माधवहंसाख्यान - मारुतीचा साक्षात्कार

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सद्‌गुरु हंस पूर्णा । शिष्यबोधार्थ धरिसी व्यक्ति नाना । हे तुझी लीला पावसी खुणा । तूंचि सांगोनी ॥१॥

ज्याक्षणीं बाळ मांडिये बैसलें । तया क्षणींच कृतकृत्या जालें । गुरुमाउलिसी कौतुकें बोले । जी पुरले मनोरथ ॥२॥

स्वामि ते आजोबा कोठें गेले । मज संगतीनें बहु सुख दिधलें । आणि आपणा समागमें जे होते आले । ते कोण गेले कोठें ॥३॥

स्वामी म्हणती ऐक सावध । ते समर्थ , जेणें मला केला बोध । तेंही वसविला सज्जनगड प्रसिद्ध । तिकडे गेले ॥४॥

आतां वृद्ध ब्राह्मण कोण म्हणसी । जेणें संरक्षून आणिलें तुजसी । तोचि मारुती न ये ओळखिसी । दुजी व्यक्ति धरिली म्हणोनी ॥५॥

तो मारुती अंगें ऐसें म्हणतां । बाळकक म्हणे काय जी ताता । मज रक्षिलें तेवि न रक्षी माता । न देता प्रगट दर्शन ॥६॥

तरी स्वामि माझी एक विनंति । तो भेटवावा प्रत्यक्ष मारुती । मग सद्‌गुरु हसोनिया बोलती । तुज इच्छा जरी दर्शनाची ॥७॥

तरी पुरश्चरण करी बरवें । निर्धारेवीण दर्शन नव्हें । ऐसें बोलूनी मंत्र स्वभावें । विधियुक्त दिधला ॥८॥

आसन घालोनि राममंत्नजपासी । माधवा बैसविलें अनुष्ठानासी । ध्यान लाउनिया मूर्ति मानसी । जपही करितसे ॥९॥

प्रातः काळपासून मध्यीन्ह । तों काळ जप करी एकाग्र मन । भोजनसमयीं स्वतंचि जाउन । उठ उनी आणिती ॥१०॥

अपुलें पत्रावरील शेष । परप्रतीती देती विशेष । तया बाळासीही अति संतोष । उच्छिष्टसेवनाचा ॥११॥

मागुती अस्तमान जालियावरी । अनुष्ठाना बैसे निर्धारी । लोटतांचि मध्यान्हरात्री । स्वामी जाउन उठविती ॥१२॥

उपहाराचे शेष देउनी । निद्रा करिती त्या पुढें घेउनी । माधव पुसतसे प्रतिदिनीं । कीं मारुती केव्हा भेटें ॥१३॥

तेव्हा उद्धवस्वामी म्हणती । उद्या भेटेल सखा मारुती । तैसाचि ध्यास माधवा चित्तीं । राहे उद्याचा ॥१४॥

ऐसें प्रतिदिनी चलतां अनुष्ठान । लोटतें जालें एक अयन । प्रतिदिनी पुसतां दर्शन । उद्या होय म्हणती ॥१५॥

एकें दिनी मध्यान्हराती । एकाग्र ध्यान असतां चित्तीं । प्रगटता जाला वीर मारुती । विद्युल्लते ऐसा ॥१६॥

तेणें कडकडाट थोर जाला । अतितर प्रकाशही दाटला । तें तेज न साहवे नेत्रांला । तेव्हां झांकीं डोळें ॥१७॥

नेत्र झांकोनीं स्तवन करित । काय आजोबा मजवरी नाही प्रीत । बहु दिवसांचा असता सांगता । अजि भेडसाविता कां ॥१८॥

ऐसें ऐकितां मारुतीनें । सौम्य रूप साजिरें धरणें । अरे बाळा उघडी नेत्र म्हणे । पाहे मजसी ॥१९॥

बाळ उघडून नेत्र पाहे । तंव साजिरी मूर्ति रम्य आहे । मग माधवें धांऊन लवलाहे । चरणीं साष्टांग केले ॥२०॥

हात जोडुनी करी विनंति । आपण कृपावंत तरी अती । तरी कां सोडुनि गेला निश्चिती । येथें आलियावरी ॥२१॥

तेव्हां हें रूप होते चोरिलें । अन्य व्यक्तीनें मज रक्षुन आणिले । किमपिही नाही कळूं दिधलें । मी अमुक असे म्हणुनी ॥२२॥

म्यां स्वामीसी जेव्हां पुसिलें । तेव्हां मजप्रती सांगितलें । उद्या भेटी होय म्हणतां लोटले । सहा महिने कीं ॥२३॥

ऐसें ऐकतां माधवांचें वचन । बोलते जाले हसोन । अरे बाळा तूं अससी अज्ञान । तुज न कळे यथार्थ ॥२४॥

अरे उद्धवस्वामीं जयासी म्हणती । तोचि असे कीं मी मारुती । आणि तुझिया हृदयीं निश्चिती । मीचि सदा असे कीं ॥२५॥

तें माझें रूप त्वां त्यागुन । पाहूं इच्छिसी मिथ्य त्वालागुन । तेव्हा स्वामीनी करवुनी अनुष्ठान । मजप्रति भेटविलें ॥२६॥

परि हें रूप सदा न राहे । क्षणभरी पाहतां नासे लवलाहे । हें पाहे कीं तुझें मनचि जालें आहे । ध्यास लागतां अति ॥२७॥

तरी ऐक एक माझें वचन । तुजसी सत्य सांगें प्रमाण । या तुझ्या मनासीं जें अधिष्ठान । तेंचि सत्य रूप माझें ॥२८॥

तया स्वरुपाचें दर्शन एकदा । जालिया नाश नाहीं कदा । तिहीहीक अवस्थेमाजी सदा । वियोगचि नव्हे ॥२९॥

तरी आतां एक त्वां करावें । उद्धवस्वामीसीं प्रार्थून पुसावें । कीं मज मनाचें अधिष्ठान दाखवावें । तेव्हा ते दाखविती तुज ॥३०॥

मग तुज तें कृपेनें दाखविती । तेव्हां तूंचि होसी अंगें मारुती । एकदा संयोग होतां कल्पांतीं । वियोग नव्हेल ॥३१॥

इतुकें बोलणें होत असतां । स्वामीं पातले सदना अतौता । माधवें देखून घाली दंडवता । आणि विनविता जाला ॥३२॥

जी जी माझीया मनीं जें होतें । तें पुरविलें भेटविलें मारुतीतें । आतां एक विनवणी समर्थातें । असें ते परिसावी ॥३३॥

माझें हृदयीं मारुतीचें स्वरूप । कैसें असे तें दाखवा मज चिद्रूप । आणि मी कोन हा माझा आक्षेप । फेडा स्वामी ॥३४॥

आणि या सृष्टीवरी बहु देव । तरी यांत मुख्य कोण देवाधिदेव । आणि देहादि हें जगत्सर्व । सत्य की मिथ्या ॥३५॥

जीवासी कैसें पडिलें बंधन । कैसा मोक्ष पाविजे कासयान । हें सर्व सांगावें मजलागून । म्हणुन चरण धरियेले ॥३६॥

ऐसे प्रश्न चिमणिया बाळाचे । ऐकतां तुष्टलें चित्त स्वामींचें । ऐके बोलिजेल उत्तर प्रश्नाचें । पुढील प्रकरणीं ॥३७॥

इति श्रीमद्धंसगुरूपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP