अध्याय सव्वीसावा - श्लोक २०१ ते २२०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


तैसें लत्ताप्रहारेंकरून ॥ असुरहृदय केले चूर्णं ॥ रक्त ओकीत रावण ॥ रथावर गेला आपुल्या ॥१॥

तों सावध जाहला लक्ष्मण ॥ वेगें सोडी निर्वाण बाण ॥ रावणाचें हृदय फोडून ॥ पलीकडे शर गेला ॥२॥

व्यथा सौमित्राची देखोन ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥ अनुज पाठीसी घालून ॥ पुढें जाहला रघुवीर ॥३॥

रावण आरूढला रथावरी ॥ जैसा जलद नगशिखरी ॥ ऐसा देखतां रावणारि ॥ काय करिता जाहला ॥४॥

हनुमंतस्कंधावरी रघुवीर ॥ उभा ठाके रावणासमोर ॥ जैसा उदयाचळीं दिनकर ॥ किंवा श्रीधर गरुडावरी ॥५॥

ऐरावतारूढ शचीनायक ॥ कीं नंदीवरी मदनांतक ॥ तयापरी अयोध्यानायक ॥ हनुमंतस्कंधी शोभला ॥६॥

क्रोधायमान रघुनंदन ॥ प्रथम सोडी एक बाण ॥ रावणाचीं दाही छत्रें छेदून ॥ अकस्मात पाडिलीं ॥७॥

मित्रपत्रें आणि चामरें ॥ सवेंचि छेदिली दुज्या शरें ॥ मुकुट भूमीसी एकसरें ॥ चूर करून पाडिले ॥८॥

सवेंच भाते दहाही धनुष्यें ॥ छेदोनि पाडिलीं अयोध्याधीशें ॥ विचित्र केलें परमपुरुषें ॥ प्रथमारंभी ते काळीं ॥९॥

राघव बोले गर्जोनी ॥ दशमुखा तुज सोडिलें रणी ॥ आज श्रमलासी रणांगणीं ॥ जाय सत्वर माघारा ॥२१०॥

आपली संपदा भोगून ॥ सकळ स्त्रियांस येईं पुसोन ॥ पुत्र पौत्र आप्तजन ॥ निरोप घेऊन येईं त्यांचा ॥११॥

मग झुंजतां समरांगणीं ॥ तुझा देह खंडविखंड करूनि ॥ तत्काळ पाडीन धरणीं ॥ निश्चय मनीं जाण पां ॥१२॥

इतुकी जवळी असतां सेना ॥ तूं कां आलासी समरांगणा ॥ दुर्जना बुद्धिहीना मलिना ॥ मुख येथें न दाखवीं ॥१३॥

ऐसें बोलतां जानकीजीवन ॥ दशमुख जाहला दर्पभग्न ॥ अजासर्पन्यायेंकरून ॥ उगाचि तटस्थ पाहतसे ॥१४॥

जो पीडे दरिद्रेंकरून ॥ तो देश त्यागी जाय उठोन ॥ तैसा रावण रण सांडून ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥१५॥

कीं जो यातींतून भ्रष्ट जाहला ॥ तो जेवीं ब्राह्मणीं दवडिला ॥ की दिव्य देतां खोटा जाहला ॥ तो लाजोनी जाय पैं ॥१६॥

असो आता नानाप्रयत्न करून ॥ कुंभकर्णास उठवील रावण ॥ ती कौतुककथा गहन ॥ श्रवण करोत पंडित ॥१७॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ अंबर ॥ नानादृष्टांत भगणें सुंदर ॥ तेथें उदय पावला रामचंद्र ॥ निष्कलंक अक्षयी ॥१८॥

ब्रह्मानंद श्रीरामचंद्र ॥ जो निर्मळ शीतळ उदार ॥ तेथें अनन्य श्रीधर चकोर ॥ स्वानंदामृत सेवीतसे ॥१९॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षडिंशतितमोध्याय गोड हा ॥२२०॥

॥अ . २६॥ ओंव्या ॥२२०॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP