माधवहंसाख्यान - ज्ञानविचाराचा बोध

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमदुद्धवहंससद्‌गुरु । माधवहंसदासाचा पाहून अधिकारु । कथिते जाले पूर्ण ज्ञानविचारु । जो कैवल्यप्रद ॥१॥

माधवासी सन्मुख बैसविलें । म्हणती सावधान पाहिजे असिले । तुवां जे जे प्रश्न असती केले । ते अनुक्रमें सांगुं ॥२॥

आधी तत्वांचा कैसा अनुक्रम । उद्भवता जाला उपक्रम । बंध कैसा जाला जीवा परम । सांगूं तो ऐके ॥३॥

ब्रह्मा एक निर्विकार । जेथें मायादिकांचा नसे विकार । तेथें आरोपिलें जगदाकार । रज्जुसर्पापरी ॥४॥

रज्जूच असतांहीं अखंड । परी पाहणार मिळाला म्याड । सर्प कल्पोनि भय घे वाड । मंदाधंकारीं ॥५॥

तेवी जग हें जालें नसतां । अज्ञानें जीव जाला कल्पिता । बंधनही पावला अवचिता । जन्ममृत्युरूप ॥६॥

दोरींचें दिसणें वांकडें । तेवी जगाचें अस्तिभातिप्रिय रूपडें । सर्प नाम ठेविलें त्या भ्यांडें । तेवीं जग नाम ठेवीं जीव ॥७॥

सर्पभाव जालियावरी । तया कल्पावें कीं भ्रांति पडली खरी । तेवी जगकल्पना होता नानापरी । यासी अज्ञान कारण कल्पावें ॥८॥

अगा अज्ञान तेचि स्वरुपी माया । माया म्हणजे शब्दचि वाया । अहंब्रह्मा प्रतीति असतां तया । अज्ञान कल्पिलें ॥९॥

मी ब्रह्मा स्फुरण जेव्हां जालें । तेव्हां तितुंकेंचि स्फुरणा जाणूं लागलें । तें जाणणेचि परी अज्ञानत्वा पावलें । न कळे कीं केवढें ब्रह्मा ॥१०॥

जेवी दोरीचें न कळणें । सर्पाकारत्व आलें तेणें । तेवी स्फुरणविरहित स्वरूप तें नेणे । तेव्हां द्वैतकल्पना करी ॥११॥

दोरीच्या दिसण्या म्हणावें अज्ञान । तेवी स्वरूपाच्या आठवा माया अभिधान । दिसणेंचि जैसें न दिसण । ज्ञानचि अज्ञान तेवी ॥१२॥

सर्प जेधवा भासला । येथें कोण म्हणावा आधीं जाला । अज्ञान कीं भ्याड कीं सर्प पहिला । निवडिता न ये ॥१३॥

तेवी जग जेधवा जालें । यांत कोण म्हणावें आधी जन्मलें । माया कीं कल्पिता जीव कीं जग पहिलें । नेमिताच न ये ॥१४॥

भ्याड नव्हे अज्ञानसर्पावीण । जीव न प्रगटे मायाजगावांचून । सर्प नव्हें नसतां भ्याड अज्ञान । मायाजीवाभावीं जग नव्हें ॥१५॥

सर्प भ्याड नसतां दोन्हीं । अज्ञानकल्पना करील कोणी । तेवी जीवजगाची नसतां उमवणी । माया कोणें कल्पावीं ॥१६॥

येथें कोणी होईल कल्पिता । भ्याडपणा जरी उप्तन्न नव्हता । परी पुरुषाच्या ठायीं पूर्वाध्यास होता । तो कल्पितां भीति होय ॥१७॥

ऐसा पूर्वाध्यास येथें कोठें । तरी येविशीं बोलिजेल गोमटें । अहं ब्रह्मास्फुर्ति जे उठे । तो अहंपणें पूर्वाध्यास ॥१८॥

पुरुष जैसा पूर्वीच असे । स्फुरण अनादि कोठें तैसें । ऐसें बोलतील तरी साधलासे । पक्ष आमुचाचि ॥१९॥

जैस पुरुष पहिलाचि आहे । तैसा संकल्पकर्ता जालाचि नव्हें । जितका रज्जुसर्पाचा खरेपणा लाहे । तितुकाही नाहीं जगद्भमा ॥२०॥

आणी सर्प जाणीलियावरी । पुरुषा अभिन्न नव्हे दोरी । जगद्भम मिथ्या कळतां निर्धारी । जीव ब्रह्माचि होय ॥२१॥

असो रज्जुसर्पभ्रमापरीं । उद्भवलीं नामरूपें सारी । त्या भ्रमामाजीं कल्पना केली दुसरीं । हे थोर हे सान ॥२२॥

हा नाग मोठा हें किरडु सान । तेवी हा सत्वगुण हा तमोगुण । किरडु जालें नागापासून । तेवी गुणांपासून भूतें ॥२३॥

गव्हाळा तांबडा डोंब्या पीतवर्ण । जेवी नामें कल्पिली अनान । तेवी पृथ्वी आप तेज वायु गगन । नामें ठेविलीं अस्तित्वा ॥२४॥

सर्व एकादाचि भ्रमें झालें । त्यासीहि कल्प कल्पूं बोलिलें । हें कारण हें कार्य त्यापासून कल्पिलें । कार्य धाकूलें कारण मोठें ॥२५॥

आकाश मोठें आणि एकगुण । वायु सान परी असे द्विगुण । तरी वायु कार्य आकाश कारण । कल्पिलें असे ॥२६॥

तेवीच वायु कारण तेजाचें । तेज कार्य असे वायूचें । तेजीं तीन गुण असती साचे । आणि उणें असे म्हणुनी ॥२७॥

आप त्याहुनीं सान चतुर्गुण । यास्तव आप कार्य तेज कारण । पृथ्वी पंचगुणी परी उणी दशगुण । तेव्हा आप कारण कार्य भूमी ॥२८॥

ऐसें न्यायादिशास्त्रकारक । अनेक प्रकारें करोनि तर्क । बळाविलें मिथ्या हे अनेक । भ्रम परी सत्यत्वें ॥२९॥

देहादि जडत्व देखिलें । तेव्हां हें भूतांचें कार्य जालें । अमुकाचे अमुक अंश कल्पिलें । तेव्हां म्हणती पंचीकृत ॥३०॥

सूक्ष्म तत्त्वें पाहतां सकळ । हे म्हणती भूतगुणांचे खेळ । आणि अपंचीकृत उद्भवले केवळ । मग प्रवेशलें पिंडीं ॥३१॥

मुळीं जाणतेपणा जो होता । तोचि ईश्वर सर्वज्ञ याचा कर्ता । पिंडी प्रवेशता किंचि‍ज्ज्ञता । जीवत्व आलें तयासी ॥३२॥

उगेंचि म्हणती असे पूर्वकर्म । यास्तव पावले योनी उत्तमाधम । पुढेंही करी पापपुण्यसंभ्रम । तेव्हां उच्चनीच योनी ॥३३॥

ऐसें जीवत्वही खरेंचि आलें । खरेंचि बंधनहीं सत्यत्वें पडिलें । हे कैसें जातील सुटले । कल्पकोटी ॥३४॥

तरी या जीवासी अति सुख व्हावें । ऐसें पुण्यकर्म कांहीं करावें । अथवा स्वर्गादिकीं जाऊन रहावें । तेचि मुक्ति जीवा ॥३५॥

ऐसें मिथ्याचि परी दृढ केलें । पुनरावृत्ति भोगिती उगले । सर्पभयें कापूं लागले । झेंडु फुटलें कितेका ॥३६॥

मी जीवही भिन्नत्वें न भावी । मी देह म्हणुनचि बुद्धि घ्यावी । हें हें माझी बळकट धरावे । हेंचि बंधाचें स्वरूप ॥३७॥

आपुलें निजरूप विसरलें । बळेंचि पाप पुण्य माथा घेतले । तरी याचे सुखदूःख पाहिजे भोगिले । जेवी रज्जु नेणतां कंपादि ॥३८॥

तो म्याड गुळ खाता म्हणे कडू । मिरची मीठ म्हणे लागे गोडू । तेवी या जीवा विषयाचा पवाडू । अति गोड लागे ॥३९॥

परमार्थ कडू म्हणुनि त्यागिला । तैसाचिक देह मृत्यूचे पावला । जैसा सर्पा भिउनी भ्याड निजेला । परि तो धोका उरे ॥४०॥

पुन्हां तो जन्मासि जरी आला । तरी भवबंध सत्य म्हणून बैसला । जैसा भ्याड निजून उठिला । तरी सर्पभयें कांपें ॥४१॥

असो ऐसेम किती वेळे मरती । आणि किती वेळें जन्मती । याची कोण करील गणती । उंच नीच ही नेणवे ॥४२॥

भ्याडासी लहरी किती आल्या । त्या न वजाती कदा मोजिल्या । तेवी जीवासी योनी कित्येक जाल्या । हा लेख नव्हे ॥४३॥

असो ऐसा महाप्रळय । जाला तरी सुटका न होय । अज्ञानाचा नव्हे क्षय । म्हणुनिया ॥४४॥

जरी होय अभिन्नज्ञान । गुरुशास्त्राअत्मप्रतीतीकडुन । तेव्हांचि नासून जाय अज्ञान । जीवन्मुक्तिसुख होय ॥४५॥

जेवीं भ्याडें देवा लाविला । दोरी ओळखुनी निवांत बैसला । लहरीसहित सर्प मेला । निर्भय ठेला तत्क्षणीं ॥४६॥

ज्ञानेंवीण कर्में करी । तेणें भवभय नाशेना निर्धारी । दीपवीण आणिले उतारी । तरी लहरी न जाती ॥४७॥

अथवा योग करितां अटाअटे । तरीही अज्ञानबंधन न तुटे । जेवी सर्प मारितांही न फिटे । भ्रांति कदा ॥४८॥

अथवा उपासना साह्म केली । तरी अज्ञानभ्रांति न जाय फिटली । जेवी गारुडी साह्म करितां न जाय भुली । सर्पभ्रमाची ॥४९॥

तस्मात् एक अभिन्नज्ञानाची व्हावें । व्यर्थ साधनें कासया करावे । ज्ञान जालिया जीवन्मुक्तिसुख भोगावें । येचि देहीं ॥५०॥

जैसी दोरी ओळखावी दीपें । तया कासया अन्य साक्षेपे । मग क्रीडतांहि आपेआपे । भीति न होय ॥५१॥

दीप लावावया कासया शीण । ज्ञान व्हावया दुजें नको साधन । एक गुरुमुखें श्रवण मनन । केलें पाहिजे ॥५२॥

श्रवण मननें तत्त्वझाडा । होतां आत्मा ब्रह्मा कळे उघडा । हेंचि ज्ञान मोक्ष पावला रोकडा । अन्य साधनेवीण ॥५३॥

तोचि तत्वझाडा सद्‌गुरु हंस । सांगतील चिमणिया बाळास । पुढील प्रकरणीं साधक डोळस । विश्वासें ऐकती ॥५४॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP