ॥ मिथ्याभास लटिकाची ॥९९॥

कैंची पृथ्वी कैंचे गगन ॥ कैंचें आप तेज पवन ॥ मिथ्या माया कैंचें त्रिगुण ॥ तेथें रावण कोठें आहे ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP