अध्याय दहावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्री गणेशाय नमः॥

श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

संतसज्जनांची मांदी मिळाली ॥ देखोनि वाग्देवी धांविन्नली ॥ शब्दरत्नांची भरणीं भरलीं ॥ वेगें आणिली भक्तिपेठे ॥१॥

पाहोनि ग्राहकांची आवडी ॥ परीक्षक तैसेंचि रत्न काढी ॥ कीं सुगरणीं जैसी वाढी ॥ अपेक्षा पाहूनि क्षुधितांची ॥२॥

गात्रें पाहूनि भूषणें ॥ लेवविती पैं शाहाणे ॥ कीं दिनमान पाहून उष्णकिरणें ॥ दया जैसें पाविजे ॥३॥

कीं पाहूनियां समयघटिका ॥ उदय होय जेंवि शशांका ॥ कीं वर्षाकाळींचे देखा ॥ मेघ जैसे वर्षती ॥४॥

कीं ऋतुकाळीं येती फळें ॥ कीं उत्तम काळ पाहूनि भले ॥ सत्कर्में करिती सकळें ॥ निष्कामबुद्धीकरूनियां ॥५॥

कीं वेदांचें अंतर पाहूनि देख ॥ चालताति शास्त्रांचे तर्क ॥ कीं लवण पाहूनि उदक ॥ धांवे जैसें त्वरेनें ॥६॥

तैसें श्रोत्यांचें जाणोनि अंतर ॥ रामकथा आरंभिली साचार ॥ बोलिला वाल्मीक ऋषीश्र्वर ॥ तेंचि चरित्र परिसा पां ॥७॥

शब्दभवाब्धि भरला अपार ॥ कवितालक्ष तारूं थोर ॥ स्फुर्तिवायूच्या बळें सत्वर ॥ जहाज चाले त्वरेनें ॥८॥

सद्गुरुकृपा हेंचि बंदर ॥ तेथें शब्दरत्नें भरलीं अपार ॥ संतपेठेसी आणिलीं साचार ॥ ग्राहक थोर म्हणोनियां ॥९॥

तरी सादरता देऊनि धन ॥ घ्या जी शब्दरत्नें परीक्षा करून ॥ असो पूर्वोध्यायीं सुमंत प्रधान ॥ श्रीरामगृहासी पातला ॥१०॥

शोकाकुलित होऊनि ॥ दशरथ पडला कैकयीसदनीं ॥ अग्निसंगेकरूनि ॥ मुक्त जैसें आहाळलें ॥११॥

ग्रहणकाळीं सूर्यचंद्र ॥ दिसती कळाहीन साचार ॥ कीं पंकगर्तेत सुकुमार ॥ हंस जैसा रुतला ॥१२॥

तैसा जाण द्विपंचरथ ॥ पडिला असे शोकग्रस्त ॥ सुमंत पाठविला त्वरित ॥ श्रीरामासी आणावया ॥१३॥

असो सुमंत म्हणे जी श्रीरामा ॥ रायें बोलाविलें कैकयीधामा ॥ पुराणपुरुष सर्वात्मा ॥ तात्काळ उठोनि चालिला ॥१४॥

रथीं बैसला ते क्षणीं ॥ नवमेघरंग चापपाणी ॥ भक्तकैवारी कैवल्यदानी ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥१५॥

वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ पाहती सर्व अयोध्याजन ॥ म्हणती कोट्यानकोटी मीनकेतन ॥ श्रीरामावरूनि ओंवाळिजे ॥१६॥

श्रीराममुकुटींची दिव्य कळा ॥ तेणें रविमंडप उजळला ॥ त्या तेजांत सूर्य बुचकळला ॥ प्रकाश पडला पृथ्वीवरी ॥१७॥

मकराकार शोभती कुंडलें ॥ कीं प्रळयाग्नीनें नेत्र उघडिले ॥ कीं कल्पांतविजूचे उमाळे ॥ शीतळ जाहले सर्वही ॥१८॥

अनंत बाळसूर्याच्या कळा ॥ श्रीरामरूपीं लोपल्या सकळा ॥ कीं ब्रह्मानंद रस ओतिला ॥ सगुणलीला धरूनियां ॥१९॥

सुवर्णोदकनदी निर्मळ ॥ मेरुपाठारीं वाहे सदा काळ ॥ तैसें केशरदिव्यतिलक भाल ॥ श्रीरामाचें शोभतसे ॥२०॥

अंगी दिव्य चंदन चर्चित ॥ अयोध्येमाजी सुवास बहंकत ॥ तेणें घ्राणदेवता नाचत ॥ निजानंदें करूनियां ॥२१॥

गुणीं ओविलीं भगणें सकळें ॥ तैसे मुक्ता हार शोभती चांगले ॥ अनंत ब्रह्मांडें एकेचि वेळे ॥ एकसरें डोलती ॥२२॥

अपार राहिले भक्त प्रेमळ ॥ म्हणोनि रुंदावलें वक्षःस्थळ ॥ दिव्य तेज पदक निर्मळ ॥ प्रभेनें निराळ कोंदलें ॥२३॥

अजानुबाहु रघुनंदन ॥ करीं विराजत चापबाण ॥ कटीं मेखळा पीतवसन ॥ चपळेहून झळकतसे ॥२४॥

असो ऐसा रघुनाथ ॥ रथारूढ विरिंचितात ॥ छप्पन्न देशींचे राजे समस्त ॥ देखोनियां आनंदले ॥२५॥

पुढें चालत चतुरंग दळ ॥ धडकत वाद्यांचा कल्लोळ ॥ श्रीराम पाहावया सकळ ॥ उतावीळ जन जाहले ॥२६॥

पाहतां श्रीरामाचें मुखकमळ ॥ राजे आनंदले सकळ ॥ म्हणती जन्म जाहला सुफळ ॥ तमालनीळ देखिला ॥२७॥

धन्य धन्य तो दशरथ ॥ जयाच्या उदरीं अवतरला रघुनाथ ॥ यासी राज्यपद यथार्थ ॥ देईल आतां संभ्रमें ॥२८॥

तो सोहळा पाहूनि नयनां ॥ जाऊं आपुल्या स्वस्थाना ॥ असो ऐसा मिरवत रामराणा ॥ कैकयीसदनासमीप आला ॥२९॥

जवळी आला ऐकोनि रघुनाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे दशरथ ॥ लोकां बाहेर टाकोनि जात ॥ श्रीराम दशरथाजवळी पैं ॥३०॥

लक्ष्मण आणि सुमंत ॥ यांसहित प्रवेशे रघुनाथ ॥ तों मुर्च्छित पडला दशरथ ॥ नयनीं वाहत अश्रुधारा ॥३१॥

रामें दशरथासी केलें नमन ॥ वंदिलें कैकयीचे चरण ॥ येरी म्हणे विजयी पूर्ण ॥ सर्वदाही होसी तूं ॥३२॥

श्रीराम पुसे कैकयीसी ॥ काय व्यथा रायाचे मानसी ॥ कां शयन केलें भूमीसी ॥ मजप्रति सांगिजे ॥३३॥

कैकयी सांगे समाचार ॥ रायें मज दिधले दोन वर ॥ ते मी मागतां साचार ॥ दुःख थोर वाटलें ॥३४॥

मग बोले रघुनंदन ॥ ते मी भाक पुरवीन ॥ येरी म्हणे तूं वनासी करीं गमन ॥ चतुर्दश वर्षें पर्यंत ॥३५॥

सांगातें नेईं सुमित्रासुत ॥ राज्य करील माझा भरत ॥ तूं वनीं होसील यशवंत ॥ सीताकांत अवश्य म्हणे ॥३६॥

मातेची आज्ञा सर्वथा ॥ न मोडावी प्रमाण शास्त्रार्था ॥ संन्यास जरी घेतला तरी माता ॥ वंदावी हें साचार ॥३७॥

प्राणाहून पलीकडे ॥ माझा भरत मज आवडे ॥ त्यास राज्य देतां मत सांकडें ॥ सर्वथाही वाटेना ॥३८॥

भूधर अवतरला लक्ष्मण ॥ परम क्रोधावला जाण ॥ भ्रकुटीये आंठी घालोन ॥ नेत्रयुगुल वटारिलें ॥३९॥

जैसा विवेकबळेंकरून ॥ क्रोध आवरिती साधकजन ॥ तैसाचि उगा राहिला लक्ष्मण ॥ भीड धरून रामाची ॥४०॥

असो कैकयीस नमून रामराणा ॥ आला कौसल्येच्या सदना ॥ परमानंद पावला मना ॥ तपोवना जावया ॥४१॥

कीं दैत्य वधावया जातां स्वानंद ॥ गजवदन आणि वीर स्कंद ॥ नमिलें अन्नपूर्णेचें चरणारविंद ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥४२॥

कीं करूं जातां अमृतहरण ॥ सुपर्णे वंदिले जननीचरण । त्याजपरी रघुनंदन ॥ कौसल्येसी नमीतसे ॥४३॥

सांगीतलें सकळ वर्तमान ॥ धगधगिलें कौसल्येचें मन ॥ भूमीसी पडली मूर्च्छा येऊन ॥ वाटे प्राण चालिला ॥४४॥

किंवा हृदयीं शस्त्र खोंचलें ॥ कीं लोभियाचें धन हरविलें ॥ तैसे कौसल्येसी वाटलें ॥ आज्ञा मागतां श्रीरामें ॥४५॥

मग म्हणे घनश्यामगात्रा ॥ रामा माझ्या राजीवनेत्रा ॥ मज सांडोनि पवित्रा ॥ कैसा वना जाशील ॥४६॥

माझे पुष्पवाटिकेआंत ॥ राहें चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ कोणासी तूं न भेटें यथार्थ ॥ राहें गुप्त राघवा ॥४७॥

श्रीराम म्हणे माते ॥ तैसें नव्हे जाणें वनातें ॥ सत्य करावया पितृवचनातें ॥ दंडकारण्या जाईन मी ॥४८॥

पश्र्चिमेस उगवेल चंडकिरण ॥ परी मी न मोडीं पितृवचन ॥ होईन भाकेसी उत्तीर्ण ॥ नसे अनमान सर्वथा ॥४९॥

जन्मोनियां जनकपोटीं ॥ साच न करवे त्याची गोष्टी ॥ तरी अपकीर्तीनें सृष्टी ॥। भरोनियां उचंबळे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP