अध्याय सव्वीसावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


एक लक्ष पुत्रसंतती ॥ सवालक्ष पौत्रगणती ॥ धन्य रावणाची संपत्ति ॥ कपी पाहती आदरें ॥५१॥

सकळ पुत्रप्रधानांची नामें ॥ बिभीषण सांगे अनुक्रमें ॥ दृष्टी देखोन रघुत्तमें ॥ आश्चर्य केलें ते समयीं ॥५२॥

मध्यें रावणाचा रथ ॥ प्रभेस न्यून सहस्र आदित्य ॥ विरिंचिहस्तें निर्मित ॥ तो दिव्य अनुपम ॥५३॥

त्या रथाचा जोडा दुजा रथ ॥ नसे त्रिभुवनीं यथार्थ ॥ त्यावरी मंदोदरीकांत ॥ दिसे मंडित वस्त्राभरणीं ॥५४॥

वरी त्राहाटिली दाही छत्रें ॥ झळकती चामरे मित्रपत्रें ॥ ऐसें देखोनि मित्रपुत्रें ॥ द्विजें अधर रगडिले ॥५५॥

शत्रूचें वैभव अगाध ॥ देखोनि सुग्रीवा नावरे क्रोध ॥ ऐकोनि वारणाचा शब्द ॥ जैसा मृगेंद्र हुंकारे ॥५६॥

तृणपर्वत संघटतां जवळी ॥ कैसा उगा राहे ज्वाळामाळी ॥ मृगेंद्र दृष्टीं न्याहाळी ॥ मग गज केंवी स्थिरावे ॥५७॥

असो तैसा किष्किंधानाथ ॥ धांवे घेऊन पर्वत ॥ रावणावरी अकस्मात ॥ परम आवेशें टाकिला ॥५८॥

तों दशमुखे सोडोनि बाण ॥ पिष्ट केला पर्वत जाण ॥ सवेंच सोडिले दशबाण ॥ सुग्रीव हृदयी खिळियेला ॥५९॥

क्रोधावला सूर्यसुत ॥ सवेंचि उपडोनि विशाळ पर्वत ॥ रावणावरी अकस्मात ॥ गगनपंथें टाकिला ॥१६०॥

तोही रावणें फोडिला ॥ मग शतबाणीं सुग्रीव खिळिला ॥ रक्तधारा तये वेळा ॥ भडभडा सूटल्या ॥६१॥

मूर्च्छा येऊन तये क्षणीं ॥ सुग्रीव स्वीकारूं पाहे धरणी ॥ मग वानर अठरा आक्षौहिणी ॥ एकदांचि उठावले ॥६२॥

शिळा वृक्ष पाषाण ॥ कपींनीं यांचा पाडिला पर्जन्य ॥ परी तितुक्यांसी रावण ॥ एकलाच पुरवला ॥६३॥

जैसा पाखांडी कुतर्क घेतां ॥ नावरेच बहु पंडितां ॥ तेवीं सकळ कपीं भिडतां ॥ लंकानाथ न गणीच ॥६४॥

असंख्यात सोडूनि शर ॥ घायीं जर्जर केले वानर ॥ तों थोर थोर कपीश्वर ॥ उभे होते रामापाशीं ॥६५॥

त्यांमाजी सातजण ॥ धांवती जैसे पंचानन ॥ शरभ गवय गंधमादन ॥ मैंद कुमुद द्विविद ॥६६॥

गवाक्ष सातवा वीर ॥ पर्वत घेऊनि सत्वर ॥ हाकें गर्जवीत अंबर ॥ रावणावरी टाकिले ॥६७॥

रावणें पर्वत फोडोनि समस्त ॥ शरीं खिळिलें वानर सप्त ॥ भूमीसीं पडले आक्रंदत ॥ परम अनर्थ वोढवला ॥६८॥

अनिवार दशमुखाचा मार ॥ देखोनि पळती कपिभार ॥ ते पाहून राम रणरंगधीर ॥ चाप सत्वर चढवतीसे ॥६९॥

तंव विनवी ऊर्मिलापति ॥ माझे बाहु बहु स्फुरती ॥ आज्ञा द्यावी मजप्रति ॥ शिक्षा लावीन दशमुखा ॥१७०॥

अवश्य म्हणे रघुनंदन ॥ सौमित्रें सजोनियां बाण ॥ जैसा उठे पंचानन ॥ रावणासन्मुख लोटला ॥७१॥

म्हणे रे तस्करा दशमुखा ॥ बुद्धिहीना शतमूर्खा ॥ आणूनियां जनककन्यका ॥ कुळक्षय केला रे ॥७२॥

कृतांताचे दाढेसी ॥ सांपडलासी निश्चयेसी ॥ आतां कोणीकडे पळसी ॥ जीव घेऊन माघारा ॥७३॥

ऐसें बोले लक्ष्मण ॥ तों विशाळ पर्वत घेऊन ॥ धांवे निराळोद्भवनंदन ॥ द्विदशनेत्रावरी तेधवां ॥७४॥

जैसी कडकडोनि पडे चपळा ॥ तैसा पर्वत रावणावरी टाकिला ॥ रावणें फोडोनि ते वेळां ॥ पिष्ट केला अंतरिक्षीं ॥७५॥

रथावरी चढला हनुमंत ॥ रावणें झाडिली सबळ लाथ ॥ मूर्च्छना सांवरून वायुसुत ॥ उसनें घेता जाहला ॥७६॥

रावणहृदयीं ते काळीं ॥ कपीने वज्रमुष्टी दिधली ॥ रावणासी गिरकी आली ॥ मूर्च्छा सांवरी सवेंचि ॥७७॥

मग सबळ मुष्टिघात ॥ मारुतीसी मारी लंकानाथ ॥ तों विशाळ घेऊन पर्वत ॥ नळ वानर धांविन्नला ॥७८॥

पर्वत टाकिला रावणावरी ॥ तेणें पिष्ट केला अंबरीं ॥ नळ खिळिला पंचशरीं ॥ हृदयावरी तेधवां ॥७९॥

तों नळें केलें अद्भुत ॥ मंत्र जपे ब्रह्मादत्त ॥ कोट्यनकोटी नळ तेथें ॥ प्रगट झाले तेधवां ॥१८०॥

घेऊन पाषाण पर्वत ॥ रावणावरी टाकिती समस्त ॥ दोनी दळें झालीं विस्मित ॥ सीतानाथ नवल करी ॥८१॥

ऐसे जाहलें एक मुहूर्त ॥ मग ब्रह्मास्त्र प्रेरी लंकानाथ ॥ नळ मावळले समस्त ॥ जेवीं नक्षत्रें सूर्योदयीं ॥८२॥

कीं पारदाची रवा फुटली ॥ एकत्र येऊनि कोठी जाहली ॥ मुख्य नळ ते वेळीं ॥ रणांगणीं उरलासे ॥८३॥

असो सिंहनादें गर्जोन ॥ पुढें धांवे लक्ष्मण ॥ तयाप्रति रावण ॥ बोलता जाहला अतिगर्वें ॥८४॥

म्हणे तूं मनुष्याचा कुमर ॥ अजून माथांचा ओला जार ॥ तुवां संग्राम तरी निर्धार ॥ कोठें केला सांग पां ॥८५॥

सौमित्र म्हणे रे मशका ॥ माझा संग्राम पाहें कीटका ॥ तुझें आयुष्य सरलें मूर्खा ॥ लंका दिधली बिभीषणासी ॥८६॥

सिंहदरीतें आला कुंजर ॥ तो केवीं जिवंत जाईल बाहेर ॥ सुपर्णे धरिला फणिवर ॥ तो केवीं प्रवेशे वारुळी ॥८७॥

भुजंगें धरिला मूषक दांतीं ॥ तो कैसा सुटेल पुढतीं ॥ समुद्रतीरीं अगस्ति ॥ उगाचि कैसा बैसेल ॥८८॥

तृतीयनेत्रींचा प्रळयाग्न ॥ चालिला रतिपतीस लक्षून ॥ मग राहील विझोन ॥ हे काळत्रयीं घडेना ॥८९॥

तैसा श्रीराम लावण्यराशी ॥ चालोन आला लंकेसी ॥ तूं पुत्रपौत्रें नांदसी ॥ हे काळत्रयीं घडेना ॥१९०॥

ऐसें बोलोन लक्ष्मण ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ शब्दामागें शब्द पूर्ण ॥ वदनींहून जेवी निघती पैं ॥९१॥

चपळ लेखकापासाव एकसरें ॥ निघती अक्षरांपासाव अक्षरें ॥ तैसे बाण सुमित्राकुमरें ॥ रावणापरी सोडिले ॥९२॥

रावणाचें अंगी ते वेळें ॥ बळें सपक्ष बाण रुतले ॥ पांच बाण रावणें सोडिले ॥ सौमित्रावरी तेधवां ॥९३॥

जैशा पंच विद्युल्लता ॥ तैसे सौमित्रे देखिले शर येतां ॥ मग ते वरचेवरी तत्वतां ॥ निजशरें पिष्ट केले ॥९४॥

परम क्रोधे दशमौळी ॥ ब्रह्मशक्ति बाहेर काढिली ॥ अभिमंत्रोन सोडिली ॥ राघवानुजा लक्षूनियां ॥९५॥

ते अनिवार शक्ति पूर्ण ॥ सुमित्रासुतें सोडिला बाण ॥ अर्ध टाकिली खंडोन ॥ अर्ध हृदयीं बैसली ॥९६॥

तेणें निचेष्टित सौमित्र पडिला ॥ श्वासोच्छ्वास बंद जाहला ॥ ऐसें देखोनि रावण धांविन्नला ॥ रथाखाली उतरूनियां ॥९७॥

निचेष्टित असतां सौमित्र ॥ वरी हाणी मुष्टिप्रहार ॥ जैसे निजल्यावरी तस्कर ॥ बहुत घाय घालिती ॥९८॥

तें मारुतीनें देखोन डोळां ॥ कृतांतापरी धांविन्नला ॥ लत्ताप्रहार ते वेळां ॥ सबळ दिधला रावणा ॥९९॥

पादरक्षेचे घायीं देख ॥ लोक ताडिती वृश्चिक ॥ कीं दंदशुकाचें मुख ॥ पाषाणें चूर्ण करिती पैं ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP