रुद्रारामहंसाख्यान - मंत्रोपदेश

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमद्वुरुमाधवहंसें । रुद्रारामाचें बोलणें ऐकून ऐसें । बहु आल्हाद मानोनि मानसें । तया पोटासी धरियेलें ॥१॥

म्हणती गा धन्य धन्य सुमति । अनंत जन्मांचे पुण्याची उन्नति । तुझी फळासी आली माझें वाटे चित्तीं । स्थिति तुझी ऐसी ॥२॥

जन्मतांचि तुज विषयाचा त्रास । परमार्थ घडावा इच्छी मानस । तुझें भाग्यवर्णन नव्हे कवणास । शेषादिकांही ॥३॥

मजहि उदंड शिष्य जाले । परी ऐसे देखिले न ऐकिले । तस्मात माझेंही भाग्य उदेलें । कीं मिळे ऐसें रत्न ॥४॥

वरुती वेष पाहतां जड । अंतरीं मननशक्ति वाड । त्याहीवरी गुरुसेवेचें कोड । तरी काय अवघड तुज असे ॥५॥

मोक्षसंपत्ति तुझिये करीं । सदा वस्ती करील निर्धारीं । तूंचि गुरु या चराचरीं । जगदुद्वार करिसी ॥६॥

तूं आमुचा शिष्य न होसी । साक्षात मीच तूं गा अससी । भोगावया चरणसेवेसी ग्लानी करिसी कासया ॥७॥

तुज मंत्राचा उपदेश नलगे । ज्ञान मात्र व्हावें लागे वेगें । विचार द्वारां तूं ब्रह्म निजांगे । होसी उपदेशमात्रें ॥८॥

या रीती माधवस्वामीं बोलतां । रुद्र घाली साष्टांग दंडवता । मज मंत्रोपदेश नलगे म्हणतां । संप्रदाय कैसा चाले ॥९॥

तस्मात आधीं मंत्र सांगावा । पाठीं ज्ञानोपदेश करावा । परी मज आवडतसे गुरुसेवा । तरी द्यावा हा प्रसाद आधीं ॥१०॥

परी मज आवडी सदाशिवाची । आणि भस्मरुद्राक्षधारणाची । तरी मंत्र द्यावा शिवपंचाक्षरीचा । जप रुद्राक्षमालेनें ॥११॥

ऐकोनी माधवस्वामी बोलती । कीं राममंत्राची आली पध्दति । आतां शिवमंत्र केवीं द्यावा तुजप्रति । पुढे पुढें संकर होईल ॥१२॥

तुज नाहीं मंत्राचे कारण । जपही तुज नको माला घेऊन । उगाचि लौकिक करावा रक्षण । यास्तव शिवमंत्र देऊं ॥१३॥

परी तुवां कवणाही लागुनी । उपदेशावा राममंत्र कर्णी । ऐसें बोलोनि रुद्रारामालागुनी । मंत्र दिधला शिवपंचाक्षरी ॥१४॥

रुद्राक्षमाला सुंदर कंठीं । भस्म शोभे सांग लल्लाटीं । कानटोपी , कर्णी रुद्राक्ष , लंगोटी । कटिबंदासहित ॥१५॥

शिवमंत्र असे मात्र घेतला । परी तयाचा जप नाहीं केला । मुखीं गुरु गुरु हा छंद लागला । आणि कायेनें गुरुसेवा ॥१६॥

जयासी गुरुसेवेचा संकल्प । तयासी कासया पाहिजे जप । अंत :करण शुध्दिही आपेआप । जन्मादारभ्य असे ॥१७॥

गुरुसेवेचा प्रकार कैसा । पुढील प्रकरणीं बोलिजेल कांहीसा । तो साधकीं श्रवण करुन मानसा । सुदृढ धरावा ॥१८॥

एकदां ग्रहणपर्व आलें । तेव्हा माधवस्वामीनें सांगीतलें । कीं आद्यंत ग्रहणसमयीं एकाग्र जपिलें । तरी पुरश्चरण होय ॥१९॥

रुद्रहंस म्हणती तथास्तु । गुरु आज्ञाच आम्हां जप समस्तु । मग पुरश्चरण केलें ग्रहणाआंतु । चिमणिया बाळें ॥२०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP