रुद्रारामहंसाख्यान - कोशांचा विवेक

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सदगुरु रुद्राराम । स्वयें गुरुभक्ति घडतां परम । सर्व श्रुत्यर्थ जाला सुगम । प्रकाशमय अंतरीं ॥१॥

ऐसें गुरुभक्तीचें महिमान । एकदां गुरुमुखें होतां श्रवण । विचारें त्या रीतीं होय स्फुरण । नि :संशयेंसी ॥२॥

असो एके दिनीं रुद्राराम । माधवस्वामींसी विनवी सप्रेम । जेथून उत्पत्ति स्थिति लय तें ब्रह्म । कोणतें मज सांगा ॥३॥

ऐसा प्रश्न ऐकोनि माधवस्वामी । म्हणती हा विचारवंत अंतर्यामीं । असे यास्तव संकेतें अनुक्रमीं । दावीत दावीत दाऊं ॥४॥

ऐक बापा एक वचन । हें जग जालें अन्नापासून । अन्नामुळेंचि जगाचें वर्तन । लयही अन्नामाजीं ॥५॥

ऐसी हे श्रुतिच असे बोलिली । अन्नाचीं पांच अंगें कल्पिती जाली । शिर पक्ष दोन आत्मा पुच्छ प्रतिष्ठा केली । तें तूं अवधारीं ॥६॥

या अन्नमयाचें हेंचि शिर । आणि हा दक्षिण पक्ष सव्य कर । वाम कर तो पक्ष उत्तर । हाचि आत्मा ययाचा ॥७॥

हेंचि पुच्छ अन्नमयाचें । तरी हेंचि ब्रह्म असे साचें । विचारें पाहे होय नव्हे याचें । मागुता प्रश्न करीं ॥८॥

मग रुद्रराम विचार करी । अन्न म्हणजे दृश्यत्त्वें हें सारी । जितुकें आलेंसे आकारीं । तेंचि अन्नमय ॥९॥

त्रिकाळी हे म्हणो अबाधित । तरी यददृष्टं तन्नष्टं हे श्रुति म्हणत । उत्पन्न होईल तें नासेल निश्चित । तस्मात हें सत्य नव्हे ॥१०॥

आतां चिद्रूप जरी अन्नमय । स्वतां स्वरुप जडमय । चळतें ऐसा जो भास होय । लिंगदेहयोगें ॥११॥

यासी अवस्था ना व्यापार । तरी जड भागचि समग्र । चिद्रूपता न दिसे अणुमात्र । आणि आनंद नाहीं ॥१२॥

सदा सुखदु :खचि होणें । आणि होय तेंचि स्वतां नेणें । घणाचें घाव जाणावें पाषाणें । कैशियापरी ॥१३॥

एवं असज्जडदु :खात्मक । अन्नमय हा भूतभौतिक । श्रुति बोलिली जरी आवश्यक । तरी हें ब्रह्म नव्हे ॥१४॥

ब्रह्म तरी अनिर्देश्य । तरी हें हें करी कोण निर्देश । तस्मात हें बोलणें असे अवश्य । पूर्वपक्षाचें ॥१५॥

अन्नमयचि पृथ्वी संपूर्ण । अन्नमयें चारी खाणी जाल्या निर्माण । अन्नेंचि वांचती सर्वजन । मरतां पृथ्वींत मिळती ॥१६॥

हें तिन्हीं लक्षणें असती अन्नासी । यास्तव बोलिले कार्यकारणेसी । परी पृथ्वी कारण जन्मली कुशीं । आपाच्या प्रत्यक्ष ॥१७॥

अन्नासी कारण मुख्य दिसेना । आणि निर्देश करी श्रुति बोलिली । हे जीवाची परीक्षा असे पाहिली । येथें अविचारी जाती ठकलीं । विचारवंत मानीना ॥१९॥

हेंचि शिर हें हें पक्ष दोनी । आत्मा पुच्छ हें हें बोले वाणीं । येथें मूर्खजन देहेच आत्मा मानोनी । बैसले सदृढ ॥२०॥

देह तरी जातो मरुनी । तरी केलें कर्म भोगावें कोणी । आणि पूर्वी करितां कासयानीं । देह जन्मा आला ॥२१॥

हें ऐसें कवणासी कळेना । म्हणती मरतां पुन्हां जन्म असेना । तरी तूप खावें करोनि ऋणा । देहात्मा तोषवावें ॥२२॥

असो हा विरोचन -सिध्दांत । विचारें पाहतां अपुले मनांत । अन्नमय नव्हे ब्रह्म निश्चित । भूतभौतिकादि ॥२३॥

जरी हें हेंचि याचें पक्ष शिर । तरी आत्माचि कैसा निर्धार । बैसे आपुलिया खांदियावर । आपण केवीं ॥२४॥

पुच्छ म्हणजे अधिष्ठान । तरी हेंचि दृश्याचें कारण । तस्मात अन्न ब्रह्म नव्हे म्हणून । विनवी सदगुरुहंसा ॥२५॥

जी जी देहाचा देहचालक । कैसा होईल आवश्यक । तस्मात अन्न ब्रह्म निश्चयात्मक । नव्हेच नव्हे ॥२६॥

हें रुद्रारामाचें ऐकतां उत्तर । संतोषलें हंसराज गुरुवर । धन्य तूं विचारवंत साचार । अन्न ब्रह्म नव्हे ॥२७॥

अन्नाहून अन्य आत्मा प्राण । त्या प्राणमयें या देहासी चळण । प्राण हा आपोमय पृथ्वीसी कारण । असे प्राण सर्वां ॥२८॥

प्राणापासून सर्व जालें । प्राण असतां सर्व वांचलें । प्राणामाजीं सर्व लया पावलें । तरी प्राणमय ब्रह्म ॥२९॥

या प्राणमयाचे पांच प्रकार । मुख्य प्राण तोचि याचें शिर । दक्षिण पक्ष अपानोत्तर । पक्ष तोचि समान ॥३०॥

आकाश आत्मा प्राणमयाचा । पृथ्वी पुच्छत्त्वें प्रतिष्ठिली साचा । तस्मात विचार करी प्राणमयाचा । ब्रह्म होय कीं नव्हे ॥३१॥

ऐसें सदगुरुचें वचन ऐकोनी । रुद्र विचारिता जाला मनीं । उत्पत्ति स्थितिलय प्राणापासुनी । असे सर्वांची ॥३२॥

शरीरीं जरी प्राण जागे । तरीच सर्व हें जग वागे । प्राणास्तव स्त्रीपुरुषसंयोगें । उत्पत्ति होती ॥३३॥

प्राण जातां वायूंत मिळत । ऐसा प्राणचि कारण समस्तांत । परी स्वानुभवें पाहतां जडचि दिसत । चंचळही असुनी ॥३४॥

जैसा भात्यांतील वायु चळतसे । तैसे देहांतुन उमटती श्वासोछवासें । सत म्हणता तरी या नाश असे । प्राण गेला आला म्हणती ॥३५॥

प्रत्यक्ष एका श्वासासी होय उद्वम । एक श्वास पावे उपरम । तरी प्राण नाशे अविनाश ब्रह्म । होय कैसेनि सद्रूप ॥३६॥

आतां प्राण हा चिद्रूप म्हणावा । तरी झोपेंत संचरतो बरवा । तरी वस्त्रें भूषण नेतां स्वयमेवा । न जाणे हा प्राण ॥३७॥

अथवा सर्प चढतां अंगावरी । प्राण हा न जाणे कीं हा डसून मारी । तरी प्राणासी चिद्रूपत्त्व नव्हे निर्धारी । आणि आनंदही नाहीं ॥३८॥

अन्नें होय प्राणाचें पोषण । रोग होती होतां अधिक न्यून । नाना सुखदु :खप्रद हा प्राण । प्रत्यक्ष असे ॥३९॥

प्राण सद्रूप ना चिद्रूप । अथवा नव्हे आनंदरुप । विवंचून पाहतां आपेआप । असज्जडदु :खात्मक ॥४०॥

ब्रह्म तरी अद्वितीय अक्रिय । प्राणासी सर्वदा क्रिया होय । प्राणपंचक आणि पंच कर्मेद्रिय । हा प्राणमय कोश ॥४१॥

प्राण ह्रदयीं राहून नासिकांत वावरे । सुखदु :ख देत विहरण विकारें । अपान राहे अधोद्वारें । विसर्ग करी ॥४२॥

व्यान सर्वांगी अन्नरस पाववी । समान नाभि संधी हालवी । उदान कंठीं क्षुत्पान करवीं । एवं क्रिया हे पांचांची ॥४३॥

वाचेसी बोलणें पाणिया देणें घेणें । पादासी गमन उपस्थे रति भोगणें । गुदेंद्रियासी मलोत्सर्ग करणें । एवं क्रियात्मक प्राणमय ॥४४॥

मुख्य प्रधानत्त्वें असे प्राण । यास्तव प्राण या कोशीं शिरस्थान । अपानहि त्यासीं साहकारी होण । या हेतू दक्षिणपक्ष ॥४५॥

समान देहाचें करवी चळण । म्हणून वामपक्ष असे समान । अवकाशेविण नव्हे संचरण । तस्मात आकाश आत्मा ॥४६॥

देहाविण प्राणा नाहीं आधार । कोठें करावा क्रिया व्यापार । तस्मात पृथ्वी पुच्छ हा निर्धार । प्राणमय कोशाचे ॥४७॥

जैसा जडभाग अन्नमयाचा । तेवी चंचलत्त्व जडांश अविद्येचा । जाणण्याविण क्रियात्मक साचा । प्राणमय कोश ॥४८॥

असो देहास्तव याचा आहेपणा । नाश पावे देह अवसाना । तस्मात असद्रूपता असे प्राणा । तरी ब्रह्म हा नव्हे ॥४९॥

चिद्रूप आणि आनंदरुप । हे तरी प्राणासी नसती अल्प । असज्जडदु :खात्मक जाणून साक्षेप । विनवी येऊन गुरुसी ॥५०॥

जी जी प्राणाचा विचार पाहिला । परी हा ब्रह्म नव्हे कवणेहि बोला । तरी सांगावें यथार्थ मजला सत्य ब्रह्म कोणतें ॥५१॥

देह जैसा ब्रह्म कळतां । मिथ्यता आली जगा समस्ता । तेवींच प्राणमयाचा शोध घेतां । सर्व जग -क्रिया खोटी ॥५२॥

ऐसें ऐकतां शिष्यवचन । संतोषलें हंसस्वामीचें मन । आल्हादयुक्त चिमण्या बाळालागुन । सांगती मनोमय ॥५३॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP