ब्रह्मादेव निजसुखें तृप्त । होत्साता विचारी मनांत । हेंचि आपण ध्यावें त्वरित । अनन्य व्यक्तीनें ॥१॥
म्यांचि मजसी बोधावें । म्यांचि मागुती सुखी व्हावें । आणि अन्य जनांसी दाखवावें । गुरुशिष्य एकरूप ॥२॥
ऐसा ब्रह्मादेवंहसाचा हेतु । प्रगटता जाला मूर्तिमंतु । तो वसिष्ठ ब्रह्मासुतु । विख्यात असे ॥३॥
श्रीवसिष्ठ उप्तन्न होतां । ब्रह्माया हंसासी जाला विनविता । कोणत्या ज्ञानें कर्मीं वर्ततां । अलिप्तत्वें राहिजें ॥४॥
ऐसें ऐकतां पिता गुरुहंस । महावाक्याचा करिता होय उपदेश । सखयां तूं प्रत्यक्ष् ब्रह्मा आहेस । सर्व मायिकनिरासें ॥५॥
जें जे होतें आणी जातें । मायिक रूप ओळखी तेंतें । याचे अधिष्ठान सत्य जें तें । तो तूं आत्मा स्वयें ब्रह्मा ॥६॥
इतुकें ऐकतां विचारेंकडुन । वसिष्ठ पावला समाधान । अंगें ब्रह्मा मी सच्चिदेद्धन । उपाधि तरी मज कैची ॥७॥
माया ईश्वर आणी ईशनिर्मित । अविद्या जीव आणि जीवकृत । इतुकें हें नामरुप समाप्त । भ्रमास्तव जालें असे ॥८॥
भ्रमें भासलें तें जालें नाहीं । जरी दिसत असताहे सर्वही । दोरीवरील जैसा अहि । यासि निरसावें कासया ॥९॥
जोंवरी असे उप्तत्तिकाळ । तोंवरी दिसेल मृगजळ । लय होतां आपेआप सकळ । माझे ठायीं आटे ॥१०॥
ऐसा पूर्णबोधें वसिष्ठ मुनि । पूर्णकाम समाधानी । लोकोपकारालागुनी । विहितकर्में आचरे ॥११॥
सप्तषिंमाजीं अग्रगण्य । यावत्काल असे व्यक्ति धरून । कर्म ज्ञान मार्ग समान । अधिकारभेदें चालवी ॥१२॥
असो ऐसा वसिष्ठमुनि । विचार करिता झाला मनीं । मीच गुरु हंसरुप असोनी । शिष्यव्यक्ति धरनि ॥१३॥
तोचि हेतु वसिष्ठाचा । त्रेतायुगीं प्रगटे साचा । जो कां अवतार नारायणाचा । रावणहनना प्रगटे ॥१४॥
सूर्यवंशीं रघुचिये कुळांत । प्रगटला यास्तव राघव नाम विख्यात । दाशरथी दशरथसुत । रामनाम असे जया ॥१५॥
हा विष्णूचा जाणुन अवतार । मखरक्षणा नेत विश्वामित्र । ते समयीं राजा रामचंद्र । वसिष्ठ गुरूसी विनवीत ॥१६॥
साष्टांग करुनी नमस्कार । सप्रेमें विनविता होय थोरू । जयजय सद्गुरु ज्ञानविचारु । मजप्रति द्यावा ॥१७॥
मग कळवळोनि मुनि वसिष्ठ । सांगता जाला योगवसिष्ठ । जो का वेदांतसंमतीं श्रेष्ठ । आणि सांख्यपातंजलींहीं ॥१८॥
जो ग्रंथामाजीं मुगुटमणि । अध्यातविद्येची तरी खाणी । तितुका मज बोलावया वाणी । मति हे कैची ॥१९॥
असो सफल ग्रंथाचें तात्पर्य । जें प्रत्यगात्मा ब्रह्मा अद्वय । इतुकाचि हा बोलतां विषय । होय सर्वसिद्धि ॥२०॥
जैसा कुसुंबाचा रंग । एका सान वस्त्रांत येतसे सांग । तैसा वेदांतविस्तार अमोघ । एका वचनी येतसे ॥२१॥
असो प्रत्यगात्मा ब्रह्मा पूर्ण । तूंचि रामा अससी अभिन्न । येणें उपदेशें समाधान । जालें असे रघुनाथा ॥२२॥
तया ज्ञानें अखंड तॄप्त । लोका ऐसा लोकीं वर्तत । वाल्मिक जयाचें चरित्र गात । शतकोटी रामायणें ॥२३॥
तोचि अर्थ शतकोटीचा । सारांश बोलिला व्यास वाचा । अध्यात्मरामायण ग्रंथ हा साचा । विख्यात असे ॥२४॥
तेथें रामाचा पुरुषार्थ बोलिला । रावणवधादि अनुक्रम कथिला । ऐशिया प्रवृत्तिमाजी संचला । बोध तो परिपुर्ण ॥२५॥
एवं सद्गुरु श्रीहंसाचें । संकेतें चरित्र बोलिलें साचें । जेवी अल्प पय घेऊन पयोनिधीचें । बाळ चिमणें नाचत ॥२६॥
इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्याक्ति । श्रीरामाख्यान हें निगुती । चतुर्थ प्रकरणी बोलिलें ॥४॥