अध्याय सव्वीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


एकामागें एक अद्भुत ॥ नीळें टाकीले शत पर्वत ॥ तितुकेही छेदी प्रहस्त ॥ सीतानाथ पाहतसे ॥५१॥

प्रहस्ताचें बळ सबळ ॥ सर्वांगी खिळिला वीर नीळ ॥ परी तो वैश्वानराचा बाळ ॥ भिडतां मागें सरेना ॥५२॥

याउपरी नीळ दक्ष ॥ शतयोजनें ताडवृक्ष ॥ मोडूनि धांवे जेवीं विरूपाक्ष ॥ कल्पांतकाळीं क्षोभला ॥५३॥

भुजाबळें भोंवंडून ॥ वृक्ष घातला उचलोन ॥ रथासहित प्रहस्त चूर्ण ॥ रणमंडळीं जाहला ॥५४॥

जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनवृष्टि करिती सुरवर ॥ रावणापासीं सत्वर ॥ घायाळ जाऊन सांगती ॥५५॥

पडिला ऐकतां प्रहस्त ॥ शोक करी लंकानाथ ॥ म्हणे व्याघ्र प्रतापवंत ॥ गोवत्सांनी मारियेला ॥५६॥

कमळगर्भींचा घेऊन तंत ॥ मशकें बांधिला ऐरावत ॥ खद्योततेजें आदित्य ॥ आहाळला कैसा आजि तो ॥५७॥

सैन्यकासी म्हणे लंकानाथ ॥ सेना सिद्ध करावी त्वरित ॥ आजि मी युद्ध करीन अद्भुत ॥ जिंकीन रघुनाथा कपींसीं ॥५८॥

घाव निशाणीं दिधले सत्वर ॥ दणाणिलें लंकानगर ॥ कोट्यानकोटी महावीर ॥ सिद्ध जाहले शस्त्रास्त्रीं ॥५९॥

तो लंकापतीची पट्टराणी ॥ मंदोदरी विवेकखाणी ॥ तियेचे दूत सभास्थानीं ॥ परम धूर्त बैसले होते ॥६०॥

समय देखोनि विपरीत ॥ स्वामिणीपाशीं गेले त्वरित ॥ वर्षाकाळीं धांवत ॥ सरितापूर जैसे कां ॥६१॥

कीं शरासनापासोन ॥ सायक धांवती त्वरेंकरून ॥ कीं अस्ता जातां उष्णकिरण ॥ पक्षी आश्रमा धांवती ॥६२॥

तैसे स्वामिणीपासीं येऊन ॥ पाणी जोडून करिती नमन ॥ मग अधोदृष्टीनें वर्तमान ॥ सांगती सकळ सभेचे ॥६३॥

रणीं पडला प्रहस्तप्रधान ॥ म्हणोनियां दशानन ॥ सकळ सेना सिद्ध करून ॥ आतांचि जातो संग्रामा ॥६४॥

ऐसा समाचार ऐकोनि ॥ मंदोदरी लावण्यखाणी ॥ जिच्या स्वरूपावरूनि ॥ रतिवर ओवाळिजे ॥६५॥

जिची मुखशोभा देखोनि ॥ विधुबिंब गेले विरूनि ॥ चंपककळिका गौरवर्णी ॥ सुकुमार त्याहूनि बहुत ॥६६॥

आंगींची प्रभा अत्यंत ॥ तेणें अलंकार शोभत ॥ कीं त्रिभुवन हिंडोनि रतिकांत ॥ श्रमोन तेथें विसांवला ॥६७॥

हास्य करितां कौतुकें ॥ दंततेज मंदिरीं झळके ॥ बोलतां रत्नें अनेकें ॥ भूमीवरी विखुरती ॥६८॥

आंगींचे सुचासें करून ॥ कोंदलें असे अवघे सदन ॥ तडिदंबर वेष्टिलें पूर्ण ॥ सुवास मृदु निर्मळ ॥६९॥

चपळेचा प्रकाश पडे ॥ तैसे झळकती हातींचे चुडे ॥ वीस नेत्र होऊनि वेडे ॥ रावणाचे पाहती ॥७०॥

ते लावण्यसागरीची लहरी ॥ दूतवार्ता ऐकोनि मंदोदरी ॥ सुखासनीं बैसोन झडकरी ॥ सभेसी तेव्हां चालिली ॥७१॥

भोंवते दासींच चक्र ॥ जाणविती नानाउपचार ॥ सवें माल्यवंत प्रधान चतुर ॥ बहुत वृद्ध जाणता ॥७२॥

आणि अतिकाय कुमर ॥ जैसा पार्वतीसी स्कंद सुंदर ॥ कीं शचीजवळी जयंत पुत्र ॥ अतिकाय शोभे तैसा ॥७३॥

सहस्रांचे सहस्र दूत ॥ कनकवेत्रपाणि पुढें धांवत ॥ जन वारूनि समस्त ॥ वाट करिती चालावया ॥७४॥

अंगीच्या प्रभा फांकती ॥ तेणें गोपुरचर्या उजळती ॥ असो ते मंदोदरी सती ॥ सभाद्वारा प्रवेशे ॥७५॥

अधोवदनें तेव्हां जन ॥ सकळ परते गेले उठोन ॥ तेव्हां मंदोदरीनें येऊन ॥ पतीचीं पदें नमियेलीं ।७६॥

दशमुख बोले हांसोन ॥ आपलें कां झालें आगमन ॥ मग क्षणएक निवांत बैसोन ॥ मयजा वचन बोलत ॥७७॥

टाकोनियां शुद्ध पंथ ॥ आडमार्गे जो गमन करित ॥ तया अपाय येती बहुत ॥ यास संदेह नाहींचि ॥७८॥

सर्वांसी विरोध करून ॥ आपुलें व्हावे म्हणे कल्याण ॥ तो अनर्थीं पडेल पूर्ण ॥ यासी संदेह नाहींचि ॥७९॥

वेदशास्त्रीं जे अनुचित ॥ तेथें बळें घाली चित्त ॥ तेणें आपुला केला घात ॥ यासी संदेह नाहींचि ॥८०॥

विवेकसद्बुद्धीचे बळें ॥ अनर्थ तितुके टाळावे कुशळें ॥ वचनें संतांची निर्मळे ॥ हृदयीं सदा धरावी ॥८१॥

राया पुरुषार्थ हाचि पूर्ण ॥ परदारा आणि परधन ॥ येथें जो न घाली मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥८२॥

नंदनवनींचा मिलिंद ॥ दिव्यसुमनांचा घेत सुगंध ॥ त्यासी पलांडुपुष्पी लागला वेध ॥ नवल थोर वाटे हें ॥८३॥

सुरतरूच्या सुमनांवरी ॥ जो निद्रा करी अमरमंदिरी ॥ तो निजो इच्छी खदिरांगारीं ॥ नवल परम वाटे हें ॥८४॥

ज्याची ललना सुंदर बहुत ॥ जीतें अष्टनायिका लाजत ॥ तो पुरुष अन्य आलिंगू इच्छित ॥ नवल परम वाटे हें ॥८५॥

सुरभि सुरतरु चिंतामणि ॥ इच्छिले तें पुरवी सदनीं ॥ तो कोरान्न इच्छित मनीं ॥ नवल परम वाटे हें ॥८६॥

अंतरीं जाणूनि यथार्थ ॥ अन्यथा बळें प्रतिपादित ॥ न करावें तें बळेंचि करित ॥ तरी अनर्थ जवळी आला ॥८७॥

मी जाणता सर्वज्ञ ॥ ऐसा पोटीं वाहे अभिमान ॥ शतमूर्खाहूनि न्यून ॥ कर्म आचरे बळेंचि ॥८८॥

याचलागीं लंकेश्वरा ॥ कामासी कदा नेदीं थारा ॥ कामसंगें थोरथोरां ॥ अनर्थी पूर्वीं पाडिलें ॥८९॥

तुमचा स्वामी त्रिनेत्र ॥ त्याचा शत्रु काम अपवित्र ॥ तो तुम्ही केला मित्र ॥ तरी उमावर क्षोभला ॥९०॥

स्मरारिमित्र रामचंद्र ॥ त्यासी सख्य करा साचार ॥ मग तो संतोषोनि कर्पूरगौर ॥ अक्षयीं पद देईल ॥९१॥

सीता परम पतिव्रता ॥ हे रामापासींच बरी गुणभरिता ॥ कलहकल्लोळसरिता ॥ आणिकाचे गृहीं हे ॥९२॥

हे काळानळाची तीव्र ज्वाळा ॥ क्षणें जाळील ब्रह्मांडमाळा ॥ लंकेसी आणितां क्षय कुळा ॥ करील आमुच्या निर्धारें ॥९३॥

सहस्रार्जुनें नेऊन बळें ॥ राया तुम्हा बंदीं रक्षिले ॥ त्यास भुगुपतीनें मारिले ॥ त्यासही जिंकिलें राघवें ॥९४॥

ऐसा बळिया रघुनंदन ॥ जेणें जळीं तारिले पाषाण ॥ तरी त्यासीं सख्य करून ॥ आपणाधीन करावा ॥९५॥

हिरण्यकश्यपा नाटोपे हरी ॥ प्रह्लाद जन्मला त्याचे उदरीं ॥ तेणें सख्य करून मुरारि ॥ आपणाधीन पैं केला ॥९६॥

चिरंजीव करूनि कुळवल्ली ॥ जगीं कीर्ति वाढविली ॥ तैसा रामसखा ये काळीं ॥ करून वाढवा सत्कीर्ति ॥९७॥

तुम्हांस धरिलें ज्या वाळीनें ॥ तो जेणें निवटिला एकबाणें ॥ त्यासी आतां सख्य करणें ॥ मनीं धरूनि हे गोष्टी ॥९८॥

भक्ति वेगळा रघुनाथ ॥ तुम्हांस वश नव्हे यथार्थ ॥ सीता देऊन सीताकांत ॥ आपणाधीन करावा ॥९९॥

ज्याहीं पुरुषार्थ करूनि ॥ सुरांचे मुकुट पाडिले धरणी ॥ ते राक्षस पाडिले रणीं ॥ कोट्यनकोटी पाहें पां ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP