पंचवटिकेसी असतां नारायण । त्रिकाल गोदेचे करित स्नान । टिळे माळा शोभे कौपीन । वया वर्ष सहावें ॥१॥
एक वेळ भीमकुंडीं जाउनी । प्राथिलें मारुती लागुनी । धांवें धाव्रं गोतमी जननी । वत्स तुझें भुकेलें ॥२॥
तंव तो पातला वीर मारुती । येरु मस्तक ठेवी चरणावरुती । मारुती ह्मणे काय असे चित्तीं । सांग तें मी करीन ॥३॥
येरु विनवी बोलिला होता । कीं राम उपदेशील तुज तत्वतां । तरी भेटवावे जनकात्मजासहिता । याच क्षणी मज ॥४॥
ऐकतां तुष्टोनि मारुती । स्मरता जाला श्रीरामप्रति । तत्क्षणीच प्रगटला कृपामुर्ति । सद्गुरुहंस श्रीराम ॥५॥
सिंव्हासनीं जानकीस हित । मागें उभा सुमित्रासुत । ऐसा देखिला घवघवित । दृष्टीस एकएकी ॥६॥
उभयतां घालिती नमस्कार । रामें आलिंगिला अंजनीकुमर । मस्तकी ठेविला अभकर । नारायणाचिया ॥७॥
नंतर उठवुनी बैसविलें । स्वकरें मुखासी कुरवाळिलें । सावधान असावें ह्मणती वहिलें । अगा बाळा उपदेशा ॥८॥
सकल उपनिषदांचे सार । तूंच कीं ब्रह्मा निराकार । जीवशिवादि भेदप्रकार । तुझ्या ठायीं कैचा ॥९॥
रज्जूबरी सर्प जैसा । तुजवरी जगद्भ्रम तैसा । तेथें देहादि अहंकारांत सहसा । मी हें भावूंच नको ॥१०॥
अस्थिमासांचा स्थुल देहो । तेथें जागृति अवस्थेचा निर्वाहो । विश्वाभिमानी घेतले लाहो । या विकरापरता तूं आत्मा ॥११॥
सूक्ष्म देह अवस्था स्वप्न । तैजसनामें जो घेतसे अभिमान । या भ्रमासी जो अधिष्ठान । तो तूं याहून परता ॥१२॥
तुज स्वरुपाचें जें विस्मरण । तयासी बोलिजे देह कारण । तेचि सुषुप्ति अवस्था प्राज्ञाभिमान । याहून भिन्न तूं आत्मा ॥१३॥
जैसा देहत्रया विलक्षण । तैसाचि सर्व ब्रह्माडां अधिष्ठान । मुळमायातीतं तूं निर्गुण । अससी बापा ॥१४॥
जड तरी पंचभुतादि अघवें । हें कांहीं तुझें रूपे नोहे । चंचल तितुकेंक व्यर्थ भासावें । तें तरी तूं कैसा ॥१५॥
दोही वेगळें एक निश्चळ । तें तें परब्रह्मा केवळ । माया अविद्येचा जेथें मळ । स्पर्शिलाचि नाहीं ॥१६॥
ऐसा तूं परिपुर्ण अनंत । उप्तत्तिस्थितिप्रलयरहित । तेथें कैचा बंधमोक्षा संकेत । नामरूपातीत तूं ॥१७॥
अमा तूं मी आणि हा मारुती । हे शब्दमात्रेंचि भेदे वृत्ति । परि अवघा एक चिन्मूर्ति । परिपूर्ण अद्वैत ॥१८॥
ऐसे श्रीरामसद्गुरुहंसाचे । शब्द ऐकूनी निष्कर्षाचे । मूळ छेदुनी संशयाचें । समाधान पावला ॥१९॥
जेथें समाधि ना उत्थान । सहजी सहजत्वें अभिन्न । होऊन वंदितसे चरण । आणि विनविता झाला ॥२०॥
मी कृतार्थ स्वामीचिये कृपें । अज्ञान नाशिलें ज्ञानादीपें । तरी अज्ञान कार्य सह पडपें । राहे कैसेनी ॥२१॥
परी एकचि विनंती असे चरणीं । पूर्ण ज्ञानाचे निरूपणीं । उत्तमाधिकारी श्रवणमननीं । समाधान पावे ॥२२॥
तैसें मंदप्रज्ञासी न घडे । तया साधन असावें कोडें । जेणें अनधिकारिया मोक्ष जोडे । भावर्थियांसी ॥२३॥
ऐसें साधन निरोपावें । जेणें स्त्रीशुद्रादिहि उद्धरावें । ऐकतां राम ह्मणें हें न घडावें । कदा काळीं ॥२४॥
ज्ञानेविण जरी मोक्ष जोडे । तरी वाजती श्रुतीचे चौघडे । ते बोल काय होती कुडे । आणि वचनें ज्ञात्याचीं हं ... ॥२५॥
परी ज्ञानाची प्राप्ती व्हावया । सांगेन ऐकावें उपाया । तेणें अंतः करण शुद्ध होवोनिया । स्थिरत्व होय चित्ताचें ॥२६॥
तेंचि कोणतें ह्मणसी साधन । तरी राममंत्राचें व्हावें । पुरश्चरण । परी मंत्र घ्यावा सद्गुरुमुखेंकडुन । जया चाड परमार्थाची ॥२७॥
येथें नलगे पात्रापात्र । स्त्रीशूद्रेहीं घ्यावा राममंत्र । त्रयोदशाक्षरी पवित्र । न्यासध्यानादिपुर्वक ॥२८॥
सत्पात्रता पाहिजे दान द्यावया । भोजन घालावें भलतिया । ज्ञानासी पाहिजे अधिकारियां । मंत्राधिकार सर्वां ॥२९॥
ऐसें ऐकतांचि नारायण । श्रीरामापुढें पसरी कान । तो राममंत्र परम निधान । सांठवाव हृदयीं माझें ॥३०॥
बहु बरे रामें ह्मणुनी । वीजमंत्र सांगितला कर्णीं । हा सप्रणव द्यावा ब्राह्मणालागुनी । प्रणवेविण स्त्रीशुद्रां ॥३१॥
ऐसा करावया जगदुद्धार । नारायण घेता जाला मंत्र । तेथुन मंत्र उपदेशप्रकार । पद्धति चालिली ॥३२॥
आणिक विनवितसे पुढती । हें नाम नसावें मज प्रति । रामदासाख्य हें त्रिजागतीं । प्रख्यात व्हावें ॥३३॥
तथास्तु ह्मणतसे रघुपति । कंठीं हर्मुजी मेखला होती । ते कृपेनें वोपिली शीघ्रगति । रामदास नाम ठेवुनी ॥३४॥
हंससंप्रदाय वाढले थोर । ऐसा देउनिया वर । सीतासौमित्रासहित रघुवीर । अंतर्धान पावले ॥३५॥
मारुती ह्मणे गा रामदास । पूर्ण जालें कीं इच्छित मानसा । येरु ह्मणे जो कृपेसरिसी । परिपूर्ण जालों ॥३६॥
परी अझुन एक असे प्रार्थना । मंत्राचें घडावें पुरश्चरणा । आपणाकरितां सर्वही जना । तोचि मार्ग लागे ॥३७॥
आपण आधी जितुकें करावें । तितुकेंक अन्याप्रति सांगावें । क्रियावीणे जें उपदेशावें । तेंचि निष्फळ ॥३८॥
प्रतिलक्ष मंत्राक्षराप्रति । पुरश्चरणाची असे गणती । परि हेतु असे जो माझिये चित्तीं । तो अवधारिजे जी ॥३९॥
वाल्मीकें स्वयें आपुलें ओठीं । रामायण वदला शतकोटी । तरी मजलाही घडावा उठाउठी । शतकोटी जप ॥४०॥
हंसोनि बोले हंस मारुति । अगा हे बाळा नकळे तुजप्रति । हेंकलियुग अल्पायुषी होती । प्राणी हे अवघे ॥४१॥
शतवर्षे वय नेमिलें । परि बालपणींच कित्येक मेले । अथवा शतवर्षे जरी पूर्ण जाले । तरी शतकोटी जप नव्हे ॥४२॥
परि तुवां घेतलास जो आळ । तो मी पुरवीन बापा सकळ । तोचि कैसी ऐके केवळ । संख्या शतकोटीची ॥४३॥
" मंत्रोऽन्यत्र मनोऽन्यत्र अन्यत्र शिवमारुतः । कोटिजन्म जपं कुर्यात कस्य सिद्धिर्वरानने ॥ "
सांब ह्मणे पार्वतीसी कोंडें । मंत्र अन्ये मन एकीकडे । दैवत अन्य प्राण अन्य तरी जोडे । सिद्धि केवी कोटिजन्म जपतां ॥४४॥
तस्मात् मन दैवत प्राण । सार्थ जप सहित ध्यान । घडे जया एकावर्तन । तेणें सहस्त्रधा केलें ॥४५॥
मनमाला ते उत्तम । ओष्ठमाला ते मध्यम । करमाला तोचि अधम । अधमाधम माणीमाला ॥४६॥
अथवा वर्णमाला ते उत्तम । करमाला ते असे मध्यम । अक्षमाला ते अधम । अधमाधम काष्ठमाला ॥४७॥
मनमालेनें एकाचे सहस्त्रगणती । वर्णमालेनें शतसंख्या होय भरती । अक्षमालें केल्या इतुके रहाती । अन्य सर्व तो निष्फळ ॥४८॥
तस्मात् रामदासा ऐकावें तुवां । मुख्य मनमालेनें जप करावा । वर्णमालेनें जपें अथवा । येर तो गोवा परता सांडी ॥४९॥
तरी अल्पचि काळें उठाउठीं । जपहा घडेल शतकोटी । जेव्हां संख्यां होईल तेव्हां माझें भेटी । होईल हें समजें मनीं ॥५०॥
ऐसें बोलोनि अंजनीनंदन । त्वरें पावला अंतर्धान । मग हंससमर्थ भीमकुंडीं जाऊन । जप तो आरंभिला ॥५१॥
नाहीं माळा ना आसन । स्वयें नाठवेंचि मी कोण । ऐसें एकाग्र करुनी मन । उदकामाजी जप करिती ॥५२॥
हंससमर्थें श्रीगुरुरामास । मागून घेतलें नाम रामदास । परि संप्रदायियाणें दास हा वाणीस । उच्चार न करावा ॥५३॥
तरी हंससमर्थं ह्मणुनी । शिष्यवर्गें नाम जपावें वाणी । असो शतकोटी जप होता क्षणीं । मारुती हंस प्रगटले ॥५४॥
अलं अलं बापा आतां जप । तुझा सिद्धि गेला संकल्प । पुरे कर्माचा खटाटोप । तूं निष्कर्म सर्वदा ॥५५॥
ऐसा मारुतीची ऐकतां वाणी । समर्थ लोळती येऊन चरणीं । उभयंता प्रवर्तले आलिंगनी । शिवरुपा दोघेहीं ॥५६॥
अनुष्ठानाची करुनी समाप्ति । उभयतांही वनफळें खाती । हेंचि संतर्पण सर्व विश्वाची तृप्ति । जाली एकदाची ॥५७॥
पुढे उभयतांही चर्चा करिती । अहोरात्र उभयतांची संगति । हें नकळेचि कवणाप्रति । ऐसी द्वादशवर्षे लोटलीं ॥५८॥
येथें मध्यें एक असे इतिहास । समर्थ उपदेशिलें उद्धवहंसास । ते कथा विस्तारें बहुवस । द्वितीयाष्टकी आहे ॥५९॥
परि हे प्रथमशिष्य पट्टाधिकारी । टांकली संस्थानीं स्थापिती निर्धारी । पुढें जावयासी कृष्णातीरीं । आज्ञा करित मारुती ॥६०॥
आतां कृष्णातीरीं होय निवास । त्यागोनिया गोदातीरास । चिमणे बाळ कथा सुरथ । बोलेल हंसप्रसादें ॥६१॥
इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । श्रीमर्थहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणी ॥६॥