आदिपुरुष निर्विकार ॥ कौसल्येस घाली नमस्कार ॥ प्रदक्षिणा करूनि वारंवार ॥ मुख विलोकीं जननीचें ॥१॥
जो मायातीत अगोचर ॥ तेणें आसुवें भरले नेत्र ॥ विमलांबुधारा पवित्र ॥ मुखावरून उतरल्या ॥२॥
मायेनें धांवून तयेवेळीं ॥ रामाचे गळां मिठी घातली ॥ तो शोक ऐकतां उर्वीमंडळीं ॥ कवींसी बोली न वर्णवे ॥३॥
म्हणे कमलपत्राक्षा रघुनंदना ॥ तुवां कैकयीची पाळिली आज्ञा ॥ मान दीधला पितृवचना ॥ माझी अवज्ञा कां करिसी ॥४॥
मग तो जगद्वंद्य रघुनायक ॥ मातेसी म्हणे न करीं शोक ॥ मी सत्वर परतोनि देख ॥ जननी येतों तुजपाशीं ॥५॥
असो सीतेचिया मंदिरांत ॥ प्रवेशला जनकजामात ॥ सीता जाहल आनंदभरित ॥ मूद ओंवाळी वरूनिय ॥६॥
मनीं जगन्माता विचारति ॥ कां एकलेचि आले श्रीरघुनाथ ॥ संगें राजचिन्हें नाहींत ॥ चिंताक्रांत जानकी ॥७॥
वृत्तांत सांगें रघुनंदन ॥ आम्ही वनाप्रति करितों गमन ॥ तुवां कौसल्येची सेवा करून ॥ सुखें राहावें येथेंचि ॥८॥
सुमित्रा आणि कैकयी ॥ समान भजें सर्वांठायीं ॥ जनकगृहा न जाय कदाही ॥ कुरंगनेत्रे जानकी ॥९॥
वनासी येसी तरी बहुत ॥ दंडकारण्य कठिण पंथ ॥ वात ऊष्ण शीत यथार्थ ॥ न सोसवे तुझेनि ॥११०॥
तंव ते सुंदर श़ृंगारमराळी ॥ गुणसरिता जनकबाळी ॥ सुकुमार राजस चंपककळी ॥ काय बोले तेधवां ॥११॥
अहा जगद्वंद्या श्रीरामा ॥ निजभक्तकामकल्पद्रुमा ॥ गजास्यजनकविश्रामा ॥ टाकुनि मला नव जावें ॥१२॥
जगज्जनका रघुवीरा ॥ जनकजामाता जगदुद्धारा जगरक्षका जलनेत्रा ॥ जलदगात्रा रघुराजा ॥१३॥
जलचरें जल सांडून ॥ वेगळीं होतां त्यजिती प्राण ॥ द्विजकुळांसी आकाशावांचून ॥ नव्हे भ्रमण कोठेंही ॥१४॥
दीप सांडूनि निश्र्चितीं ॥ प्रभा न राहे कल्पांतीं ॥ कनकासी टाकूनि कांति ॥ कदा परती नव्हेचि ॥१५॥
शिवावेगळी नाहे अंबिका ॥ किरणें न सोडिती कदा अर्का ॥ साधुहृदय सांडोनि सद्विवेका ॥ कोठें जाणें घडेना ॥१६॥
रत्नावेगळी कळा ॥ गोडी न सोडी गुळा ॥ कस्तूरी न सोडी परिमळा ॥ तेवीं मी वेगळी नव्हेचि ॥१७॥
म्हणोनि रघुपति कोमलांगा ॥ दयाळा मम हृदयाब्जभृंगा ॥ ताटिकांतका नवमेघरंगा ॥ मज टाकूनि न जावें ॥१८॥
सिंह सखा असतां पाहीं ॥ मग कांतारीं हिंडतां भय नाहीं ॥ सीतेचे शब्द ऐकतां हृदयीं ॥ जगदात्मा संतोषला ॥१९॥
जानकीवचन सुधाकर ॥ तेणें तोषले रामकर्णचकोर ॥ कीं वचनमेघ गर्जतां गंभीर ॥ मनमयूर नृत्य करी ॥१२०॥
रघुपती म्हणे इंदुवदने ॥ श्रीवसिष्ठाचे चरण धरणें ॥ मज वनाप्रति पाठवणें ॥ हेंचि विनवीं तयांप्रति ॥२१॥
तुज नेतां वनाप्रति ॥ नानाशद्बें लोक निंदिती ॥ यालागी पुसोनि वनाप्रति ॥ समागमें निघावें ॥२२॥
मग वसिष्ठाचिये चरणीं ॥ नमन करी जगज्जननी ॥ म्हणे मी राघवाची सांगातिणी ॥ वनवासीं होईन ॥२३॥
मग वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ संगे नेईं जनकदुहिता ॥ सवें असो द्यावें सुमित्रासुता ॥ रक्षणार्थ तुम्हांतें ॥२४॥
असो सौमित्रास म्हणे राघवेश ॥ वसिष्ठगृहीं आहे मम धनुष्य ॥ अक्षय भाते निःशेष ॥ वरद शस्त्रें आणावीं ॥२५॥
आपुलें संग्रहधन रघुवीर ॥ याचका वाटी उदार ॥ गुरुगृहास द्रव्य अपार ॥ वस्त्रें भूषणें धाडिलीं ॥२६॥
आणि नाना वस्तु संपत्ति ॥ पाठविल्या गुरुगृहाप्रति ॥ सद्रुरूसी जे न भजती ॥ अभागी निश्र्चिती तेचि पैं ॥२७॥
तनुमनधनेंसी शरण ॥ श्रीगुरुसी जो न जाय आपण ॥ तो जाहला जरी शास्त्रप्रवीण ॥ न करितां गुरुभजन तरेना ॥२८॥
व्यर्थ गेलें तयाचें तप ॥ जळो जळो तयाचा जप ॥ व्थर्थ काय कोरडा प्रताप ॥ गुरुवचन नावडे जया ॥२९॥
सद्रुरूचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ त्या अपवित्राचें मुख कदा ॥ दृष्टीं न पहावें कल्पांतीं ॥१३०॥
तरी तैसा नव्हे रघुवीर ॥ गुरुगृहाप्रति अपार ॥ द्रव्य वस्त्रें अलंकार ॥ पाठविलीं तेधवां ॥३१॥
गुरुपुत्र परम सूज्ञ ॥ आदरें आणिला बोलावून ॥ आपलीं वस्त्रें भूषणें काढून ॥ तया संपूर्ण लेवविलीं ॥३२॥
सीतेनें वस्त्रें भूषणें अपार ॥ सुयज्ञासी दिधलीं सत्वर ॥ रथ देऊनियां गुरुपुत्र ॥ निजगृहास पाठविला ॥३३॥
सकळ ऋषींच्या गृहाप्रति ॥ द्रव्य पाठवी रघुपति ॥ चौदा वर्षें निश्र्चितीं ॥ पुरोन उरे अपार ॥३४॥
विश्र्वामित्र असित कण्व ॥ दुर्वास भृगु वामदेव ॥ अंगिराआदि द्विज सर्व ॥ द्रव्य राघव पाठवी त्यांतें ॥३५॥
कौसल्या सुमित्रा माता जाणा ॥ द्रव्य पाठवी तयांच्या सदना ॥ रामें आपुले सेवकजनां ॥ द्रव्य अपार दिधलें ॥३६॥
दरिद्री दीन कुटुंबवत्सल ॥ अशक्त पंगु केवळ ॥ तयांसी द्रव्य तमानीळ ॥ आणूनि देता जाहला ॥३७॥
इष्ट अत्यंत गौरवून ॥ सर्वांस म्हणे रघुनंदन ॥ स्नेह न सांडावा मजवरून ॥ सुखें करून नांदा हो ॥३८॥
मग कैकयीच्या गृहास ॥ येता जाहला जगन्निवास ॥ ते वेळे अयोध्येच्या लोकांस ॥ कल्पांतचि वाटला ॥३९॥
अयोध्येच्या नरनारी ॥ अश्रु वाहती तयांच्या नेत्रीं ॥ गोब्रह्मणांचा कैवारी ॥ वना जातो म्हणोनियां ॥१४०॥
इकडे कैकयीच्या सदनांत ॥ रामें नमिला दशरथ ॥ प्रदक्षिणा करोनि विलोकित ॥ वदनारविंद पितयाचें ॥४१॥
दशरथ म्हणे रघुनंदना ॥ राजीवनयना जातोसी वना ॥ मी न ठेवीं आपुल्या प्राणा ॥ कुलभूषणा रघुवीरा ॥४२॥
राजा म्हणे श्रीरामातें ॥ दळभार नेईं सांगातें ॥ वनामाजी सुखें वर्तें ॥ चौदा वर्षेपर्यंत ॥४३॥
तों रामचंद्र बोले वचन ॥ मी तपालागीं सेवितां कानन ॥ तेथें दळभाराचें कारण ॥ सर्वथाही नसेचि ॥४४॥
वल्कलें वेष्टूनि वनांत ॥ तप करीन मी यथार्थ ॥ ऐसी कैकयीनें ऐकोनी मात ॥ वल्कलें पुढें ठेविलीं ॥४५॥
तीं वेष्टूनि श्रीराम ॥ श्यामलांगीं लाविलें भस्म ॥ केशभार सुवास परम ॥ आकर्षोनि बांधिले ॥४६॥
सौमित्रें वल्कलें वेष्टून ॥ वंदिले दशरथाचे चरण ॥ तों कैकयी म्हणे सीते झडकरून ॥ वस्त्रें भूषणें फडीं कां ॥४७॥
ऐसें ऐकतां जनकबाळी ॥ तडिदंबर भूषणें त्यागिलीं ॥ तीं सर्व कैकयीनें आवरिलीं ॥ वल्कलें दीधलीं नेसावया ॥४८॥
तंव वल्कलें कडकडीत कठिण ॥ नेसतां न येती सीतेलागून ॥ मग आपुले करें रघुनंदन नेसवीत जानकीतें ॥४९॥
जानकी सुकुमार अत्यंत ॥ वल्कलें नेसतां अंगास रुपत ॥ ते देखोनि ब्रह्मसुत ॥ निर्भस्ति कैकयीतें ॥१५०॥